श्रीशारदास्तवन |
जयोस्तुते जयोस्तुते श्रीशारदे
वंदे त्वां वंदे त्वां वाग्मि वरदे !
आदिमाया, तू सरस्वती
सकलजनांची ज्ञानस्फुर्ती
बुद्धी दे, तू तेज दे
शक्ती दे, तू भक्ती दे
सत्यशिव सुंदरचा ध्यास दे ।।१।।
कलारसिकता, चेतना, सत्संग दे
कोवळ्या मनास या इंद्रधनूचे रंग दे
तेजोमयी तू शब्दसुन्दरी, तारी
मज अज्ञानतेच्या अंधारातुनी ।।२।।
पाटी, पुस्तक, लेखणी, चितशुद्ध
आणिक ही बोबडी वाणी
घेऊनि उभा तव मंदिरी
ज्ञानवृक्ष हा नव अंकुराचा
होऊनी भिडू दे गगनावरी ।।३।।
अक्षरयज्ञ आरंभितो
तुज नमन करुनि ज्ञानदे
आशीष दे भगवती
देहि मे जयम् ।
देहि मे जयम् ।
माते मी तव अंकूरम् ।
माते मी तव अंकूरम् ।।४।।
©आश्विनी तेरेदेसाई-पाटील