न मे कर्मफले स्पृहा.

गीता जयंती विशेष

1 1,046
न मे कर्मफले स्पृहा.
हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ म्हणजे ‘भगवतगीता’! सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष  शुक्ल एकादशीच्या (मोक्षदा एकादशी) दिवशी, भगवान श्रीकृष्णाने, कुरुक्षेत्रच्या रणांगणावर अर्जुनाला गीतेचे ज्ञानामृत सांगितले. मानवाच्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या गीतेचा उपदेश सुरु झाला. म्हणूनच हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून साजरा केला जातो.
महाभारतातील भीष्मपर्वाचा गीता हा भाग आहे. त्यात १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत. गीतेत मानवाचा सर्वच अंगांनी विचार आहे. ‘गीता’ ही कल्याण करणारी ग्रंथरूपी देणगी मानवाला लाभली आहे. श्रीमद्भगवतगीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर खऱ्या अर्थाने जीवनग्रंथ आहे. हा एक पावन पुनीत ग्रंथ आहे, ज्यात वेदांचे सार तत्व संग्रहित करण्यात आले आहेत. यात धर्माचा उपदेश समाहित करण्यात आला आहे. यांत जीवन जगण्याची कला सांगण्यात आली आहे. यात कर्म-भक्ती-ज्ञान यांचा उपदेश आहे. यात मनुष्याच्या स्वधर्माचे ज्ञान आहे. सदासर्वकाळ असा हा प्रेरणादायी ग्रंथ आहे. गीता म्हणजे सर्व ग्रंथांचा मेरुमणी व परमार्थाचा शिरोमणी आहे. म्हणूनच गीता हा जगातील एकमेव ग्रंथ आहे, ज्याची जयंती साजरी केली जाते.
भगवद्गी ता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. संदर्भ बदललेत, परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत तसाच्या तसा आहे.
या ग्रंथात सर्वात मुख्य उपदेश आहे धर्माचा. आज मनुष्याचे जीवन धर्ममार्गापासून भटकून गेले आहे. धर्म वास्तविक पाहता आम्हाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवितो. गीतेत स्वत: श्रीकृष्णानेच म्हटले आहे
*“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्”* ॥४-७॥
*“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे”* ॥४-८॥
हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते व अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी साकार रुपात लोकांच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट होतो. साधुपुरुशांचे रक्षण करण्यासाठी तसेच पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी मी युग युगात प्रगट होत असतो.
जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी मानली जाणारी भगवत्-गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी दिशादर्शक आहे. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.
“न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते”।|४-१४।। असा संदेश देणारी गीतेची सर्वाधिक मोलाची शिकवण म्हणजे, आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे. एक प्रकारे हीच शिकवण आपल्याला आपल्या कार्याप्रती निस्वार्थी बनवते, आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण करायला प्रवृत्त करते, आणि जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगायला शिकवते.
गीतेची शिकवण ही आहे की संसार सोडायचा नाही तर संग सोडायचं, कर्म सोडायचे नाही तर कामना, अपेक्षा सोडायची. जे कर्म करायचे ते अपेक्षा ठेवून करायचे नाही, ते निष्काम असले पाहिजे.
संसाररूपी रस्त्यावरून चालताना अतिशय उत्तम शिदोरी म्हणजे भगवतगीता. गीतेने ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय केला आहे. पण हा समन्वय करताना भक्तीवर जास्त भर दिला आहे. ज्ञान कर्म आणि भक्ती या तीनही गोष्टींमध्ये एकवाक्यता आहे. खऱ्या कर्मात भक्ती आणि ज्ञान, खऱ्या भक्तीत कर्म ज्ञान व खऱ्या ज्ञानात कर्म आणि भक्ती सामावलेली असतात.
वसुदेवसुतंदेव कंस चाणूर मर्दानम, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगतगुरुम| भगवतगीता ही महाभारताच्या मध्यभागी उंच दीपस्तंभासारखी उभी आहे. तिचे सिद्धांत त्रिकाला बाधित आहेत. कारण त्यात जीव, जगदीश आणि जगत यांचे रहस्य आहे.ज्ञान भक्तीचा सुंदर मिलाप आहे. त्यातील प्रत्येक ओळीतून ईश्वराचे दर्शन होते. मनुष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त होण्याकरिता गीतेची रचना आहे. ती संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. गीतेमध्ये जीवनाचे खरे सिद्धांत सांगितले असल्यामुळे कोणत्याही संप्रदायाच्या बुद्धिनिष्ठ माणसाला ती आवडेल. आपले जसे पंचप्राण आहेत तसेच गीतेचेही पंचप्राण आहेत.
१) प्रयत्नवाद: गीतेचा प्रयत्नवाद हा दैवी प्रयत्नवाद आहे. “प्रयत्न करणे व हाक मारणे” या दोघांचे रासायनिक मिश्रण हा गीतेचा प्रयत्नवाद आहे.
2) अहंकारनाश: गीता सांगते, अहंकाराला दूर करायचे असेल तर भगवंताशी नाते जोडा. अहंकारनाशासाठी
“मी तुझा आहे” हा मोठा अहंकार बाळगा असं गीता सांगते. “अहं ब्रम्हास्मि शिवोहम” ही भावना असावी.
३) लोकसंग्रह: लोकसंग्रह म्हणजे लोकांना गोळा करणे नसून लोकांचे उन्नतीकरण करणे होय. पशुतुल्य जीवन जगणाऱ्याला मानव बनवणे. माणसात असलेले चैतन्य जागृत करण्याचे काम म्हणजे लोकसंग्रह.
४) भक्ती : हा गीतेचा प्राण आहे. जो कधीही भगवंतापासून विभक्त होत नाही तो भक्त. भक्ती ही एक वृत्ती आहे. भगवतगीता, भक्ती व उपासना यातील भेद समजावताना, उपासना करायची असते, पण भक्ती जीवनात आणायची असते आणि ती आणण्यासाठी एकाग्रता हवी. जीवनातील प्रत्येक कर्म भक्तीमय, ज्ञानमय, सेवामय व्हावे. जीवनात आनंद मिळवायचा असेल तर भक्ती हा उत्कृष्ट मार्ग आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलच आहे, “भक्तिविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा”.
५) समन्वय: कर्मयोग्याचा हात, ज्ञानी माणसाचे नेत्र व भक्ताचे हृदय या तिहींचा समन्वय होणे म्हणजे त्रिवेणी संगम. गीतेच्या समन्वयात पूर्ण ज्ञानी, पूर्ण कर्मयोगी, व पूर्ण भक्त यांना स्थान आहे. गीता ही सज्जनांना जवळ करते. कारण तो सज्जन आहे म्हणून आणि दुर्जंनांही जवळ करते कारण तो पापी आहे म्हणून. दुर्जनांनाही ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे. ईश्वर स्मरणानेच वाल्ह्याचा वाल्मिकी झाला.
श्रीकृष्णाने निरनिराळ्या विचारांचे मंथन करून मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयोगी पडणारे अमृत बाहेर काढले, हेच गीतामृत होय. भोगाचा अतिरेक झाल्यावर जसा समाज पतित होतो, त्याचप्रमाणे त्यागाचा अतिरेक झाल्यावर देखील समाज अध:पतित होतो. भोग आणि त्याग, प्रवृत्ती व निवृत्ती यांचा सुवर्णमध्य साधतो तोच या जगात कृतार्थ होतो. हे सर्व कसे साधावे, प्रवृत्ती निवृत्ती रूप कशी करावी व निवृत्ती प्रवृत्ती कशी करावी हे गीतेतील श्रीकृष्णाचे तत्वज्ञान शिकल्याने समजते.
जीवन जगत असताना, जगण्याचा प्रयत्न करत असताना, क्रोधावर ताबा मिळवणे फार आवश्यक आहे.
गीतेत आपल्या कोणत्याही समस्येवर उत्तर सापडत नाही असे होतच नाही. ही भगवद्गीता म्हणजे जन्म आणि मृत्यू या दरम्यानच्या प्रवासात, वादळी वारा होऊन, होडीतून जाण्यासाठी, मार्ग दाखवणारी, सुखदुःखाच्या भावना अनुभवताना, सकारात्मक दृष्टी देणारी, अशी जिवाभावाची सखी. मनाचा संपर्क साधावयाचा असेल तर गीते सारखा दुसरा शिक्षक नाही.
गोंधळलेल्या, भांबावलेल्या, अर्जुनाला जसे मोह नष्ट होऊन कर्तव्याचे भान येते, तशीच स्थिती गीता वाचनाने, आचरणात आणल्याने, आपली होते. काय करावे किंवा काय करू नये हे समजत नाही, अशावेळी गीतेतून आपल्याला योग्य मार्गदर्शन होते म्हणूनच गीता फक्त त्या काळापुरती किंवा यापुरती मर्यादित नाहीत अनंत काळासाठी व सर्व जगतासाठी गीता मार्गदर्शक आहे.
विनोबाजींनी तर “भगवद्गीते”ला गीताई माऊलीच म्हटलेले आहे. “गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, रडता पडता घेई उचलूनी कडेवरी|”. महात्मा गांधी म्हणतात.”गीता माउलीने, माझ्या लौकिक मातेची जागा भरून काढली.”
भगवतगीता आपणास सुरवातीलाच आठवण करून देते – *“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे”*. ज्याला आपण धर्मभूमी म्हणतो, कर्मभूमी म्हणतो ते आपले कर्मक्षेत्र आहे. ते आपले धर्मक्षेत्र आहे. कर्माला धर्मापासून वेगळे करायला नको. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” याचा अर्थ “क्षेत्रे क्षेत्रे, धर्म कुरु” असा घेतला. म्हणजेच जे क्षेत्र तुम्हाला मिळाले आहे, बस, तिथे तिथे “धर्म” करायचा प्रयत्न करा. नियतीने सृष्टीच्या प्रत्येक जीवनाला वेगवेगळे क्षेत्र देवून ठेवले आहे. कुणी शिक्षक आहे,  कुणी विद्यार्थी आहे, कुणी व्यापारी तर कुणी नोकरदार. कुणी सैनिक आहे तर कुणी गृहिणी. अशा प्रकारे जीवनाची जेवढी रूपे आहेत त्या सर्वांचे आपले आपले कुरुक्षेत्र आहे. कर्मक्षेत्र आहे. निसर्गाने, नियतीने मनुष्याला कुरुक्षेत्र तर दिले, कर्मक्षेत्र तर दिले: पण त्याला “धर्मक्षेत्र” आपण बनवायचे आहे. त्यात धर्माची स्थापना आपल्याला कराव्याची आहे. अधर्म कराल तर भगवंत तुमच्या साठी नाहीच.
श्रीमद्भगवद्गीतेचे आख्यान, त्याचे वचन, कर्मामध्ये धर्माला सम्मिलित करण्याचे आवाहन आहे.
सगळ्याच दृष्टीने गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते  याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते. आपल्या शिकवणीतून गीता आपल्याला मनावर पूर्ण ताबा मिळवायचा मार्ग दाखवते. ती तुम्हाला एका अत्युच्च उंचीवर नेते. तुम्हाला मन:शांती आणि स्थर्य देते. पूर्वीपेक्षा अधिक, आणि जगभरातील लोक याच मन:शांतीच्या शोधात आहेत. सततच्या तणावपूर्ण वातावरणात संयमाचे महत्त्व आता लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे.
गीतेतील तत्त्वज्ञान आपल्याला समानतेचीच शिकवण देते. याचाच अर्थ गेल्या अनेक युगांपासून समानतेचे तत्त्व भारतात रुजलेले आहे. वास्तविक पाहता जगातील कोणताही धर्म भेदभावाची शिकवण देत नाही.
‘वेद,उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानसा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. ‘गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे.
आज गीता जयंतीच्या दिवशी, आपल्या जीवनातही गीतेचे पंचप्राण आणि जीवनाला दृष्टी देणारा संदेश, आपण अनुसरण्याचा संकल्प करू या.

लेखक हे पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेले असून एका खाजगी कंपनीत 26 वर्ष नोकरी केली. सध्या गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, बाल विहार, गोकुळ साठी लिखाण आणि कार्यक्रम सादर. वृत्तपत्रांमध्ये समयोचित लिखाण. भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या कार्यात सहभाग. गेली चौदा वर्ष, कर्क रोग जनजागृती अभियान आणि समुपदेशन म्हणून कार्यरत. मोबा - ९४२३३८३९६६

1 Comment
  1. एकनाथ बडवाईक says

    छान प्रासंगिक लेखन.

Leave A Reply

Your email address will not be published.