इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे.
इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे.
अनेक वर्षांपासून या विषयावर लिहिण्याचं मनात होतं. इतिहास प्रामुख्याने दोन पद्धतीने मांडला जातो, शास्त्राच्या आणि कलेच्या द्वारे. शास्त्र म्हणजे संदर्भ घेऊन जसाच्या तसा वस्तुनिष्ठ, इतिहासलेखनाचे मूळ शास्त्र आहे तसा इतिहास मांडणे. कलेच्या द्वारे म्हणजे इतिहासाची पार्श्वभूमी घेऊन, कलात्मक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून कलाकृती रचणे. उदाहरणार्थ कादंबरी, नाटक, चित्रपट वगैरे. इतिहास जाणून घ्यायचा असेल किंवा अभ्यासायचा असेल तर पहिल्या शास्त्रोक्त पद्धतीने मांडला जातो तोच वस्तुनिष्ठ इतिहास वाचावा लागतो. आपल्याकडे अनेकजण घोळ करतात; कादंबरी वगैरे कलाकृतींना खरा इतिहास मानतात. गेल्या काही वर्षात ही परिस्थिती अगदी अल्प प्रमाणात बदलली आहे. अर्थात हा विषय तसा मोठा आहे, तो आत्ता इथे थोडक्यात सांगण्याचं कारण हे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘राजा शिवछत्रपति’ या अद्वितीय आणि सुप्रसिद्ध ग्रंथाला काहीजण कादंबरी मानतात. वास्तविक हे बरोबर नाही. ‘राजा शिवछत्रपति’ ही कादंबरी नाही. ते कसे ह्याचे स्पष्टीकरण पुढे देत आहे.
बाबासाहेब पुरंदरेंचा ‘राजा शिवछत्रपति’ हा ग्रंथ मला वाटतं शिवचरित्रावरचाच नाही तर एकूणच मराठ्यांच्या इतिहासासंबंधीचा सर्वाधिक गाजलेला ग्रंथ. या ग्रंथाच्या लोकप्रियतेविषयी फार सांगण्याची गरज नाही. तब्बल सहाहून अधिक दशकांपासून अधिराज्य गाजविणाऱ्या या ग्रंथाने शिवचरित्र खरोखर घराघरात पोहोचवलं. गेल्या काही वर्षांत काहीजणांनी मुद्दामून या ग्रंथाविषयी काही वाद उद्भवले, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि काही तथ्यहीन आरोप केले. बाकीच्या आरोपांविषयी दखल घेण्याचीही गरज नाही कारण ते पूर्णपणे तथ्यहीन आहेत आणि खोडले गेले आहेत. पण अनेकांना ‘राजा शिवछत्रपति’ हा ग्रंथ कादंबरी वाटते. कारण काय तर हा ग्रंथ अतिशय सोप्या, सुंदर भाषेत लिहिला आहे म्हणून. ‘राजा शिवछत्रपति’ला कादंबरी समजणाऱ्यांना संदर्भग्रंथ आणि कादंबरी दोन्हीही नीट समजलेले नाहीत. कादंबरीकार हा ऐतिहासिक कादंबरी लिहिताना इतिहासविषयक संदर्भांचा त्याला हवा तसा उपयोग करतो पण तो पुरेपूर कलात्मक स्वातंत्र्याचाही उपयोग करतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरीत जागोजागी काल्पनिक संवाद, काल्पनिक पात्रं, वर्णनं, प्रसंग असतात. तो काही इतिहास नसतो. फक्त कादंबरीची कथा, पार्श्वभूमी इतिहासावरून घेतलेली असते. हीच गोष्ट नाटक, सिनेमा, टीव्ही सिरीयल इत्यादींची. अशा इतिहासविषयक कलाकृती बनवताना आता तर कलात्मक स्वातंत्र्याचा अतिवापर आवश्यकच असतो असा समज त्या बनविणाऱ्यांनी करून घेतलेला दिसतो. असो. बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘राजा शिवछत्रपति’ मध्ये असे काही काल्पनिक संवाद, पात्र, प्रसंग नाहीत. सगळ्याला संदर्भ आहेत. जे संवाद आहेत ते ऐतिहासिक साधनांतील संवादांवरूनच किंवा ऐतिहासिक प्रसंगाच्या अनुषंगाने आहेत. वस्तुस्थितीला सोडून नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ‘राजा शिवछत्रपति’च्या नवीन आवृत्त्यांमध्ये संदर्भग्रंथांमध्ये असतात तसे मजकुरात जागोजागी आकडे टाकून प्रकरणाच्या शेवटी संदर्भ दिलेले आहेत. त्यांचे नीट निरीक्षण करता बाबासाहेबांनी शिवचरित्र अक्षरशः जगले आहे, इतिहास घोळून प्यायलेले आहेत याची प्रचिती येते.
याबाबतीत ‘राजा शिवछत्रपति’ ग्रंथाच्या निर्मितीचा इतिहास माहीत असणे महत्त्वाचे आहे. बाबासाहेब पुरंदरेंना शिवचरित्र लिहिण्याची महत्त्वाकांक्षा पहिल्यापासूनच होती. ‘राजा शिवछत्रपति’ ग्रंथाच्या पूर्वी बाबासाहेबांनी शिवचरित्राची दहाबारा प्रकरणं विवेचन पद्धतीने, इतिहासलेखनाचे शास्त्र असते त्या पद्धतीने लिहिली. म्हणजे इतिहास संशोधक, अभ्यासक लिहितात त्या पद्धतीने. १९५०-५१च्या दरम्यान ‘एकता’ या मासिकाच्या संपादकांच्या सांगण्यानुसार बाबासाहेब आपल्या या शिवचरित्राची काही प्रकरणं त्या मासिकात द्यायला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेले हे प्रकरणात्मक शिवचरित्र एकता मासिकात दर महिन्याला क्रमशः येऊ लागले. पण पहिल्या सहा महिन्यांत सहा लेखांवर वाचकांची एकही अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया आली नाही. उत्सुकतेने बाबासाहेब जेव्हा संपादकांकडे विचारायला गेले तेव्हा संपादक म्हटले की “आम्ही तरी कुठे वाचतोय. तू लिहितोय म्हणून आम्ही छापतोय…” हे हसण्यावारी निघालं. पण बाबासाहेब घरी आल्यावर गंभीरपणे विचार करू लागले की मी लिहिलेले हे शिवचरित्र उत्कृष्ट नसेलही, पण या अलौकिक चरित्रावर एकाचीही वाचून चांगलीवाईट प्रतिक्रिया येऊ नये…? तेव्हा खूप विचार करून बाबासाहेबांनी हे शिवचरित्र त्यांच्या घरचे उपाध्याय वासुदेवकाका कविगुरुजींना वाचायला दिलं आणि सल्ला मागितला. ते म्हटले, “अरे बाबासाहेब, तुझं हे लिखाण वाचायला मला आठ दिवस नेट लावावा लागला. तू लिहिलेलं सगळं अभ्यासपूर्ण आहे, पण त्यात पांडित्यही नाही आणि ललित्यही नाही. फक्त ऐतिहासिक सत्य आहे. सत्यच लिही पण सुंदर लिही. अवघड विषय सोपा आणि सुंदर कर. शिवाजीमहाराजांचं सगळं चरित्रच रत्नखचित आहे. निखळ सोन्याचं आहे. पुन्हा लिही.” त्यांनी बाबासाहेबांना ज्ञानेश्वरीचं उदाहरण दिलं. मग बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरी आणि साऱ्या संतांच्या, लोककलावंतांच्या पासून प्रेरणा घेतली आणि ‘महाराष्ट्ररसात’ हे अद्वितीय शिवचरित्र कसं लिहिलं, त्याविषयी फार सांगण्याची आवश्यकता नाही.
‘राजा शिवछत्रपति’ ग्रंथाची ही थोडक्यात पार्श्वभूमी. बाबासाहेबांनीच ‘राजा शिवछत्रपति’च्या प्रस्तावनेत हे सगळं सांगितलं आहे. बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी किती हालअपेष्टा सोसल्या, किती खस्ता खाल्या, किती झटले हा एक वेगळा नि मोठा विषय आहे. घरचे दागिने, सामान विकलं, पुण्याहून रेल्वेने रात्री मुंबईला जाऊन भायखळ्याच्या बाजारात भाजी विकली, गावोगावी जाऊन पुस्तके विकलीत… ऐतिहासिक कागदपत्रांसाठी प्रचंड पायपीट केली, सायकलीवर खूप फिरलेत. काय काय सहन केलं कल्पनाही करता येणार नाही. उगाच नाही हे शिवचरित्र घराघरात पोहोचलं, सगळ्यांना शिवचरित्राची, इतिहासाची गोडी लागली.
बाबासाहेबांनी सोप्या, सुंदर, आकर्षक, रसाळ भाषेत का लिहिलं यासाठी हे सांगितलं. बाबासाहेब त्यांच्या स्वभावानुसार स्वतःला इतिहासकार म्हणवत नाही. अनेकांकडून त्यांना बखरकार, नाटककार, कादंबरीकार म्हटले जाते (बाबासाहेबांना ‘शिवशाहीर’ ही पदवी सातारच्या राजमाता कै. सुमित्राराजे भोसले यांनी १९६७ मध्ये दिलेली आहे). अर्थात बाबासाहेबांनी काही ऐतिहासिक नाटके, कथा, कादंबऱ्याही लिहिल्यात. पण बाबासाहेब पुरंदरे इतिहासकारही आहेत. हे सिद्ध करायला ही ‘राजा शिवछत्रपति’ ग्रंथाची पार्श्वभूमीच नाही तर अजून अनेक दाखले आहेत. १९४७ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७’ मध्ये बाबासाहेबांनी पेशवेकाळातील २७ महत्त्वाची पत्रे संशोधित करून त्यात समाविष्ट केलेली आहेत. त्या खंडात सुरुवातीलाच ही पत्रे आहेत. या खंडाच्या प्रस्तावनेत भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस ‘ब.मो.पुरंदरे तरुण इतिहास संशोधक’ असा बाबासाहेबांचा उल्लेख करून त्यांना गौरवतात. महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीच्या नेमक्या तिथीचा निर्णय करण्यासाठी ‘छत्रपति शिवाजी महाराज जन्मतिथि निर्णय समिती’ नेमली होती. या समितीत अनेक दिग्गज इतिहास संशोधकांबरोबरच बाबासाहेब पुरंदरेही होते. या समितीने १९६८ साली आपला अहवाल प्रसिद्ध केला. त्यातील बाबासाहेब पुरंदरे यांचे निवेदन वाचल्यावर त्यांच्या अभ्यासाचा दर्जा कळतो. बाबासाहेबांचा तो लेख वाचल्यावर हे बाबासाहेब पुरंदरेंनीच लिहिलेले आहे का असा प्रश्न पडतो.
अवघड लिहिणे सोपे असते पण सोपे लिहिणे अवघड असते. बाबसाहेबांकडे अभ्यासक, संशोधक वृत्ती आहे. त्यांचे चुलते कृ.वा.पुरंदरे हे थोर इतिहास संशोधक होऊन गेले. मराठ्यांचा इतिहासाच्या संशोधनकार्यात त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. पुरंदरे घराण्याच्या ऐतिहासिक वारसा प्रमाणेच त्यांच्याकडून इतिहास अभ्यासाचाही वारसा बाबासाहेबांना लाभला. आपला देदीप्यमान इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, आबालवृद्धांना तो समजावा, त्याची गोडी लागावी आणि महती कळावी यासाठी त्यांनी अतिशय सोप्या, सुंदर, रोचक भाषेत इतिहास लिहिला, सांगितला. आणि तसे घडलेही. बाबासाहेबांनी फक्त ऐतिहासिक संदर्भ जसेच्या तसे उतरवले नाहीत. ते समजून लोकांना सहजसुंदर रीतीने समजावून सांगितले. ‘राजा शिवछत्रपति’च्या नवीन आवृत्त्या याचे एक उत्तम उदाहरण आहे. ‘राजा शिवछत्रपति’ ग्रंथाचा अनेक इतिहास लेखकांनी संदर्भ घेतलेला आहे. तो संदर्भग्रंथच आहे. हा ग्रंथ म्हणजे शिवचरित्र समजण्याची पहिली पायरी आहे. आपल्याकडे इतिहास लेखनाची पद्धत, परंपरा नव्हती असे म्हटले जाते. पण इतिहास कसा सांगावा याविषयीचा एक प्राचीन संस्कृत श्लोक आहे –
“धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितं ।
पूर्ववृत्तंकथायुक्तमितिहासं प्रचक्षते ।।”
हा श्लोक नीट वाचून समजून घ्यावा. थोडक्यात ‘कथायुक्त’ पद्धतीने इतिहास सांगावा असा याचा मतितार्थ आहे. बाबासाहेबांनी अशाच पद्धतीने इतिहास सांगितला. मी हे अनेकदा म्हटलेले आहे की इतिहासाचा अभ्यास करावा, कसा करावा हे अनेकांनी सांगितले; पण तो का करावा, त्याचा उपयोग काय हे अतिशय सुंदर, सोप्या, आकर्षक रीतीने सांगणारे बाबासाहेब पुरंदरे या क्षेत्रातील मानबिंदू आहेत. आज ते शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत.
छायाचित्र साभार – जगन्नाथ चव्हाण.