श्रीदेवनाथी भिक्षा परंपरा : सामाजिक समरसतेचा मंत्रघोष

धर्म

0

अंजनगाव सुर्जी हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. येथे १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता. अंजनगाव आणि सुर्जी ही दोन वेगवेगळी गावे. शरनिऱा नदीच्या अलीकडच्या काठावर अंजनगाव तर पलीकडे सुर्जी वसले आहे. आज या नदीवर शहानूर धरण बांधले गेले आहे. पांडव अज्ञातवासात असताना विराट राजाच्या नगरीत वास्तव्याला होते. अर्जुनाने त्याच्या धनुष्यातून जमिनीत बाण मारला. त्या ठिकाणाहून पाण्याची धार प्रकट झाली. तो अखंड प्रवाह शरनीरा म्हणून ओळखला गेला, अशी आख्यायिका आहे. रामदूत हनुमंत यांच्या मातोश्री अंजनीमाता हनुमंत जन्माच्या आधी या क्षेत्री काही काळ वास्तव्यास होत्या त्यामुळे हे क्षेत्र अंजनीग्राम ( अंजनगाव ) म्हणून ओळखले जाऊ लागले अशीही आख्यायिका जनमानसांत रुढ आहे. पैठणमधील सत्पुरुष शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराजांच्या परंपरेतील श्री देवनाथ महाराज यांचा जन्म सुर्जी अंजनगाव येथेच झाला. आपल्या विदर्भात पैठणच्या एकनाथ महाराजांची दत्त प्रासादिक एका जनार्दनीं पीठ परंपरा श्रीदेवनाथ महाराजांनी सुर्जी अंजनगाव या तालुक्याच्या ठिकाणी १७५४ मधे स्थिर केली. मोगल काळात फिरते राहीलेले पीठस्थान परब्रह्म महारूद्र सद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांनी सुर्जी येथे स्थिर केल्यामुळे या परंपरेस देवनाथी परंपरा , देवनाथ मठ , श्रीनाथ पीठ या अनेकविध नामाभिधानाने ओळखले जाते. देवनाथांच्या गुरूंचे गुरू गोपाळनाथ यांच्या आई आनंदीबाई या ज्येष्ठ पुत्र रामचंद्र याचा शोध घेण्यासाठी बराच प्रवास केल्यानंतर अंजनगावात शिवराम ब्राम्हण यांच्याकडे वास्तव्यास होत्या. शिवराम ब्राम्हण हे पानिपतच्या लढाईच्या वेळी प्रसिद्धीला आलेले जानोजी भिताडे यांचे पुत्र होते. त्यांचा वंश आजही अंजनगाव सुर्जीत आहे. इंग्रज आणि भोसले यांच्यातील देवगावच्या तहानंतर जाचक अटींमुळे भोसल्यांची अवस्था बिकट झाली होती. दौलतराव शिंदे यांनी इंग्रजांशी अंजनगाव सुर्जी येथे तह केला. या तहानुसार उत्तरेकडील मोठा मुलूख इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला होता. ‘सुर्जी अंजनगावचा तह’ म्हणून इतिहासात तो ओळखला जातो. शहानूर नदीच्या काठावर सुर्जी या शहरात पुरातन असा मठ आहे. या मठाला सहाशे वर्षांची भक्तीपरंपरा लाभली आहे. सहा शतकांपासून ही गुरू-शिष्यपरंपरा अखंडितपणे सुरू आहे. देवनाथ मठ म्हणून हा परिसर ओळखला जातो. आज समस्त भारतवर्षात हे स्थान श्रीनाथ पीठ , श्रीनाथ सदन , श्रीदेवनाथ मठ या नावाने सुविख्यात आहे. दत्त प्रासादिक पीठ परंपरा -दत्तात्रेयांचे अधिष्ठान , सगुण सुंदर विग्रहस्वरूप माधव मंजिरी ( राधाकृष्ण ) कुलदेवता आणि हनुमंत उपास्य दैवत म्हणजेच ज्ञान , भक्ती आणि कर्म असा त्रिवेणी संगम सुर्जी मठात नित्य नांदत आहे. श्रीदेवनाथ महाराजांपासून आजतागायत हे पीठस्थान समाजाभिमुख राहीलेले आहे. हिंदु समाजातील अठरापगड ज्ञाती समुदायाला एकत्र करून गेली ६०० वर्षे अखंड असिधारा व्रताप्रमाणें ही देवनाथी परंपरा साधकशिष्य समुदायाला प्रपंचातून परमार्थाकडे नेत कंटकाकीर्ण बिकट वाटेवरून सन्मार्गाची शतपावली घालून घेत आहे.
भारत वर्षातील तत्कालीन समस्त साधू -संत- महंत -शंकराचार्य यांचे सुर्जीच्या श्रीदेवनाथ मठात नित्य येणे असायचे. देवनाथ मठात स्वामी समर्थ महाराज , शेगावचे गजानन महाराज , शिर्डीचे साईबाबा , डॉ हेडगेवार , लोकमान्य टिळक आदी अनेक संत सत्पुरुष येऊन गेल्याची नोंद आहे. समाजातील सज्जनशक्तीला भक्ती आणि शक्तीरूपी पोषण देऊन अधिकाधिक बळकट करण्याच्या आपल्या ईश्वरप्रदत्त कर्त्यव्यापासून ही परंपरा कोणत्याही परिस्थितीत तसूभरही ढळली नाही. म्हणुनच नागपूरकर भोसले ,पुण्याचे पेशवे , ग्वाल्हेरचे शिंदे , हैद्राबादचा निजाम , एलिचपूरचा नवाब अशी तत्कालीन राजघराणी श्रीनाथ पीठाशी आमचे गुरुघर या नात्याने शिष्यत्व पत्करून समाजापुढे वावरत होती. जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंदनाथ , कृष्णनाथ, विश्वनाथ, मुरारनाथ, रंगनाथ ,गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरूपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ, मनोहरनाथ आणि विद्यमान पीठाधीश असलेले श्रीजितेन्द्रनाथ, ही शिष्यपरंपरा अखंडपणे कार्य करीत आहे.

देता घेता हरीच अवघा I मार्ग अभेदाचा I सोहळा न्यारा भिक्षेचा II

  1. जहागीर नव्हे- जंजीर’ असे म्हणत, पुणेकर पेशव्यांनी लेखी करून दिलेली, साठ हजारी जहागीर नम्रपणे नाकारताना, सुर्जी पीठाचे संस्थापक परब्रह्म महारुद्र सद्गुरू देवनाथ महाराज म्हणतात, आम्ही गुरुपरंपरेचे पथिक, भिक्षा हे आमचे जीवितव्रत, तेव्हा जहागिरीचा अंगीकार करणे आम्हासाठी पापकर्म. सद्गुरू कृपेने भरभरून भरलेली आमची झोळी आणि आमचा फकिरी बाणा, हेच आमचे वैभव. पेशव्यांनी बहाल केलेला पालखी पदस्थाचा मान तेवढा स्वीकारून, चार पालखी वाहकासह एक पालखी, जगू आणि गणू हे दोन सेवक तद्वतच लक्ष्मी घोडी, इतक्यांचा नम्रपणे स्वीकार करीत, नाथांनी आपल्यातल्या साधुत्वाचा परिचय पुणेकर पेशव्यांना करून दिलेला दिसतो. स्वार्थ आणि परमार्थ यातील अवघड व मोहमयी अदृश्य सीमारेषा म्हणजे अनाकलनीय अनुत्तरित प्रश्न. देवनाथांनी या जटिल प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून जगापुढे मांडलेले आहे, राजसत्तेची राजमान्यता मिळूनही राजाश्रयाच्या सुवर्णबेडीत न अडकलेले एकमेव संत म्हणजे श्रीदेवनाथ महाराज. दान ,देणगी,वर्गणी अश्या कुठल्याही पाशात न अडकता आपल्या एका जनार्दनीं दत्त प्रासादिक भिक्षा तत्वाचा अवलंब श्रीदेवनाथ मठात आजतागायत सुरु आहे. भगवान दत्तात्रेयाने प्रदान केलेली अक्षय झोळी , छडी ,चिपळ्या आदी प्रासादिक लेणी आजही सुर्जी मठात जतन केल्या असून विद्यमान पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराज जेव्हा पीठ नियमानुसार भिक्षा परंपरेचे पालन करण्यास निघतात तेव्हा त्यांच्या खांद्यावरील त्या अक्षय झोळीचे दर्शन असंख्य नाथभक्तांना होते. दत्तपीठाचे संकेतानुसार आजही दर शनिवारी देवनाथ महाराजांची भिक्षाफेरी सुर्जी परिसरात फिरून असंख्य मुमुक्षु साधकांना भक्ती आणि वैराग्याचे दर्शन घडवून देत असते. ब्रह्मलीन सदगुरु मनोहरनाथ महाराज हे स्वतः आपल्या पारंपारिक वेषभूषेसह अक्षय झोळी घेऊन गुरुवर्य गोविंदनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीला ( फाल्गुन शुद्ध नवमी ) जोडून पाच दिवस महाभिक्षेला निघत. त्याच महाभिक्षा परंपरेचे पालन सदगुरु मनोहरनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त ( फाल्गुन शुद्ध तृतीया ) विद्यमान पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराज प्रतिवर्षी करीत असतात. मुळात दत्त परंपरेत भिक्षा दान , देणगी , दक्षिणा मागण्याचे साधन नसून ते त्याग, तपस्या आणि वीतरागी जीवनव्रत आहे. येथे भिक्षा घालणारा आणि स्वीकारणारा दोघेही श्रीहरी नारायण स्वरूप मानले गेले असल्याने भिक्षा मोक्षप्राप्तीचे साधन मानले गेले आहे.
    आपल्या पूर्व पीठाधीशांच्या पुण्यतिथी निमित्त निघणारी देवनाथ मठाची महाभिक्षा परंपरा खरे तर सामाजिक समरसतेचा अर्थ कृतीतून जोपासणारी अभिनव संकल्पना आहे. सुर्जी अंजनगावच्या प्रत्येक घरातील सदस्य दत्त प्रासादिक झोळीला श्रद्धापूर्वक निमंत्रण देऊन आपल्या घरात येण्यास विनंती करतात. पुण्यतिथीचे अगोदर सतत पाच दिवस महाभिक्षा फेरी मठातून सकाळी ९ ला प्रारंभ होते आणि कोणताही विश्राम न घेता सायंकाळ नंतर मठात परत येते. आचार्य जितेंद्रनाथ महाराज स्वतः या महाभिक्षा फेरीचे नेतृत्व करीत अक्षय झोळी घेऊन गोविंद राम गोविंद गजर करीत मार्गक्रमण करतात. Shree Jitendranath Maharajयावेळी मठातील सेवाधारी मंडळी , अनेक गणमान्य आणि नाथ महाराजांच्या भिक्षाफेरीत सहभागी होण्यासाठी आलेले अनेक परगावचे लोक देखील सामील असतात. केवळ जाती-वर्ण आदी शुल्लक भेदांपायी हिंदू समाजाची शतकानुशतके वाताहत झाली. मात्र कोणताही भेदाभेद न मानता समाजातील प्रत्येक घरात श्रीजीतेंद्रनाथ महाराजांची भिक्षा पोहोचते. घरातील मंडळी तर साधू संत येती घरा या उक्तीप्रमाणे नाथांचे औक्षण , स्वागत करतात. झोळीला निमंत्रण असल्यांने घरात जाऊन भिक्षेचे पारंपरिक भजन प्रत्येक घरात गायले जाते त्यांनतर भिक्षेचा स्वीकार केल्या जातो. केवळ भिक्षा घेऊन ही फेरी पुढे निघत नाही तर या निमित्ताने घरातील प्रत्येक सदस्याचे क्षेम कुशल सुख दुःख नाथ महाराजांना समजते. अनेक माहेरवाशीणि या निमित्ताने घरी आलेल्या असतात. हिंदु समाजाचे शक्तिकेंद्र परिवारसंस्था आहे, परिवार सशक्त राहील्यास समाजाला देखील नव्या तेजाची भरारी प्राप्त होते परिवार प्रबोधनाचा हाच उद्देश महाभिक्षा फेरीतून न कळत साधला जातो. सामाजिक समता -समरसता या केवळ बोथट झालेल्या शब्दांना देवनाथ मठाच्या महाभिक्षा फेरीतून भक्तीचा ओलावा प्राप्त होत असतो. देवनाथ मठातील पुण्यतिथीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगू गणू पूजन. वर उल्लेख केल्याप्रमाणे देवनाथ महाराजांनी पेशवाई जहागीर अव्हेरून जगू गणू नामक स्वीकारलेल्या दोन भैरववीरांचे पूजन. देवनाथांचे आणि नाथ परंपरेचे धर्मवीर रक्षक म्हणून जगू गणू महाराजांना स्थान आहे. देवनाथ महाराज मठात नसतांना लुटारुंनी केलेल्या हल्य्यात मठ स्थानाचे रक्षण करतांना वीरमरण प्राप्त झालेल्या श्रीनाथ सांप्रदायिक शिष्यद्वयांप्रति कृतज्ञता अर्पण करण्याचा सोहोळा पुण्यतिथीला केल्या जातो. तत्कालीन समाजात स्पृश्यास्पृश्यतेचे अवडंबर माजले असताना विप्रेतर जणू गणू वीरांना मठातील अश्वत्थ वृक्षावर सदैव विराजमान करण्याचा वरप्रसाद देवनाथांनी दिला. आजही पूर्व पीठाधीशांच्या पुण्यतिथीस विप्रेतर दोन युवकांना जगू गणू स्वरूप मानसन्मानाने आमंत्रण दिल्या जाते. खुद्द पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज जगू गणू पूजन करतात. देवनाथ मठातील जगू गणू पूजन म्हणजे कोणतेही भाषण न देता सामाजिक समरसतेचा उच्चरवाने केलेला सामूहिक जयघोष आहे.

बरोबर १२० वर्षांपूर्वी १८९८ मधे सद्गुरू साईनाथ महाराज यांचे प्रत्यक्ष आगमन सुर्जी अंजनगावच्या या प्राचीन श्रीनाथ पीठात झाले होते. त्यावेळी श्रीनाथ पीठावर समर्थ सद्गुरू श्रीभालचंद्रनाथ महाराज विराजमान होते. साईनाथ महाराज आणि सद्गुरु श्रीभालचंद्रनाथ महाराज यांचे दत्त सांप्रदायिक संबंध तत्कालीन समाजमनाचा ठाव आणि हृदयातील भाव टिपणारे होते. साईनाथ महाराज हे सद्गुरू भालचंद्रनाथ यांना बडेभय्या असे संबोधन करीत. प्रत्येक भेटीच्या वेळी साईनाथ महाराज सुर्जी मठातील श्रीदत्त प्रासादिक अक्षय झोळीतून एक मूठ तांदुळ भिक्षा म्हणून आपले सोबत शिर्डीस घेऊन जात. १८९८ पासून सद्गुरू भालचंद्रनाथ महाराज यांच्या निर्याणापर्यंत (१९११ ) पर्यंत साई आणि नाथ महाराज यांच्या प्रत्यक्ष भेटी सुर्जी मठात होत होत्या.
देवनाथ मठ प्रसिद्धीपराङ्मुख असले तरीही श्रीदेवनाथ पीठाचे विद्यमान अधिपती आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच देव देश धर्मासाठी मठाची व्याप्ती आणि कीर्ती समस्त भारतात आपल्या कार्याद्वारे पोहोचवली आहे. तुकाराम महाराज गाथा पारायण सोहोळा , देवनाथ महाराज विग्रह स्थापना , अमरावती येथे संपन्न संत -भाविकांचा महाकुंभ आणि या सगळ्यावरील कळस म्हणजेच २०१६ साली नागपुरात संपन्न झालेला ऐतिहासिक धर्मसंस्कृती महाकुंभ होय.
घराघरात राष्ट्रमाता जिजाऊप्रमाणे माता भगिनींचे निर्माण करण्यासाठी स्थापन झालेले विश्वमांगल्य सभा हे संघटन तर आता अखिल भारतात याच देवनाथ मठाची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन आपल्या विस्तारकक्षा रुंदावत आहे. श्रीदेवनाथ मठाच्या सांप्रदायिक उपासना , युवा शिबिरे , उत्सव यासोबतच श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास-अंजनगाव , देवनाथ वनबंधु छात्रावास, देवनाथ वेद विद्यालय आणि प्राच्य विद्या अनुसंधान केंद्र -नागपूर, श्रीनाथ वैदिक -वारकरी प्रतिष्ठान अमरावती, श्रीदेवनाथ नेत्र चिकित्सालय ,श्रीनाथ रुग्णवाहिका सेवा – मेळघाट ,श्रीनाथ चल चिकित्सालय आदी सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून समाजहित सर्वोपरी हाच वस्तुपाठ श्रीदेवनाथ मठाने घालून दिला आहे.
जितेंद्रनाथ महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास

उभा द्वारी मी घेऊन झोळी कणवा तू घ्यावी
सद्गुरुनाथा प्रेमे सन्मती भिक्षा घालावी

भवकल्लोळी जितेंद्रनाथा अद्वैती रमवी
मनोहरनाथा प्रेमे एवढी भिक्षा घालावी

सदगुरु मनोहरनाथ महाराजांच्या पुण्यतिथनिमित्त देवनाथ मठातील या सामाजिक समरसता संदेश देणाऱ्या अभिनव सोहोळ्यास विनम्र अभिवादन.

*प्रा.डॉ. भालचंद्र माधव हरदास*, नागपूर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये आचार्य. ?राष्ट्रीय वाचनालय सांस्कृतिक मंडळ सदस्य ?विश्वमांगल्य सभा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ?नवयुग आणि पंडित बच्छराज व्यास शाळेचे संचालन करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह. ?आजपर्यंत १८० हुन अधिक हिंदी- मराठी-संस्कृत रचना केल्या आहेत ?विविध वृत्तपत्र आणि नियतकालिके यातून स्तंभलेखन सुरू आहे ?तरुण भारत रविवार आसमंत पुरवणीत *उत्तरायण* स्तंभलेखन. ? दैनिक हिंदुस्थान अमरावती मध्ये *चिंतन* साप्ताहिक सदर. ?राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

Leave A Reply

Your email address will not be published.