हलबल पितामह

लेख

0 909

अचानक त्याला आठवण झाली… त्या भिष्माची. तोसुद्धा होता पितामहच. स्वकीयांमुळे शरपंजरी पडलेला. प्रचंड आदर मिळकतीला असलेला पण आदेशातील धार गमावून बसलेला. अशा वेळी पितामहाने काय करावे?  पुन्हा शस्त्रे हाती घेऊन उतरावे रणसंग्रामात की निवांत पडून राहावेे, शरपंजरी.

Bheeshm.

आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने गेल्यावेळी रणदुदुंभी वाजण्यापूर्वी नव्यानेे केली होती आणि काळे कभिन्न ढग दाटून आलेले, आजुबाजुच्या प्रचंड डोंगरांना धगधगत्या वणव्याने कवेत घेतले असल्याने आधीपासूनच खिन्न, उदासवाणे वाटणारे वातावरण अधिकच उदासवाणे झाले. कोणे एकेकाळी आपल्या भात्यातील एकसे एक शरांनी शत्रुपक्षाची गाळण उडविणारा, आपण म्हणजेच यश आणि आपण म्हणजेच विजयश्री हा रणभूमितील पामरांचा विश्‍वास सार्थ ठरविणारा पराक्रमी योद्धा… एकाच म्यानात दोन नव्हे तर अनेकानेक तलवारी ठेवण्याची आणि त्या समर्थपणे वेळ – काळ पाहून काढण्याची खास कला अवगत असलेला वीर… ज्याच्या तरवारींचीच नव्हे तर म्यानांचीही भीती प्रतिपक्षाने बाळगावी, म्यानातून कोणती तलवार केव्हा बाहेर येईल याचा अंदाज दस्तुरखुद्द बाहेर येईतो तरवारींंनाही नसावा इतका कुशल, वाक्बगार, चपळ लढवय्या… प्रतिपक्षाच्या सेनापतींनी ज्याला तेल लावलेला पैलवान म्हणून गौरवावे, मैद्याचं पोतं म्हणून हिणवावे… कशाचाच त्याच्या सत्तेची कवच कुंडलं असलेल्या मनावर कधीच परिणाम झाला नाही. तोच वीर, योद्धा, लवय्या… आज सह्याद्रीच्या कुशीत खिन्न मनाने एकेक पाऊल टाकत शतपावली करीत होता. आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने नुकतीच केली होती. थेट रणातून माघार घेतली तरीही रणांगण गाजवून सोडणारे त्याचे अनेक उत्तराधिकारी आहेत की. त्यातील कोण रण गाजवेल, याचही अंदाज त्याला आहे. त्यामुळे त्याची पावले ठामपणे पडत आहेत, आजही. पण त्या पावलांची दिशा कधीच कोणाला कळली नाही, तशीच ती आज अशा खिन्न वातावरणातही कळत नाहीये.
सत्ययुगात जेे झाले, त्रेता युगात जे घडले तेच आज घडतेय का? असा प्रश्‍न साक्षात इतिहासाला पडलाय. सत्तेच्या पाशांनी सगळे – सगळे संबंध खिळखिळे होताहेत की सत्तेचे पाश विजेत्याच्या प्रतिमेला आवळू पाहताहेत. या पाशांनी कायम सोबत केली, आपल्याला. अगदी ’वसंता’च्या बहरातसुद्धा. अचानक कोण्या एका पहाटे तो सूवर्ण खंजिर कामी आला होता, क्षणार्धात शत्रू आणि मित्र पक्षांमध्ये झुंबड उडाली, पळापळ करणारे भानावर आले त्यावेळी भल्या पहाटे हाच योद्धा होता स्थानापन्न त्या सिंहासनावर… झाली त्यालाही आता तब्बल चार दशकं. या महाराज्यावरील नजर कधीच हटली नाही, इतक्या वर्षात. ऐन रणभूमित आपण विरोधात ठाकलो असतानाही प्रतिपक्षातील एका विजेत्या योद्ध्याने आपणच त्याचे सारथ्य केल्याची जाहीर कबुली दिली होती, प्रजाजनांना तेव्हा आश्‍चर्य वाटले. पण आपण कधीच कुटुंब – कबिल्याचा विचार क्षणभरही दूर होऊ दिला नाही. अनेक सेनापती तयार झाले, प्राणपणाने लढणारे सैनिक तयार झाले पण कधीच आपल्या अढळस्थानाला धक्का लावण्याचे धारिष्ट्य कोेणाच्या ठायी निर्माण होणार नाही, याची आपण काळजी घेतली. धक्का लावण्याची शक्ती मिळवू पाहणार्‍या भल्याभल्यांना धक्क्याला लावले. अरेरे… पण आज हे अचानक असे का व्हावे??? त्याचे विचारचक्र क्षणभर थांबले.
आपल्याच जवळचे, अतिजवळचे सगळे तरुण नेतृत्वस्थानी बसवणे म्हणजेच नव्या नेतृत्वाला संधी देणे. सत्तेच्या पाशात गुंतून या महाराज्यातील अनेक कुटुंबांमध्ये उभी फूट पडली. अर्थात प्रजा म्हणते त्यात आपलाच हात असतो, असो. प्रजा काय काहीही म्हणते. परंतु, आज प्रथमच अर्धा शतकातील चौदा युद्धांतील यशानंतर एक पाऊल मागे घ्यावे लागलेय. नव्या सळसळत्या रक्ताने हट्टाने पेटून रणांगणात उतरण्याचा निर्णय खरा करून दाखवला. काही काळापूर्वी ’पार्थ’ आक्रमक झाला होता, आता या पिढीचा तोच बाणा, तोच विचार ’अजित’ ठरू पाहतोय. कर्मण्येवाधिकारस्ते… त्याला मान्यच नसल्याच्या आविर्भावात त्याने मिळवूनच घेतले, त्याला हवे होते ते. पार्थाच्याही नशिबी कायम स्वकियांविरुद्धची लढाईच असते का? पण स्वकीयांशी लढाईत पार्थ कायमच ’अजित’ ठरतो?, ठरेल? अशा प्रश्‍नांचे काहून माजलेय त्याच्या मनात. आपणच कर्ते आणि करविते, आपणच नेते आणि नेतृत्व, आपणच श्रेष्ठ आणि श्रेष्ठीही असेच आजवर वाटत होते. तेच तर सत्य होते, कारण आपल्याला ते मान्य होते. आज अचानक असे का व्हावे, सारीपटाच्या सगळ्याच घरांमध्ये ज्याच्यासाठी अनेक प्याद्यांची फौज कामी येते, भल्या – भल्यांना हत्ती गारद करतो, उंटाची तिरकी चाल अचंबित करते विरोधकांना फक्त आणि फक्त आपले राजेपण जपण्यासाठी. आपणच त्या पटावरील नायक हा आपला समज आणि प्याद्यांचा विश्‍वास दोलायमान व्हावा? प्यादे, उंट, हत्ती, वजिराच्या गर्दीतील आपण राजे नव्हे तर कोणीतरी दुसर्‍यानेच मांडलेल्या सारीपटावरील प्यादे आहोत? केवळ अशक्य… पण मग चार दशकांपूर्वीचा सगळाचा सगळा इतिहास का असा सूड उगवतोय? अशी खूप फोडाफोडी आपण पाहिली, हे आपण गर्वाने सांगतोय, ते समोरच्या प्याद्यांमध्ये बळ येण्यासाठी. अशा एखाद्या वाक्यानेच तर ते बिच्चारे एक – एक घर पुढे सरकत असतात. पण अशा खूप पाहिलेल्या फोडाफोडीमागे आपणच होतो, हे सांगून टाकावे का आता? असे अनेक विचार त्याच्या घायाळ झालेल्या मनात घोळत होते. आणि अचानक त्याला आठवण झाली… त्या भिष्माची. तोसुद्धा होता पितामहच. स्वकीयांमुळे शरपंजरी पडलेला. प्रचंड आदर मिळकतीला असलेला पण आदेशातील धार गमावून बसलेला. अशा वेळी पितामहाने काय करावे? काय करावे… पुन्हा शस्त्रे हाती घेऊन उतरावे रणसंग्रामात की निवांत पडून राहावेे, शरपंजरी.

  • विशाल राजे

जेष्ठ पत्रकार,स्तंभ लेखक, रायगड. www.vishalraje.com

Leave A Reply

Your email address will not be published.