आर्य खरेच बाहेरून आले का ? आणि हिंदु शब्दाची उत्त्पती कशी झाली ?
आर्य खरेच बाहेरून आले का ? आणि हिंदु शब्दाची उत्त्पती कशी झाली ?
हिंदुस्थान या समृद्ध देशाला “हिंदुस्थान” हे नाव कसे पडले यासंदर्भात आतापर्यत तुम्ही अनेक कथा वाचल्या असतील. तुम्ही या कथांना कदाचित प्रमाणही मानले असेल. पण त्यापलीकडे जाऊन आपण खरेच कधी विचार केला केला आहे का? हिंदुस्थान या देशाला हिंदुस्थान हे नाव खरेच कसे पडले? आपण जर हिंदुस्थान नावाबद्दलच्या आपल्याला माहित असलेल्या कथा यापलीकडे जाऊन जर विचार केला आणि प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ तपासले तर आपणास खूपच आश्चर्यकारक सत्य उमगेल. आपल्याला माहित असेलल्या कथा हिंदू समाजावर विशिष्ठ विचारधारा बिंबवण्यासाठी कश्या रचल्या गेल्या याचा पृरेपूर प्रत्यय येईल.
मागील कित्येक शतकांपासून हिंदुस्थानवर अनेक स्वाऱ्या आणि वैचारीक आक्रमणे झाली यांचा मुख्य उद्देश हिंदू संस्कृती संपवणे हिंदू समाजाला जातीपाती मध्ये विभागून हिंदू धर्मामध्ये फूट पाडणे तलवारीच्या धाकावर वा आमिषे दाखवून धर्मांतरण करणे, हिंदूंच्या रूढीपरंपरा यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करणे ही याची चतुसूत्री होती.
हिंदुस्थानवर अधिराज्य गाजवण्यासाठी स्वतःच्या सोयीच्या अनेक गोष्टी लिहिल्या. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणताही प्राचीन आधार नसताना असे बरंचस साहित्य लिहिले गेले कि जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला खरा इतिहास माहितच होणार नाही आणि हे सगळे या ब्रिटिशांच्या रचलेल्या कथांवर विश्वास ठेवतील अशी विचारधारा कायम बिंबवली गेली . ब्रिटीश राजवटीत या सर्वांची बिजे फोडा आणि राज्य करा या विचाराने प्रेरित प्रामुख्याने मिशनरी लोकांच्या सहाय्याने रोवली गेली. याच षडयंत्राचा एक भाग म्हणजे ब्रिटिशांनी व मिशनरी लोकांनी सोयीचा इतिहास लिहून साहित्य आणि प्रसारमाध्यमे यांचा वापर करून हिंदुस्थानवर वैचारिक व सांस्कृतिक आक्रमण केले आणि ते अजूनही चालू आहे.
या सर्व विचारधारेतून हिंदू समाजावर काय बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जरा लक्षात घ्या. या सर्व लिखाणामधून हिंदूंना हिंदू धर्माबद्दल कशी घृणा वाटेल, त्यांच्या रुढीपरंपराबद्दल त्यांना कशी आस्था राहणार नाही, हिंदू म्हणून घेण्यात त्यांना कमीपणा कसा वाटेल हिच विचारधारा सातत्याने तेवत ठेवयाचा प्रयत्न केला जात आहे.
हिंदुनी स्वतःला कधी गर्वाने कधीच हिंदू म्हणू नये हाच याचा मुख्य उद्धेश आहे. हिंदू समाजासाठी हि अतिशय घातक गोष्ट आहे आणि दुर्दैवाने या वैचारिक षडयंत्राला आपला समाज इतिहासाची खातरजमा न करता बळी पडत आहे . राजकीय हव्यासापोटी हिंदुस्थान मधील राजकारण्यांनी इंग्रजांची री तशीच ओढली आणि तो इतिहास स्व:ताच्या राजकीय फायद्यासाठी तसाच पुढे चालू ठेवला आहे. याच एक जिवंत उदाहरण म्हणजे आर्य आणि अनार्य हा वाद.
तुम्ही आतापर्यंत अनेक अश्या कथा वाचल्या असतील कि आर्य भारतात बाहेरून आले त्यांनी इथले मूळनिवासी यांना आपल्या शक्तीच्या जोरावर पराभूत करुन त्यांना दास बनवले आणि नंतर यांना आपल्या संस्कृती मधे घेऊन त्यांना शूद्र बनवले. ब्रिटिशांनी हे विष कळवण्यासाठी पवित्र वेदांचा संदर्भवापरला. आर्य अनार्य वर्णव्यवस्था ही कल्पना मूळ वेदांपासून कशी सुरुवात झाली असं बीज समाजात रूजण्यासाठी अनेक लिखाणे केली गेली. याचाच भाग म्हणून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहासकार फ्रेडरिक मॅक्समुलर याने अठराव्या शतकात वेदांचे भाषांतर करून अश्या अनेक कथा रचल्या. त्याने स्वतः कधीही हिंदुस्तानात पाऊल ठेवले नाही पण हिंदुस्तानात आर्य कसे आले आणि त्यांनी इथले मूळनिवासी यांचा पराभव केला आणि वर्णव्यवस्था लादून शूद्रांचे कसे शोषण केले याचे बीज मात्र ब्रिटनमधे बसून पक्के रुजवले. अशा प्रकारचं लिखाण करण्याचा ब्रिटिशांचा एकमेव उद्देश म्हणजे हिंदुस्थानी समाजामध्ये फूट पाडून हिंदू संस्कृतीवर घाला घालणे हाच आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रेडरिक मॅक्समुलर याचे हे समाजविघातक विचार त्यांनी लिहिलेले पुस्तक “शूद्र कोण होते” यातील चौथे प्रकरण “आर्य आणि शूद्र” यामधे अतिशय पद्धतशीरपणे पुराव्यानिशी खोडून काढले आहेत.*
डॉ. बाबासाहेबांनी वेदांचे विवेचन करून खालील निष्कर्ष काढले होते.
- वेदांमध्ये आर्य जाती संबंधात कोणतीही माहिती मिळत नाही.
- वेदांमध्ये असा कोणताही प्रसंग किंवा उल्लेख सापडत नाही आणि असे सिद्ध केले जाऊ शकत नाही की आर्यांनी भारतावर आक्रमण केले आणि येथील मूळनिवासी लोकांना दास बनवले.
- आर्य दास दस्यू हे वेगळे सिद्ध करण्यासाठी वेदांमध्ये निश्चित पुरावा मिळत नाही
- वेदांमध्ये अशा कोणत्याच गोष्टीचे स्पष्टीकरण सापडत नाही जसे आर्य दास दस्यू यांचा वर्ण वेगळा आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्टपणे सिद्ध होते कि इंग्रजांनी केलेलं बहुतांश लिखाण हे केवळ हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यासाठी होते. आपल्या राजकारण्यांनी सुद्धा १९७४ साली हिंदूस्थानात मॅक्समुलरच्च्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करून या विषारी विचारांना एकप्रकारे मूकसंमतीच दिली असेच म्हणावे लागेल.
आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि डॉ. आंबेडकरांनी वेदांचे विवेचन करून फ्रेडरिक मॅक्समुलर याने रुजवलेल्या फुटीरतावादी विचारांचा खोटा बुरखा टराटरा फाडून आर्यन इन्वेजन थ्योरीच कशी खोटी आहे असे जळजळीत वास्तव समोर आणले असतानासुद्धा आपले राजकारणी व एका विशिष्ठ विचारसरणीने ग्रासलेले लेखक दुर्देवाने अजूनही हिंदू समाजात हि दरी वाढवण्यासाठी मॅक्समुलरच्या विचारधारेला प्राधान्य देऊन डॉ. आंबेडकरांचे विचार दुर्देवाने समाजापुढे का येऊ देत नाहीत हि विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
आर्य भारतात आले नाहीत याउलट आपल्याच पूर्वजांनी पर्शिया(आताचे इराण) व युरोपात जाऊन त्यांना शेती व नगररचनेचे धडे दिले याचे शिक्कामोर्तब अलीकडेच २०१५ मधे हरियाणामधील राखीगडी इथल्या संशोधनातून ४५०० वर्षापुर्वीच्या सापडलेल्या मानवी व इतर अवशेषावरून आणि केलेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून सिद्धच झाले आहे कि आर्य हे हिंदुस्थानीच होते. “हिंदू” या शब्दाबद्दल पण अश्याच अनेक कथा रचल्या गेल्या आहेत. एका कथेनुसार हिंदुस्थानातमधील एक पवित्र नदी सिंधु. या सिंधु नदीतीरावर हिंदू संस्कृती वाढली. सिंधु नदीच्या काठी आर्य राहत होते असे आपण बरेचदा वाचले असेल. शेजारील देश पर्शियाच्या लोकांनी पर्शियन भाषेत “स” या अक्षराचा उच्चार “ह” असा होतो म्हणून सिंधु नदीकाठी राहणाऱ्यांना हिंदू म्हणायला सुरुवात केली असे संदर्घ रचण्यात आले . पर्शियाच्या(इराण) अध:पतनानंतर जेव्हा यावनी लोकांनी हिदुस्थानवर स्वारी केली तेव्हा इथल्या लोकांना हिदुस्थानी म्हणायला सुरुवात केली अश्याप्रकारे हिंदू हे नाव मिळाले असे कायम बिंबवण्यात आले.
आपण जर पारशी भाषेचा नीट अभ्यास केल्यास असे लक्षात येईल कि पारशी भाषेत “स” हे अक्षर असून त्याच्या उच्चारपण “ह” असा न होता “स” असाच होतो. “स” चा उच्चार पारशी भाषेत जर “ह” झाला असता तर काय घडले असते? पारशी भाषेतील सुल्तान झाला असता हुल्तान, सलीम झाला असता हलीम , सनद झाली असती हनद आणि साजीश झाली असती हाजीश. असे अनेक पारशी शब्द बदलले गेले असते. यावरून हे सिध्द होते कि हिंदू या शब्दाचा उगम पर्शियन भाषेत नक्कीच झाला नाही.
मग नक्की हिंदू शब्द आला कुठून? त्याच्या उगम झाला तरी कुठे ? हा शब्द आपलाल्या नक्की दिला कोणी? याचे उत्त्तर आपल्याच पवित्र प्राचीन ग्रंथांत आहे. पुराणकालीन ग्रंथ “बृहस्पति आगम” या ग्रंथात हिंदू शब्दाचा स्पष्ट उल्लेख सापडतो. बृहस्पति आगम हा ग्रंथ प्राचीन असून पर्शियन संकृतीच्या कित्तेक वर्ष अगोदर लिहिला आहे. हिंदू हा शब्द आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी दिलेला असून यावनी किंवा पर्शियन लोकांनी दिलेला नाही हे ध्यानांत घ्या.
श्लोक : –
ॐकार मूलमंत्राढ्य: पुनर्जन्म दृढ़ाशय:
गोभक्तो भारतगुरु: हिन्दुर्हिंसनदूषक:।
हिंसया दूयते चित्तं तेन हिन्दुरितीरित:।
अर्थ: ‘ॐकार‘ ज्याच्या मूळ मंत्र आहे , पुनर्जन्मावर ज्याची दृढ़ आस्था आहे , भारताने ज्याचे प्रवर्तन केले आहे तथा हिंसेची जो निंदा करतो तो हिन्दू आहे.*
श्लोक : ‘हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते॥‘
अर्थ : हिमालयापासून प्रारंभ होऊन इन्दु सरोवरापर्यंत (हिन्द महासागर) हा देव निर्मित देश हिन्दुस्थान म्हटला जातो.*
कालिका पुराण, शब्द कल्पद्रुम, मेरूतंत्र, भविष्य पुराण, अग्निपुराण अश्या अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथामधे ‘हिन्दू’ शब्द स्पष्टपणे सापडतो. आपले प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ तपासले तर आपणास निश्चितपणे याचा उलगडा होईल. मग प्रश्न पडतो अश्या प्रकारचे साहित्य ब्रिटीशांनी का निर्माण केले गेले आणि अजूनही असे साहित्य का निर्माण केले जात आहे? याचे उत्तर ब्रिटीशांच्याच विचारधारेतून उलगडत जाते. मॅक्समुलरची पर्यायाने ब्रिटीशांची विचारधारा काय म्हणते नीट समजून घ्या.*
मॅक्समुलर लिहतो “हिंदुस्तान एकदा जिंकला गेला आहे आणि पुन्हा एकदा जिंकला पाहिजे आणि तो दुसरा विजय हा शिक्षणाद्वारे असावा”. हिंदुस्तानी लोकांनी जर त्यांच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास करायला सुरवात केली तर त्यांचा राष्ट्राभिमान व स्वाभिमान पुन्हा जागृत होईल. त्यामुळे हिंदू मोठ्या संख्येने राष्ट्रविचाराने प्रेरित होऊ शकतात. हे सर्व थांबवण्यासाठी पाश्चिमात्य विचाराने प्रेरित एक नवीन राष्ट्रीय साहित्य निर्माण करून नवीन भावना रुजवली पाहिजे. आपल्या एकोणिसाव्या शतकातील ख्रिश्चनत्व हे भारताचे ख्रिस्ती महत्त्व असणारच आहे परंतु भारताचा प्राचीन धर्म जर फोफावला आणि जर ख्रिस्ती धर्म पुढे आला नाही तर त्याचा दोष कोणाला द्यायचा?*
संदर्भ : Letter to the Duke of Argyll, published in The Life and Letters of Right Honorable Friedrich Max Müller (1902) edited by Georgina Müller.
यावरून हिंदुस्थानी लोकांनी एक बोध घ्यायला हवा .जर हिंदू धर्माला कमीपणा दाखवणारे साहित्य कोणत्याची प्रसारमाध्यामातून आपल्यासमोर आले तर त्याची निश्चित खात्री करा कि हे साहित्य आपल्या संस्कृतीचे खरे रूप दाखवण्यासाठी लिहले आहे का कि हिंदूच्या पवित्र संस्कारांचे, भावनांचे खच्चीकरण करण्यासाठी लिहिले आहे. त्यासाठी डोळसपणे प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ तपासा आणि खरे काय आहे हे जाणून घ्या. आपली प्राचीन हिंदू संस्कुती आधुनिकतेबरोबर जोपासा आपल्या पुढच्या पिढ्यांना प्राचीन साहित्याबद्दल संस्कुतीबद्दल अवगत करा.
आपल्या प्राचीन हिंदू संस्कुती आणि हिंदूधर्मात इतकी प्रतिभा आहे कि आपला हिंदुस्थान एक दिवस प्रगतीच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालून विश्वाला मार्गदर्शन करून वसुधैव कुटुम्बकम याची प्रचीती नक्कीच देईल.*
चला तर मग हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने प्रतिज्ञा करूया आपली प्राचीन संस्कुती जोपासुया आणि या भूमीला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करूया!!!*
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
Very well written.
नंदू, हा लेख काळाची गरज आहे. छान विश्लेषण अभ्यासपूर्वक केले. आपल्या संस्कृतीचा अभिमान जागविण्याचा काळ आला आहे.