सावरकर, विनायक दामोदर : (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी ,थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.
सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.
मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.
भारतमातेच्या थोर सुपुत्रास शत शत नमन !