गोंधनापूरचा किल्ला..

0 786

गोंधनापूरचा किल्ला..
खामगावपासून 15 किमी अंतरावर असलेले गोंधनापूर हे गावच एका किल्ल्यात वसलेले आहे. इतिहासाच्या पानांमध्ये दडला असलेल्या या किल्ल्याची विशेषता आहे ती येथे असलेल्या भुयारी खोल्यांमध्ये. किल्ल्यात भुयारामध्ये 52 खोल्या असून, एका खोलीतून दुस-या खोलीत जाण्यासाठी रस्ता आहे. आतमध्ये प्रकाश येण्यासाठी व्यवस्था व बाहेर येण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. या खोल्यांमध्ये शिवपार्वतीची मूर्ती आहे.    


किल्ल्याच्या आवार भिंतीमध्ये नागरिकांनी घरे बांधली असून, शेकडो कुटुंबे येथे वास्तव्य करीत आहे. या भुईकोट किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी स्थिती सध्याही उत्तम आहे. किल्ल्याच्या सभोवताल एक किलोमीटर परिघाचा भव्य असा परकोट होता, तो सध्या पडला असून, त्याचे अवशेष पहायला मिळतात. या परकोटाला चार मजबूत बुरुज व एक प्रवेशव्दार आहे. या परकोटाच्या आत गावक-यांनी घरे बांधली. या किल्ल्याला तीन प्रवेशव्दार आहेत. त्यापैकी पहिले प्रवेशव्दार हे परकोटाच्या भिंतीचे आहे. यामधून प्रवेश केल्यावर नागरिकांची घरे दिसतात. हा किल्ला नागपूरकर भोसले यांचे नागपूर येथील वहिवाटदार चिटणीस यांच्या मालकिचा आहे. त्यांनी किल्ल्याच्या दुस-या प्रवेशव्दाराजवळ लोखंडी गेट लावून त्याला कुलूप आहे. मात्र, तरीही किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या भिंतीला लागूनच घरे आहेत. त्यामुळे नागरिक भिंतीजवळ खत, कचरा टाकतात, गुरे बांधतात. या किल्ल्यात बाहेरच्या बाजुने सैनिकांसाठी असलेल्या खोलीवर एका ग्रामस्थाने ताबा मिळविला आहे. त्याचे कुटंूब या खोलीत राहते.


या किल्ल्याचे बांधकाम तीनशे वर्षांपूर्वी करण्यात आले. बांधकाम दोन मजली असून, खालील बांधकाम दगडामध्ये तर वरील बांधकाम विटा व चुन्यामध्ये केले आहे. किल्ल्याच्या मुख्य इमारतीला दोन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याची भव्यता निदर्शनास येते. दुस-या दरवाजातून प्रवेश केल्यावर मुख्य किल्ला दृष्टीस पडतो. किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजुला धान्याची कोठारे आहेत. घोडयाच्या पागा आहेत. दुस-या मजल्यावर ओळीने खोल्या आहेत. एका खोलीतून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे. या किल्ल्यात भुयारामध्ये काही खोल्या आहेत. जमिनीच्या खालील या भुयारातील खोल्यांमध्ये जाणारा रस्ता अजूनही आहे. या खोल्यांमध्ये विटांचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच सुर्यप्रकाश येण्यासाठी छोटे छोटे छिद्रही ठेवण्यात आले आहे. एका खोलीतून दुस-या खोलीत जाण्यासाठी दरवाजा आहे. चार ते पाच खोल्यानंतर बाहेर निघण्यासाठी वेगळा रस्ता आहे. अशाप्रकारे येथे 52 खोल्या असल्याचे येथील काही म्हातारे ग्रामस्थ सांगतात. मात्र, सर्वच खोल्या सध्या दिसत नाहीत. या खोल्यांपैकी एका खोलीत महादेव व पार्वतीची लाकडाची मूर्ती असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. किल्ल्यात पूर्वी नागरिक जात होते, त्यांनी त्या मूत्र्या व खोल्या पाहल्या आहेत. अनेक वर्षांपासून किल्ल्यात कुणी जात नसल्यामुळे अन्य खोल्यांचे मार्ग बंद झाले आहेत. यापैकी एका खोलीतून भुयारी मार्ग असून, तो मार्ग येथून दहा किमी असलेल्या पिंपळगाव राजा येथील देवीच्या मंदिरात निघतो, असे सांगण्यात येते. किल्ल्यात पाच ते सहा विहिरी आहेत, या विहिरी सध्या बुजल्या आहेत. 60 ते 70 फूट उंच असलेल्या किल्ल्याच्या तटावरुन दहा किमी अंतरावरील परिसर न्याहाळता येतो. या किल्ल्याच्या तटावर ठिकठिकाणी शत्रूवर नजर ठेवणाया सैनिकांच्या बंदूका ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. किल्ल्याला असलेल्या बाहेरील भव्य परकोटाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. गावाच्या पाच किमी अंतरावर या परकोटाचे भग्नावशेश दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला कुलूप असून, गावकरी आतमध्ये जात नाहीत. त्यामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे. भुयारांमध्ये वटवाघळांचे राज्य आहे. या किल्ल्याचे बांधकाम कुणी केले, याबददल माहिती मिळत नाही. किल्ल्याच्या इतिहासाबददल कुणीही अद्याप लिहिलेले नाही. आजूबाजूच्या लोकांना तर गोंधनापूर गावात भव्य असा किल्ला आहे, याचीही माहिती नाही. एकंदर हा किल्ला नागरिकांचे अतिक्रमण, शासनाची उदासिनता, चिटणीसांचा दुर्लक्षितपणा यामध्ये अडकला आहे. किल्ल्याच्या परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नागपूरचे चिटणीस यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नागरिकांना न्यायालयाने नोटीसही दिली आहे. मात्र गावकरी घरे सोडण्यास तयार नाहीत. चिटणीस यांनी हा किल्ला विक्रीसही काढला होता. मात्र काळाचा खेळ पाहा, कधीकाळी हा किल्ला जिंकण्यासाठी प्राण लावून युदध करण्यात येत होते. पाण्यासारखा पैसा लावून लढाया करण्यात येत होत्या. आता, मात्र एकही ग्राहक मिळाला नाही.
 गावातील उनाड मुले किल्ल्यावर खेळत असतात. किल्ल्यातील मधमाशांचे मध तोडणे, भुयारांमध्ये जाणे असे कार्यक्रम ही मुले राबवितात. या किल्ल्याचे लोखंडी प्रवेशव्दार सध्या बंद ठेवण्यात येते. या किल्ल्याबाबत फारसी माहिती पुढे आली नसल्यामुळे इतिहास संशोधक किंवा पर्यटक येथे फिरकतही नाही. सुस्थितीत असलेला हा किल्ला पुरातत्व खात्याने ताब्यात घेण्याची गरज आहे.

सदर लेख “उद्धस्त वास्तु समृद्ध इतिहास” या पुस्तकातून घेण्यात आला आहे.

  • विवेक चांदुरकर 
Leave A Reply

Your email address will not be published.