दाभाडकर आणि एकसष्टीचा समाजमाध्यमी महाराष्ट्र.
दाभाडकर आणि एकसष्टीचा समाजमाध्यमी महाराष्ट्र.
गोष्ट तशी छोटी…नारायणराव दाभाडकर नावाचे गृहस्थ आजारपणामुळे आणि वय जास्त असल्याने काही दिवसांपूर्वी वारले. त्या दिवशी अशी खूप लोकं महाराष्ट्रात ,देशात वारली असतील. कोरोनाचा कहरच एवढा आहे कि अशी वयस्कर मंडळी देवाघरी जाणे याची तशी खंत वाटण्याचे कारण नाही .खरं तर अनेक जण त्याला ‘चला सुटले बिचारे’ असेच म्हणतात. आणि गम्मत म्हणजे सुटले कोण तर देवाघरी जाणारे जसे तसेच खाली राहिलेले देखील. व्यवस्थापन शास्त्रातील काय ते win-win combination सारखे. असो.. दाभाडकर तसे काही प्रसिद्ध व्यापारी..उद्योजक ..राजकीय पुढारी ..तत्वशील चिंतक ..विचारवंत.. वैगरे वैगरे काहीच नव्हते. ते एक साधे कुटुंबकर्ते होते. आजारी पडल्याने सर्वसामान्य कुटुंबात जसे पुढील उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातात तसे त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात आणले. कोरोनाच्या कहरामुळे रुग्णालयातील गर्दी आणि त्यांची हवालदिलता, देखील जी आज सर्वत्रच दिसत आहे, बघून दाभाडकरांना रुग्णसेवेची जास्त गरज आपल्या पेक्षा अन्य तरुण रुग्णांना आहे. आपले तर काय आता वय झाले आहे, असे वाटल्याने रुग्णालयात न थांबता घरी आले आणि आजारपणामुळे पुढील तीन दिवसातच मृत्र्यूमुखी पडले. जवळच्या कोणी तरी या सर्वांची माहिती घेत याची माहिती सामाजाध्यामावर प्रसारित केली. आपल्या पेक्षा अन्य कुणालातरी अधिक गरज आहे अशी त्याग वृत्ती ठेऊन केलेली ही कृती अन्यथा आपला महाराष्ट्र धर्म ..भारतातील त्यागाची परंपरा..अगदीच काही नाही तर ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ या सदरात मोडली असती.. कदाचित याची दाखलही घेतली गेली नसती …. पण प्रसारमाध्यमातील त्या माहितीत हे दाभाडकर नावाचे गृहस्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते असा उल्लेख आला आणि ती माहिती ‘बातमी’ झाली. गोष्ट मोठी झाली…..
महाराष्ट्रातील एका नामांकित वृत्तपत्राने त्यांच्या शोध पत्रकारितेतून या माहितीची बातमी बनवली. दाभाडकर त्या रुग्णालयात गेलेच नव्हते पासून ते त्यांच्या कथित त्यागकथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी शोध मोहीम सुरु केली. कोरोना काळात शासनाने खूप वेळा जाहिराती देऊन देखील डॉक्टर का मिळत नाहीत, बऱ्याच ठिकाणी अन्य राज्यातून वैद्यकीय स्टाफ का आणावा लागत आहे, दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणार असे सांगितल्यावरही परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी का चालले आहेत, कठोर आदेश काढल्यावर देखील लोक ते का पाळत नाहीत, त्यांना कठोर निर्बंध म्हणजे काय हे कळले आहे का? अशा सद्यस्थितीतील अनेक बाबींवर शोधपत्रकारिता केली असती तर महाराष्ट्रातील काही प्रश्न निकाली लागले असते. पण ते न करता एखादी समाजमाध्यमावरील वाचण्यास केवळ एक किवा दोन मिनिटे लागणारी बातमी, कोणतीही दहशतवादी , गुन्हेगारी, राजकीय धुळवडीत हिरव्यावर भगवा किवा भगव्यावर लाल रंग फेकून शिमगा न करणारी…अगदी गेलाबाजार लैगिक अत्याचार, बलात्कार… काहीच नाही तर आर्थिक घोटाळा .. डीमॉनिटायझेशन कि काय ते…किवा अगदी रेमडेसिव्हीर..ऑक्सिजनचा तुटवडा अशांविषयी भाष्य करणारी कोणतीही माहिती त्या बातमीत नसताना देशातले किंबहुना महाराष्ट्रातले खूप कळीचे आणि जनजीवन विस्कळीत करणारे, त्याची माहिती किंवा उपाययोजना वृत्तपत्राच्या ज्या मुख्य पानावर असते तेथे हे सर्व विषय बाजूला सारून दाभाडकरांना प्राधान्य दिले. दाभाडकरांच्या माहितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख येतो काय आणि ‘लोकमान्य लोकशक्ती’ जागी होते काय. याचा अर्थ काय घ्यायचा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शब्दांच्या भयगंडाने जळी.. स्थळी.. काष्ठी आता हे येणार ..या भीतीने आपण काय करतो आहोत याचे भानच सुटत चालल्याचे दिसत आहे.
कालच १ में रोजी आपण महाराष्ट्रीयन एकसष्ट वर्षाचे झालो. महाराष्ट्र धर्म वाढवताना,महाराष्ट्राच्या गुणांची यादी करताना अन्याया विरुद्धची चीड, चिवटपणा, अभिमान, आधुनिकतेचा ध्यास, या सारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांबरोबरच बुद्धिप्रामाण्यवाद याची जाण महाराष्ट्राला विसावे शतक उजाडण्याच्या आधीच आली होती असे लिहिणाऱ्यानी आपला बुद्धिप्रामाण्यवाद कुठे गहान ठेवला ? लोकहितवादी,बाळशास्त्री जांभेकर,लोकमान्य टिळक,प्रल्हाद केशव अत्रे ते अगदी अलीकडच्या काळातील गडकरी , तळवलकर, टिकेकर यांचा पत्रकारितेचा वारसा ज्यांनी जपावा असे वाटणाऱ्यांनी अशी पत्रकारिता करावी. कोरोनाच्या या काळात आजाराचे स्वरूप बदलले तसे आजारी पडणाऱ्यांच्या लक्षणात देखील अनाकलनीय बदल होऊ लागले. पत्रकारिता करणाऱ्यांच्यात देखील असे काही करोना काळात झाले कि काय?. या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या बाबतीत काहींनी असे सांगितले कि ते करोनामुळे गेले हे खरे जरी असले तरी अर्धसत्य आहे त्यांना आधीच खूप आजार होते. कोरोना निमित्त झाले. बहुतेक पत्रकारितेतील अनेकांबाबातीत असे झाले आहे काय? एकसष्ठीत माणूस प्रगल्भ होतो असे म्हणतात. आमचे काय चालले आहे. वैचारिक मतभेदालादेखील आपल्या व्यवहारात एक सन्मानपूर्वक स्थान देणाऱ्यांची परंपरा सांभाळणारे आम्ही कुठे चाललो आहोत. मधल्या काळात राजकीय पटलावरील घडामोडीत सुद्धा विमानात बसलेल्या माननीय राज्यपालांना राजकीय ताकद दाखविण्याच्या हव्यासापोटी खाली उतरवण्यापर्यंत आपली बौद्धिक कुवत झाली. या लेखाचा राजकीय विषय राजकीय नाही,परंतु ज्या माध्यमाने समाजभान घडवायला हवे अशी अपेक्षा आहे. त्यांनी वैचारिक विद्वेषाचा असा पसारा मांडावा. आपण किती पुरोगामी आणि मोकळे ,पुढारले आहोत हे दाखविण्याच्या नादात अंगावरचे सगळेच कपडे काढून नागडे झाले आहोत याचे भानही सुटत चालले आहे.
प्रश्न दाभाडकरांचा नाही,तर आपल्या विवेकाचे स्खलन होण्याचा आहे. आत्ता पर्यंत जे मागे राहून काम करायचे ते आता पुढे येऊ लागले आहेत. त्यांचे एखादे लहान, कोणी सांगितले नाही तर कळणार देखील नाही आणि कळले तरी त्याची कोणी टिमकी वाजविणार नाही असे असताना देखील दुसऱ्यास सोय उपलब्ध करून दिली हे वाचण्याने देखील तिळपापड होत असेल तर असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी आता त्याची सवय करायला हवी. बदलाचे वारे तर वाहू लागले आहे याचे भान ठेऊन सदसद्विवेकबुद्धी जागी ठेऊन वागणे गरजेचे झाले आहे. एकसष्टीतील हा महाराष्ट्र आता केवळ सुजाणच नव्हे तर जागरूक झाला आहे, ती जागरूकता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने सांभाळावी हेच आव्हान आहे.
फोटो साभार – dandelife.com