नागपूर-ढाका-नागपूर – भाग : ७
नागपूर-ढाका-नागपूर
बांगलादेशची साहसी सायकल यात्रा
भाग : ७
भारतात जाऊन पुन्हा बांगलादेशात
त्रिपुरा नरेश भेट
भटकता-भटकता आम्ही बांगलादेशाच्या अशा बाजूला आलो की जिथे बाजूलाच त्रिपुरा आहे. त्रिपुरा राज्याच्या राजधानी चे शहर अगरताला हे अगदी सीमेवरच आहे. सात-आठ किलोमीटर अंतरावर. त्यावेळची गंमत अशी की बांगलादेश मधील अनेक लोकं रिक्षातून, शेतातून, बांधातून अगरतालाला यायचे आणि सिनेमा पाहून परत जायचे. आपल्याला बॉर्डर सिक्यूरिटी असेल असं वाटतं, पण त्या वेळची स्थिती मात्र ही अशी होती. आता काय आहे? माहिती नाही. कंपाउंड कुठे बांधणार, शेताला लागून शेत! आलोच आता तर त्रिपुरात जाऊन यावे म्हणून आम्ही अगरताला येथे गेलो नाहीतर बंगलादेशाला पूर्ण वेढा घेऊन जावं लागलं असतं. गावात राहण्याच्या दृष्टिने चौकशी केली तर एका चौकांमध्ये एका बाजूला पोलीस स्टेशन, एका बाजूला पोस्ट ऑफिस आणि एका बाजूला काँग्रेस कमिटीचे ऑफिस वरच्या मजल्यावर होते. आम्ही काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला आमच्या जवळचे पत्र दाखवून त्यांच्या इथे मुक्काम केला. आम्ही त्रिपुरा नरेशांचा जो राजवाडा आहे, जे राजे होते त्यांना भेटायला त्यांच्या राजवाड्यात गेलो. सुदैवाने त्यांची भेट छान झाली. राजवाड्यात त्यांच्यासोबत फोटो वगैरे असे सर्व व्यवस्थित झाले. कोणत्याही राजाला भेटण्याची ही आमची पहिलीच वेळ त्यामुळे वेगळीच भावना होती.
भिकारीही मच्छरदाणीत!
एक दिवस आम्ही एका रात्री थिएटरमध्ये जितेंद्रचा सिनेमा लागला होता तो पाहायला गेलो. कमिटीचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर होतं आणि जिन्याच्या खाली दरवाजाला कुलूप लागायचे. व्यवस्थापक म्हणाला की, ‘आल्यावर तुम्ही मला आवाज द्या मी उठतो आणि दार उघडतो.’ आम्ही आनंदात सिनेमा पाहून परत आलो. त्याला रात्री २३/१२.३० वाजता जोरजोराने खूप आवाज दिला. पण तो उठायचे कामच नाही. त्याला उठवायचा दुसरा काही मार्ग आमच्या जवळ नव्हता. शेवटी त्याचा पिच्छा सोडला, आणि समोरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो. त्यांच्याशी बोलून दोन टेबल आम्ही जोडले आणि त्याच्यावर २/३ रजिस्टर उशाशी घेतले आणि झोपायचा प्रयत्न केला. पण डास इतके प्रचंड होते की, त्यांनी आम्हाला खाऊन टाकलं असतं. डोळ्याला डोळा लागणे शक्यच नव्हतं. त्या दार न उघडणार्याला शिव्या देत होतो. अशा वेळेला रात्रीची गस्त घालणार्या गाडी मधून एक इन्स्पेक्टर आला. त्याला आम्ही म्हटलं, इथे आम्ही आता झोपू शकत नाही. त्याच्याशी बोलून आम्ही पूर्ण रात्रभर त्या जीपमध्ये त्याच्यासोबत गस्त घालत काढली. जीपमधून आम्ही फिरत होतो अंगाला हवा लागत होती त्यामुळे डास सुसह्य होत होते. तिथे मी पहिल्यांदा पाहिले की बाहेर रस्त्यावर, जे भिकारी/गरीब लोक झोपतात ते सुद्धा मच्छरदाणी लावून झोपले होते. आम्हाला मोठे नवल वाटले पण लक्षात आले मच्छरदाणी शिवाय तुम्ही झोपू शकत नाही. पूर्ण बंगालमध्येच छत्री आणि मच्छरदाणी आवश्यकच आहे.
पुन्हा बांगलादेशात
त्रिपुराचा मुक्काम आटपून आम्ही पुन्हा बांगलादेशात परत आलो. बॉर्डर/चौकी असा काही भाग नव्हताच. आणि तिथून आम्ही सिल्हेटकडे निघालो. तिथून मेघालय जवळचा (प्रदेश) शिलाँग फक्त १३२ किलोमीटर वर तिकडे जाण्याचा पण खूप मोह होत होता. शेवटी विचार केला की असे पुढे पुढे जात राहणे कठीण आहे. आपल्याला परतीच्या मार्गाला लागले पाहिजे आणि म्हणून मनाची समजूत घालून आम्ही सिल्हेट भेट आटोपून रंगपूरकडे निघालो.
दिनाजपूर – बिहारी मुसलमानांची छावणी
ढाका मध्यभागी, चितगाव खालच्या बाजूला, ढाक्याच्या उजवीकडे सिल्हेट हे वरच्या बाजूला आहे. तर रंगपूर दिनाजपुर हे वर डाव्या बाजूला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही खालूनच वरच्या दिशेने प्रवास करत दिनाजपुरला आलो. दिनाजपूर, रंगपूर येथे त्यावेळी बिहारी मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या छावण्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यावेळेला तीन लाखाहून अधिक बिहारी मुसलमान तिथे एक प्रकारे कोंडून ठेवले होते.
बिहारी मुसलमानांबद्दल बंगाली मुसलमानांमध्ये द्वेषाची तीव्र भावना होती. स्थिती अशी होती की कोणाला बिहारी म्हणणे सर्वात मोठी शिवी. दुसरे असे की समजा एखाद्या बंगाली मुसलमानाने बिहारी मुसलमानाला मारलं, तर काही त्याला शिक्षा होत नव्हती. त्याच्यामुळे बिहारी मुसलमानांचे हाल फार वाईट होते. त्यांना शासनाने एक प्रकारे संरक्षण देऊन तिथे एकत्र केले होते. पुढे त्यांचं काय झालं? माहिती नाही. पण हे आम्ही अनुभवलं. बिहारी कोण? तर बंगाली न बोलता हिंदी/उर्दू बोलतो तो बिहारी. उर्दूसाठी आम्हाला आमची बंगाली संस्कृती, बंगाली भाषा, बंगाली परंपरा, यांचे बलिदान द्यायचे नाही असे बंगाली मुस्लीमांचे मत होते. त्या बंगाली भाषेच्या नेतृत्वातूनच बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे इतके दिवस लोकांच्या मनात असलेला राग, द्वेष बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा सगळ्या बिहारी मुसलमानांच्या विरुद्ध निघाला. या सगळ्यांच्यात किती बिहारी मुसलमान मारले गेले, याची कोणतीच नोंद नाही. पण भाषा एवढी तीव्र परिणाम करू शकते, याचे उदाहरण बांगलादेशने घालून दिले.
हिंदी सिनेसंगीत अहोरात्र गुनगुणणारा!
यादरम्यान विश्वासला त्या इंजेक्शनच्या रिअॅक्शनचा त्रास पुन्हा उफाळला. त्याला अॅडमिट करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून तिथल्या पबना येथील तालुका/जिल्हा रुग्णालयांमध्ये आम्ही भरतीसाठी त्याला घेऊन गेलो. त्याला अॅडमिट करून घेतलं आणि एक स्पेशल रूम दिली. मी कुठे जाणार म्हणून त्यांनी मलाही भरती करून घेतलं आणि स्पेशल रूम मध्ये माझा पण बेड होता. दवाखान्यात एक कंपाउंडर होता. २४ तास त्याच्या तोंडामध्ये हिंदी सिनेमाची गीते राहायची. कधी शिळेवर वाजवायचा तर कधी शब्द गायचा. पण त्याचे हिंदी सिनेमा संगीतावर अतोनात प्रेम आणि सगळे सिनेगीत त्याला पाठ. विश्वासला दवाखान्यात राहणं भाग होतं. माझं तसं नव्हतं. त्यामुळे तो कंपाउंडर आणि मी आम्ही बाहेर कुठे कुठे जाऊन यायचो बाहेरचे खाऊन यायचो. हिंदी सिनेमावर प्रेम करणार्या कंपाउंडरचे आजही नवल वाटते. विश्वासला बरं वाटलं आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आमचे परमिट ३०.०६.७२. पर्यंतच होते. त्याशिवाय आम्हाला सीमापार जाता आले नसते म्हणून दिनाजपूरला डीएम ला भेटून परमिटची मुदत वाढवून घेतली आणि तो प्रश्न संपविला. अवामी लीगच्या ठिकठिकाणच्या नेत्यांनी/कार्यकर्त्यांनी आमची बऱ्याच ठिकाणी चांगली व्यवस्था केली.
क्रमशः उद्या भाग ८