कुरुक्षेत्र ते अंतू बरवा.
कुरुक्षेत्र ते अंतू बरवा
आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
” मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे “
पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.
एखादं गाव किंवा स्थळ वाचावं आणि नंतर ते पाहण्यासाठी जावं याची मजा काही और असते. इथे मी अवर्जून उल्लेख करेन “मृत्युंजय ” ह्या शिवाजी सावंत ह्यांच्या कादंबरीचा. ह्या कादंबरीमध्ये कुरुक्षेत्राचं वर्णन आहे. कर्ण युद्धभूमीजवळ एका टेकडीवर उभा राहून युद्धभूमीचं निरीक्षण करतो असं लिहिलं आहे. हे वर्णन वाचून मी सिमल्याला जाताना मध्ये येणाऱ्या कुरुक्षेत्रावर ( हरियाणा ) थांबलो. कुरुक्षेत्राला हरियाणा सरकारने पर्यटनस्थळ म्हणून विकसित केलं आहे. इथे प्रचंड लांब युद्ध भूमी आहे. सावंतांनी “मृत्युंजय ” मध्ये जे वर्णन केलं ते जसाच्या तसं पाहता येतं, अनुभवता येतं. शिवाय अर्जुनाला श्रीकृष्णाने जिथे गीता सांगितली असं मानतात त्याच ठिकाणी दोघांचं सुरेख शिल्प आहे. ते पाहून मी ड्रायव्हरला कर्ण उभा राहायचा ती टेकडी शोधू असे सांगितले. मी एक अजब पर्यटक आहे अश्या नजरेने पाहून तो नाईलाजाने टेकडी शोधत निघाला. गावातल्या हरियाणवी बोलणाऱ्या लोकांनी टेकडीचा रस्ता दाखवला.
तिथे मला एक साधू भेटला. तो म्हणाला, कर्ण इथे उभा राहून कुरुक्षेत्र पाहत असे. श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ योद्धा होता असे मानतात. पण आम्ही हरियाणवी लोक मानतो की कर्ण सर्वात श्रेष्ठ योद्धा होता. फक्त त्याचा पक्ष चुकल्याने त्याच्या शौर्याकडे दुर्लक्ष झालं !!
एकूणच, सावंतांच्या नजरेतील कुरुक्षेत्र मी पाहून आलो आहे…. त्यांची ” मृत्युंजय” कादंबरी वाचून !!
महर्षी कर्वे आणि त्यांचे पुत्र रं. धो. कर्वे ह्यांच्यावर विविध लेखकांनी केलेलं वर्णन मी वाचलं. त्यात कोकणातल्या मुरुड-हर्णेचा उल्लेख येतो. ते वाचून मी हर्णेचा सागरी किनारा पाहून आलो. त्या किनाऱ्याला महर्षी कर्वे किनारा म्हणतात. कल्याणच्या प्रसिद्ध खिडकी वडाच्या मालकांनी तिथे महर्षी कर्वे ह्यांची चित्ररूपी गॅलरी उभी केली आहे, तीसुद्धा पाहिली. मुरुड-हर्णे जवळ आंजर्ले गाव आहे, कड्यावरचा गणपती आहे. एका डोंगरावरून समुद्र किनारी असलेलं आंजर्ले पाहता येतं. काळूआरु घरे, नारळाची झाडे, अथांग सागर पाहून डोळ्याची पारणे फाटतात.
कोकणाचं खुमासदार वर्णन केलं आहे ते पु. ल. देशपांडे ह्यांनी. त्यांच्या अंतू बर्वा कथेमध्ये रत्नागिरीचा उल्लेख आहे. मी रत्नागिरी त्यासाठी पाहिली. शिवाय भाट्याच्या खाडीवर विश्वेश्वराचं मंदिरसुद्धा पाहून आलो ते त्यात अंतू बर्वा ह्यांच्या तोंडी त्याचा उल्लेख आल्यामुळे !!
पु. ल. देशपांडेची अंतू बरवाच्या तोंडी असलेली ती वाक्ये देण्याचा इथे मोह आवारात नाही.
” “अहो रत्नांग्रीस उकडले नाही, तर त्याला शिमला नसते का़य म्हटले ? बाकी उकाड्याचा त्रास तुमच्या सड्यावर जास्त. मारा सायकलवर टांग आणि या आमच्या पोफळीच्या बागेत. आमची बाग म्हणजे एकदम एअर कंडिशन हो ! हा आमचा कंट्री विनोद बरं कां जावयबापू !” ( अंतू बर्वा )
” आला न्हेरू, चालले बघायला. इथे पडलाय् दुष्काळ, तर भाषण काय देतोस ? तांदूळ दे ! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवरून गीता वाचून दाखवण्यासारखे आहे. याचा उपयोग त्याला नाही आणि त्याचा याला नाही. आणि न्हेरूस दाखवले काय ? तर बाळ गंगाधर टिळक जन्मला ती खोली ? अरे गंगाधरपंतास दृष्टांत झाला होता काय की त्याच्याकडे लोकमान्य जन्माला येणार ते ? दाखवलीनत कुठलीशी खोली आणि दिले ठोकून इथेच टिळकांने पहिले ट्यँहा केले “
रत्नागिरीहून येताना हातखंबा हे ठिकाण पाहायला मिळालं. पु. ल. ह्यांच्या म्हैस कथेमध्ये एस.टी. बस म्हशीला धडक देते असं वर्णन आहे. त्यात हातखंब्याचं नाव येतं. पु लंच्या काळात हातखंबा छोटा नाका होता, आता तिथे मोठा चौक झाला आहे. रत्नागिरी, देवबागच्या प्रसिद्ध आणि अत्यंत स्वादिष्ट हापूस आंबे ह्या नाक्यावर मिळतात. सिधुदुर्ग जिल्ह्यात किंवा त्यापलीकडे गोव्यात जाणारे प्रवासी इथे थांबून ह्या आंब्यांचा स्वाद घेतात.
इथे मला व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशाची खूप आठवण येते. माडगूळकरांनी जागतिक ख्यातीचा चित्रकार वॅन गॉग ह्याचं वर्णन वाचलं आणि त्याचा देश, तो राहत असलेली ठिकाणे, त्यांनी चित्र काढलेली स्थळे पाहून आले. माडगूळकरांनी बहुतेक लिखाण माणदेशातील गावांवर केलं आहे. त्यांची बनगरवाडी, माणदेशी माणसं, वाटा अशी पुस्तके वाचली आणि रेखाचित्रं काढून कथा लिहिल्या. त्यामुळे तो भाग पाहायची इच्छा आहे. आपल्या एका लेखात ते लिहितात – जे.बी. प्रिस्टले गर्दीला कंटाळून एकांतात राहिला गेला. मीसुद्धा तसाच उतारवयात रानावनात एक झोपडी बांधून राहीन. माझ्या रानात तरटी, हिवर, बाभळी, मुरकूटी, तरवड असे बन आहे. माडगूळकरांनी व्यक्त केलेलं हे वन आता असेल की नाही, माहित नाही. पण ते एकदा पाहायचं आहे. ही झाडे कशी दिसतात तेही त्यांनी केलेल्या वर्णनामुळे पाहायचं आहे. माडगूळकरांनी ” अरण्यवाचन” नावाचा लेख लिहिला. त्यात झाडे, पक्षी ह्यांचं वर्णन आहे. असं अरण्य एकदा पाहायचं आहे.
लेखक शंकर पाटील ह्यांनी स्वतःच्या गावाचं वर्णन केलं तेही पाहायचं आहे. ज्यांनी श्रीराम लागू-निळू फुले ह्यांचा ” पिंजरा ” सिनेमा पाहिला त्यांना पाटीलांच्या लेखनाची जादू कळेल. पाटीलांनी हा सिनेमा लिहिताना आपल्याच गावांचं वर्णन केलं असेल का? ती गावे अजून तशीच टिकून असतील का ? पाटीलांचा एक लेख शाळेत अभ्यासाला होता. शीर्षक आठवत नाही, त्यात रानवनाचं वर्णन होतं ते स्पष्ट आठवतं. तिथूनच त्यांनी लिहिलेली ठिकाणी पाहायची इच्छा झाली आहे.
इंदोरच्या सराफ बाजारचं वर्णन मी अनेकवेळा वाचलं आहे. दिवसा उजेडी ह्या बाजारात सोने चांदी विकली जाते आणि रात्री आठ नंतर इथे अनेक खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. म्हणून सराफा बाजारला खाऊ गल्लीही म्हणतात. इंदोरी पोहे, भाजी, कणसाचा किस, कचोरी आणि जोशींचा दही वडा खाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. यु ट्यूबवर सराफा बाजाराचे अनेक विडिओ मी पहिले. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पदार्थ दाखवले जातात आणि जोशी दहिवडेवाले हवेत वडा उडवून मसाला मिसळताना दाखवले जाते. अजून इंदोरला गेलो नाही, पण खास खाण्यासाठी एकदा इंदोरला जायचे आहे. इंदोरला भेट दिलीच तर आवर्जून ह्या सराफा बाजारात जा. मी तर म्हणेन की दिवसभर उपाशी राहूनच जा आणि इथे मनसोक्त खा.
स्थळांचं जसं वर्णन वाचून ते पाहायची इच्छा होते तशी व्यक्तींचं वर्णन वाचून त्यांना भेटायची इच्छा होते. अशीच एक व्यक्ती आहे वाडकर काका ! वाडकर ह्यांनी रायगडावर १००० वेळा स्वारी करण्याची शपथ घेतली आहे. मी अनेक वर्षांपूर्वी हे वाचले होते. अखेरीस एकदा चक्क रायगडावर ते स्वतः भेटले.
तोवर ते रायगड ८८५ वेळा चढले होते !!
मराठी साहित्य ही खरोखर आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे. ते वाचावे आणि आणखी प्रगल्भ व्हावे हे भाग्य आपल्याला मिळालं आहे. जगातील युरोप, अमेरिका, दुबई इत्यादी देश पाहावेत असं स्वप्न अनेकांना पडतं. जमल्यास ती ठिकाणे पाहावीत, पण मराठी साहित्यामधील ठिकाणे वाचून खास ती पाहण्यासाठी जावे.
अशा पर्यटनाची मजाच काही और आहे.