एक विलक्षण अनुभव पंढरीच्या वारीचा.

0

अगदी आजही वारीत असल्याचाच भास होतो. ‘माउली पुढे चला’ म्हणत वाट शोधणारे आम्ही. वारीत सहभागी होणारा प्रत्येकजण सकारात्मक आयुष्याची, समाधानाची वाट शोधत असतो. मिळेल ती वाट पकडायची आणि समोर चालत राहायचं. कारण ध्येय ठरलेलं असत. आत्मविश्वास असतो. त्यामुळे लहानग्यांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण वारीत स्वतःची ओळख पुसून टाकत फक्त वारकरी म्हणून सहभागी झालेला असतो. त्यामुळेच असेल कदाचित, पण वारीत प्रत्येकाचं वय समान वाटतं, अवघा भारत एकरूप वाटतो. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले वारकरी मनात घर करतात. त्यामुळे आपसूकच त्यांच्याविषयी आदर वाढतो, प्रेम वाढतं. पण वारी संपली आणि मग मला पुन्हा अनुभवायला मिळाला तो जात, धर्म, पंथ अशा अनेक कारणांनी विभागलेला भारत.

दुनिया के अजिब ही मेले है, दिखती तो भीड है !
लेकीन चलते सब अकेले है..

यावर्षी डिजिटल प्रभात कडून आळंदी ते पंढरपूर वारी कव्हर करण्याची संधी मिळाली. दरवर्षी पुण्यात येणारी वारी पाहणाऱ्या मला, ही वारी नवी नसली तर तिचा अनुभव मात्र नवा आणि आयुष्य समृद्ध करणारा होता. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून वारीचा प्रत्येक क्षण लोकांपर्यंत पोचवताना, ही वारी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक ठरली. आधुनिक मीडियामधील अपेक्षित बदल स्वीकारत इथे आम्हीच अँकर, आम्हीच रिपोर्टर, कॅमेरामॅन आणि आमचे मोबाईल म्हणजेच ओ.बी व्हॅन.

पुण्यातील वारीच्या मुक्कामापासून सुरु झालेला हा प्रवास, अनेक खेड्यापाड्यातून आलेल्या वारकाऱ्यांसोबत पहिल्यांदा संवाद साधण्याची वेळ, हे सगळंच नवीन होतं. वारकऱ्यांचे अफाट अनुभव ऐकून, त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीची जाणीव क्षणोक्षणी होतं होती. गाडगेबाबांच्या वेशात असणाऱ्या एका अवलीयाने दुष्काळ, स्वछता आणि युवकांचा वारीमधील सहभाग यावर ऐकवलेली सद्यपरिस्थिती ऐकून तर अंगावर काटा आला.

पुण्यातील पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आम्ही आमचा वारीचा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत सुरु केला, आणि वारकऱ्यांसाठी आवाहनात्मक असणाऱ्या टप्प्यात, म्हणजेच दिवेघाटात माऊलींच्या पालखीचे शूट केले. आम्ही दिवेघाटात सकाळी ११ वाजता पोहचलो आणि माऊलींची पालखी आली ४ वाजता. हा पहिलाच दिवस असल्याने दिवेघाटात वार्तांकन केल्यानंतर वारीत नको जायला असाही विचार मनात आला, कारण जोरदार पाऊस. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आम्ही पूर्ण भिजलो होतो, त्यामुळे ‘हे जमणार नाही, परत जाऊयात’ असे विचार मनात यायला सुरवातही झाली होती. मात्र कोसळणाऱ्या पावसातही केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही भौतिक गरजा नसताना वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना पाहून ‘जमेल आपल्यालाही’ हा प्रोत्साहनाचा डोस मिळल. त्यामुळे आता पंढरपूर गाठायचेचं हा निर्णय मनात पक्का झाला. दिवेघाटाच्या या कव्हरेजने वाटेत किती खडतर समस्या येऊ शकतात, याची झलक दाखवली होती. त्यामुळे आम्ही सासवडच्या दिशेने तयारीनिशी निघालो. आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आजवरचं आयुष्य विदर्भात घालवल्या माझ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचं हे रूप नवं होतं.

हलक्याश्या पावसाच्या सरी, गार हवा आणि पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वारकऱ्यांसोबत ‘माउली माउली’च्या गजरात आमचा प्रवास सुरू होता. वारकऱ्यांच्या बरोबरीने गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण या कसरतीमध्ये आम्ही यशस्वी झालो. सासवडला शिवाजी महाविद्यालयात आमचा मुक्काम होता. यापूर्वी फक्त शाळेत असताना स्काऊट गाईड व एनएनसीसी’च्या कॅम्प मध्ये बाहेर राहण्याचा अनुभव होता पण वारीचा अनुभव पहिल्यांदा घेत होतो.

रोज नवीन गाव, नवीन परिस्थिती, बदलते हवामान ही सर्व आव्हाने डोळ्यासमोर होती. सासवड मधील मुक्काम संपल्यानंतर हे सर्व वारकरी म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे असं वाटायला लागलं. एकेमेकांची नावही न विचारता निर्माण होणारं, प्रेम, जिव्हाळा अतूट असणारे नाती यामुळे अनुभवायला मिळाली. आडनावरून जातीचा निष्कर्ष लावणाऱ्या लोकांसाठी वारी ही एक मोठी चपराक आहे. कारण इथं कोणी तुम्हाला तुमचा जात,धर्म विचारात नाही. माणसाने माणसांसोबत कसे जगायचं हे वारी उत्तम प्रकारे शिकवते.

सासवडमध्ये पालखीचा दोन दिवस मुक्काम होता. संध्याकाळी पालखी तळावर जाऊन काही वारकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. यादरम्यान, वारीमध्ये भाषिक, धार्मिक असा कोणताही भेद नसतो हे जाणवलं. हल्ली भाषेच्या शुद्धतेमुळे एकमेकांना डिवचणाऱ्या लोकांनाच अनुभव पाहता, वारीतील हे भाषाच वैविध्य मोहात पाडणारं होतं. या मुक्कामात आम्ही काही बंजारा समाजातील महिला वारकऱ्यांशी सवांद साधला. त्यांनी त्यांचा भाषेत काही मधूर भजन ऐकवली. परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता विठ्ठलाप्रती असणार वारकऱ्यांचं निस्वार्थ प्रेम मन जिंकून घेत.

‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी…’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे यामध्ये वयाची सुद्धा मर्यादा नसते. खरा माणुसकीचा धर्म हे वारकरी जगत असतात आणि हाच वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. त्यामुळे वारीही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

लाखो भाविकांना कोणी न बोलावता ते या सोहळ्यात सहभागी होतात. एका कुटुंबाप्रमाणे अनोळखी लोकांसोबत राहतात. हे सर्व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेतून हे उमजतं. परमात्म्यास बद्ध करण्याची ताकद वारीतील भक्तीत आहे. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे

Wari anubhav

‘विठ्ठल टाळ। विठ्ठल दिंडी।।
विठ्ठल तोंडी उच्चारा। आणि शेवटी
विठ्ठल अवघा भांडवला।।

सासवडचा मुक्काम आटपून आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने, वारकऱ्यांच्या दिंडीसोबत आम्ही आमची वाट शोधात होतो. माउली माउली चा जयघोष, टाळ मृदूंगाच्या निनादात आमचा रस्ता कसा सर व्हायचा हे आम्हाला सुद्धा कळायचे नाही. वाटेत पालखी यमाई शिवर या ठिकाणी विसाव्यास थांबली. त्या ठिकाणी वारकऱ्यांचा नाष्टा, काही वेळ आराम होता. याठिकाणी काही महिला वारकऱ्यांची मुलाखत घेऊन आम्ही जेजुरीकडे प्रस्थान केले.

जेजुरीच्या भक्तीनिवास मध्ये आमचा मुक्काम होता. मी पहिल्यांदा हा सर्व परिसर पाहत होतो. त्यामुळे जेजुरीच्या गडावर पहिल्यांदा चढण्याची उत्सुकता मनामध्ये होती. निवासाच्या ठिकाणी आमच्या बॅग ठेवून आम्ही गडाच्या दिशने निघालो. आधीच भरपूर दमलेलो मात्र ऊत्सुकतेपुढे थकवा निघून गेला आणि आम्ही अखेर गड सर केला. त्यानंतर आम्ही गडावर भाविकांची गर्दी जमल्यामुळे काही स्टोरी करून गडावरून दिसत असलेले नैसर्गिक सौन्दर्य नजरेने टिपले. गडावर नेटवर्क असल्यामुळे काही व्हिजव्हल ऑफिसला पाठवले. कारण ज्या ठिकाणी पालखी थांबायची त्या ठिकाणी नेटवर्क जॅम व्हायचे त्यामुळे आमची मोठी दमछाक व्हायची.

जेजुरीचा मुक्काम संपवून आम्ही (१ जुलै) वाल्मिकी ऋषींचे वाल्हे गावाच्या दिशने निघालो. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आजूबाजूने उसाची शेती. एकूण बारा वाड्या व पाच वस्ती असलेले हे गाव आहे. आमचे वार्ताहर समीर भुजबळ यांच्याकडे आमचा मुक्काम होता. अल्हाददाक वातावरण असलेले गाव, माझा पहिलाच भाग असल्याचे मी हे सर्व दृश्य नजरेनें टिपत होतो. वाल्हे चा मुक्काम संपल्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव अश्या गावांमध्ये माणूसपण असणाऱ्या माणसांसोबत वारी अभुभवता आली. भेंडीशेगाव पूर्वी, तोंडले-बोंडले या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई यांच्या पालख्यांची भेट होती. सर्व वारकऱ्यांसाठी हा अभूतपूर्व क्षण असतो. अगदी अंगावर क्षहारे येतात. सलग वारीसोबत असल्यामुळे संतांच्या कथा ऐकण्यात आल्या. त्यामुळे त्याग काय असतो, याची प्रचिती आलेली. त्यामुळे हे सर्व मी मोट्या मोठ्या उत्साहाने अनुभवत होतो.

भेंडीशेगावचा मुक्काम संपल्यानंतर आम्ही थेट वाखरी गाठली. तोंडले-बोंडले पासून मला चांगलाच हिवताप आलेला. मात्र ध्येयापर्यंत पोहचलो या आनंदामुळे ताप जाणवला नाही. वाखरी म्हणजे आम्ही पंढरपूरच्या समीप आलेलो. वाखारीच रिंगण आटोपून आम्ही थेट पंढरपूर गाठले. भक्तांचा मेळा लागलेला. नजर जाईल तिथपर्यंत फक्त वारकरी. हल्ली दंगा, जाळपोळ, राजकीय सभेला जबरदस्ती माणसे जमतात. पण मी पहिल्यांदा ना कोणतं आमंत्रण, ना कोणत्या बोलावण्या शिवाय जमलेली माणसांची जत्रा पाहत होतो.

दुसऱ्या दिवशी एकादशी होती. त्या रात्री फक्त एक तास झोपून लगेच रात्री १ वाजता विठ्ठल मंदिरात गेलो. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी येतात. त्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. आणी परतीचा प्रवास सुरु केला. १५ दिवस केलेला प्रवास आम्ही ५ तासात केला. पूर्ण रस्ते ओसाड होते. जिकडे तिकडे शांतता. ज्या ठिकाणी पालखी विसावा घेत होती ते ठिकाण बघितले कि मन भरून येत होत. पण आजही जय हरी, माउली शब्द कानी पडले तर वारीत असल्याचा अनुभव होतो. पंढरपूर सोडताना एवढच सांगेन एकदा तरी वारी अनुभवावी…

-संदीप कापडे
उपसंपादक(ऑनलाईन विभाग), दैनिक प्रभात पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.