एकवीस दिवसांचा लॉक डाऊन आता सव्वा महिन्यावर गेलाय. तुमच्या मनात असो वा नसो… आता गप गुमान घरात बसा. बाहेर जायचंच असेल तर जाताना पार्श्वभागाला तेल लावून जा. नाक्यानाक्यावर पोलीस दांडके घेऊन उभे आहेत.
लोक मला विचारतात तुम्ही या सक्तीच्या सुटीत काय केलंत? मी त्यांना म्हणतो की या सुटीने मला माझं आयुष्य मनासारखं जगायचा अवसर दिला. आयुष्य सकारात्मकतेने जगण्याचं एक मूलभूत तत्व आहे. आपत्तीचं रुपांतर इष्टापत्तीत करायचं. जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही. तेव्हा परिस्थितीनुसार आपण स्वत:ला बदलायचं. आणि त्याच परिस्थितीचा हुशारीने उपयोग करुन घ्यायचा. प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघायची.
सगळ्यात आधी ठरवलं, सकाळी नियमित उठायचं… आन्हिकं उरकली की योग आणि प्राणायाम हे कम्पल्सरी. हे जे करोनाप्रकरण आहे त्याचा थेट संबंध श्वसनाशी आहे. स्वत:ला करोनापासून दूर ठेवायचं असेल तर सर्वात आधी फ़िटनेस आवश्यक आहे. तसा मी पहिल्यापासून फ़िटनेस सॅव्ही आहे. पण आता लॉकडाऊनमुळे मी त्याला अधिक वेळ देतो. तन दुरुस्त तो मन दुरुस्त…! हे आपले ब्रीदवाक्य असल्यामुळे निराशा, चिडचिड, कंटाळा या गोष्टी माझ्या आसपासही फ़िरकत नाहीत. या फ़िटनेस फ़ंडामध्ये मी एकटाच नाही तर माझ्या कुटुंबीयांनाही सामील करुन घेतलं.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात खूप काही राहून गेलेलं असतं. किती चांगली पुस्तकं वाचायची राहून गेली होती. श्रीमान योगी आणि मृत्यंजय वाचले त्याला तर जमाना झाला होता. रफी, मुकेश आणि किशोरचे आत्मे स्वर्गातून साद घालत होते.किती दिवस मैफल जमवली नाही रे.. चल बसू या! नव्वदीतली लता तर मला कायम छळत आलीय. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती मला सतावणार आहे. करोनातल्या काही दिवेलागणी मी तिला बहाल केल्या. माझी बायको नम्रता माझ्या आयुष्यात आली त्याला आता चौवीस वर्ष होतील. पण वयात आल्यापासून मी जिच्याबरोबर रोमान्स करत आलो, मनातली गुपित जिला विश्वासाने सांगत आलो, जिच्या माध्यमातून व्यक्त होत आलो ती माझी जिवाभावाची सखी कविता गेल्या काही वर्षात व्यस्त दिनक्रमामुळे माझ्यापासून तुटत चालली होती. कोरोनातल्या काही रात्री आणि काही दिवस तिच्या मर्जीने मी तिला बहाल केले.
आणि हो कुटुंबियांशी संवाद साधणं ही खूप महत्वाची गोष्ट दुर्लक्षित राहिली होती. तरूण होत चाललेल्या माझ्या मुलाचा मी एवढे दिवस बाबा होतो. या लॉकडाऊनमुळे मी त्याचा मित्र झालो. त्याचे केस वाढलेले आणि सगळी सलूनं बंद… मग मी त्याचा चक्क हजाम झालो. हातात कैची आणि कंगवा घेऊन मी त्याचे केस कापले. सध्या दिवसातून एकदातरी आम्ही बुद्धिबळाचा डाव मांडतो. तॊ छानच खेळतो. पण बऱ्याचदा त्याला जिंकू देण्यासाठी मी स्वत:हून हरतो. मग आपण बाबांना हरवलं याचा आनंद त्याच्या चेह्ऱ्यावर दिसतो तो अवर्णनीय असतो. या हरण्यावरुन एक शेर आठवला बघा,
जिंदगी का ये हुनर भी
आजमाना चाहिये।
जंग अगर अपनों से है
तो हार जाना चाहिये।
बायकोबरोबर कित्येक दिवसात मनसोक्त बोललो नव्हतो. तो बॅकलॉग या लॉकडाऊनने पुरा केला. मी तिला बघायला गेलो होतो त्यावेळेस कोणता ड्रेस घातलेला हे तिला अजून आठवतय याचं मला नवल वाटलं. सध्या रोज सगळे कुटुंबीय एकत्र बसुन टीव्हीवर जुन्या सिरियल्स पहातो. कोडी सोडवतो. मी तिला घरकामात मदत करतो. करोनाने मला पुन्हा एकदा फ़ॅमिली मॅन बनवला.
आपल्यालाच कशाला, निसर्गालाही या बदलाची आवश्यकता होती. बाहेर पहा ना, कारखान्यांची धुराडी थंडावलीत. त्यामुळे प्रदूषण कमी झालंय. शहरांमधून गायब झालेल्या चिमण्या परत आल्यायत. मोर, हरण रस्त्यावर मुक्त फ़िरु लागलेयत. सकाळ अधिक प्रसन्न वाटत्येय. माणुस नुसता ओरबाडत सुटला होता. निसर्गदेवता सुद्धा जखमा किती सहन करेल. आधी ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून तिने सूचना केल्या होत्या. शास्त्रद्न्य ओरडून सांगत होते. पण आपण त्याकडे लक्ष दिलं नाही. आता ही अंतिम सूचना आहे. यातून सुद्धा आपल्याला काही बोध झाला नाही तर मात्र या विश्वाचा कडेलोट अटळ आहे. अमेरिका आणि अन्य युरोपियन देशात पहाल तर तिथला सुखवस्तुपणा त्यांच्या मूळावर उठलाय. या सुखवस्तूपणातून माज आणि बेफ़िकीरी हे अवगुण उत्पन्न होतात. करोनाविरुद्धची ही प्रदीर्घ लढाई माणसाला पुन्हा लीन व्हायला भाग पाडेल.
लहानपणी पाठ्य्पुस्तकात नोहाची नौका नावाची एक गोष्ट होती. नोहाला द्रुष्टान्त होतो की लवकरच महाप्रलय होणार आहे. नोहा दिवसरात्र खपून एक महाकाय नौका बनवायला घेतो. येणारे जाणारे त्याला हसतात. त्याची खिल्ली उडवतात. पण नोहा निष्ठेने आपलं काम चालू ठेवतो. अन एक दिवस खरेच प्रलयाची चाहूल लागते. या नौकेमध्ये जे आसरा घेतात ते वाचतात. बाकी सारे जग धुऊन निघते. नौकेत वाचलेली माणसे, पशु, पक्षी हे जेव्हा प्रलयानंतर बाहेर येतात तेव्हा एक निराळेच जग निर्माण झालेले असते. निर्मळ, निरामय, पवित्र….!
करोना व्हायरसमुळे असेच काहीसे होऊ घातले आहे असे माझे मन मला सांगते आहे.
—————————————-
वाचकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. त्यातल्या काही मोजक्या प्रतिक्रिया –
सावंतवाडीहून भारतीताई कदम (माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या सुकन्या) यांचा दूरध्वनी होता की चोहीकडे निराशा दाटलेली असताना तुमचे नियमित येणारे संदेश मला आत्मविश्वास देतात. सौ. जयश्री संगीतराव ( मुंबईचे माजी जिल्हाधिकारी सी एस संगीतराव यांच्या सुविद्य पत्नी) कळवतात, ‘तुमचा आनंदाची स्थानके हा लेख वाचला आणि मला माझं सगळं आयुष्य आठवलं. असे कितीतरी आनंदाचे क्षण आपण वेचायचे सोडून देतो. तुमचा प्रत्येक लेख सुंदर जगण्याच्या टीप देणारा असतो. कोल्हापूरहून श्री राजन गुणे यांची गंमतीदार कॉमेंट आलीय, ‘ तुमचे विचारधन ओंजळीत पडूनही जो दुर्लक्षित करेल त्याचा करोना तिसऱ्या स्टेजला पोहोचलाय असं समजावं.’
धन्यवाद मित्र हो…! माझी उमेद वाढली. पुन्हा भेटू. भेटत राहू. ?
-प्रसाद कुलकर्णी ?
Motivational Speaker
9969077133
(photo – from Flickr.com)