इराणी अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा बदला

0

इराणी अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा बदला

इराणचा साठ वर्षीय अणु शास्त्रज्ञ मोहसेन फख्रीझादे याच्या, शुक्रवार २७ नोव्हेंबर २०२० ला झालेल्या हत्येचा कठोर बदला घेण्याचा विडा, इराणचे राष्ट्रपती हसन रौहानींनी उचलला आहे. फख्रीझादेची हत्या,इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेनी, अमेरिकेच्या मदत/सल्ल्यानी केली या बद्दल इराणमधे एकमत आहे. फख्रीझादे फार पूर्वीपासून मोसादच्या “हिटलिस्ट” वर होता. जागतिक मुत्सद्दी आणि संरक्षणतज्ञांनुसार, पुरेपूर तयारीनी केलेल्या या वर्षातील सामरिक महत्वाच्या दुसऱ्या हत्ये विरुद्ध इराण त्वरित पाऊल उचलणार नाही. अमेरिका, इस्रायल व त्याच्या मध्य पूर्वेतील सहयोग्यांच्या प्रचंड सामरिक व आर्थिक दबाव/ दडपणातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारा इराण सध्या; ”त्याच्या कुठल्याही सामरिक किंवा हिंसात्मक कारवाईचे गंभीर परिणाम होतील” या अलिखित धमकी खाली आहे हे प्रत्ययाला येत. या हत्येचा हिंसक इराणी प्रतिसाद, तिसऱ्या आण्विक महायुद्धाचा ओनामा असेल यात आजमितीला तरी शंका नाही. इराणी संरक्षण मंत्री आमिर हातेमीनुसार,आपल्या सासऱ्याकडील जेवण आटोपून परत जात असतांना मोहसेन फक्रीझादे आणि त्याचे रक्षक/कुटुंबीयांना भर दिवसा तेहरान जवळील अब्सर्द गावातल्या हमरस्त्यावर गोळ्या घालून ठार मारण्यात आल.आधी,त्यांच्या तीन गाड्यांवर बंदुकीच्या गोळ्यांचा जबरदस्त वर्षाव झाला आणि नंतर जवळच उभ्या असलेल्या एका ट्र्कमधे मोठा स्फोट झाला.शेवटच्या गाडीतील त्याची पत्नी सोडता बाकी बारा लोक या हल्ल्यात मारल्या गेले. फख्रीझादेच्या हत्येमधे डझनावर हत्यारबंद लोक (गनमेन) सामील होते अस सुरवातीला म्हणणारा इराण आता,या ऑपरेशनमधे रिमोट कंट्रोल्ड मशीन गनचा वापर कऱण्यात आला,अस खात्रीपूर्वक सांगतो आहे. इराणी न्यूज एजन्सी फार्सनुसार,इस्रायलनी ही हत्या लांबून (स्टॅन्ड ऑफ डिस्टन्स) केली. घटना स्थळी कोणीही माणूस नव्हता याची, इराणी सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे सचीव,अली शमखानी यांनी मिळालेल्या “इंटलिजन्स इनपुट्स”वरून पुष्टी केली आहे.पाश्चात्य सूत्रांनुसार,जीपवर बसवलेल्या मशीनगनला उपग्रहाद्वारे कंट्रोल/ऑपरेट करून फक्रीझादेच्या ताफ्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला आणि ट्रकला रिमोट कन्ट्रोलद्वारे उडवण्यात आल. ही कारवाई इतकी अचूक होती की शेवटच्या गाडीतील चालक व सुरक्षा कर्मी मारल्या गेलेत पण मिसेस फक्रीझादेच्या केसालाही धक्का लागला नाही. हे जर खर असेल तर,अशा प्रकारच्या प्रगत हत्यार प्रणालीच्या भयावह अचूकतेची कल्पना करता येते. .
अनेक अमेरिकन सैनिक,मुत्सद्दी,नागरिक व पत्रकारांच्या हत्येला जबाबदार असणारा जनरल कासीम सुलैमान,बगदाद विमानतळाकडे जात असतांना अमेरिकन ड्रोननी त्याला ०७ जानेवारी,२०२०ला रस्त्यातच टिपल.”अमेरिकेला या हत्येच्या निर्णयाचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी इराणनी,सुलैमानीच्या हत्येनंतर दिली होती. पण त्यानंतरच इराणी प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा मवाळ होत. सुलैमानीच्या दफन विधीनंतर अवघ्या काही तासांमधेच इराणनी,अमेरिकन सैनिक असलेल्या दोन इराकी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले खरे,पण त्यात कुठल्याही प्रकारची जीव हानी होणार नाही याची ही काळजी घेतली. संरक्षणतज्ञांनुसार,इराणला तीव्र अमेरिकन उत्तराची आणि इस्रायली मोसाद वरिष्ठ इराणी राजकीय/नागरी/ सैनिकी अधिकाऱ्यांवर “टार्गेटेड अटॅक्स” करेल याची भीती असल्यामुळे त्यांनी,साधकबाधक विचारांती मवाळ प्रत्युत्तर दिल असाव..या पार्श्वभूमीवर,मोहसेन फक्रीझादेच्या हत्येनंतर इराण काय कारवाई,केंव्हा करतो/करेल याकडे संरक्षणतज्ञांच लक्ष लागल आहे.
जी कामगिरी कासीम सुलैमानीनी इराणच सामरिक व राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी केली त्याच तोडीची कामगिरी मोहसेन फख्रीझादेनी इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवण्यासाठी केली आहे.इराणी अणु/अण्वस्त्र प्रकल्पाच्या ओनाम्यापासून ते त्याचा विकास,त्यासाठी संसाधन उभारणी आणि शास्त्रज्ञांची फळी तयार करणारा फख्रीझादेच होता.इराणच्या अणुप्रकल्पांत त्याच योगदान एवढ सर्वसमावेशक आहे की त्याच्या मृत्यूचा इराणी अणुप्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. तो तसाच प्रगतीशील असेल/राहील. मध्यपूर्वेत;शिया मुस्लिम राजवट आणि इराणी दबदबा वृद्धिंगत करण्या संबंधीचा मुख्य सामरिक धोरणकर्ता आणि लष्कर तज्ञ,कासीम सुलैमानच्या, अमेरिके द्वारा करण्यात हत्येला वर्षही झाल नसतांना झालेल्या मोहसेन फख्रीझादेच्या हत्येमुळे, चवताळलेल्या इराणी मूलतत्ववाद्यांच्या मनातील सूडाच्या स्वयंस्फूर्त भावनावस्थेला (इम्पल्स फॉर रिव्हेंज) इराण सरकार बळी पडू शकत. उलटपक्षी; २०१५ च्या आण्विक करारासंबंधात जो बायडेनचे काय विचार आहेत याची खात्री झाल्या शिवाय इराण, फख्रीझादेच्या हत्येच्या बदल्यासाठी कुठली ही टोकाची भूमिका घेणार नाही किंवा लगेच प्रत्युत्तर देणार नाही याची कल्पना असलेल्या इस्रायलनी; सांप्रत निष्क्रिय वातावरणाचा लाभ घेण्यासाठी,इराणच्या“हाय व्हॅल्यू/अपॉर्च्युनिटी टार्गेट्स” वर हल्ला करण्याची योजना आखली असेल तर त्यातही काहीच नवल नाही.
फख्रीझादेच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या त्वरित इराणी प्रतिघाती कारवाईला, मावळते अमेरिकन राष्ट्र्पती डोनाल्ड ट्रम्प,तीव्र तडक सामरिक उत्तर देतील.त्याच बरोबर,इराणशी राजकीय/आर्थिक संबंध पुनर्रस्थापन करण्याच्या,भावी राष्ट्र्पती जो बायडेनच्या धोरणाला अमेरिकन प्रत्युत्तरामुळे मोठा झटका बसेल ही भीती देखील इराणला आहे. इराणवरील आर्थिक/सामरिक निर्बंध सैल करावे अस त्याला वाटत असेल तर त्यानी आपल्या आण्विक प्रकल्पांना खीळ घालण आवश्यक आहे या अटींवर,माजी अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामांनी २०१५मधे ब्रिटन,फ्रन्स,जर्मनी,रशिया आणि चीन बरोबर हस्ताक्षर केलेल्या ” जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन”मधून, डोनाल्ड ट्रम्पनी २०१८मधे एकतर्फी माघार घेऊन इराणला अडचणीत आणल..बायडेनना तो करार पुनर्जीवित करायचा आहे.जो बायडेनचे मनोनीत सेक्रेटरी ऑफ स्टेट,अँटोनी ब्लिंकेननुसार,इराण संबंधातील होऊ घातलेला आण्विक करार,जास्त मजबूत आणि दीर्घकालीन असेल.इराण फख्रीझादेच्या हत्येचा वापर, बायडेन प्रशासनाशी बोलणी करतांना “बार्गेनिंग चिप”सारखा करेल असा संरक्षणतज्ञांचा कयास आहे.
इस्रायलनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नसली तरी,त्यात त्याचा सहभाग असण्याचे इराणी आरोप फेटाळलेही नाहीत. मात्र,या हल्ल्यानंतर इस्रायलनी त्याचे जगभरातील दूतावास,प्रकल्प,पुजा स्थळ, इमारती आणि संसाधनांची सुरक्षा चरमस्तरावर नेली आहे.मोहसेन फख्रीझादेच्या हत्येचा बदला इराण;बदल्याच लक्ष्य कोण याची खात्री झाल्यावर, संपूर्ण तयारी व अचूक आराखडा बनवून आपल्या सोईनुसार, स्थळ,काळ आणि वेळ पाहून, लगेच/ वर्ष दोन वर्षात, घेईल. एकतर इराण आत्मघातकी/घातकी क्षेपणास्त्र हल्ला करेल किंवा ड्रोनद्वारे स्फोटक हल्ला करेल.इस्रायलनी,फख्रीझादेच्या हत्येनंतर इराणच्या संभावी हवाई हल्ल्याला निष्फळ करण्यासाठी त्याच्या एयर डिफेन्स सिस्टीम्सना “रेड हाय अलर्ट”वर आणल आहे. २०२० मधे सुलैमानी व मोहसेन फख्रीझादेसमेत इराणच्या सहा अणुशास्त्रज्ञ/वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या झाली.याच दरम्यान,नातन्झ आण्विक केंद्र,तेहरान जवळील पर्चीन मिलिटरी बेस व आठ इतर महत्वाच्या लष्करी ठिकाणांवर स्फोट घडवण्यात आले.या सर्व घटनांसाठी इराण,अमेरिका व इस्रायलला दोषी मानतो/ठरवतो.फख्रीझादेच्या नुकत्याच झालेल्या हत्येनंतर इराणी संसदेत “डेथ टू इस्रायल”च्या घोषणा निनादल्या व त्याच बरोबर, “युरेनियम एनरिचमेण्ट” वीस टक्के करण्याची आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अणु निरिक्षकांवर संचार बंदी घालण्याची जोरदार मागणी करण्यात झाली. इराणी सूत्रांनुसार त्यांनी ३/४ डिसेंबरच्या रात्री,तेल अविव्हच्या जवळ, मोसाद उपप्रमुख फाहमी हिनावीची हत्या (मॅन्युअल किलिंग) करून फख्रीझादेच्या बदल्याच रणशिंग फुंकल आहे.मात्र इस्रायलनी या बातमीची पुष्टी केलेली नाही. मोहसेन फख्रीझादेच्या हत्येशी अमेरिकेचा सूतमात्र संबंध नाही हे अमेरीकेनी जाहीर केल असल तरी सूत्रांनुसार,फख्रीझादेच्या हत्येपूर्वी अमेरिकेनी त्यांच विमानवाहू आण्विक जहाज ‘निमिट्झ’ पर्शियन गल्फमधे आणि बी ५२ बॉम्बर्सना मध्यपूर्वेतील मित्र देशांमधे आणल/तैनात केल होत.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पीओच्या दक्षिण आशिया दौऱ्या दरम्यान;इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू,सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि पॉम्पीओ यांची गुप्त बैठक रियाधमधे झाल्याच्या बातमीनी, जागतिक राजनीतिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. अमेरिकेनी या वर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही,सौदी अरबनी या बातमीच खंडन केल आणि नेतान्याहूनी कुठल्याही प्रकारच भाष्य करण्यास नकार दिला.डोनाल्ड ट्रम्पच्या राजवटीत इस्रायलला खूप मोठी सामरिक मूभा होती. ती बायडेन राजवटीत मिळेलच याची इस्रायलला खात्री नाही. स्वरक्षणार्थ हल्ला करण्या संबंधी इस्रायलच स्वातंत्र्य बायडेन हिरावणार नाही हे जरी खर असल तरी ट्रम्प प्रशासनाच्या काळात इस्रायलला काहीही करण्याचा हिरवा झेंडा होता तसा आता नसेल हे देखील तेवढच सत्य आहे.त्यामुळे १९ जानेवारी, २०२१ला अमेरिकेतील होऊ घातलेल्या सत्ता पालटा आधीच इस्रायल काही धडक कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोहसेन फख्रीझादेच्या हत्येच “कॉस्ट बेनिफिट ऍनालिसिस” केल असता;या हत्येमागे कोणता सामरिक उद्देश होता,यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावर होणारे परिणाम,याच्या टायमिंगची वैधता आणि हत्ये मुळे फायदा होईल की तोटा हे प्रश्न समोर येतात. ट्रम्पचा कार्यकाळ संपायला अवघे दोन महिने उरले असतांना इस्रायल,अमेरिका व सौदी अरबच्या नेत्यांच्या;नोएममधील १८-२१ नोव्हेंबरच्या वर उल्लेखित बैठकीनंतर ही हत्या झाल्यामुळे यात या तीनही देशांचा हात/समावेश होता अस मानल्या जात. या हत्येमुळे; बायडेन व रुहानीच्या संभावित/भावी जवळकीला चाप बसून २०१५च्या आण्विक कराराच पुनर्जीवन करण कठीण होईल आणि .आपापल्या देशांमधे ट्रम्प व नेतन्याहू यांची वट वृद्धिंगत होईल. पण याच्या परिणामस्वरूप; इराणमधे कट्टरपंथीयांना (हार्ड लाइनर्स) बळ मिळून, जून २०२१मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तेथील मूलतत्ववाद्यांचा निःसंशय विजय होईल. दुसऱ्या बाजूला,इराणी अणुशास्त्रज्ञांच्या हत्येला अमेरिकन/इस्रायली वैधता मिळाली तर इराण द्वारा इस्रायली/अमेरिकन अणु शास्त्रज्ञांची हत्या आणि इतर हिंसक कारवायांनाही स्वाभाविक वैधता प्राप्त होईल.
मोहसेन फख्रीझादेच्या हत्येमुळे एक गोष्ट प्रकर्षानी उजागर होते. बलाढ्य शत्रू राष्ट्रांकडे,आपली सर्व महत्वाची माहिती (इंटलिजन्स) असते. अशा हत्या करण्याची यंत्रणा (सिस्टीम),धडाडी ( ऍड़ॉसिटी) आणि कुवतही (कॅपेबिलिटी) त्यांच्यात असते. अशी कारवाई,अतिशय सफाईदार,अचूक आणि प्राणघातक रित्या पार पाडल्या जाते. भारतानी अशा कारवायांना या आधीही तोंड दिल आहे आणि आजही देतो आहे. सर्व साधारणपणे, प्रतिस्पर्ध्यांनी आण्विक क्षेत्रात आपल्या पेक्षा वरचढ होऊ नये या उद्देशानी अशा हत्या होतात/केल्या जातात. भारतही या दिव्याचा सामना करतो आहे.या दिव्याची सुरवात,भारतीय अणुयुगाचे जन्मदाता,डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या मृत्यूने झाली. २४ जानेवारी १९६६ ला, ते प्रवास करत असलेली एयर इंडिया फ्लाईट नंबर १०१, स्विस आल्प्स पर्वतराजीच्या मॉन्टे ब्लँक शिखरावर आदळल्यामुळे नष्ट/ध्वस्त होऊन,त्यातील ११७ प्रवासी/कर्मचारी मृत्युमुखी पडले. वैमानिकाचा एयर ट्रॅफिक कंट्रोलरशी असणारा संपर्क तुटल्यामळे हा अपघात झाल्याचा अहवाल पाश्चात्य निरीक्षक/ तपासकांनी दिला. १९६४मधे चीननी केलेल्या अणुस्फोटांनंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी विचारलेल्या “कॅन वुई मॅनेज अंडर ग्राउंड न्यूक्लियर टेस्ट”या प्रश्नाला,होमी भाभांनी होकार दिला आणि तद्नुसार,काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत,“आम्ही नजदिकी भविष्यात अणुस्फोट करून बॉम्बही बनवू”अशी स्पष्ट ग्वाही दिली.
भाभांच्या अपघाताच्या केवळ १३ दिवस आधी; तत्कालीन सोव्हिएट युनियन मधील ताश्कंद शहरात,पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना, अतिशय रहस्यमय स्थितीतील अगम्य अकाली मृत्यूला सामोर जाव लागल हा असंभवनीय/ अनाकलनीय योगायोग तर नक्कीच नव्हता.भारताला अणुशक्ती/अण्वस्त्रधारी बनण्यापासून दूर राखणे ही सीआयए/अमेरिकेची तत्कालीन प्राथमिकता होती आणि केजीबी/रशियाला नेहरू घराण्यातील देश प्रमुखच पाहिजे होता. भाभांच्या अपघातामागे अमेरिका आणि शास्त्रींच्या मृत्यूमागे रशिया असल्यामुळे,भारत एक कर्तबगार पंतप्रधान आणि अणुशास्त्रज्ञाला मुकला.होमी भाभांच्या अपघातानंतर,भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (बार्क) आणि इतर आण्विक प्रकल्पांशी निगडित शास्त्रज्ञांचा मोठ्या प्रमाणात रहस्यमय,अनैसर्गिक मृत्यू झाला. न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनचे उमा राव व रवी मेने, कल्पक्कम आण्विक केंद्राचा मोहम्मद मुस्तफा,बार्कचे उमंग सिंग,एम अय्यर व पार्थ प्रतिम बाग,कैगा ऍटोमिक पावर स्टेशनचा एल महालिंगम समेत २३ अणुशास्त्रज्ञ आणि इंडियन स्पेस रिसर्च सेंटरच्या ६८४ शास्त्रज्ञांना यमसदनी प्रयाण कराव लागल. सर्वात शेवटची घटना,२०१९मधे झाली.
या सर्वांच्या मृत्यूची कारण तपासणी झाली का,त्यामागे कोण होत,त्यातून कोणते निष्कर्ष निघाले,त्यावर काय कारवाई झाली आणि पुढे याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कोणती पाऊल उचलली आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.भारताच्या आण्विक/अंतरिक्ष संशोधनाला खीळ लावण्यामागे, सीआयए आणि आयएसआयचा हात आहे याची खात्री भारतीय संरक्षणतज्ञांना आहे.अण्वस्त्रधारी भारत पाकिस्तानसाठी “खतरेकी घंटी” आहे आणि अण्वस्त्र निर्मिती करता भारतानी नेहमी आपल्यावर अवलंबून राहाव ही अमेरिकेची “दिली ख्वाईश”होती/आहे हे १९९९च कारगिल युद्ध आणि १९७४/९८च्या अणुस्फोटातून प्रत्ययाला येत.
पाकिस्तान व चीन आपल्या मूळावर उठले असतांना आणि अमेरिकन हेतूची ठाम खात्री नसताना, मोहसेन फख्रीझादेच्या हत्येमधून योग्य तो बोध घेण सरकार साठी अपरिहार्य असेल. जागतिक पटलावर शाश्वत मित्र/शत्रू नसतात. तेथे फक्त देशाच्या भल्या/स्वार्थाच्या मध्ये नजर स्वतःची कार्यपद्धती ठरवून, धोरण आखणी करावी लागते. उत्तरी सीमेवरील सामरिक तणावाला नजर अंदाज करत,राजकीय स्वार्थासाठी आज भारतात,एक प्रकारची अराजकी परिस्थिती निर्माण करण्यात येते आहे/झाली आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन भारताच्या शत्रूंनी, उपग्रहाद्वारे कंट्रोल केलेल्या हत्यारांचा वापर अती विशिष्ठ लोक/संसाधन/इतर अती महत्वाच्या लक्ष्यांवर केला/करायच ठरवल तर त्या विरुद्ध काही ठोस धोरण आहे का किंवा या हत्येपासून धडा घेऊन या बद्दल धोरण निर्मिती होणार आहे का याच उत्तर येणार काळच देईल.

– कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

0

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Leave A Reply

Your email address will not be published.