प्रतापगड भवानी !
तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे. श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये कोकण व घाटमाथ्याच्या सीमेवर असलेला जावळी प्रांत काबीज केला. संरक्षणदृष्ट्या या प्रदेशाची उपयुक्तता लक्षात घेऊन, सह्याद्री पर्वताच्या रांगेतील भोरप्या डोंगरावर असलेल्या पुरातन गढीच्या ठिकाणी महाराजांनी प्रतापगड या किल्ल्याची स्थापना केली. प्रतापगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३५४३ फूट आहे. महाबळेश्वरपासून हा किल्ला वीस किलोमीटर अंतरावर असून किल्ल्यापर्यंत वाहनांनी जाता येते. वाडा – कुंभरोशीपासून पायी किल्ल्यावर जाता येते. पूर्वी या किल्ल्यावर असलेल्या गढीस ढोपरा किंवा गुढ्यादुर्ग हे प्राचीन नाव होते. (शिवकालीन प. सा. सं. ३ नं. २६४०) १६५६ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. १६५७ मध्ये किल्ला पुर्ण झाला. शिवरायांनी महाराष्ट्रात बांधलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये हा किल्ला अभेद्य व उत्तम दुर्गशैलीचा मानला जातो. या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर याने शिवरायांचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली केले. मोरोपंतांनी या पूर्वी राजगड, रोहिडा व पुरंदर या किल्ल्यांचे बांधकाम केलेले होते. गडाच्या पायर्या चढून गेल्यावर प्रथम पश्चिमाभिमुखी मुख्य दुर्गद्वार लागते. या दुर्गद्वाराची बांधणी शिवकालीन मराठा शैलीतील असून, दरवाजाच्या दोन्ही बाजूस व्याघ्रमुखे कोरलेली आहेत. या दरवाजातून वर गेल्यावर पूर्वेकडे तोंड असलेला भग्न दरवाजा आढळतो. या दरवाजातून शिवाजीमहाराज अफझल खानाच्या भेटीस गेले होते. अफझल बुरुजाच्या बांधकामानंतर या दरवाजाचा वापर कमी होत गेला. प्रतापगड प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. वरचा बालेकिल्ला व खालच्या भागास खालचा किल्ला म्हणतात. खालच्या किल्ल्याचे क्षेत्रफळ ३२० यार्ड लांब व १२० यार्ड रुंद आहे. ही लांबी दक्षिणोत्तर असून रुंदी पूर्वपश्चिम बालेकिल्ल्याच्या तटापर्यंत आहे. किल्ल्यावर एकूण चार तलाव व दोन विहिरी आहेत. या खोदलेल्या तलावातील कातळाचा वापर किल्ल्याच्या भिंती व बुरूज बांधण्याकरिता करण्यात आला. गडावरील पायर्यांचे नूतनीकरण, १९५७ मध्ये पंडित नेहरूंच्या प्रतापगड भेटीच्या वेळी करण्यात आले. काही ठिकाणी मूळ उंच पायर्यांचे दर्शन होते. मुख्य दरवाजा ओलांडून उजवीकडे असलेल्या तलावापासून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जाणार्या मार्गाच्या डावीकडे श्री भवानीमातेचे मंदिर आहे.
तुळजापूरची तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. मंबाजी पानसरे व इतर जाणकार व्यक्तींना बिहार – बंगाल प्रांताच्या सीमेवर असलेल्या श्वेतगंडकी व त्रिशुलगंडकी, नद्यांच्या संगमाच्या परिसरात पाठवले तेथून दिलेल्या मोजमापानुसार काळ्या एकसंध पाषाणाची शिळा आणवून, निष्णात नेपाळी कारागिरांकरवी तुळजाभवानीची सुंदर मूर्ती घडवली. ही मूर्ती अष्टभुजा
महिषासुरमर्दिनीची आहे. या मूर्तीकरिता वापरलेला पाषाण काळा कुळकुळीत असून त्यावर सुवर्णरेखा उमटलेल्या आहेत. महाराजांनी चिरेबंदी देवालय बांधून त्यात १६६१ मध्ये अत्यंत श्रद्धापूर्वक व विधिवत मोठ्या समारंभपूर्वक मोरोपंत पिंगळ्यांच्या हस्ते भवानीमातेची प्रतिष्ठापना केली. भोसल्यांच्या परंपरागत कुलदैवताची स्थापना करून शिवरायांनी प्रतापगडावर नवे अधिष्ठान व पुण्यक्षेत्र वसवले. देवीच्या पूजेअर्चेसाठी व मंदिराच्या कायम व्यवस्थेकरिता व्यवस्थापक, पुजारी, पुराणिक, गुरव, चौघडेवाले आदींच्या नेमणुका करून त्यांना गडावर निवासस्थाने बांधून दिली. महाराजांनी अष्टभुजा आदिशक्तीस सालंकृत करून, उंची रेशमी जरीची वस्त्रे, सोन्याचा मुगुट अनेकविध अलंकार व पूजेची उपकरणी, भवानीमातेस अर्पण केली. येथे देवळात पूजापाठ, नैवैद्य व उत्सवही सुरू झाला. याचे सुंदर वर्णन सभासद बखरीत करण्यात आलेले आहे.
देवीचे देवालय प्रशस्त असून गाभार्याचे व रंगमंडपाचे काम शिवकालीन आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर गणेशमूर्ती आहे. चार ते साडेचार फूट उंचीच्या व तेवढ्याच रुंदीच्या सिंहासनावर तुळजाभवानी विराजमान आहे. ही रेखीव, तेजःपुंज, प्रसन्न मूर्ती दोन ते अडीच फुटांची असून या मूर्तीच्या उजव्या बाजूस कोनाड्यात, एक ते दीड फूट उंचीची महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती आहे. भवानीमातेच्या मूर्तीसमोर प्राचीन स्फटिकाचे शिवलिंग आहे. गडाचे बांधकाम करताना मोरोपंत पिंगळ्यांना हे शिवलिंग सापडले होते. गर्भगृहात छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज युद्ध मोहिमेअगोदर देवीच्या दर्शनास येत व ध्यानधारणा करीत असत. शिवराज्याभिषेकाच्या वेळी (२० मे १६७४) महाराजांनी भवानीमातेस सोन्याचे छत्र अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आढळते. मंदिराच्या छतावर शिशाचे आच्छादन सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या कारकीर्दीत (१८१८-१८३९) करण्यात आले. मंदिराच्या आवारात दोन शिवकालीन दीपमाळा असून वीज पडून त्यांचे थोडे नुकसान झालेले आहे. १९२७ मध्ये लागलेल्या आगीत या मंदिरातील कीर्तनमंडप व पुराणमंडपाचे नुकसान झाले तेव्हा सातारच्या छत्रपतींनी व फलटणच्या निंबाळकरांनी याचा जीर्णेद्धार केला. नुकतेच सातारच्या श्रीमंत छत्रपतींकडून या मंडपांचे अत्यंत सुंदर व कलात्मक नूतनीकरण करण्यात आलेले आहे.
मंदिरासमोर नगारखाना असून मंदिराच्या आवारात डाव्या बाजूस अनेक प्रकारच्या शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या सभोवती तटबंदीसारखी भिंत असून येथून भवानी तलाव व दख्खन बुरुजाचे दर्शन होते. डिसेंबर १९२९ मध्ये या मंदिरात मोठी चोरी झाली. या देवीचे लाखो रुपयांचे दागिने व रत्ने चोरीस गेली. या संदर्भात मुंबईच्या पठाणांच्या टोळीला भोर संस्थानात अटक करून त्यांच्यावर खटले भरून, १९३१ मध्ये शिक्षा देण्यात आली. या घटनेची हकिकत तत्कालीन ‘ज्ञानप्रकाश‘मध्ये प्रसिद्ध झालेली आहे.
छत्रपती संभाजीराजे, शाहु छत्रपती, ताराबाई व अनेक मराठा सरदारांची भवानीमातेवर नितांत श्रद्धा होती. संकटात धावून येणार्या या देवीच्या दर्शनास महाराष्ट्रातून हजारो भक्त या गडावर येतात. सातारच्या श्रीमंत छत्रपतींचे हे खासगी देवस्थान असून येथील व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. नवरात्रात येथे घटस्थापना, सप्तशतीचे पाठ, गोंधळ, कीर्तन, होमहवन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवकालापासून चालत आलेले पूर्वापार धर्मविधी सातारच्या छत्रपती घराण्याकडून अत्यंत धर्मबुद्धीने व भक्तिभावाने पार पाडले जातात. श्री भवानी मंदिरापासून बालेकिल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने व रहिवाश्यांची घरे आहेत. प्रतापगडाचा इतिहास कथन करणारे संस्कृती दर्शन संग्रहालय व तेथील स्लाईड शो प्रेक्षणीय आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून या दरवाजाव्यतिरिक्त बालेकिल्ल्यास आणखी तीन दरवाजे आहेत.
बालेकिल्ला ३० ते ४० मीटर उंचीच्या तटबंदीने वेढलेला असून आत महाराजांच्या सदरेचे व इतर वास्तूंचे अवशेष आहेत. आत केदारेश्वराचे मंदिर आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अनावरण केलेल्या श्री छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. किल्ल्यावर अफझल बुरूज, केदार बुरूज, यशवंत बुरूज, रेडका बुरूज, असे गनिमी युगतंत्रास उपयुक्त असे बुरूज आहेत. तसेच येथे अफझलखानाचा दर्गा व मुख्य दरवाजाच्या पुढे अफझल खानाच्या भेटीची जागा असून अफझलखानाचा वध महाराजांनी येथेच केला व इतिहासप्रसिद्ध युद्ध येथेच झाले. दर्याखोर्यांनी भरलेल्या गर्द वृक्षराजीने वेढलेला, श्री शिवरायांच्या कुशल युद्धतंत्राची साक्ष देणारा व आदिमाया, आदिशक्ती श्री भवानीचे अधिष्ठान असलेला प्रतापगड महाराष्ट्रातील दुर्गांमध्ये दुर्गश्रेष्ठ आहे.
प्रविण देशपांडे, ” देशपांडे – वाडा ‘ तांदळी खुर्द ता.पातुर जि.अकोला. (विदर्भ प्रदेश)