सामान्यातील असामान्य – पद्मश्री सुधा मूर्ती !!
सामान्यातील असामान्य – पद्मश्री सुधा मूर्ती !!
सुधा मूर्ती !! या नावातच आत्मीयता,प्रेमळपणा, आपलेपणा जाणवतो. सुधा मूर्ती हे व्यक्तिमत्त्वही जादूमय आहे,संयमी आहे,प्रभावी आहे. आतून उजळलेले आहे,संस्कारमय आहे,दृढनिश्चयी आहे, आत्मविश्वासपूर्ण आहे. सुधा मूर्ती ह्यांनी इन्फोसिसच्या बहरत्या कालावधीत घर तसेच मुलाबाळांची देखभाल करण्यात आयुष्य खर्ची घातले. त्याबद्दल त्या समाधानी होत्या. त्याचबरोबर त्यांनी आपले लक्ष लिखाणावर केंद्रित केले. त्यांनी नोकरी सोडल्यानंतर एका वेगळ्या जीवनास प्रारंभ केला खरंतर त्यांची ओळख त्यांच्या पुस्तकांतून अधिक होते.
पुस्तकातील कधीही आणि कुठलीही कथा वाचायला गेले की मूर्ती मॅडम सहज डोळ्यांसमोर येतात आणि मग त्यांच्याबद्दलची प्रेम भावना अधिक दृढ होते. Leena Sohoni यांच्यामुळे त्यांचे कन्नड साहित्य आपल्याला मराठीत वाचायला मिळत आहे हे खरंतर आपलं भाग्य आहेच. प्रत्येक पुस्तक घरी असावे अशी ग्रंथ संपदा मूर्ती मॅडम यांची आहे. त्यांनी कन्नडमधून अनेक पुस्तकांचे लिखाण केले. कादंबरी, प्रवासवर्णन आणि संगणक परिचय पुस्तके इत्यादी साहित्यप्रकार हाताळले. त्यातील बरीच पुस्तके ही मराठी, तमिळ,मल्याळम,तेलगू,हिंदी व इंग्रजी,गुजराती,कोकणी भाषेत प्रकाशित झाली.
इन्फोसिस ट्रस्टच्या माध्यमातून इन्फोसिस फाऊंडेशन ची निर्मिती झाली आणि त्यांनी समाजसेवेचा विडा उचलला. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले. त्यांनी स्वत:पुरत्या मर्यादित केलेल्या क्षेत्रात काम करणे पसंत केले पणत्यांच्यासारख्या प्रतिभावान स्त्रीने हा निर्णय का घेतला असावा,हा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही आणि या प्रश्नाचे समर्पक उत्तर आज ७१ व्या वर्षी मागे वळून पाहिले की मिळते कारण आज सुधा मूर्ती ह्यांचा ७१ वा जन्मदिवस आहे.
खरंतर त्या त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून कायमच सोबत असतात. सुधा मूर्ती यांचे साहित्य, त्यांची पुस्तके अतिशय सोपे ,सरळ पण तितकेच परिणामकारक आहेत. अतिशय अवघड गोष्टी सहज,सोप्या शब्दात व्यक्त करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहायला मिळतात. प्रचंड सकारात्मक ऊर्जा देणारे त्यांचे साहित्य आहे. प्रत्येक वाचक जेंव्हा त्यांचे साहित्य वाचतो त्या वेळी तो सकारात्मक विचाराने कायमच भारावून जातो. सुधा मूर्ती ह्यांची ग्रंथसंपदा कुणालाही आवडेल अशीच आहे. वयाचे बंधनच नसलेली त्यांची साहित्यकृती आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेट देण्यासाठी त्यांची पुस्तकं आहेत आणि कायमच राहतील. अशा सामन्यातील असामान्य जपणाऱ्या पद्मश्री सुधा मूर्ती ह्यांना भगवंताने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
✍️ सर्वेश फडणवीस
#ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದಶುಭಾಶಯಗಳು #SudhaMurthy