? आनंदाची स्थानके ?

जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स- ४

0 408

लॉकडाऊनच्या निमित्ताने दूरदर्शनने अनेक जुन्या डॉक्युमेंटरीज बाहेर काढल्यायत. तर परवा काश्मीरवर एक डॉक्युमेंटरी चालू होती. काश्मीरच्या निसर्गाचं विलोभनीय दर्शन टीव्हीवर होत होतं. दोन्ही हातांनी आपल्या दुखऱ्या गुडघ्यांना पेनबाम चोळत समोरच्या परब काकी माझ्याशी गप्पा मारत होत्या. टिव्हीवर काश्मीर बघून त्यांना आपल्या उमेदीच्या दिवसांची आठवण झाली. आणि त्या खुर्चीतल्या खुर्चीत पुटपुटल्या,

“डोळे मिटण्याच्या आधी एकदा तरी काश्मीर बघायची खूप इच्छा होती रे. पण संसाराच्या रामरगाड्यात जमलंच नाही.

“ अहो, मग आता जाऊन या ना काकी. आता सोपं झालंय तिथे जाणं”

“ आता शक्य नाही रे बाबा. हे संधिवाताचे गुडघे घेऊन बर्फात कुठे जाणार. पुन्हा यांना मधुमेहाचा तीव्र त्रास. अंहं… आता नाहीच शक्य. त्यावेळी हौस होती. अंगात शक्ती होती. मी माझ्या भिशीतून पैसे पण जमवले होते. पण आज जाऊ ,उद्या जाऊ करता करता कधी जाणं झालंच नाही. आता दोन्ही मुलं मार्गी लागलीयत. सुना आल्यायत. सख्य्ख्या आईवडीलांसारखं आम्हाला जपतात. पण माझे गुडघे आणि यांचा मधुमेह आम्हाला घराबाहेर पडायची परवानगी देत नाही. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशी परिस्थिती आहे आमची.”

आपल्यापैकी बऱ्याच जणांची परिस्थिती या परब काका काकींसारखी असते. आयुष्याची आनंदयात्रा घेऊन ही लाईफ़लाईन एक्सप्रेस निघालेली असते. वाटेत कितीतरी आनंदाची स्थानके लागतात. पण आपण सहजपणे त्यांना बायपास करुन निघून जातो. साजरे करण्यासारखे कितीतरी क्षण आपल्या आयुष्यात नियमित येत असतात. पण आपण ते वेग्वेगळ्या सबबींखाली साजरे करायचं नाकारतो. कधी वेळ नाही म्हणून, कधी परिस्थिती नाही म्हणून, तर कधी जबाबदाऱ्या आहेत म्हणून! आणि नंतर चुकचुकतो. आयुष्यात कोणताही क्षण एकदाच येतो. आपण तो ओंजळीत पकडला नाही तर दुसऱ्याच क्षणी भूतकाळाचा भाग बनतो. मानवनिर्मित सगळी चाकं उलटी फिरवता येतात. पण कालचक्र कधीच उलटं फिरवता येत नाही. निसटलेले क्षण, हुकलेली संधी आणि गेलेलं माणूस कधी मागे फिरवून आणता येत नाही. त्या त्यावेळेस त्याचा आदर करता आला पाहीजे.

थोडी मेमरी रिवाईंड करा आणि आठवून बघा, काय काय राहून गेलं आयुष्यात…. आवडत्या मैत्रीणीला गुलाबाचं फूल देईन देईन म्हणता द्यायचं राहून गेलं. तब्बेतीची काळजी घे रे असं फ़ोनवर गलबलून सांगणाऱ्या गावच्या भावाला मिठी मारायचं राहून गेलं. आयुष्यभर हाल अपेष्टा काढलेल्या बाबांना त्यांच्या हयातीत विमानाने फिरवायचं राहून गेलं. आईच्या रित्या मनगटांवर सोन्याच्या बांगड्या चढवायचं राहून गेलं. बहिणीशी गैरसमजुतीतून भांडण झालं होतं, तिला सॉरी म्हणायचं राहून गेलं. बाळ लहान होतं तेव्हा त्याला घोडा घोडा करायचं राहून गेलं. लग्नाचा २५ वा वाढदिवस ऑफीसच्या कामामुळे साजरा करायचा राहून गेलं. गुलाम अलीला लाईव्ह ऐकायचं कायमचं राहून गेलं. कोकणात जन्म घेऊन सुद्धा आंबोलीला सहल काढायचं शेवट्पर्यंत राहून गेलं…. एक ना अनेक…. असे हजारो, लाखो आनंदाचे, क्रुतार्थतेचे क्षण परमेश्वराने उदारहस्ते ओंजळीत टाकले होते. पण ते आपल्या गाफ़ीलपणामुळे तसेच राहून गेले. काही राहून गेले तर काही काळासोबत वाहून गेले. आनंदाची अशी कितीतरी स्थानके वाटेत लागली होती. पण आपली गाडी तिथे थांबू शकली नाही.

इंग्रजीत एक अल्पाक्षरी म्हण आहे, Tomorrow never comes. कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका. आजचा आनंद आजच उपभोगा. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात येईल की नाही ते आपल्याला ठाऊक नाही. आला तर त्याला सामोरे जाण्याच्या स्थितीत आपण असू की नाही ते आपल्याला सांगता येत नाही.

हा प्रवास कधीतरी संपण्याची वेळ येईल. एक दिवस शेवटचे स्थानक नजरेसमोर दिसू लागेल. गाडीचा वेग मंद मंद होत जाईल. आणि कितीही इच्छा असली तरी शेवटच्या स्थानकातून ही गाडी माघारी फ़िरवता येणार नाही.. तेव्हा आनंदाने जगू लागा. आत्ता, या क्षणापासून. तुमची गाडी आत्ता ज्या स्थानकावर थांबली आहे ते आनंदाचे स्थानक आहे.
————————————-
या सकारात्मक उपक्रमावर अनेक छान प्रतिक्रिया येतायत. त्यातल्या काही प्रातिनिधिक देतोय:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभाग अध्यक्षा, सद्भगिनी धनश्री चिंचकर नाईक म्हणतात, “आपले लेख सकारात्मक उर्जा देतात. आताच्या परिस्थितीत खचुन जाणाऱ्या लोकांना त्याची जास्त गरज आहे. मी ते माझ्या सर्व ग्रुप्स मध्ये शेअर करत असते.”
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे PI श्री सुनील जाधव म्हणतात, ” सध्याच्या दिवसात या उपक्रमाची सर्वाधिक गरज आम्हाला आहे. खूप टेन्शनमध्ये असलो की मी तुमचे मेसेज काढून वाचतो. छान वाटतं.”
धन्यवाद मित्र हो. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. ?

-प्रसाद कुलकर्णी
Motivational Speaker
9969077133

Leave A Reply

Your email address will not be published.