लोकमान्य आणि अमरावती…
एकोणिसावे शतक संपून विसाव्या शतकाची सुरुवात झाली ती राजकीय जागृतीचे पहाट घेऊनच, विसावे शतक म्हणजे देशात स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात, स्वातंत्र्यप्राप्तीची आणि लोकशाही मार्गाने देशाच्या प्रगतीची वाटचाल करणारे शतक होय. दिनांक ३जानेवारी १९०२ रोजी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे अमरावतीला शुभागमन झाले. रेल्वे स्टेशन वरच त्यांचे स्वागत करून त्यांना मानपत्र दिले होते. कारण त्यांचा मुक्काम अमरावतीत फारच थोडावेळ राहणार होता. श्री दादासाहेब खापर्डे यांनी लोकमान्य टिळकांना आपल्या बग्गीतून सन्मानाने घरी आणले. लोकमान्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक खापर्डे वाड्यावर आले होते. त्यांना एक दिवसही थांबता आले नाही ज्यादिवशी आले त्याच दिवशी सायंकाळी पाच च्या गाडीने ते परत गेले. श्री दादासाहेब खापर्डे आणि इतर मंडळी त्यांना पोहोचवण्याकरता बडनेरा स्टेशन पर्यंत गेली होती.
दिनांक २७ डिसेंबर १८९७ रोजी कॉंग्रेस अधिवेशन अमरावतीत भरले होते. त्या आधी अधिवेशनाची तयारी करताना मंडप सजविताना दादासाहेब खापर्डे यांनी असे सुचविले की, व्यासपीठावर प्रमुख ठिकाणी लोकमान्य टिळकांचे चित्र लावावे. पण या सूचनेचा काही लोकांनी उपहास केला. नंतर त्याला उपेक्षेचे स्वरूप आले. अधिवेशनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसा दादासाहेबांनी आपल्या सूचनेला पाठिंबा मिळवून, त्या सूचनेस आग्रहाचे स्वरूप आणले. प्रसंग आणीबाणीचा निर्माण झाला होता. कारण दुसऱ्या दिवसापासून पाहून येणार, आणि अजून टिळकांच्या चित्राचा वाद मिटला नव्हता, नव्हे त्याच तीव्र आग्रहाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर दिनांक २५ डिसेंबरला अध्यक्ष श्री शंकरन नायर आले, डब्ल्यू .सी. बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिन चंद्र पाल, महादेव गोविंद रानडे, रवींद्रनाथ टागोर आले. हिंदुस्थानात कोणीही लौकिकवान उरले नाही जे या अधिवेशनाला आले नाही. टिळकांच्या चित्राचा वाद अध्यक्ष पर्यंत गेला. हा हट्ट सोडून द्यावा असे अनेक हितचिंतकांनी दादासाहेबांना सल्ला दिला. शेवटी अध्यक्ष यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची सभा झाली. बराच वेळ वाटाघाट झाली. विचारविनिमय झाला. व्यासपीठावर टिळकांचे चित्र लावावे की नाही या संबंधाने साधक-बाधक प्रमाणे सांगण्यात आली. टिळकांचे चित्र मंडपात लावल्यास काँग्रेस राजद्रोहाचा साथ देते असे सिद्ध होईल असे प्रतिपादन करण्यात आले. तर उलट, “मायभूमी करता हे दुर्धर कष्ट करणाऱ्यांचे आपण एवढेही बोधचिन्ह मंडपात लावण्याचे धैर्य दाखवणार नाही व त्यांच्या कष्टाचे आपण चिज करतो व त्याला मोल देतो असे उघड दाखवणार नाही तर काँग्रेसला प्रयोजनच उरत नाही” असे दादा साहेबांकडून स्वागताध्यक्ष या नात्याने प्रतिपादन करण्यात आले. अखेर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मार्ग काढला. ते म्हणाले की “चित्र लावण्याचे प्रयोजन हेच जर असेल तर राष्ट्र या नात्याने राष्ट्राची सेवा करीत असताना टिळक जे कष्ट करीत आहेत व जे मनोधैर्य दाखवीत आहेत त्याची राष्ट्राला जाणीव आहे व राष्ट्राची त्यांना सहानुभूती आहे हेच जर आपणाला उघड माथ्याने दाखवायचे आहेत तर मी माझ्या स्वतःच्या भाषणात त्यांचा गौरव पूर्ण शब्दानेही उल्लेख करतो म्हणजे सर्व साधेल.” दादासाहेबांनी ही तडजोड मान्य केली व हा वाद मिटला.
काँग्रेस मधील जहाल व मवाळ हेच शब्द अमरावतीच्या अधिवेशना पासूनच रुढ झालेत.
इसवीसन अठराशे ९७ मध्ये पुण्याला प्लेग आला. त्यासंदर्भात लोकमान्य टिळकांनी केसरीतून काही लेख लिहिले होते. नंतर मिस्टर रॅण्ड नावाच्या गोर्या अधिकाऱ्याचा पुण्यात खून झाला. त्याबद्दल संशयावरून चाफेकर व नातू बंधू यांना अटक करण्यात आली. परंतु सरकारला या प्रकरणी लोकमान्य टिळकांना अडकवायचे होते. पण पुरावे मिळेनात, म्हणून शेवटी शिवाजी उत्सवातील व्याख्याने केसरी प्रसिद्ध केली, हे कारण पुढे करून “१२४.अ” कलमाखाली टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यावेळी अमरावतीतून टिळक बचाव फळी उभारून सर्वश्री दादासाहेब खापर्डे, रंगनाथ पंत मुधोळकर, व मोरोपंत जोशी यांनी काही रक्कम लोकमान्य टिळकांचे खटल्यासाठी मदत म्हणून पाठवली होती. परंतु शेवटी या खटल्यात लोकमान्य टिळकांना अठरा महिने सक्तमजुरीची शिक्षा देण्यात येऊन जेलमध्ये डांबण्यात आले.
पुढे ७ सप्टेंबर १८९८ रोजी लोकमान्य टिळक कारागृहातून सुटले. तेव्हा त्यांचे याप्रसंगी अमरावतीकर जनतेच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिरात दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ सप्टेंबर १८९८ रोजी नागरिकांची सभा भरून, लोकमान्यांचे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्या काळी राजद्रोही माणसाच्या अभिनंदनाची सभा घेणे मोठे धाडस होते, वरील सभेचे महत्व त्यामुळेच आहॆ.
लोकमान्य टिळकांची सुटका झाल्याची बातमी येतात प्रथम लोकांचा विश्वासच बसेना, पण पुढे खात्री होऊन लोकांनी अनेक प्रकारे आनंद व्यक्त केला.दीपोत्सव, गूढया उभारणे,सत्यनारायण, फटाके फोडणे, मिरवणुकी इत्यादी प्रकारांनी हा आनंद सर्व देशभर व्यक्त झाला होता. त्यांची मुक्तता मुदतीपूर्वीच झाली होती.
दिनांक १९ जून १९०३ रोजी लोकमान्य टिळक यांचे वरील खटल्याचे संदर्भात अमरावतीस आले होते. त्यांचा मुक्काम दादासाहेब जोग वकील यांचेकडे होता. या खटल्यातील साक्षी चे काम आठ दिवस चालू होते. तारीख २८ ला लोकमान्य टिळकांना गणेश थिएटर मध्ये विद्यार्थ्यां तर्फे मानपत्र देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. पुन्हा ते १९०५ मध्ये लोकमान्य टिळक अमरावतीस आले, यावेळी लोकमान्यांचा अमरावती एक आठवडा मुक्काम होता. या मुक्कामात पाच मे रोजी लोकमान्य टिळकांनी ब्रह्मविद्या मंदिरास भेट दिली, व तेथे जमलेल्या मंडळींशी बराच वेळ ते बोलत बसले होते. दिनांक ६ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव येथील श्री दत्त मंदिरात थाटाने साजरा करण्यात आला. या उत्सवाला लोकमान्य टिळक उपस्थित होते. त्याप्रसंगी लोकमान्य टिळकांचे फार उद्बोधक व विद्वत्ताप्रचुर भाषणही झाले होते. भाषणाला प्रचंड गर्दी झाली होती.
दिनांक ७ मे ला गणेश नाट्यगृहात श्री शिवजयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या उत्सवासाठी लोकमान्य टिळक आणि श्री दादासाहेब खापर्डे या दोघांची लोकांनी थाटात मिरवणूक काढून समारंभपूर्वक त्यांना गणेश नाट्यगृहात नेले होते. तेथे लोकमान्यांचे एक तास भाषण झाले. या मुक्कामात लोकमान्य टिळकांना गावात अनेक ठिकाणी पानसुपारी आली. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुलांनी “पानिपत चा मूकाबला” हे नाटक रंगभूमीवर करून दाखवले होते. या नाटकाला टिळक प्रथम पासून शेवटपर्यंत उपस्थित होते.
पुढे ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळक पुन्हा अमरावती आले होते.
श्री दादासाहेब खापर्डे यांच्या नातीच्या लग्नानिमित्त लोकमान्य टिळक ७ फेब्रुवारी १९१७ ला अमरावतीला आले होते. त्यावेळी अमरावती भागात प्लेग चालू होता. तरीही ८ फेब्रुवारी रोजी जोग चौकात भरलेल्या मोठ्या सभेत त्यांचे भाषण झाले. या सभेसाठी जोक चौकात खास व्यासपीठ उभारण्यात आले होते.
मंडाले तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगून लोकमान्य टिळक १९१४ साली सुटले होते, व त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि राजकीय वजन वाढले होते. अशा स्थितीत त्यांचे १९१४ नंतर प्रथम आगमन झाले असल्याने, अमरावतीत त्यांना ठिकाणी पानसुपारी झाल्या व त्यांचा मोठा मान सन्मान करण्यात आला होता.
दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी सकाळी लोकमान्य टिळक यांच्या निधनाची दुःखद वार्ता अमरावतीस तारेने कळली. व ही वार्ता वाऱ्यासारखी सर्व शहर भरभरून सर्व शहर शोकमग्न झाले. शहरात स्वयंस्फूर्त कडकडीत हरताळ पडला. सायंकाळी चार वाजता जोग चौकात दुःख प्रदर्शनार्थ नागरिकांची जाहीर सभा भरली. सर्व जातीधर्माचे लोक आले होते. सभा अमरावतीत कधी पाहिली नाही इतकी उदास होती. दुःखाने अश्रुपात न आवरणारे श्रोते होते. स्वतः अध्यक्षास गहिवर न आवडल्याने भाषण करता आले नाही. गावात जिकडे-तिकडे उदास व भयाण वाटत होते. सर्व दुकाने व व्यवहार अजिबात बंद होते. सर्वांचे चेहरे उतरले होते, व लोकमान्यांच्या पवित्र गोष्टी खेरीज व खेदजनक मृत्यू खेरीज दुसरे कोणीही कोठेही बोलताना आढळुन आले नाही.
सोमवार तारीख ९ रोजी जोग चौकातून लोकमान्यांच्या तसबिरी ची मिरवणूक काढण्यात आली. मान्यवर नागरिकांनी प्रथम स्वतःच्या खांद्यावरून लोकमान्यांचा चौरंग वाहिला रस्त्याने हिंदू-मुसलमान यांनी मिळून आळीपाळीने चौरंग वाहिला सर्व मिरवणूक भर “पायी हळूहळू चाला मुखाने टिळक नाम बोला” असा अखंड गजर चालू होता. लोकमान्यांचे तसबिरी वर “होमरुल” निशाण फडकत होते. पुढे दिंड्या चालल्या होत्या, लोकमान्यांच्या स्वारी मागे निदान १२ते१५ हजार समाज असावा. सरासरी शंभर सव्वाशे कुलीन स्त्रिया ही चौरंगा चे पाठीमागे चालत होत्या. सर्व अमरावती शहर दुःख सागरत बुडालेला होते, अशा त्या लोकमान्यांना त्रिवार वंदन.
“असा मोहरा झाला नाही, पुढे न होणारं ! बाळ टिळक हे नाव जगात, गर्जत राहणार !!”
-नेहा विवेक नानोटी