विवेकानंद शिलास्मारक एक चिरंतन प्रेरणास्त्रोत
कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिलास्मारकाला २ सप्टेंबर रोजी पन्नास वर्ष पूर्ण झालीत. या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या अनुषंगाने “विवेकानंद शिलास्मारक एक भारत विजयी भारत” या महासंपर्क अभियानांतर्गत शिलास्मारकाच्या रोमहर्षक इतिहासाचा मागोवा.
अखिल मानव जातीच्या उत्कर्षासाठी “विश्वबंधुत्वाची” शिकवण देणार्या भारतीय “मानवधर्माची” महती आपल्या जाज्वल्य विचारातून साता समुद्रापार पोहचविणार्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी मकर संक्रांतीच्या दिनी कोलकत्ता येथे झाला. राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा संदेश देणार्या विवेकानंदांची जन्मशताब्दी १९६३ यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करावी. हा विचार संपूर्ण भारतभर पसरला. भारतात पुनरुपी एक नवचैतन्याची लाट उसळली. भारताचे दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी येथील काही विवेकानंद प्रेमी मंडळींनी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून स्मारक निर्मितीची योजना आखली. त्यांच्या मनात आले की, त्रिसागरांनी वेष्टित (हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या संगमावर) माता पार्वतीच्या (कन्याकुमारी मातेच्या) पद्स्पर्शाने पावन झालेल्या अशा कन्याकुमारी स्थित पवित्र श्रीपाद शिळेवर जेथे स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमणाच्या शेवटी २५ ते २७ डिसेंबर १८९२ ला तीन दिवस तीन रात्र तपश्चर्या केली. भारताचा सुवर्णमयी भुतकाळ, खडतर असा वर्तमानकाळ आणि उज्वल भविष्यकाळ त्यांच्यापुढे उभा राहिला आणि येथेच त्यांना आपले जीवनध्येय सापडले. राष्ट्रभक्तीने प्रेरीत झालेल्या तरुणाचे एका युगप्रवर्तक योध्दा संन्यासी म्हणून रुपांतर झाले. पुढे शिकागो धर्मपरिषदेत जगाला भारतीय संस्कृतीची ओळख झाली. विवेकानंदांना जेथे हा जीवन साक्षात्कार झाला तेथेच विवेकानंदाचे एक भव्य दिव्य स्मारक व्हावे, असा विचार पुढे आला. मात्र कोणत्याही चांगल्या कामात विघ्न आणणारे अनेक विघ्नसंतोषी प्रत्येक समाजात असतातच, तेथेही तसेच घडले. अनेकांकडून याकामी मोठा विरोध झाला. त्यावेळी स्मारक समितीला आदरणीय एकनाथजी रानडे यांच्या रुपाने एक कुशल संघटक सचिव म्हणून खंबीर नेतृत्व लाभले.
एकनाथजींनी जन्मशताब्दी निमित्ताने आदरांजली म्हणून विवेकानंद विचारांचा संग्रह “राऊझिंग काॅल टू हिंदू नेशन” (हिंदू तेजा जाग रे) हा ग्रंथ प्रसिध्द केला होता. एकनाथजींच्या असामान्य संघटन कौशल्यातुन स्मारक उभे राहिले. एकनाथजी भारतातील सामान्य माणसांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सर्वांना भेटले, सर्व राज्य सरकारे, केंद्र शासन तसेच उद्योगपतींच्या सहकार्याने दीड कोटी रुपयांचा निधी त्यांनी जमविला. या निधी संकलनात तीस लाख सामान्य जनतेने एक-एक रुपया देऊन आपला सहभाग नोंदविला. याकामी एकनाथजींनी एक-एक रुपयाच्या टिकीटाचा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्यांनी केवळ दोन दिवसात लोकसभेच्या ३२३ खासदारांच्या मान्यतादर्शक सह्या मिळविल्यात. तद्नंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्रीपाद शीळेवरच विवेकानंदांचे स्मारक उभारण्यास परवानगी दिली. बंगाल मध्ये जन्मलेल्या विवेकानंदांचे स्मारक तमिळनाडूमध्ये कशाला उभारायचे असा प्रश्न उपस्थित करणारे तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांचा स्मारकास सुरुवातीला असलेला विरोध मावळला. येथे आपल्याला पहावयाला मिळते की जर एखादी व्यक्ती कुशलता, धैर्य आणि उच्च ध्येयाप्रती संपूर्ण निष्ठा बाळगून इतरांच्या भल्यासाठी कार्य करीत असेल तर अशा वेळी नियतीसुद्धा अनुकूल बदल घडवून आणते. असेच काहीसे येथे घडले होते. स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा बसविण्यात येणार होती त्या सभामंडपाच्या आराखड्याला स्वतः कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी परमाचार्यांनी पारंपारिक स्थापतातील तज्ञ एस. के. आचारी यांच्यासोबत बसून अंतिम रूप दिले होते. त्यांनी सभामंडपाचा आकार १३० बाय ५६ फूट असा ठरविला. याला मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांनी परवानगी दिली. कारण भक्तवत्सलम् यांना परमाचार्यांप्रती मोठा आदर होता. सात वर्षाच्या अथक मेहनतीतून २ सप्टेंबर १९७० रोजी एक विशाल स्मारक पूर्णत्वास आले. शिलास्मारकाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी रामकृष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते शिलास्मारक राष्ट्राला समारंभपूर्वक अर्पण करण्यात आले. एकनाथजींनी राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर प्रत्यक्ष शिळेवर उतरविण्याची अभिनव योजना सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरली. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवाने उल्लेख केला. उद्घाटन सोहळा तब्बल पंधरा दिवस चालला. देशभरातील अनेक मान्यवर या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेत. १६ सप्टेंबर १९७० रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीनी समापन सोहळ्याप्रसंगी शिलास्मारकाला भेट दिली. इंदिरा गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, “नवीन पिढी आपल्या प्राचीन संस्कृतीकडे जात नाही हा त्यांचा दोष नव्हे तर तो आपला दोष आहे. आपणच त्या संस्कृतीच्या भव्य आदर्शांनुसार अापली आयुष्ये घडवू शकलो नाही. सामाजिक मुक्ती शिवाय वैयक्तिक मुक्ती शक्य नाही”.
विवेकानंद शिलास्मारकास आज लक्षावधी देशी-विदेशी जिज्ञासू पर्यटक प्रतिवर्षी भेट देऊन विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होतात. हे स्मारक भारतीय स्थापत्य कलेतील एक महान आश्चर्य तसेच वास्तुशास्त्राचा आगळावेगळा आविष्कार आहे, भारतातल्या सर्व पवित्रतम गोष्टींचा सुंदर संगम येथे आहे. शिलास्मारक जितके भव्यदिव्य आहे. तितकाच त्याच्या निर्मितीचा इतिहास रोमहर्षक आहे. शिलास्मारकाची निर्मीती हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानून एकनाथजी निर्मीतीच्या कामाने एवढे झपाटले गेले होते की, दगडांवर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा परिणाम होऊ नये या दृष्टीने त्यांनी गोलिअॅथ ग्रेनेड दगडांचा वापर शिलास्मारकासाठी केला. विवेकानंदांच्या पुतळ्याची दृष्टी श्रीपाद मंडपावरच असावी यासाठी त्यांनी शिल्पकार सोनवडेकरांबरोबर बराच खल केला व त्यांनी दुसरा नविन पुतळा निर्माणाचा आग्रह धरला होता. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर त्यांचा कटाक्ष असे. मुख्य मंदिराचा घुमट हे कलकत्याच्या रामकृष्ण मिशन ची आठवण करून देणारे आहे तर प्रवेशद्वारावरील आयताकृती चौकटही अजंठा आणि वेरूळ लेण्यांची आठवण करून देते. याशिवाय शिळेवर श्रीपाद मंडपम्, ध्यान मंडपम्, प्रशासनिक कार्यालय आहे.
“पावित्र्य पूर्ण जीवनाचा आदर्श ठेवलेले ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असलेले शेकडो पराक्रमी तरुण-तरुणी गरीब दिनदुबळ्या दलित समाजाला उत्कर्षाप्रत नेण्यासाठी सहानुभूतीपूर्वक साहाय्य करतील, साऱ्या देशभर संचार करतील, तसेच समाजाला त्यांच्या मुक्तीचे मदतीचे सामाजिक पुनरुत्थानाचे व समतेचे तत्त्वज्ञान शिकवतील”.* विवेकानंदांना अभिप्रेत असलेल्या या विचारातूनच “मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थान” हे ब्रीद घेऊन, ‘मानव सेवा हीच खरी माधव सेवा’ हे आपले अंतिम ध्येय ठेवून, शिलास्मारकाच्या उभारणीनंतर दोन वर्षांनी विवेकानंद केंद्राची स्थापना कन्याकुमारी येथे ७ जानेवारी १९७२ रोजी झाली. विवेकानंद केंद्राचा आज अखिल भारतीय पातळीवर एका शक्तीशाली आध्यात्मप्रेरीत सेवा संघटनेच्या रुपात विस्तार झाला असून, ते वैचारिक आंदोलन म्हणून ओळखले जाते. शिक्षण आरोग्य, योग, ग्रामविकास, अध्यात्म, पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास, प्राचीन विद्या, संस्कृतीचे रक्षण, वेद उपनिषदांचे जतन व संवर्धन, प्रकाशन आदी माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध क्षेत्रातील उपक्रमांद्वारे ही चळवळ सर्वदूर पसरविण्याच्या दृष्टीने १००८ शाखा व १२ प्रकल्पांच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतात विवेकानंद केंद्राचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. केंद्राच्या स्थापनेमागे एकनाथजी रानडे यांची भूमिका स्पष्ट होती ते म्हणालेत “मला केवळ दगडविटांचे स्मारक नकाे आहे, तर विवेकानंदांच्या विचारांचे जिवंत स्मारक हवे आहे. ज्यापासून मनुष्य निर्माणाचे कार्य होईल.” विवेकानंद केंद्र आज खर्या अर्थाने त्याग आणि सेवेचे प्रतिक बनले अाहे.
घडा आणि घडवा” हा विवेकानंदांचा विचार समोर ठेवून केंद्रातर्फे देशभर योगवर्ग, स्वाध्यायवर्ग, संस्कारवर्ग व केंद्रवर्ग या चार ‘कार्यपध्दती’ व वर्षभरात पाच वेगवेगळ्या उत्सवांचे आयोजन केले जाते. यामध्ये गुरुपौर्णिमा, ‘विश्वबंधुत्व दिन’ साधना दिवस, गीता जयंती व समर्थ भारत पर्व विवेकानंदांची जयंती यांचा समावेश आहे. कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिलास्मारक एक चिरंतन प्रेरणास्त्रोत म्हणून गेल्या पन्नास वर्षांपासून समस्त भारतीयांना जगतगुरु भारताच्या निर्माणाचा मार्ग दाखविणारे ‘दिपस्तंभ’ ठरले आहे.