श्रीचक्रधर स्वामींचे अवतार कार्य

अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव.

0

श्रीचक्रधर स्वामींचे अवतार कार्य

इसविसनाच्या बाराव्या शतकातील उत्तरार्धात महानुभाव संप्रदाय या नव्या विचार सरणीच्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी होत. यांचे पूर्वीचे नाव हरिपाळ देव असे होते. यांचा जन्म गुजरात प्रांतातील भडोच नगरात माता म्हालन व पिता विशाळ देव यांचे उदरी झाला. माता पित्यांच्या छत्राखाली हरिपाळांचे अत्यंत सुखात बालपण गेले. तारुण्यावस्थेत त्यांचे कमळाईसा नावाच्या सुंदर मुलीशी लग्न झाले. अचानक हरिपाळांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मृत्यू आला. मातापित्यांसह सर्व नगरवासीयांवर दुखा:चा डोंगर पसरला. त्याची प्रेतयात्रा स्मशानात पोहोचली व त्यांचे प्रेत सरणावर ठेवण्यात आले. त्याच वेळी मातापित्यांचे दु:ख पाहून परमेश्वराला अवतार घेण्याची ईछा झाली. त्याच प्रेत देहात परमेश्वराने अवतार घेतला त्यांचे प्रेत सरणावरुन उठून बसले. सर्वांना आश्चर्य वाटले, हरिपाळ देव जीवंत झाले ही वार्ता ऐकताच सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मंगल वाद्यांनी त्यांची मिरणवणूक काढून त्यांना राजवाड्यात आणले. परतू पूर्वीप्रमाणे त्यांना आता रस वाटत नव्हता म्हणून त्यांनी राम यात्रेच्या निमित्ताने घर सोडले. ते रिद्धपूर जि. अमरावती येथे येऊन पोहोचले. येथे परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीगोविंद्प्रभुंचे अवतारी कार्य सुरूच होते. हरिपाळ देवाने श्रीगोविंद्प्रभूंचे शिष्यत्व पत्करले व श्रीगोविंदप्रभून्ंनी त्यांचे नाव श्रीचक्रधर असे ठेवले. ज्ञान, शक्तीचाही स्वीकार त्यांनी परमेश्वर अवतार श्रीगोविंदप्रभू पासूनच स्वीकारला. श्रीचक्रधरांची गुरुविषयी आत्यंतिक आवड व श्रद्धा होती. काही दिवस रिद्धपूर येथे राहिल्यानंतर ते सालबर्डीच्या पहाडी डोंगरात सुमारे १२ वर्षे मौनावस्थेत होते. एके दिवशी श्रीचक्रधरस्वामी एका विस्तीर्ण झाडाखाली मौनावस्थेत असताना एक ससा सैरावैरा धावत त्यांचे मांडीखाली येऊन लपला तेवढ्यात तेथे पारधी धावत आले व स्वामींना ससा सोडवण्याबद्दल विनवणी करू लागले. स्वामींचे मौन भंग होऊन शब्द बाहेर पडले “ येथे शरण आलिया काही मरण असे ” पारध्याना स्वामींनी अहिंसेचा मार्ग कथन केला. स्वामींच्या तेजस्वी वाणीमुळे त्यांच्यात परिवर्तन झाले. यापुढे आम्ही हिंसा करणार नाही असे वचन देऊन पारधी निघून गेले. येथूनच पुढे स्वामींच्या कार्याला सुरुवात झाली. १२ वर्षांनंतर स्वामींच्या मुखातून निघालेले हे गुह्यर्थ विषद करणारे वाक्य होते. स्वामींच्या भ्रमणात अनेक पशु-पक्षी, जंगली हिंस्त्रप्राणी, व वृक्षवल्ली चा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याविषयी स्वामींची ममता त्यांच्या असंख्य लीळेतून दिसून येते.
सालबर्डीच्या पहाडी जंगलात मुक्ताबाई नामक एक योगिनी अनेक वर्षापासून तपस्या करीत असताना तिला स्वामींचे दर्शन झाले. स्वामींनी तिनी दिलेल्या कंदमुळांचा स्वीकार केला व तिला उद्धारण्याची योग्यता प्रदान केली. उद्धारण्याचे एक व्यसनच त्यांनी अंगिकारले असल्यामुळे त्यांनी आपल्या कार्याकरिता महाराष्ट्रची निवड केली. या भागातील अयोग्य जीवांना योग्यता प्रदान केली तर काहींचा उद्धार केला.
त्यावेळी व्रतवैकल्ये , कर्मकांड , जातिभेद या सारख्या अनेक समाज विघातक रूढी परंपरांच्या विरोधात स्वामींनी मोठे कार्य केले व सर्वांना समानतेची वागणूक देत स्वत:चा एक आदर्श समाजासमोर उभा केला. हे करत असताना काही समाज कंटाकाकडून स्वामींना अनेकदा त्रास सहन करावा लागला. परंतु आपल्या कार्याला त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.
त्याकाळी संस्कृत भाषेला खूपच मान होता व वैदिक धर्माची भाषा संस्कृत होती ती सर्वसामान्यांना नकळणारी होती. चक्रधरस्वामींनी मराठी भाषेचा सर्वप्रथम ज्ञानदानासाठी स्वीकार केला. मराठी भाषेला अत्युच्य शिखरावर नेण्याचा प्रयत्न झाला. आपले तत्वज्ञान मराठी भाषेत सर्वप्रथम श्रीचक्रधरस्वामींनी समजासमोर ठेवले. श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाची मांडणी करतांना जीव, देवता, प्रपंच, आणि परमेश्वर या चार प्रकारांच्या आधारे केलेली आहे. या पैकी जीव ही संकल्पना लक्षात घेतली तर, त्यांच्या भूमिकेची स्पष्टता होईल. त्यांच्या मते जीव अनंत आहेत. त्यात केवळ मनुष्यच येत नसून सर्व प्राणी, पशुपक्षी, झाडे वनस्पति इत्यादींचा समावेश होतो. हा विचार एका देशापुरता मर्यादित नसून अखिल विश्वासाठी आहे. म्हणूनच विश्वबंधुत्वाची जाणीव यातून स्पष्ट होते. स्त्री- पुरुष समानतेचा विचार सुद्धा त्यांनी आपल्या कृतीतून मांडला. स्त्रियांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. विधवा अवस्थेत नैराष्यात जगत असणार्‍या स्त्रियांच्या जीवनात उत्साह व आनंद श्रीचक्रधर स्वामींनी त्यांच्या अधिकाराची जाणीव देऊन वाढवला. स्त्री ही केवळ भोग्य वस्तु नाही ही जाणीव सतत त्यांच्या विचारातून दिसून येत असे. परिस्थिति मुळे वेश्याव्यवसायात गेलेल्या स्त्रियांना स्वामींनी समाजात योग्य स्थान प्राप्त करून दिले. श्राद्ध, पिंडदान या सदर्भात समजतील अनेक गैरसमज श्रीचक्रधर स्वामींनी दूर केले.
आज संबंध विश्वात अशांतता, अराजकता पसरलेली दिसून येते त्याचे मूळ कारण अहंपणा आहे. त्यामुळे दुसर्‍याचे मोठेपण दिसत नाही. अहंपण तात्पुरता नाहीसा करून उपयोग नाही तर तो समूळ नाहीसा व्हायला हवा. त्यासाठी चक्रधर स्वामींनी ज्ञानावर भर दिला. अज्ञान हे सर्व नाशाचे कारण आहे. आज सर्वत्र हत्या व आत्महत्याचे सत्र सुरू आहे. परंतु परमेश्वराने दिलेल्या मनुष्य जीवनाचे सार्थक सर्वांनाच करता आले पाहिजे. परंतु अहंपणा, वर्णभेद, वर्णद्वेष, आर्थिक विषमता, स्त्री-पुरुषभेद ह्या कारणांमुळे माणसाचा विवेक संपत चाललेला आहे. या अविवेकामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात.
श्रीचक्रधर स्वामींचे जीवन विषयक तत्वज्ञान व्यापक आहे. सर्व भेद नाकारून, आपण सर्व एक आहोत आणि आपल्याला समान अधिकार आहेत. ही जाणीव दृढ होऊन वैचारिक स्वातंत्र्याचा विकास होईल. असे श्रीचक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातील वैचारिक पातळीची क्षमता असल्याचे दिसून येते.

  • प.म.श्री. कृष्णराजबाबा बीडकर उर्फ पंजाबराव बीडकर, संचालक सर्वतीर्थ मंदिर श्रीक्षेत्र रिद्धपूर.

लेखक हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तसेच महानुभाव पंथाचे अभ्यासक असून सध्या ते महानुभाव पंथातील महंत गादीवर विराजमान आहेत व श्री सर्वतीर्थ संस्थांनचे अध्यक्ष व संचालक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.