वंदना हेमंत पिंपळखरे च्या कर्तृत्वासाठी.
वंदना हेमंत पिंपळखरे च्या कर्तृत्वासाठी.
स्त्रीचे रूप अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. कधी ती वज्रासारखी कठीण तर कधी ती फुलासारखी कोमल, नाजूक असते. आयुष्यात येणाऱ्या अनुभवांना सामोरे जाता जाता तिचे गुण विकसित होत जातात. त्यामुळे घटना सापेक्ष तिच्यातील कठीणपणा अथवा सुकोमलता आपण समजू शकतो. परंतु एकाच वेळी कठीण आणि कोमल अशा दोनही ध्येयांवर जर एखादी स्त्री यशस्वीपणे काम करत असेल तर तिच्या कौशल्याला काय म्हणावे. बॉक्सिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर यशस्वीपणे काम करणारी व कलेच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मैत्रीण वंदना हेमंत पिंपळखरे पूर्वाश्रमीची वंदना जगन्नाथ कुलकर्णी, नवरात्रीचा आजचा शब्द जागर वंदनाच्या अपार कर्तुत्वासाठी .
वंदनाचे प्राथमिक शालेय जीवन अकोल्याच्या जय हिंद चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोहरी देवी खंडेलवाल या शाळेत झाले. वंदनाला सुरुवाती पासूनच खेळांची ओढ होती . त्या वेळी स्कूल गेम म्हणजे रिंग, कबड्डी असायचे. शाळेतील शिक्षिका मीना देसाई, शिक्षक माने सर, श्री वसंत जोशी सर, तिला जिल्हा स्पर्धेकरिता सराव देण्याकरता तिच्यासोबत रिंग खेळायचे. त्या वेळी वंदनाने कलेक्टर ऑफिस द्वारा आयोजित वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला, आणि तिचा पहिला नंबर आला .त्यामुळे उपजतच गुणांना वाव मिळत गेला .वंदना सांगते घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यामुळे वंदनाने सहाव्या वर्गापासून पन्नास रुपये कमावून आई-वडिलांचा सांभाळ केला आहे. पुढे लहानपणीच आईचे छत्र हरविले .वंदनाने आर्थिक स्वावलंबन अवलंबवून आपल्या पायावर आपले शिक्षण केले. सुतळी शेवया विकून तिने उदरनिर्वाह केला. प्रतिकूल परिस्थितीला समोर गेली .पुढे नोकरी व शिक्षण करून घर सांभाळले.
मार्शल आर्टशी वंदनाचा लहानपणीच संबंध आला. मात्र सातवी आठवीपासून त्याचा सराव अधिक जोमाने सुरू झाला. त्यावेळी समाजात खूप जुने वातावरण होते. मार्शल आर्टला वाव नव्हता. मात्र होमगार्ड ऑफिस व इंटर भवन येथे क्लासेस सुरू केले. 1995 पर्यंत वंदना मार्शल आर्ट शिकायची व शिकवायची देखील. अकोल्यात गणपती विसर्जन मिरवणुक फार मोठी असते. त्यात अनेक नामांकित आखाड्यांचा सहभाग असतो. गणपतीच्या आखाड्यात सलग पाच वर्षे पहिले पारितोषिक तिच्या टीम ने जिंकले .वंदना म्हणते त्यावेळी स्पर्धा चंद्रशेखर गाडगीळ यांचा आखाडा, गुलाबराव गावंडे यांचा आखाडा, शक्ती जिम यांच्यासारख्या मातब्बर लोकांशी असायची. मात्र वंदनाच्या मुलींच्या टीम ने सलग पाच वर्षे संपूर्ण शस्त्रांचे प्रथम क्रमांक मिळवून चमत्कार केला .या शस्त्रांमध्ये दानपट्टा, भाला ,ढाल, तलवार, लाठीकाठी, नॉनचॉक इत्यादी शस्त्रांचा समावेश होता. वंदना ब्लॅक बेल्ट टू डॉन घेणारी विदर्भातील पहिली महिला आहे.
पुढे महाविद्यालयात असताना वंदना विद्यापीठाच्या स्पर्धेत सहभागी झाली. आज ती जुडोच्या संघटनेत आहे. तसेच बॉक्सिंगच्या राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आज बॉक्सिंग ची तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पुणे येथे झालेल्या युथ कॉमनवेल्थ गेम मध्ये भारतीय तांत्रिक अधिकारी म्हणून शासनातर्फे निवड होऊन तिने यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.
म्युझिकल चेअर गेम करिता भूतान या ठिकाणी भारतीय तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले. जेकेडी म्हणजे जीत कुनीदो मार्शल आर्ट चा एक भाग ,थाई बॉक्सिंग ,मिक्स बॉक्सिंग, या गेम मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदा ,जागतिक स्तरावर दोनदा, आणि एशियन स्तरावर तीनदा, भारतीय तांत्रिक अधिकारी म्हणून तिने काम पाहिले. सध्या वंदना मिक्स बॉक्सिंग या खेळात जागतिक स्तरावरील तांत्रिक अधिकारी या पदावर कार्यरत आहे .
तसेच बॉक्सिंग, मिक्स बॉक्सिंग नॉन चॉक जीत कुनिदो,मार्शल आर्ट, या पाच खेळात महिला तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे .
वंदना 1995 पासून मुलींसाठी निशुल्क स्वसंरक्षणाच्या कार्यशाळा आयोजित करते. विद्यापीठ सलग्नित असलेल्या महाविद्यालयातील मुलींना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तसेच, समाजातील इतर संस्थांनी आयोजित केलेल्या शिबिरांच्या अंतर्गत ,हे निशुल्क स्वसंरक्षणाचे धडे सुरू असतात .
वंदना सध्या अकोल्यातील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नोकरी करते. नोकरी व घर यशस्वीपणे सांभाळून शासनाच्या व फेडरेशन अंतर्गत होत असलेल्या, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय, या सर्व स्पर्धांमध्ये सर्व स्तरांवर वर उल्लेख केलेले सर्व क्रीडा प्रकारात वंदना सक्रियपणे कार्यरत आहे.
वंदनाला वयाच्या आठव्या वर्षापासून 58 व्या वर्षापर्यंत कला व क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानामुळे शासनाचे चार व अन्य संस्थांचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे मंत्रालयातर्फे देण्यात येणारा कला व क्रीडा क्षेत्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, शासनातर्फे देण्यात येणारा स्त्री रत्न पुरस्कार, शासनातर्फे येणारा क्रीडा संघटक पुरस्कार, आणि महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, या पुरस्कारांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. शासनाचे विविध क्रीडा क्षेत्राचे पाच ब्लेझर्स आज वंदनाकडे आहेत .ही खूप मोठी उपलब्धी आहे.
गेल्या 8 ऑक्टोबरला पनवेल येथे 27 राज्यातील सहभागी पैकी निवड होऊन, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून एकमेव महिलेला पुरस्कार मिळाला ती एकमेव महिला म्हणजे वंदना होय .
दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथील हॉटेल मेरिडियन मध्ये वंदनाला ब्रुसली एक्सलन्स अवॉर्ड मिळाला. यामध्ये 27 राज्य सहभागी होते.
मे 2024 मध्ये होणाऱ्या एशियन गेम साठी भारतीय तांत्रिक अधिकारी म्हणून वंदना श्रीलंकेला जाणार आहे.
सध्या वंदना बॉक्सिंग या खेळाची विभागीय सचिव आहे .
एकीकडे बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट मध्ये जागतिक स्तरावरील रेफ्री व राष्ट्रीय पुरस्कार मिळणारी वंदना, कठीण खेळांशी समरस असली तरी, मूळतः ती एक स्त्री आहे. त्यामुळे स्त्रीची कोमलता, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता ,सुबकता, सौंदर्यदृष्टी, हळवेपणा, हे सर्व गुण वंदनाच्या अंगात आहेत. त्यामुळे वंदनाचे क्रीडाक्षेत्रासोबतच कलाक्षेत्रातही जसे की, रांगोळी पुष्परचना ,फुलांची रांगोळी, पाककला, याही क्षेत्रात आवर्जून उल्लेख करावा असे विशेष योगदान आहे. या सर्व कलांच्या विनामूल्य कार्यशाळा जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्तरांपर्यंत आयोजित करून वंदना सहभागींना निशुल्क मार्गदर्शन करीत असते.
एका संस्थेच्या अंतर्गत ,अमेरिकेतील चार महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण वंदनाने दिले आहे .
कुकिंग शूकींग द्वारा आयोजित, पुण्यातील हॉटेल इनग्रीन मध्ये झालेल्या मास्टर शेफ स्पर्धेत, अंतिम राऊंड चा विषय होता स्वीट कॉर्न व बेबी कॉन चे पदार्थ बनविणे. तेंव्हा सुगरण वंदनाने स्वीट कॉर्न ची पुरणपोळी बनवून 85 स्पर्धकांमध्ये मास्टर शेफ चा प्रथम क्रमांक मिळविला. याव्यतिरिक्त नोकरी, घर ,कला व क्रीडाक्षेत्र सांभाळून वंदना हौसे खातर आजही एक वेळा 50- 50 तिळगुळाच्या आणि पुरणाच्या पोळ्या करून पुण्याला विकते. वंदनाच्या पाक कौशल्यामुळे तिचे ग्राहक पुण्यात उपलब्ध आहेत .त्यासोबतच तिने केलेल्या स्वादिष्ट लोणच्याची दिल्ली व तमिलनाडु येथे मागणी आहे. तसेच लोणच्या सोबत काही महाराष्ट्रीयन पदार्थांची, अरुणाचल प्रदेश दिल्ली, व अमृतसर येथे मागणी आहे.
अकोल्यासारख्या शहराच्या ठिकाणी मंगळागौर, डोहाळे जेवण ,करिता इव्हेंट मॅनेजमेंट चे काम कलात्मक दृष्ट्या वंदना आवडीने करते .
अकोलेकरांसाठी या क्षेत्रातील हे सुपरीची आणि यशस्वी नाव आहे.
अकोल्याचे इतिहासात संस्कार भारतीची आणि नैसर्गिक फुलांची सर्वात मोठी रांगोळी काढणारी जिल्ह्यात वंदना पहिली महिला आहे.
या सर्व व्यापासोबत वंदना लेखनाचेही काम करते. दोन वर्षांपूर्वी इनरव्हील क्लब तर्फे आयोजित केलेल्या “सासु सुनेचे नातं नवा दृष्टी वाद” या वंदनाच्या लेखाला प्रथम पारितोषिक मिळाले .
अकोला जिल्ह्यातील मुख्यत्वे दैनिक भास्कर, दैनिक सकाळ, लोकमत, या वृत्तपत्रांनी वंदनाला स्टेज व सहकार्य दिल्यामुळे ,तिने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात विनामूल्य मार्शल आर्ट, संस्कार भारतीची रांगोळी, फुलांची रांगोळी ,पुष्परचना ,या विषयक प्रशिक्षण दिले. ती सांगते की, कलाक्षेत्रासाठी तिला प्राध्यापिका सुषमा गायकी यांचे मार्गदर्शन मिळाले, तर क्रीडा क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चे मार्गदर्शक, सतीशचंद्र भट यांचे मार्गदर्शन मिळाले.
वंदनाने आजपर्यंत क्रीडा आणि क्रीडा -आहार या विषयावर जागतिक, आंतरराष्ट्रीय, आणि राज्यस्तरावर, अनेक वृत्तपत्रात लेख लिहिले आहेत. अकोल्यातील वृत्तपत्रांमधून देखील नेहमी वंदना लेखन करते .
वंदनाने तिच्या आयुष्यात अनेक माणसे जोडली आहेत. साधारणतः रोजच वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र परिवारात तिने सविस्तर लिहिलेला लेख फेसबुक वर वाचायला मिळतो. इतक्या लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवून रोजच कुणावर तरी एवढे व्याप सांभाळताना लिखाण करणे खूप प्रभावित करते. वंदना म्हणते कि ,ती वेळेचा अपव्यय अजिबात करत नाही.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला प .पू .सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी संबोधित केले. क्रीडा क्षेत्रा तर्फे वंदना त्या बैठकीला आमंत्रित होती.ही खूप मोठी गौरवाची गोष्ट.
वंदनाच्या जीवनाचा आलेख जागतिक स्तरांपर्यंत जाणारा आहे. या सर्व प्रवासात तिच्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आलेत. मात्र या संघर्षाशी झुंजार पणे लढा देत आज वंदना यशस्वीपणे आयुष्यात उभी आहे .
वंदनाच्या यजमानांसह सासू , दीर, मुले , यांचा तिला सक्रिय पाठिंबा आहे. त्यांच्या भक्कम पाठिंबामुळेच वंदना हे दैदिप्यमान यश साध्य करू शकली असे ती म्हणते .तिने मुलांना देखील खूप चांगल्या पद्धतीने घडविले आहे.
वंदनाच्या आजपर्यंतच्या कार्यासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि भविष्यातील इच्छा आकांक्षांसाठी व यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
ऍड. मनिषा कुलकर्णी, नागपूर.
9823510335