शिवराय : शोधक बुध्दी आणि पारखी नजर असणारे राजे .

शिव राज्याभिषेक ३५० वे वर्ष विशेष .

0

शिवराय : शोधक बुध्दी आणि पारखी नजर असणारे राजे .
—————————————-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य हातोटीचे अनेक वैशिष्ट्ये नेहमीच सांगितले जातात . त्यात त्यांचा गनिमी कावा , प्रशासन निती , व्यवस्थापन कौशल्य , महिला रक्षणाचे धोरण , धर्म व संस्कृती संवर्धनाची दक्षता आणि रयतेचं हित जोपासण्याचा कटाक्ष इत्यादि बाबींचा आवर्जून उल्लेख होत असतो . शिवरायांच्या कार्यांचे हे पैलू महत्त्वाचे आहेतच . पण याच बरोबर मला त्यांचा उल्लेखीत शिर्षकाप्रमाणे असणाऱ्या पैलूकडे लक्ष वेधून घेण्याची अधिक आवश्यकता वाटते . शिवाजी महाराज यांचे युध्द कलेचे प्रशिक्षण केंद्र हे अतिशय कठीण व निर्मनुष्य अशा डोगंरी भागात असायचे . तिथे कुणालाही पोहचणे अशक्यप्राय ठरायचे . जर चुकून कुणी त्या स्थळी पोहचलाच तर त्यास माझ्याकडे घेऊन या . अशी सक्त ताकीद महाराजांनीच प्रशिक्षण केंद्रावरील पहारेकऱ्यांना दिलेली होती . एके दिवशी एक वाटसरू त्या भागातून प्रवास करताना त्याला पक्षाचा आवाज ऐकू आला आणि तो त्या दिशेने जावून गुप्त असलेल्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहचला . त्याला पाहून सगळेच अचंबित झाले . आदेशानुसार त्या वाटसरूला महाराजांच्या समोर हजर करण्यात आले . इतक्या निर्जन स्थळाचा या मनुष्यास कसा पत्ता लागला . हे बघून महाराजही आश्र्चर्यचकित झाले . त्यांनी त्या अज्ञात व्यक्तीची कसून चौकशी सुरू केली ,
‘ तुम्ही त्या ठिकाणाचा कसा शोध लावला ? ‘ महाराजांनी विचारले .
‘ मी डोंगरातून जात असताना मला पक्षाचा आवाज ऐकू आला . तेव्हा माझ्या असे लक्षात आले की , जो पक्षी आवाज काढतो तो या दिवसात काढत नाही . म्हणजेच काहीतरी काळेबेरे आहे . असे मला वाटले . म्हणून मी जिज्ञासेपोटी त्या दिशेने चालत गेलो असता मला कळून चुकलं होतं आवाज काढतो हा पक्षी नसून माणूस आहे . शेवटी माझा अंदाज खरा ठरला आणि मला या जागेचा शोध घेता आला .’ त्या व्यक्तीची ही हुशारी बघून महाराज भारावून गेले आणि त्याला हेर खात्याचा प्रमुख म्हणून नेमले . त्या व्यक्तीचे नाव होते , बहिर्जी नाईक . असाच प्रसंग दुसराही सांगता येईल , शिवरायांचे सैनिक मावळे शत्रूशी लढण्यासाठी पुढे मोहीमेवर गेलेले होते . शिवराय काही वेळेच्या फरकाने मागून जात होते . परंतू त्यांना पुढे गेलेले सैनिक नेमके कोणत्या दिशेने गेले , हे नक्की ठाऊक नसल्यामुळे त्यांना जात असलेल्या मार्गावर भिमा लोहार भेटला . तो आपल्या कामामध्ये इतका आत्ममग्न होता की , शिवाजी महाराजांनी त्याची इथून सैनिक गेलेले तुम्ही पाहीले का ? अशी विचारणा करता . नाही ही बा . मी पाहिलेच नाही , असे उत्तर दिले . नंतर महारांजाना सैन्य येथूनच गेले पण , कामात तल्लीन असलेल्या या माणसाला काहीच माहीत नाही . ही बाब लक्षात आली . महाराजांनी भिमा लोहार याला निरोप पाठवून बोलावून घेतले व तुला शस्त्र चालविता येतात का ? असा प्रश्न केला . तेव्हा भिमा लोहाराने महाराजांना दिलेले उत्तर फारच आश्र्चर्यचकित करणारे होते . तो म्हणाला , महाराज जो शस्त्र तयार करू शकतो , त्याला शस्त्र चालविणे का जमणार नाही ? शिवरायांनी त्याची तरबेजता व कामातील एकाग्रता पाहून भिमा लोहाराकडे शस्त्रागार विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी सोपवली . अशी होती शिवरायांची शोधक बुध्दी व पारखी नजर . म्हणूनच हा महत्त्वाचा पैलू अधोरेखित केल्याशिवाय महाराजांच्या गुण वैशिष्ट्यांचा तपशील मांडता येणार नाही . त्याचा यथोचित वेध घेणे अगत्याचे ठरते .

– गंगाधर कांबळे
मंगरूळनाथ जि. वाशिम
मो.नं. ९५०३८५७९९८

लेखक इतिहास व समाज शास्त्राचे अभ्यासक आहेत. मो.नं. ९५०३८५७९९८

Leave A Reply

Your email address will not be published.