समर्थ सद्गुरु गजानन महाराज आणि श्रीदेवनाथ मठाचा ऋणानुबंध.

0

समर्थ सद्गुरु गजानन महाराज आणि श्रीदेवनाथ मठाचा ऋणानुबंध.

आज माघ वद्य सप्तमी! शेगावनिवासी योगीराज गजानन महाराज यांचा प्रगटदिन. गण गण गणात बोते हा मंत्रजागर करून अगणित भक्तांचे भवभयभंजन करणारी अवधूत दिगंबर माऊली. शेगाव विदर्भातील तालुक्याचे ठिकाण. शेगावजवळच अकोट मार्गावर सुर्जी अंजनगाव येथे ६०० वर्ष पुरातन गुरू शिष्य परंपरा असलेले दत्त प्रासादिक एकनाथी पीठ- श्रीदेवनाथ मठ म्हणून आजही विख्यात आहे. परब्रम्ह महारुद्र सद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांचेपासून विद्यमान आचार्य परमपूज्य स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज ही एका जनार्दनी श्रीनाथ पीठ परंपरा आजही अविरत अक्षूण्ण आहे.
योगीराज गजानन महाराज यांचे सुर्जी अंजनगाव श्रीदेवनाथ मठाशी प्रेमभावाचे संबंध आहेत. संतकवी दासगणू महाराज रचित श्रीगजानन विजय पारायण ग्रंथातील १९ व्या अध्यायातील ११६ वी ओवी या आत्मीय धाग्याला अधोरेखित करते.

*#शेख #महंमद #श्रीगोंद्यांत । #आनंदीस्वामी #जालन्यांत ।*
*#सुर्जी-#अंजनगांवांत । #देवनाथ चाहाते #योगाचे #श्रीगजाननविजय* -#अध्याय१९/११६॥*

श्रीगजानन महाराज देहरूपात विद्यमान असताना समर्थसद्गुरू भालचंद्रनाथ महाराज हे सुर्जी पीठावर अधिपती होते. श्रीदेवनाथ मठाधिपती सद्गुरू श्रीभालचंद्रनाथ महाराजांना गजानन महाराज बडे भय्या मानीत. शेगावहून कोणी भाविक सुर्जी-अंजनगावला जात असल्यास बडे भय्या श्रीभालचंद्रनाथांच्या झोळीतले धान्य #नाथप्रसाद म्हणून नक्की आणा असे ते सांगत असत. विदर्भातील शेगाव संस्थान आणि श्रीनाथ पीठ सुर्जी अंजनगाव यांचे हे ऋणानुबंधाचे नाते आजही कायम आहे. विद्यमान आचार्य सद्गुरू श्रीजितेंद्रनाथ गुरूमनोहरनाथ महाराज यांनी या नात्याची वीण अधिकच घट्ट केली असून शेगाव संस्थानचे विश्वस्त कै. श्रद्धेय शिवशंकरभाऊ पाटील वेळोवेळी त्याचा उल्लेख देखील करीत होते.आजच्या प्रगटदिनानिमित्त धर्मसंस्कृती क्षेत्रातील वैदर्भीय मुकुटमणी अशी ख्याती लाभलेल्या शेगाव आणि सुर्जी अंजनगाव यांच्या या नात्याचे हे पुष्प सद्गुरूचरणी अर्पण… इति शम्….

✍ डॉ भालचंद्र माधव हरदास
माघ वद्य सप्तमी,प्रगटदिन
९६५७७२०२४२

*प्रा.डॉ. भालचंद्र माधव हरदास*, नागपूर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये आचार्य. ?राष्ट्रीय वाचनालय सांस्कृतिक मंडळ सदस्य ?विश्वमांगल्य सभा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ?नवयुग आणि पंडित बच्छराज व्यास शाळेचे संचालन करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह. ?आजपर्यंत १८० हुन अधिक हिंदी- मराठी-संस्कृत रचना केल्या आहेत ?विविध वृत्तपत्र आणि नियतकालिके यातून स्तंभलेखन सुरू आहे ?तरुण भारत रविवार आसमंत पुरवणीत *उत्तरायण* स्तंभलेखन. ? दैनिक हिंदुस्थान अमरावती मध्ये *चिंतन* साप्ताहिक सदर. ?राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

Leave A Reply

Your email address will not be published.