रंगबावऱ्या आठवणी ! (बाबांची आठवण)

0 594

हरपल अहसास होता है
आप यहा ही हो जैसे
काश ये हो जाये मुमकीन
मगर ये मुमकीन हो कैसे ।

तुम्ही गेलात तेव्हापासून हे रंग म्हणजेच माझ्यासाठी तुमच असणं होऊन गेलयं.मी तुमच्या मनाचा सुध्दा भाग आहे हे मला माझ्या बोटातून कागदावर उतरणाऱ्या रंगरेषांनीच सांगितलयं बालपणापासूनच .अलगद रंगांच्या दुनियेत मला जर कोणी नेलं असेल तर ते म्हणजे माझा बाबा !जिथे मी स्वतःला तासन तास हरवू शकते ती जागा म्हणजे चित्रकला! मी काही फार मोठी चित्रकार नाही.पण लहानपणासूनच ह्या रंगानी मला अक्षरशः वेड लावलं ते वेड अजूनंही माझ्यात तसचं आहे. खरतरं तर ते मी जपलयं अगदी मनापासून!बोटांना रंग लागले कि मन कस धुंद होते. एक वेगळीच दैवी अनुभूती देऊन जातं.

ह्या कलेने जगाकडे, दुःखाकडेही पाहण्याचा एक अनोखा दृष्टिकोन दिलायं, दैव किंवा देव प्रत्येकाला आयुष्याचं चित्र काढायला काही रंग देतो त्यातून सुंदर रंगीबेरंगी चित्र रंगवायचे असते. रंगातुन नेमकं काय साकारायच ते आपल्या हातात असत.
पण एक नक्की कुठल्याही औदासिन्याला , निराशेला आणि विराण जागेला रंगानी स्पर्श केला कि ती जागा, ती व्यक्ती पूर्वीची राहातच नाही. रंग त्यात ओततात ते जिवंतपण !
कुठल्याही जागेला अस सुंदर बनविण्याची दृष्टी कलाकारांना कोण देत ? खरतर निसर्ग हा महान कलाकार !तस अनुवंशिकता हे कारण असेलही पण मानवी कर्तृत्त्व असतं ते कलादृष्टी पेरण्याचे आणि जपण्याचे . खरतरं मला फक्त वयाची आठ -नऊ वर्षच वडीलांचा सहवास मिळाला पण माझ्यातली कलादृष्टी विकसित करण्याचं श्रेय त्यांनाच जात. वाटत कुठून आलं हे सगळ ज्यांनी हात धरून चित्र काढायला कधी शिकवलंच नाही. रंगबिरंगी फुलांचे हार करणे , सुरेख रंग व गंधांच्या फुलांनी भरलेले आंगण ,गणपतीची सजावट करणं ,चैत्रगौरीची लक्षवेधी आरास असो नाहीतर रोजची सुरेख देवपुजा, नीटनीटकेपणाने चादर लावणे ,कपड्यांच्या साधे घड्या करण असो कसतरी करणे त्यांना खपायचं नाही,सगळं काम कस आखीव रेखीव !तिच शिस्त आणि संस्कार त्यांनी आम्हा दोघी बहिणींना दिलेत.माझे बाबा गणपती आणि नवरात्रात दुर्गा देवी सजवायचे तेही स्वत:चा कापड उद्योग सांभाळून त्यांनी आपली कला जोपासली होती. त्यासाठी ते अकोल्यात प्रसिद्ध होते.कपड्याच्या व्यवसायात येण्याआधी ते मूर्तीकारच होते.मुर्ती घडविण्याचे रितसर शिक्षण त्यांनी घेतले होते.कपड्याची पण त्यांना उत्तम जाण होती.आम्हाला लहानपणी खुप सुंदर patterns व fabrics चे dresses बाबा आणायचे.माझी handloom साड्यांची व विविध रंगपोताच्या कपड्यांची जाण आणि आवड ही वडीलांकडुन वारसा हक्कानेच मला मिळाली आहे.
मला हात धरुन कधीही चित्र काढायला न शिकवणाऱ्या बाबाकडून आलं तरी कस ? कारण त्यांच्या कलादृष्टीचा स्पर्श त्यांच्या प्रत्येक रोजच्या आचारा-विचाराला होत होता.ती कलेची जाण अशी काही त्यांच्या आयुष्यात मिसळून गेली होती की सारं काही ते सुंदर करुन टाकत.दु:खाचही रुपांतर कलानिर्मितीत करता येतं ते फक्त कलाकाराला!’फुलांसंगे मातीस वास लागे म्हणतात ‘तसे त्यांचा अल्पसहवासात ही रंगकलेची आवड माझ्यात आली.ह्या चित्रकलेमुळे एक आखीव-रेखीव पण व्यक्तीमत्वाला लाभले. ह्या वेडामुळे मग स्वत:च व्यक्तिमत्त्व ,घर,आंगण,पोषाख सारं काही मी रंगमय करुन टाकलं अगदी ते नसल्याचे दु:ख सुध्दा!असा काही ह्या छंदाशी भावबंध जडलाय की नजरेस पडेल त्या वस्तुला,शब्दांना,विचारांना,घरातल्या कोपऱ्यानं कोपऱ्याला अनोख रंगरुप बहाल करावस वाटत!त्यातूनच मला पेंटिंग , फोटोग्राफी,पाककला ,बागकाम,नटण्या-थटण्याची,रांगोळी काढणे,गृहसजावट, वेगवेगळ्या राज्यात तयार होेणारे विविध पोताचे,work केलेले कपडे घेणं (handloom and handicrafts) इत्यादींची आवड माझ्यात रुजत गेली.त्यामुळेच जीवन एकसुरी,एकरंगी कधी वाटलेच नाही!

‘रिकामा न जाऊ द्यावा एकही क्षण’ह्या उक्तिप्रमाणे मला ह्या वेड्या रंगछंदामुळे क्षण अन् क्षण हवाहवासा वाटतो व सतत हरवण्याची जागा गवसलीय .आज तुम्ही नसलात म्हणून काय झालं Father’s Day च्या निमित्त्याने तुम्हाला मला जे काय दिलतं त्यासाठी Thank you म्हणायचं आहे आणि तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त कराव्या वाटल्या.तुमचं नसणं नेहमीच जाणवतं असत पण ह्या ‘रंगबावऱ्या आठवणींनी ‘मला तुमच्या मनाशी,तत्वांशी कायमच जोडून ठेवलयं व ठेवणारं !

डाॅक्टर फारतर व्यक्तिचं आयुष्य वाढवू शकतात,पण हया वाढलेल्या आयुष्याला उभारी देण्याचं काम कलावंतच करु शकतात हे मात्र खरयं !
Thank you for giving me such a beautiful gift of colours बाबा ! miss you lot.

Leave A Reply

Your email address will not be published.