सामाजिक बांधिलकी
आपण सर्वच समाजप्रिय प्राणी आहोत कारण समाजात राहून सर्वांसोबत मिळून मिसळून राहाण्याचे तंत्र आपण आत्मसात केलेले आहे पण जेव्हा समाजात राहातो तर आपण स्वतःवर काही बंधनं घातलीत का? सामाजिक बांधिलकी ची व्याप्ती खूप मोठी आहे. सर्वांनी मिळून जर आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर सुदृढ समाजाची निर्मिती केली जाऊ शकते.
ख-या अर्थाने कोण कोण आपापली जबाबदारी पार पाडतं? हे महत्वाचे आहे म्हणून स्वतःच्या घरातच चांगली शिकवण घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची पहिली जबाबदारी पण असे होताना दिसत नाही. स्वतःच्या घरापुरताच मर्यादित विचार करणारेच जास्त आहेत.उदाहरणार्थ स्वतःच्या घरातला कचरा दुस-यांच्या दाराशी लोटून देणं, अरे पण रोज घंटागाडी येते तर त्यात कचरा टाकायचा सोडून इतस्ततः का टाकायचा? आणि हे प्रमाण सुशिक्षित समजले जाणारे लोकंच जेव्हा करतात तेव्हा मनस्वी चीड येते.
प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या यांची निर्मितीच झाली नसती तर आज ही वेळ आली नसती. अजूनही निर्मिती बंद केली तर सहज शक्य आहे प्लॅस्टीकचा महापूर रोखणं.
सर्वांनी एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध ठेवणं आणि गरजूंना मदत करणं हे पण समाजातल्या लोकांचेच कर्तव्य आहे पण इथेही लोकं फक्त स्वतःचाच विचार करताना दिसतात. गरज प्रत्येकालाच पडू शकते हे जर ध्यानात घेतले तर किती छान होईल. “एकमेका सहाय्य करु अवघे धरू सुपंथ”याप्रमाणे वागणूक ठेवून एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. कुठल्याही परिस्थितीत एकीचे बळ मोठेच असते.
कोणाला कमी लेखू नये,सर्व सारखेच आहोत असे समजून माणुसकीने वागायचं ठरवायला हवे सर्वांनीच. मुख्य म्हणजे मानसिकता बदलायला हवी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जपायला हवीत परस्परांची मनं,स्वभाव जरी भिन्न असले तरी. माघार घेण्यातही कधी कधी आनंद असतो बरं नेहमीच हमरीतुमरीवर येण्याची गरज नसते. समाजाभिमुख वर्तन हवे. संतांनी किती छान शिकवण दिली आहे,ती व्यर्थ जाऊ नये म्हणून तरी प्रयत्न केला पाहिजे.
सध्याच्या हवामान बदलीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन गरजेचे आहे,हे पण समाजातल्या लोकांचेच आद्य कर्तव्य आहे ज्यामुळे पुढची पिढी अंशतः तरी ब-या अवस्थेत जगू शकेल हा विचार आपणच केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा भासतो आहे तर त्यासाठी जे उपाय नेमून दिलेत ते अमलात आणून जल दुर्भिक्ष कमी करता येईल का ते बघावे आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करावा,आहे म्हणून उधळपट्टी करू नये.
वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे एकतर वाहतूकीचा प्रश्न आहेच पण जे नियम घालून दिलेत त्यांचे पालन कोण कोण करतात? मी तर बघते,झेब्रा क्राॅसिंगवर सर्रास गाड्या उभ्या करतात तसेच सिग्नल चालू असतानाच गाड्या पळवतात लोकं. सिग्नल तोडून जातांना काही ठिकाणी हाॅर्न वाजत राहतात पण इतकी घाई कसली आहे हेच कळत नाही? यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे पण आजकाल जीवाची पर्वा नाही लोकांना फक्त धावायचे सुसाट वेगाने आणि पुढे जायची जणू अहमहमिकाच लागली आहे सर्वांना, तुमच्याकडे वाहन आहे तर तुम्ही तसेही लवकर पोहोचणार आहात हे का नाही समजत? जीवावर उदार का होता? पायी चालणा-यांसाठी रस्ता नाही का? वेळीच वेगाला आवर घालायला हवा आणि गरज असेल तरच गाडी वापरावी म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील.वाहतुकीची कोंडी होणार नाही, पेट्रोल, डिझेल चे दुर्भिक्ष जाणवणार नाही पण आजकाल कोणालाच याचे काहीच पडलेले नाही, आम्ही फक्त स्वतःचाच विचार करणार कारण इतरांचा विचार करण्यासाठी वेळ कुठे आमच्याकडे?
आपल्याच भगिनींवर होणारे अत्याचार आपण निमूटपणे पाहूच कसे शकतो? नाही तिथे सूडाची भावना घेऊन बसतो आणि अशावेळी गरज आहे तर पळ काढतो आपण? इतके अत्याचार सहन करून कितीतरी निष्पाप जीव बळी पडले तरी आपण शांतच? समाजात राहातो ना मग कधी पेटून उठणार? ही जबाबदारी आपलीच समजून का नाही वागत? का त्याच विचार प्रवाहातले असल्यासारखे वागतो आपण? नुसते मोर्चे काढून उपयोग नाही तर कृती करण्याची गरज आहे.
व्यसनाधीनतेच्या आहारी जाणारी पिढी वाढत चालली आहे त्यामुळे विचार करण्याची मती खुंटत चालली आहे. चित्रपट,मालिका बघून चांगले न घेता बेभान वागण्याचे तंत्र आपण लवकरच आत्मसात करतो पण इतक्या वर्षांचे आईवडिलांनी घालून दिलेले सुविद्य ,सुसंस्कृत संस्कार विसरत चाललोत आपण? मोबाईल, सीसीटीव्ही कॅमेरा यांचा विक्षिप्तपणे उपयोग करणं फारच लवकर शिकले पण त्याचाच चांगला वापर करून सुजाण होण्याचं विसरलो आणि म्हणूनच अधःपतनाकडे चाललोत हे पण विसरलोत,आपापसात भांडत बसण्यातच धन्य मानतो आहोत पण त्यात तिस-याचा लाभ होतो आहे हे सोईस्करपणे विसरलोत.
मुळात समाज बनतो तो माणसांमुळेच पण सुदृढ समाज हवा असेल तर आपल्यातली कार्यक्षमता वाढवण्याची आत्यंतिक गरज आहे. माणुसकी, सकारात्मकता,सुविद्यता,सुसंस्कृतपणा या आणि अशा कितीतरी चांगल्या शब्दांना रूजवून घेऊन समाजाला पुनर्जीवित करा आणि सामाजिक बांधिलकी प्रतयेकाने आपापली ओळखून कृतीत आणण्याची गरज आहे आणि खरंच आहे अशी मंडळी जी समाजासाठी झटते आहे दिवस रात्र त्यांच्यात सामील व्हा आणि भान ठेवणारा समाज निर्माण करा ना की भान हरपलेला.