आम्ही कालपुत्र आम्हा, येईल मरण कैसे

कोरोनाशी (PPE कीट घालून) प्रत्यक्ष दोन हात करताना

5

साधारणतः डिसेंम्बर २०१९ पासून जगभरात कोरोना, Covid-19, वूहान, N-95 मास्क, सॅनिटायझर, PPE Kit असे आजवर कधीही न ऐकलेले शब्द आणि शहरांची नावे कानावर पडायला लागली। त्यावेळेस आपला या सगळ्याशी काहीही संबंध येणार नाही या भ्रमात आपण सगळेच वावरत होतो. यथावकाश जसा जसा हा धोका भारतात सगळीकडे पसरायला सुरुवात झाली तसेतसे नेहमीप्रमाणे देशभरात संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. त्यापैकी मी ऐकलेल्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत त्या अश्या , भारतात एकदा उन्हाळा सुरू होउदे आपल्याकडे इतके कडक ऊन पडते की हा कोरोना व्हायरस त्या कडक उन्हानेच मरून जाईल किंवा आपण एक सिगरेट पिली की करोना व्हायरस आपोआप जळून जातो, आपण रोज दारू पिऊन शुद्ध सॅनिटायझर ने शरीर आतून साफ करतो आपल्याला काही होणार नाही. खरे तर आपल्यापैकी अनेकांनी अश्या बाता मारणारे अनेक वैज्ञानिक गलोगल्ली तयार झालेले पाहिले आहेत तसे या कठीण काळात खूप स्तुत्य काम करणारे देखील पाहिले आहेत जे पहिल्यापासून काही न काही सकारात्मक काम करत आहेत। भारतात हळूहळू हे प्रकरण गंभीर वळण घ्यायला लागले आहे असे दिसायला लागले. आणि मग सर्वप्रथम २२ मार्च २०२०ला देशभरात जनता कर्फ्यु पाळण्यात आला। त्यानंतर लगेचच २४ मार्च पासून देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींकरता संपुर्ण lockdown जाहीर करण्यात आला, तो आजवर कायम आहे यातच हे प्रकरण गंभीर आहे याची चाहूल लागायला लागली।
मी व्यवसायाने वकील आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक देखील आहे। कोणत्याही आपत्ती काळात संघाची भूमिका नेहमीच समाजाला सर्व प्रकारचे साहाय्य करणारी ठरली आहे हा आजवरचा इतिहास आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला हा lockdown उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने अनेकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणार हे लगेचच लक्षात आले. त्या दृष्टीने संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी मिळून काही ठोस काम करावयाची एक योजना आखली आणि मग सुरू झाली सेवा कार्यांची नियोजन करणारी एक नियोजनबद्ध साखळी आणि त्यानंतर केलेल्या नियोजनानुसार आखीवरेखीव पद्धतीने चालणारे प्रत्यक्ष काम। पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली कीट गरजूंना वाटप करणे हा या कामाचा पहिला टप्पा ठरला। त्याचबरोबर काही ठिकाणी ना नफा ना तोटा तत्वावर शेतकऱ्यांना उत्पन्न आणि नागरिकांना चांगल्या प्रतीची भाजी विक्री, गरजूंना शिजवलेले अन्न वाटप, काही ठिकाणी माठ विक्रीद्वारे कुंभार व्यावसायिकास मदत असे अनेक नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या ताकदीनुसार सुरू केले आणि ते आजतागायत कमी अधिक प्रमाणात यशस्वीपणे चालुदेखील आहेत।
हे सगळे एका बाजूला चालू असतानाच हळूहळू पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या भयावह पद्धतीनं वाढायला लागल्याने पुणे मनपा आणि संघाच्या जनकल्याण समिती तर्फे कोरोना संशयित असलेल्या वस्त्यांमध्ये किंवा रेड हॉट स्पॉट म्हणून पुणे मनपाने जाहीर केलेल्या वस्त्यांमध्ये जाऊन थेट बाधित व्यक्ती शोधून काढणे आणि त्या बाधित किंवा संशयित रुग्णाची यादी तयार करायची अशी एक धाडशी योजना संघाने तयार केली। आणि संघाच्या रचनेतून सर्वांना यामध्ये सहभागी व्हायचे एक आवाहन करण्यात आले. वरवर सोपे वाटत असले तरीही बाधित वस्तीत जाऊन काम करणे हे तसे भीतीदायकच आहे तरी मनाची पूर्ण तयारी करून आणि घरच्यांची परवानगी घेऊन ३ मे ला मी गरवारे कॉलेज मध्ये दाखल झालो। माझ्यासारखे अनेकजण तिथे दाखल झालेले होतेच।
जिथून हे सगळे केंद्र चालवले जात होते ते गरवारे कॉलेज हॉस्टेल मध्ये दोन स्वतंत्र इमारती मध्ये विद्यार्थी आणि एका इमारती मध्ये विद्यार्थिनी अशी राहायची व्यवस्था केली होती।दिमतीला Dr लोकांची देखील एक फौजच तैनात होती आणि काही जण येऊन जाऊन उपलब्ध होते।
साधारणपणे ३ ते ४ दिवस रेड हॉट स्पॉट असणाऱ्या वस्तीत प्रत्यक्ष काम आणि त्यानंतर ५ दिवस तिथेचस्वतंत्र इमारतीत विलगिकरण असे कामाचे स्वरूप होते। गरवारे मध्ये जायच्या आधी आम्ही आमची वैद्यकीय तपासणी, आवश्यक ते प्रशिक्षण पुर्ण केले होतेच . पण तरीही तिथे गेल्यावर पुन्हा सगळ्या गोष्टींची उजळणी करून घेण्यात आली। साधारणतः एक टीम एका दिवसात 200 ते 400 पर्यन्त व्यक्तींची तपासणी करत होती अश्या दिवसाला एकूण 12 ते 14 टीम मास स्क्रिनिंग ला जात होत्या। या सगळ्या टीम ताडीवाला रस्ता, दांडेकर पूल भवानी पेठ अश्या रेड हॉट स्पॉट वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करत होत्या आणि त्याहून धक्कादायक म्हणजे यात सापडलेल्या संशयित रुग्णांची संख्या ही साधारणतः एकूण सर्वेक्षण केलेल्या रुग्ण संख्येच्या 5 ते 10 टक्के इतकी होती।

PPE कीट घालून काम करणे अत्यंत जिकिरीचे आहे। माझ्या सारख्या उंची 6 फूट किंवा त्याहून अधिक असणाऱ्या लोकांना वेगळे patch लावून ते PPE कीट जिथे शॉर्ट होत होते तिथे पॅक करावे लागत होते कारण रेड हॉट स्पॉट मध्ये जायचे असल्याने अधिकाधिक काळजी घेणे अत्यावश्यक होते । आम्ही सगळेच कोरोना बाधितांना थेट expose होत असल्याने ही विशेष काळजी घेतली जात होती । नुसते PPE कीट नाही तर त्यासोबत 3 मास्क दोन हॅन्डग्लोवज, पायात बूट त्यावर शु कव्हर असा अवतार आणि असा जागतिक make up करून आम्ही सगळे स्क्रिनिंगच्या मोहिमेवर बाहेर पडायचो। साडे आठ ते दुपारी दोन किंवा तीन पर्यंत हा PPE कीट घालून चाललेला सोहळा चालू असायचा। सगळे आटोपून गरवारे मध्ये परत आलो की सुहास्य वदनाने आमचे स्वागत करायला व्यवस्थेमधले स्वयंसेवक हजर असायचेच जे न थकता सकाळी सहा वाजल्यापासुन आमच्या चहा, नाश्ता जेवण याची काळजी घेत असायचे। आम्हाला संपुर्ण sanitize तिथे असलेल्या अनलिमिटेड सरबताचा आस्वाद घेऊन आम्ही आंघोळीला रवाना व्हायचो। स्वयंसेवकाचे मनःस्वास्थ सर्वप्रकारे उत्तम राहील याची सर्वतोपरी काळजी घेतलेली क्षणोक्षणी जाणवत होती। एक मात्र नक्की जाणवले की तिथे आलेल्या बहुतेक सर्व स्वयंसेवकांना मागच्या दोन महिन्यात कोणतेही उत्पन्न मिळाले नाही आणि इथुन घरी गेल्यावर अजून 8 दिवस विलगिकरण मध्ये राहावयाचे असल्याने उत्पन्नाचे साधन मिळवायची संधी असल्यास ती नक्की सोडावी लागणार होती तरीही या सगळ्या परिस्थितीमध्ये मनस्थिती नीट ठेवून आणि ही परिस्थिती स्वीकारून सगळे जोमाने आणि नेटाने काम करत होते हे विशेष।

या अभियानाचे मला वाटलेले विशेष यश म्हणजे ज्या रेड हॉट स्पॉट मध्ये कोणीही जायला तयार नाही अश्या बाधित वस्त्यांमध्ये जाऊन थेट संशयित रुग्णामध्ये जाऊन काम करणे हे स्वयंसेवकांनी केलेलं काम हे आहे। एका गोष्टीची चिंता करावी ती म्हणजे आम्ही स्क्रीनिंगला जाताना फुल बाह्यांचा शर्ट, सुती पॅन्ट, बूट, घोट्याच्या वरपर्यन्त जाणारे मोजे असा पोशाख करून जात असू पण रेड हॉट स्पॉट असणाऱ्या वस्ती विभागात अनेकजण बिना मास्क, half शर्ट, half पॅन्ट, चप्पल आणि त्याहीपेक्षा ग्रूप ने कोणतेही अंतर ना राखता फिरत होते अश्याने आपण सगळ्यांना धोक्यात घालतोय ह्याची जाणीव करून द्यायचेदेखील काम आम्हाला स्क्रीनिंगला गेल्यावर करावे लागत होते ज्याचे training आम्ही on site स्वतःच अनुभवावर घेतले आणि implement देखील केले। वस्तीमध्ये असे असले तरीदेखील तपासणीसाठी कोणीही विरोध केला नाही स्वतःहून सगळेचजण तपासणी करून घेत होते आम्ही तपासणी करून पुढे गेलो की एखाद्या राहील्या असलेल्या व्यक्तीला फोन करून बोलवून घेऊन तपासणी करून घेत होते। जीवाची भीती काय असते याचाही अनुभव आम्ही सगळे पण प्रत्यक्ष घेत होतो कोरोनाने हाही अनुभव आम्हाला दिला । छोट्याशा खोलीत किंवा दहा बाय दहाच्या वर खाली असलेल्या दोन खोल्यात 15, 17, 22 जण एकत्र कसे राहू शकतात आणि त्यांच्या sanitisation आणि अनेक गोष्टींचा विचारही या निमीत्ताने समोर आला। या पार्श्वभूमीवर आपल्याही अनेकांना आज आपल्या उपलब्ध असलेल्या राहत्या घराची विशालता जाणवली आणि आपल्याला असलेले सुखही दुखते आहे इथे त्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती मध्ये लोक राहत आहेत हे प्रकर्षाने जाणवले।

हे सगळे एका बाजूला असताना आमच्या निवासातआमच्याशी निगडीत अनेक बारीकसारीक गोष्टींची मात्र अत्युच्य काळजी घेतली जात होती ज्यात सकाळच्या शाखेत घेतले जाणारी योगासने, सर्व प्रकारचे प्राणायाम, सूर्यनमस्कार अश्या गोष्टी, तर दिवसात दोनदा स्क्रीनिंगला जाणाऱ्या लोकांची तपासणी, रात्री काढा, अश्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे।
संघाच्या शिस्तबद्ध वातावरणात नेहमी राहायची सवय नसलेल्याना ह्यांचे अप्रूप वाटते पण या सगळ्याच्या मागे back ऑफिस म्हणून काम करणारी देखील एक अदृश्य टीम काम करत असते जे हे सगळे सुखकर करत असते ज्यात टेस्ट रिपोर्ट साठी आमची नावे याकरिता आवश्यक त्या सर्व पूर्तता करून पाठवणे, आलेल्या सगळ्यांची यादी maintain करणे, ग्रुप तयार करून तो update आणि active ठेवणे असे काम करणारे अनेक लोक आहेत ज्यांचे आम्ही कायम ऋणी राहू।
या स्क्रीनिंगच्या निमीत्ताने अनेक जीवभावाचे मित्र मिळाले आणि जीवन नव्याने समृद्ध करणारा अजून एक अनुभव गाठीशी जमा झाला हे आमचे सध्या बँक बॅलन्स शून्यावर येऊ घातलेल्या काळातील सर्व प्रकारचा balance वाढवणारी उत्साहवर्धक बाब। नकारात्मक काळात म्हणजे सध्या incoming चालू नसताना आपल्या खात्यात काहीतरी क्रेडिट जमा झाले हेही नसे थोडके।थँक्स टू कोरोना।

आणि शेवटी आमचा report negative आलाय बरका। त्यामुळे 8 दिवसांनी विलगिकरण संपले की सर्वांना प्रत्यक्ष भेटायला सुरू करणार आहेच तेव्हा या विषयावर सविस्तर बोलूच तोपर्यन्त स्टे सेफ स्टे होम। आणि सरतेशेवटी आवडत्या नेत्यांचे वाक्य
गो करोना गो।

केदार देशपांडे, ९४२०१७९२२७
रा स्व संघ, संभाजी भाग, पुणे महानगर

5 Comments
  1. अद्वैत आठवले says

    सुंदर लेख ! शेवट खूप मस्त केलाय. ऐन युद्धात बंदूक घेऊन रणात उतरले सर्व स्वयंसेवक. आणि casualty n hota sarv parat yetayt hi अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांचे अभिनंदन !!

  2. Vinayak B K says

    खरच कौतुकास्पद काम. भाग्यवान आहात असे काम करायची संधी मिळाली.

  3. सुहास says

    सुंदर लेख केदार, खूप आवडला ! समर्थांची एक सुंदर ओवी आहे दासबोधातील …
    गनिमांच्या देखता फौजा | रणशूरांच्या फुरफुरती भुजा l
    ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी |

    यात किंचित बदल करून

    गनिमांच्या देखता फौजा | रणशूरांच्या फुरफुरती भुजा ।
    ऐसा पाहिजे की मेळा । कैपक्षी परमार्थी |

  4. सुहास देव says

    खुपच सुंदर आणि प्रेरणादायी लेख आहे, केदार. लेख वाचुन आमचे पण बाहु स्फुरत आहेत.

  5. Vishwajeet Deshmukh says

    रोमांचकारी अनुभव सांगितले. धन्यवाद.

Leave A Reply

Your email address will not be published.