ही गोष्ट आहे २०१० सालची. झी टीव्ही वरला आयडिया सारेगम लिटिल champs हा कार्यक्रम ऐन भरात होता. त्या लिटिल champs च्या गुरु आणि संगीत समुपदेशक सौ. वर्षा भावे यांचा मला फोन आला. त्यातल्या आठ निवडक मुलांना घेऊन त्या एक अल्बम (CD) तयार करत होत्या. त्यासाठी त्यांना माझ्याकडून एक गाणं लिहून हवं होतं. अल्बमचं नाव, ‘ आठवा स्वर’.
मी विचारलं, माझं गाणं कोण गाणराय?
त्या म्हणाल्या, प्रथमेश लघाटे.
मग मी लिहायला बसलो. एक सुंदर गाणं तयार झालं. त्या गाण्याला वर्षाताईंनी आपल्या सात्विक सूरांची देखणी आभूषणं चढवली. प्रथमेश त्यावेळी केवळ १५ वर्षांचा होता. त्याच्याकडून ते सुंदररित्या गाऊन घेतलं. आणि मग ते अशा देखण्या स्वरूपात रसिकांसमोर आलं.
हे गाणं खरं तर माझ्या विस्मृतीत गेलं होतं. मागील पंधरवड्यात पंतप्रधानांच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनावेळी माझे सन्मित्र समीर सप्रे यांनी ते मला पाठवलं. हा व्हिडिओ स्वतः प्रथमेशनेच बनवलाय. त्याचा आवाजही त्याच्या वयाबरोबर आता छान खुललाय.
गाण्याची संकल्पना अशी आहे की चोहीकडे निराशेचा अंधार दाटला असताना आम्ही सात्विक सकारात्मकतेचा दीप घेऊन निघालो आहोत. त्या दिव्यात सत्कर्माचे तेल घातले आहे. त्या प्रकाशाने अंधार दूर होतो आहे. निराशेची जागा चैतन्याने घेतली आहे. हे सकारात्मक विचारांचे महत्व हळूहळू सर्वानाच पटू लागले आहे. एकाचे दोन दीप, दोहोंचे चार, चाराचे आठ असा दिव्यालागी दिवा तेजाळत जातो आहे आणि सर्वत्र उजेडाचा उत्सव सुरू झाला आहे. निराशेचे, उदासीनतेचे, विद्वेषाचे निर्मूलन होऊन सारी सृष्टी चैतन्यमय झाली आहे.
आणि आभाळभर प्रकाश वाटून सुद्धा माझी ओंजळ भरलेली. दातृत्वाचा सुद्धा एक नियम असतो बघा. चांगल्या मनाने देणाऱ्याची ओंजळ कधी रिती होत नाही. तिथे चैतन्याचा झरा कधी आटत नाही. परमेश्वर अशा घराला काही कमी पडू देत नाही.
आणि खरं सांगू का, अशी गाणी कधी आपण लिहित नाही. ती वरती बसलेली शक्ती आपल्या हातून लिहून घेत असते. आपण फक्त लेखनिक असतो. फार थोड्या भाग्यवंतांना हा सन्मान लाभतो. आता हा सन्मान कृतज्ञतेने जपायचा…. शेवटच्या श्वासापर्यंत…..!
——————————–
आम्ही लावियेला कैवल्याचा दीप
अंधाराचे रूप पालटले।।
सत्कर्माचे तेल, संचिताची वात
मांगल्याची ज्योत अखंडित।।
तेजाळत गेला, दिव्यालागी दिवा
उजळून आला आसमंत ।।
आयुष्याची ठेव, उधळून दिली
तरी भरलेली ओंजळ ही ।।
गीत : प्रसाद कुलकर्णी
संगीत : सौ वर्षा भावे
स्वर : प्रथमेश लघाटे
अल्बम : आठवा स्वर
-प्रसाद कुलकर्णी ?
Motivational Speaker
9969077133