अनलज्वाला
अनलज्वाला
वाटा अवघड आयुष्याच्या तुडवत गेलो
अनुभवातून रोज स्वतःला शिकवत गेलो
अनेक होते मित्र गुरू अन सखे सोबती
नेक चांगले वेचत जीवन फुलवत गेलो
तसे ठरवुनी कधीच मीही लिहिले नाही
सहवासाने शब्दांच्या मी प्रसवत गेलो
तसा दगड मी होतो तेव्हा शाळेमध्ये
अभ्यासाचे घाव सोसुनी घडवत गेलो
संकट येता झुकलो ना वा हार मानली
खंबिरतेने परिस्थितीला झुकवत गेलो
अनेक तुकडे नात्यांचे मी जोडत होतो
स्वार्थ पाहता एकेकाचा, उसवत गेलो
पैशाने श्रीमंत जरी मी नाही मोठा
कवितेमधल्या शब्दफुलांनी मिरवत गेलो
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
फोटो साभार – unsplash.com