गांधीजींचे – एकादश व्रत

महात्मा गांधी जयंती विशेष

0

गांधीजींचे – एकादश व्रत

“एकादश व्रत” म्हटलं की आपल्याला “एकादशी” आणि त्याचा “उपवास” हेच लगेच लक्षात येतं. परंतु गांधीजींचे “एकादशव्रत” हे त्याहून अगदीच वेगळे आहे. महात्मा गांधी यांनी व्यक्तिगत जीवनासाठी ‘एकादश’ व्रत दिले होते. प्रत्येकाने त्याचे पालन करावे, असे त्यांचे मत होते. गांधीजीनी १९१५ ला गुजरात मधील, अहमदाबाद येथे साबरमती आश्रमाची स्थापना केली. तिथे राहणाऱ्या आश्रमवासीयां साठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून त्यांनी काही नियम बनवले. ते नियम ११ या संख्येत आहेत. हे “अकरा नियम” म्हणजेच “एकादश व्रत”. बनारस, विश्व विद्यालयात गांधीजींनी या “एकादश व्रत” (म्हणजेच अकरा नियम) यावर व्याख्यान दिले. गांधीजींच्या याच एकादश नियमांच्या महती मुळे “आचार्य विनोबा भावे” हे प्रभावित झालेत. त्यांचा बराच काळ हा साबरमती आश्रम गेला. हे अकरा नियम विनोबाजींनी आपल्या सोयीसाठी मराठी मध्ये लिहून काढले, वारंवार वाचून ते मुखोद्गत केले.
१२.१०.१९३० ला “मीठाच्या सत्याग्रहात” गांधीजींना अटक झाली आणि ते येरवडा तुरुंगात बंदिस्त झाले. तुरुंगात असताना ते दर मंगळवारी आश्रमात, आश्रम वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्र पाठवून एकादश नियमावलीच्या एकेका व्याख्येवर विवेचन करीत. पुढे याच पत्रांच्या संकलनांचे, प्रकाशन म्हणजे “मंगल प्रभात”.
महात्मा गांधी हे आज आपल्यापुढे केवळ एक नाव नाही तर तो एक मोठा विलक्षण विचारप्रवाह आहे. अहिंसा, असहकार आंदोलन, सविनय अवज्ञा आंदोलन, भारत छोडो आंदोलन, यासारख्या मोठ्या मोहिमा त्यांनी काढल्या व सरकारला बेजार करून टाकले. जात पात यांचा नायनाट व्हावा असे त्यांचे अंतरंगाचे भाव होते. त्यासाठी देशात अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्याट लोकांसाठी त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली या आश्रमात त्यांनी लोकांना स्वच्छता स्वतः करण्यासाठी प्रशिक्षित केलं.
“अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह,| शरीर श्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, | सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्श भावना,| ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये |”
हेच ते अकरा नियम. आजही मुखोद्गत आहेत.
अहिंसा : गांधीजींनी अहिंसेला प्राथमिकता दिली आहे. महात्मा गांधींच्या जीवनाचे एक प्रभावी अस्त्र होतं ते. शुद्ध साधना द्वारेच शुद्ध साध्य प्राप्त होऊ शकतं, यावर त्यांचा विश्वास होता. भारताला ते अहिंसेची तपोभूमी म्हणायचे. महात्माजींची अहिंसा “नकारात्मक” नसून “सकारात्मक” आहे. केवळ मारपीट, हत्या न करणे म्हणजे अहिंसा एवढेच नाही, तर प्राणिमात्रांवर दया करणे, सर्वांची सेवा करणे, स्वार्थाचा परित्याग करणे असा सकारात्मक भाव अहिंसेचा आहे. मन, वचन आणि कर्म आचरणात आणणं म्हणजे अहिंसा. *सत्य:* गांधीजी सत्याला “पूर्ण ब्रह्म” स्वरूप मानायचे. “ईश्वराला” सत्य मानता मानता “सत्य”च ईश्वर आहे हा भाव त्यांचे मनी दृढ झाला. “सत्याग्रह” या शब्दात त्याचं महत्त्व दडलेलं आहे. सत्याच्या आचरणासाठी धरलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह. ह्या मार्गाचा अवलंब करणे ही बलहीनता नसून, ती आत्मशक्तीची शुद्धता आहे. गांधीजींच्या मते सत्य आणि अहिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
अस्तेय : म्हणजे चोरी न करणे. दुसर्यासची वस्तू त्याच्या परवानगी शिवाय घेणे ही देखील चोरीच असं गांधीजी मानायचे. आपल्या गरजा ओळखून त्यानुसार प्रामाणिकतेने संचय करणे म्हणजे अस्त्येय.
ब्रह्मचर्य : खरं तर, अविवाहित असणं म्हणजे ब्रह्मचर्य. गांधीजींच्या मते, गृहस्थाश्रमींसाठी इंद्रियांवर ताबा म्हणजे ब्रह्मचर्य. मन आणि वाणी यात सुद्धा ब्रह्मचर्य असावे, एवढा विशाल विचार महात्माजींनी दिला.
असंग्रह : आवश्यकतेपेक्षा अधिकच्या वस्तू, पैसा यांचा हव्यास नको. संग्रही वृत्तीमुळे सामाजिक अपराध होण्याची प्रबळ शक्यता असते. सर्व समाजाच्या असंग्रही वृत्ती मुळे गरिबीवर मात करता येऊ शकते असा दृढभाव गांधीजींचा होता. यज्ञात टाकली जाणारी समिधेची आहुती आणि ”इदं न मम”, म्हणजे असंग्रह.
शरीरश्रम : हा जीवनातला महत्त्वाचा घटक आहे. आज त्याची जराशी कमतरता जाणवते. कुठलेही कार्य हे कमी दर्जाचे नाही, हा भाव प्रत्येकाच्या मनात रुजला जावा, ही भावना त्यात आहे. उत्पादक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने शरीरश्रम करणे गरजेच आहे. त्यामुळे बेरोजगारीवर सुद्धा मात करता येईल. त्याकाळी “चरखा” हे शरीरश्रमाचे प्रतीक मानले जायचे. चरखा! हे गांधीजींचं अस्त्र जणू. गांधीजींचे नाव व चरित्र या चरख्याशी सदैव जोडलेले आहे. खरतर हीच त्यांची खरी ओळख. चरखा देशाच्या वैकल्पिक आर्थिक धोरणांचा आधार बनावा हे त्यांचं मत होतं.
अस्वाद : म्हणजेच चव. जेवण. यासंदर्भात गांधीजींचे मत असं की, संयमित आहार हा शरीराला पोषक असतो. आधी-व्याधींपासून दूर राहण्यासाठी पचनसंस्था सुदृढ असावी. त्यासाठीच मित आहार ही संकल्पना पुढे आली. चटपटीत पदार्थांना दूर ठेवावं अस आजही आरोग्यशास्त्र सांगतं.
सर्वत्र भयवर्जन : निर्भयता वाढावी हा संदेश. सत्य बोलण्यासाठी, सत्य आचरणासाठी, निर्भयता लागते. निर्भय होऊन सर्वांनी सत्याग्रहात सामील व्हावं तसेच निर्भयतेचा उपयोग लोकोपयोगासाठी व्हावा अशी त्यांची संकल्पना होती.
सर्वधर्मसमभाव : धर्म हे एक ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. कुठलाही धर्म हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. आजच्या परिस्थितीतही सर्वधर्मसमभाव ही संकल्पना अधिक दृढ होऊन त्याचं पालन व्हावं ही काळाची गरज आहे.
स्वदेशी भावना : आजच्या भाषेत सांगायचं तर “लोकल साठी होकल होण”| आपल्या देशातच तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर स्वाभिमानाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण उद्योगधंद्यांना चांगले दिवस येतील. सभ्यता, संस्कृती, साहित्य, भाषा यात स्वदेशीचा भाव ओतून ती आत्मसात करणं गरजेच आहे. “स्वदेशी” म्हणजे “विदेशीचा द्वेष” असं मुळीच नाही.
*स्पर्श भावना:* त्या काळात अगदी ऐरणीवर असणारी ज्वलंत समस्या म्हणजे स्पृश्यास्पृश्यता. ही भावना मुळातून नष्ट व्हावी असे स्पष्ट मत महात्मा गांधींनी व्यक्त करताना, त्याचा आदर्श स्वतः त्यांनी घालून दिला. त्यांच्या साबरमती आश्रमात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक होते. त्या काळी अस्पृश्यांना सुद्धा सन्मानपूर्वक वागणूक आणि स्थान तिथे त्यांनी मिळवून दिलं. संपूर्ण भारत भ्रमण करून त्यांनी यासंबंधी जनजागृती केली.
गांधीजींच्या या एकादश व्रताच्या आचरणाने, निश्चितपणे, शालीनता, नम्रता, आपसूकच प्रत्येकाच्या अंगी बाणली जाते, यात तिळमात्र शंका नाही.
“सर्वाना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा| कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दु:खी असू नये||” ही प्रार्थना आजच्या वैश्विक महामारीच्या काळात करणे क्रमप्राप्त आहे.
वास्तविक पाहता गांधीजींचे व्यक्तित्व व त्यांचे जीवन विश्व मानवतेसाठी एक मोठा प्रकाशस्तंभ आहे.
आज जवळ जवळ शंभर वर्षांनी सुद्धा या “एकादश व्रताचे” महात्म्य तसूभरही कमी झालेलं नाही. याची अंमलबजावणी हा राष्ट्र निर्माण कार्यातील मैलाचा दगड ठरावा. तीच या २ ऑक्टोबर, “गांधी जयंती”च्या दिवशी “बापूं” ना वाहिलेली खरी आदरांजली ठरावी.

फोटो साभार ajabgjab.com

लेखक हे पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेले असून एका खाजगी कंपनीत 26 वर्ष नोकरी केली. सध्या गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, बाल विहार, गोकुळ साठी लिखाण आणि कार्यक्रम सादर. वृत्तपत्रांमध्ये समयोचित लिखाण. भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या कार्यात सहभाग. गेली चौदा वर्ष, कर्क रोग जनजागृती अभियान आणि समुपदेशन म्हणून कार्यरत. मोबा - ९४२३३८३९६६

Leave A Reply

Your email address will not be published.