फ्रान्सचे लासीते तत्व आणि आपण

0

“धर्मनिरपेक्ष” किंवा “सेक्युलर” हा आपल्या देशातील सगळ्यात बदनाम आणि घासून घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे. १९७६ साली भारतीय संविधानात ४२ व्या घटना दुरुस्तीने हा शब्द संविधानात अंतर्भूत केल्या गेला आणि तेव्हा पासून हा विवादात अडकला. तेव्हा पासूनच देशात वाद सुरू आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय?

पाच वर्षा पूर्वी फ्रांस मधील एक व्यंगचित्र प्रकाशित करणारे साप्ताहिक शर्ली हेब्दोने प्रेषित मोहम्मद यांचे एक व्यंगचित्र प्रकाशित केले आणि तेव्हा पासून फ्रांस मध्ये वाद निर्माण झाला. या व्यंगचित्रामुळे शार्ली हेब्दोच्या कचेरी वर जानेवारी २०१५ मध्ये आतंकवादी हल्ला पण झाला. त्यात या साप्ताहिकाच्या मुख्य संपादकासह अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. या हल्ल्यानंतर संपूर्ण जग फ्रांसच्या मागे उभे होते. पण आज या घटनेच्या दोन वर्षा नंतर पुन्हा हे साप्ताहिक आणि यातील व्यंगचित्र जागतिक मुख्य बातम्यांचा विषय बनले, ते का?

तर पाच वर्षापूर्वी शार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्याचा खटला सप्टेंबर २०२० साली न्यायालयात उभा राहिला. या निमित्याने शार्ली हेब्दो साप्ताहिकाने आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे हे दाखवायला आणि झालेल्या धर्मीक आतांकवादी हल्ल्याच्या दबावाला आपण बळी पडलो नाही हे दाखवायला म्हणून पुन्हा ते प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र पुनरप्रकाशीत केले. खरे तर अनेक इस्लामिक राष्ट्रात या गोष्टीचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र हे वादळ कोणतीही अनुचित घटना न घडता शमले असे वाटत असतांनाच, या व्यंगचित्रामुळे दुसरे मोठे वादळ उभे राहिले.

१६ ऑक्टोम्बर २०२० या दिवशी फ्रांसची राजधानी पॅरिस येथे ४७ वर्षीय शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही हत्या मूळ चेचेन येथील फ्रांस मध्ये शरण घेतलेल्या १८ वर्षीय मुस्लिम युवकाने केली. कारण होते, इतिहासाचे शिक्षक असलेल्या सॅम्युअल पॅटीने फ्रांस मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे देतांना शर्ली हेब्दोच्या त्या तथाकथित विवादित व्यंगचित्राला वर्गातील मुलांना दाखवले. हा प्रकार मुस्लिम कट्टरपंथी मुलांना आवडला नाही आणि त्यातून ही घटना घडली. या घटनेमुळे फ्रांस हादरून गेले. आपल्या “धर्मनिरपेक्ष” आणि “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” या मूल्यावरच धार्मिक मुळतत्ववाद्यांनी घाव घातल्याची भावना फ्रान्सच्या जनतेमध्ये पसरली. फ्रांसचे राष्ट्रपती इम्युअल मॅक्रो यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि या घटनेला देशावरील आतंकवादी हल्ला म्हणून संबोधित केले. सोबतच त्यांनी कडक शब्दात “इस्लाम धोक्यात आहे” सारखे वक्तव्य करत फ्रांस आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्याला प्राणपणाने जपेल असे सांगितले. फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या या वक्तव्याने इस्लाम जगत चांगलेच खवळले. तमाम इस्लामी देशांनी फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा निषेध केला, फ्रांस वर व्यापरिक निर्बंध लावण्यापासून ते राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंत धमक्या दिल्या. तरी फ्रांस अजून तरी आपल्या मूल्याला घट्ट पकडून आहे. तर फ्रांसच्या जनतेत ही मूल्य आणि धार्मिक विचार न करता आपल्या स्वातंत्र्याच्या मूल्याला जपायची वृत्ती आली कशी?

ती आली “लासीते” (LAICITE) या शब्दातून ! हा शब्द आला आहे फ्रेंच शब्द “लॅती” वरून याचा अर्थ आहे सामान्य माणूस किंवा असा जो “पाद्री” नाही. या लासीते तत्वाचा मुख्य उद्देश आहे फ्रांस मध्ये धर्म मुक्त समाज निर्माण करणे. साधारण फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात या तत्वाचा उदय झाला. एकेकाळी युरोपातील इतर देशां प्रमाणेच फ्रांस मध्ये पण राज्यव्यवस्थेत धार्मिक ढवळाढवळ भरपूर होती. पण जसा जसा लोकशाहीचा विकास होत गेला तसे तसे युरोपात “धर्मनिरपेक्ष सरकारचा” विचार पण प्रबळ होत गेला. पण या विचारात “राज्यसत्ता” आणि “धर्मसत्ता” यांनी आपले वेगळे अस्तित्व दाखवत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करणे अपेक्षित होते. पण “लासीते” ही त्याच्या पुढील पायरी होती, कारण या तत्वाने समाजातील धर्मीकताच बाद करायची होती, समाज धर्म विहिन बनवायचा होता.

असे नाही की फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयास आलेले “लासीते” हे तत्व फ्रेंच नागरिकांनी लगेच आमलात आणायला सुरवात केली. या नंतर या लासीते तत्वावर बराच खल झाला. १९०५ मध्ये फ्रांस सरकारने एक कायदा बनवत “धर्मनिरपेक्ष” तत्व अंगिकारले ज्यामुळे देशात धर्म आणि राज्य वेगवेगळे झाले. ज्या मुळे या लासीते तत्वाला अजून चालना मिळाली. या काळात “लासीते” हा क्रांतिकारी विचार होता. पण हा विचार देशात रुजायला पण सरकारला बरीच मेहनत करावी लागली. या करता फ्रांस मध्ये एका संस्थेची स्थापना करण्यात आली “ऑब्झरिटायर दे लासीते” म्हणजेच “धर्मनिरपेक्षतेची संस्था” !

या संस्थेनुसार “लासीते” तत्वाची व्याख्या करतांना म्हंटले आहे की, “लासीते आपल्या “अंतात्म्याच्या” स्वातंत्र्यतेची ग्वाही देते. म्हणजेच हे तत्व प्रत्येकाला आपल्या धर्माचे आपल्या पद्धतीने पालन करण्याचे स्वातंत्र्य देतो. पण “धर्म” कायद्यापेक्षा मोठा कधीच होणार नाही. “धर्म” नेहमीच कायद्याच्या अधीन राहील. या तत्वात “राज्य” नेहमीच धर्माच्या बाबतीत तटस्थ राहील अशी व्यवस्था आहे. कोणत्याही धर्म आणि पंथ यावरून राज्य कोणताही भेदभाव करणार नाही. तर राज्य फक्त कायद्याच्या अधीन राहात आपले काम करेल. या नुसारच देशाचा प्रत्येक नागरिक हा कायद्याने “समान” पातळीवर येईल. तसेच हे “लासीते” तत्व धर्म पाळण्याचे, उपासना पद्धती पाळण्याचे, आपल्या धर्माचा प्रचार करण्याचे, धर्म परिवर्तनाचे जसे स्वातंत्र्य देते तसेच धर्म न पाळण्याचे पण स्वातंत्र्य देते. त्यानुसारच आस्तिक आणि नास्तिक या दोघांनापण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समान अधिकार देण्याची हामी हे “लासीते” तत्व देते.”

आता लक्षात घ्या फ्रांसच्या वैचारिक जडणघडणीत हे “लासीते” तत्व चांगलेच रुजले आहे. याचा स्वीकार धार्मिक उजवे आणि डावे या दोघांनीपण सारख्याच पद्धतीने केला आहे आणि त्याच मुळे हे तत्व फ्रांसची राष्ट्रीय ओळख झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार या तत्वाच्या प्रभावामुळे २०५० पर्यंत फ्रांस मध्ये निधर्मी किंवा कोणत्याही धर्माशिवाय जगण्याची इच्छा असलेली लोकसंख्या देशातील सगळ्या धार्मिक लोकसंख्येच्या जास्त होईल. म्हणजे आजही फ्रांस मध्ये निधर्मी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

याच लासीते तत्वाच्या अनुरोधाने फ्रांस मधील कायदे आणि राज्य काम करते. म्हणूनच मग या देशाने शाळेत हिजाब घालून येण्यावर, सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारा बुरखा घालण्यावर कायदेशीर बंधने आणली. ही बंधने आपल्या धर्माच्या विरोधात षडयंत्र असल्याची भावना मुस्लिम समाजात वाढत असतांनाच, त्या मुळे वादावादी वाढत असतांनाच “लासीते” तत्वाने मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर फ्रांस मधील वैचारिक लोकांकडून केल्या गेला जे इस्लामला अजिबात अपेक्षित नाहीये. त्यातून ही दरी वाढत गेली.

आता इस्लाम विचारक फ्रांसच्या या वर्षानुवर्षे अथक प्रयत्नांनी, वैचारिक अभिसरणाने आलेल्या “लासीते” तत्वाचा विरोध करत आहे. या तत्वामुळे आमच्या धार्मिक मान्यता आणि परंपरा पाळण्यावर बंधने येत आमच्यावर धार्मिक अन्याय आणि अत्याचार होत असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे. हिजाब वर बंदी आणल्यावर अश्याच वैचारिक वादावर उत्तर देतांना तत्कालीन फ्रांसचे राष्ट्रपती सरकोजी यांनी पण “लासीते तत्वात कोणताही बदल अमान्य असल्याचे वक्तव्य केले होते.

फ्रांस मधील इस्लामी विचारक आणि त्यांचे काही तथाकथित मानवतावादी समर्थक देशातील धार्मिक विद्वेष कमी करण्यासाठी सरकारने मुस्लिमांना त्यांच्या धर्मातील तत्वे, परंपरा आणि मान्यता शांतपणे पाळू द्याव्या असे विचार व्यक्त करत आहेत. मात्र अशी मान्यता देऊन आपण आपल्याच “लासीते” तत्वाला पायदळी तुडवू अशी भावना फ्रांसच्या बहुसंख्य जनतेची आहे आणि नेमक्या याच बहुसंख्यांकांच्या भावनेला हे इस्लामी विचारक “बहुसंख्यकांची दादागिरी” म्हणून अधोरेखित करत आहे.

आता इतका सारा पसारा वाचल्यावर तुम्हाला पण आपल्या देशात असलेली तथाकथित धर्मनिरपेक्षता किती पातळ आहे हे ध्यानात आले असेलच. धार्मिक स्वतंत्रता आणि कायदे बदलण्याची धर्मातील ताकद आपण धर्मनिरपेक्ष तत्व अंगिकरल्यावर पण किती मोठी असते हे पण आपण बघितले आहेच. पण अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे “लासीते त्ववा” इतका धर्मनिरपेक्षपणा आपण नक्की अंगीकारु शकू काय? देशातील इस्लामी विचारवंत सोडून द्या, पण देशातील मोठा हिंदू समूह आणि इतर धार्मिक समुह विशेषतः हिंदू धर्मावर सतत टीका करणारे धार्मिक समूह तरी अंगीकार करू शकणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.

बाकी इस्लामी विचारकांना या सगळ्यांशी काही देणे घेणे नाही कारण त्यांना तुम्ही त्यांच्यातील एक झालेले हवे असता किंवा…….

Leave A Reply

Your email address will not be published.