अखंड स्फूर्तीचा झरा.

शिव राज्याभिषेक ३५० वे वर्ष विशेष.

0

अखंड स्फूर्तीचा झरा.
जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले. ते पराक्रमी असतीलही परंतु चारित्र्यवान असतीलच असे नाही तर चारित्र्यवान असणारे राजे पराक्रमी असतीलच असेही नाही परंतु पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे पराक्रमी होते आणि चारित्र्यवानही होते.आजही शिवाजी महाराज ओळखले जातात ते त्यांच्या शुद्ध चरित्र आणि चारित्र्यामुळेच !आजही त्यांचे नाव तुमच्या आमच्या ओठावर आहे ते त्यांच्या या गुणांमुळेच! आणि पुढेही राहील.

अनेक राजे हे वाड वडिलांच्या वारसा हक्काने गादीवर बसले परंतु शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने स्वतःचे हिंदवी राज्य निर्माण केले आणि त्या स्वतः मिळवलेल्या राज्याचे राजे झाले. असे स्वतःच्या मनगटाच्या जोरावर स्वतःचे राज्य निर्माण करून छत्रपती होणारे जगातील दुर्मिळ उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज.
आज आपण पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष साजरे करत असताना त्यांच्या तेजोमय इतिहासातून त्यांच्या तेजाचा अंश काही अंशी आपण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. त्यांच्या जन्मापूर्वीचा हिंदुस्थान आणि आपला महाराष्ट्र कसा होता याचाही विचार केला पाहिजे.
इ.स. ७११ पासून परकीय आक्रमणांना तोंड देत हा हिंदुस्थान आजवर हिंदुस्थान म्हणून टिकून आहे. हे परकीय आक्रमक लहरी होते ,धर्मांध होते,
धर्मांधतेतून ते हिंदुस्थानावर आक्रमण करत.
हे आक्रमक इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विशेषतःआक्रमण करीत असत.मंदिरांचा विध्वंस करणे, हजारो लोकांच्या कत्तली करणे, लोकांना जोरजबरदस्तीने काहीही करून त्यांना गुलाम करणे , स्त्रियांवर अत्याचार करणे तसेच जोर जुलूम जबरदस्ती ने छळाने व बळाने हिंदूंचे धर्मांतरण करणे हाच त्यांचा छळवाद सुरू होता.
हिंदूंना कायदे वेगळे होते.हिंदूंनी आपले सण-उत्सव साजरे करू नयेत ,हिंदूंनी निमूटपणे कर द्यावा, इस्लामी अधिकाऱ्यांनी जर हिंदूंना चांदीची मागणी केली तर त्यांनी त्याला गपगुमान सोने दिले पाहिजे. त्या अधिकाऱ्याला थुंकायची इच्छा असेल तर त्याची थुंकी हिंदूंनी आपल्या तोंडाचा ‘आ’ करून झेलली पाहिजे.हिंदूंचा अपमान करा, त्यांची कत्तल करा, त्यांना लुटून कैदी करा गुलाम म्हणून त्यांना पदरी ठेवा.
किती हा इस्लामचा विकृतीपणा ! !
इस्लामी राजवटीत हिंदूंना अनेक बंधने होती त्यांनी घोड्यावर बसू नये, शस्त्र बाळगू नये , मौल्यवान पोषाख घालू नये, आपल्या उत्पन्नाचा अर्धा वाटा सरकार जमा करावा, गाई म्हशींवर कर द्यावा.हिंदूंच्या बायकांनी मुसलमानांच्या घरी नोकरी करावी.
असे कायदे सुलतान करीत आणि सांगत आम्ही आमच्या धर्मानुसार हे सर्व करतो. मग त्यांच्या या कृतीला धर्मग्रंथाचा आधार असला काय आणि नसला काय ? सगळे सारखेच.हे सुलतान हिंदूंची मंदिरे देव देवतांच्या मूर्त्या उद्ध्वस्त करीत.महंमद गझनीने सोरटी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. तो स्वतःला ‘बुदशिकन’ म्हणजे मूर्ती विध्वंसक म्हणून घेत असे. महमद घोरीने तर हिंदुस्थानात इस्लामचा पाया रचला.इ.स. १३९८ ला तैमूरलंगने हिंदुस्थानवर आक्रमण केले हिंदूंना इस्लाम धर्मात आणून हिंदूंची मंदिरे व देव देवतांच्या मूर्त्या नष्ट करून स्वतःला ‘गाझी’हे पद मिळवावे हे त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने अमानुष छळ केला.
पुढे बाबर, अकबर, शहाजहान, औरंगजेब असे सुलतान हिंदुस्थानात इस्लामी राजवटीत होऊन गेले. हिंदूंचा छळ करण्यात त्यांना बाटवण्यात एक एकापेक्षा वरचढ होता
हिंदूंची मंदिरे स्त्रिया ,गाईगुरे काहीच सुरक्षित नव्हते. इथल्या सुलतानाचे एकच ध्येय असायचे ते म्हणजे हिंदुस्तान हा ‘दार-उल हर्ब (गैरमुस्लिम देश) त्याचा ‘दार-उल- इस्लाम( मुस्लिम देश)’ बनवायचा. त्यासाठी अमानुष कत्तली,छळ त्यांनी मांडला होता.
पण या आक्रमकांना एक संघ हिंदुस्थान म्हणून पिटाळून लावण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हता. इथला राजा स्वतःला आपल्या राज्याचा राजा समजत होता. त्याचं राज्य त्याच्या राज्यापुरतंच मर्यादित होतं. एकमेकांशी लढण्यातच हिंदू राजे आपली शक्ती व्यर्थ वाया घालवत होते.
चालुक्य, चोल,राजपूत हे हिंदू राजे एकमेकांशी लढत होते. एकत्र येऊन सुलतानांविरुद्ध लढण्यासाठी कोणी पुढे येत नव्हता. अशी हिंदुस्थानची अवस्था झाली होती.
तर शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र यापेक्षा वेगळा नव्हता.
महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा, शूरांचा, वीरांचा आहे तसाच साधुसंतांचाही आहे. या भूमीत जसे शूरवीर जन्मले त्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर रणांगणावर मर्दुमकी गाजवली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात शौर्याचा तुरा रोवला.त्याचप्रमाणे आम्हाला अलौकिक अशी संत परंपरा लाभली. संतांनी भक्तीचा मळा फुलविला.शिवजन्मापूर्वी संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव ,मुक्ताबाई ,संत नामदेव, गोरोबाकाका असे अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीत अवतरले.
संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात संतांची मांदियाळी सोबत घेऊन अखंड हिंदुस्थानाची भ्रमंती केली .परत महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याला उत्तरेकडून परकीय आक्रमण होण्याची शक्यता वर्तवली व दक्षता घेण्यासाठी सांगितले .परंतु यादव राजा गाफील राहिला.त्याने याकडे दुर्लक्ष केले .आणि नर्मदा ओलांडून अल्लाउद्दीन खिलजीची टोळधाड महाराष्ट्रावर पडली.त्याने यादवांच्या रूपाने हिंदूंचे तख्त बेचिराख केले .यादव राजांचा पराभव झाला आणि महाराष्ट्रावर सुलतानी राजवट सुरू झाली.
सुलतानी राजवटीत महाराष्ट्राची अवस्था भयाण दुःस्थितीची होती. मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी लोकांचा जीव नकोसा करणारा छळ मांडला होता.सुलतानांच्या जहरी छळाचा कहर होत होता.त्यांना लहर आली की देव देवतांच्या मूर्त्या उद्ध्वस्त करत.मंदिरे पाडत,गाई कापत,कत्तली करत,उभी पीकं कापली जात.लूटमार, जाळपोळ, सगळा नंगानाच लावला होता. जोर जबरदस्तीने छळाने व बळाने हिंदूंना धरून बांधून मुसलमान केले जात होते. हा तर या मुस्लिम सत्तेचा खेळ होता. स्त्रियाही सुरक्षित नव्हत्या. त्यांना सर्रास दिवसाढवळ्या उचलून न्यायचे. अब्रू वाचवण्यासाठी हजारो हिंदू स्त्रियांनी विहिरीत उड्या टाकल्या.
पराक्रम महाराष्ट्राच्या मातीत होताच. अनेक पराक्रमी घराणे या महाराष्ट्रात होती पण वतनाच्या तुकड्यासाठी लाचार होऊन ते पराक्रम गाजवत होते एखाद्या सुलतानासाठी ! मराठेच मराठ्यांच्या मानेवर तलवार चालवत होते ! आपल्या
पराक्रमाने काही घराणी महाराष्ट्राचं नाव उज्वल करत होते त्यापैकीच एक भोसले घराणे. शहाजीराजे भोसले यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
कोण सोडवणार होते या महाराष्ट्राला छळातून आणि सुलतानी बळातून.
जिजाबाई राणीसरकार गरोदर होत्या त्यांचे वडील लखुजीराव जाधव व त्यांचे पुत्र जिजाऊसाहेबांच्या बंधूंची बादशहाने भर दरबारात कत्तल केली होती. याचा राग जिजाऊंच्या अंतःकरणात होता.त्याच काळात त्या गरोदर होत्या. त्यांच्या मुठी रागाने वळत होत्या. त्याचा परिणाम गर्भात असलेल्या बाळावर होत होता त्याच्याही
मुठी गर्भातच आपोआप वळत असतील यात नवल नाही. शिवनेरीवर शिवाई मातेकडे जिजाऊ आईसाहेब मागणं मागत होत्या की, या छळातून महाराष्ट्राला मुक्त करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल.हा महाराष्ट्र भयमुक्त करेल असा पुत्र दे.
कुरुक्षेत्रावर गलितगात्र झालेल्या अर्जुनाचं निमित्त करुन तुम्हाआम्हांला योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने एक अभिवचन दिलं होतं. अर्जुनाचे निमित्त करून तुम्हाआम्हाला दिलेले अभिवचन म्हणजे
‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
‘अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानंम् सृजाम्यहम् ।। ‘परित्राणाय साधुनां विनाशायच् दुष्कृताम् ।’
‘ धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’
ज्या ज्या वेळी अधर्माचा उदय होतो त्यावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी तसेच न्याय व नीतीचा
धर्म पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो.आणि धर्माची पुर्नसंस्थापना करतो.
आणि गीतेत दिलेले अभिवचन भगवान श्रीकृष्णाने तंतोतंत पाळले आणि शिवनेरी वर जिजाऊआई साहेबांच्या पोटी राष्ट्रस्वरूप भगवंत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तिथी होती शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरात ,शिशिर ऋतूच्या फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शिवजन्म ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या जीवनातील एक क्रांतिकारक अशी महत्त्वपूर्ण घटना आहे. आपल्या पराक्रमाने व कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने या संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमाची नोंद घेण्यास भाग पाडले असे छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजे निपचीत पडलेल्या हिंदु समाजाला नवसंजीवनी देणारे युगपुरुष ! शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून आणि दास्यातून या भूमीला मुक्त करणारे प्रतापी महापुरुष ! जीवन उद्ध्वस्त करणारा इस्लामी दास्याच्या शृंखला त्यांनी आपल्या पराक्रमाने मोडून तोडून टाकल्या .
पण अशा या पुण्य प्रतापी महापुरुषाची जयंती तीन तीन वेळा साजरी होते हे दुर्दैवच ! तशी तर रोज शिवजयंती साजरी व्हावी . पण ज्या राजानं स्वतःचे शक चालू केले. भाषा शुद्धी केली, राज्यव्यवहार कोश तयार केला. त्या राजाची जयंती तिथीनुसारच व्हायला हवी.पण तसे होत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचावा म्हणून दिनांकानुसार यांची जयंती साजरी करावी असा कल दिसतो. पण शिवाजी महाराजांची दखल संपूर्ण जगाने ते हयात असतानाच घेतली होती . ते जगप्रसिद्ध त्यांच्या हयातीतच झाले आहेत. आपण कोण त्यांना प्रसिद्ध करणारे ?
शिवजन्मापूर्वीची इस्लामी राजवट म्हणजे सुलतानांची लहर जोर जुलमाचा कहर छळाचा डोंगर आणि स्त्रियांची अब्रू लुटण्याचा जहर. अशा काळात शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे अक्षरशः अद्भूत अलौकिक आहे.
एका हिंदी सिनेमातील गाणे आहे “आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिन्दुस्थान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की ” या गीतात जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख येतो तेव्हा “देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी खेला था” म्हणजे महाराष्ट्राची ओळख म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गौरवाची गोष्ट आहे .
अशा शिवाजी महाराजांची जयंती एक दिवस होते पण त्यांच्या आचार – विचारांची ,इच्छा -आकांक्षांची , ध्येय-धोरणांची पुण्यतिथी रोज होताना दिसते. आम्हाला शिवाजी महाराज किती समजले ???
शिवचरित्र म्हणजे अखंड स्फूर्तीचा न आटणारा झरा आहे. यातून प्रेरणा घेऊन ,अनेक शूर वीर ,स्वातंत्र्यसेनानी ,योद्धे यांनी आपले जीवन उज्ज्वल केले. शिवचरित्रातील प्रत्येक अक्षर न् अक्षर प्रेरणादायी आहे .यातून निर्माण होणारी ध्येयपूर्तीची धुंदी प्रत्येकाचे आयुष्य यशस्वी केल्या शिवाय राहत नाही .यात शंकाच नाही.
‘ तमसो मा ज्योतिर्गमय”
असे शिवचरित्र आहे . अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अपयशातून यशाकडे नेणारे न्यायनीती आणि धर्माचे आचरण करणारे असे शिवचरित्र यशाचा महामंत्र आहे.
शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन स्वतःचे ध्येय निश्चित करा. वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वरावराला साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली १६४५ साली आणि १६७४ ला हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले म्हणजे पंधराव्या सोळाव्या वर्षी ठरवलेले ध्येय सुमारे २९ वर्षाच्या परिश्रमामुळे पूर्ण झाले . हे बघण्यासाठी त्यांना फार मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागले संकटांचे वार झेलावे लागले, दुःखाचे डोंगर पाडावे लागले .आयुष्य पणाला लावावे लागले ,एका हातात तलवार आणि एका हातात मृत्यू घेऊन असे लढत होते झुंजत होते .असा एकही दिवस गेला नसेल त्या दिवशी शिवाजी महाराज मृत्यूला सामोरे गेले नसतील. परंतु मृत्यूला हुलकावणी देत त्यांनी वाटचाल करून अहोरात्र कष्ट उपसले.
‘रात्रं न् दिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या वचनाप्रमाणे झुंजत होते पण ठरवलेल्या ध्येयापासून ते कधीच विचलित झाले नाहीत. ध्येयाचा मार्ग कधीच सोडला नाही.
जिद्द ,चिकाटी ,दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर तळमळ, स्वाभिमान आणि पराकोटीचा आत्मविश्वास ही त्यांची जीवनसूत्रे होती .याच आत्मविश्वासावर माणूस कृतिशील व जिगरबाज बनतो.हाच आत्मविश्‍वास माणसाला धाडस, हिंमत, धैर्य, शौर्य ,आग,धग,रग प्रदान करत असतो आणि हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांच्या अंगी ठासून भरला होता. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्यातील अंधःकार नाहीसा केला जातो. आयुष्य प्रकाशमान होते .जबाबदारी मग ती कोणतीही असो आत्मविश्वासच आपणास ती जबाबदारी पेलण्यास सक्षम बनवतो .
आता असा आत्मविश्वास आपणास संकटाचा सामना करण्यासाठी व संकटांच्या वादळात अविचल व स्थिर राहण्यास साहाय्य करतो. कोणी कितीही टीका केली आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस स्वतःच्या ध्येयावर दृढ राहतो. आत्मविश्वासच महान कार्याचा उगम आहे. आणि आत्मविश्वासच महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या पवित्र कार्यात कामी आला आणि त्यांनी त्यांचे ध्येय गाठले.
त्या काळात पाच पाच पातशाह्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील रयतेला आपल्या जुलमी राजवटीत भरून काढत होत्या . लोकांवर अन्याय करण्याची जणू त्यांच्या त्यांच्यात चढाओढ सुरू होती. सुलतानांच्या कौर्याच्या सीमाच नव्हत्या . गरीब कष्टकरी शेतकरी रयतेला कोणी वाली नव्हता . एखाद्याला आपला जन्म स्वराज्यात व्हावा असं वाटलं तर त्यासाठी तेवढी भूमी ही स्वतंत्र नव्हती. स्वराज्यात मरावे वाटले तर तेवढीही जागा शिल्लक नव्हती. अशा पारतंत्र्याच्या भीषण काळरात्रीत, अत्याचाराच्या गराड्यात, सह्याद्रीच्या कुशीत नरसिंह रूपातील शिवाजी महाराज १५ व्या वर्षात स्वराज्याचे डाव मांडत होते.स्वाभिमानी मनाचे आणि पोलादी मनगटाचे सवंगडी मिळवत होते .जुलमी सत्ताधाऱ्यां विरुद्ध झुंजण्याचे बळ देत होते . त्यांना म्हणत होते, भिऊ नका, भ्याडपणा सोडा,क्षात्रतेज जागे करा ,भीमअर्जुनाचा वारसा सांगणारे तुम्ही,पराक्रम जागा करा,सावध रहा. पारतंत्र्याला तुमच्या बळकट मनगटाने पिटाळून लावा .मन मेंदू आणि मनगट यांचा वापर करून ही सुलतानी टोळधाड हिसकावून लावा. तुम्ही शुरवीर आहात ! तुम्ही धाडसी आहात ! पराक्रमी आहात ! अरे ,तुम्ही नरसिंह आहात नरसिंह ! ! ! दुष्टांचा विनाशासाठी आता तुम्हीच खांबा खांबातून बाहेर या ! आणि नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला तसा या जुलमी इस्लामी राजवटीचा विनाश करा .कारण हे राज्य व्हावे ही तो ‘श्रीं’ची इच्छा !
आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून मावळ मुलखातून रांगडी देहाची अन् पहाडी छातीची पोरं शिवबाच्या हाकेला ओ देत बाहेर आली. महाराष्ट्राच्या मावळखोऱ्यातून प्रत्येक घरातून एक एक मावळ्याचा पोर शिवबाला त्याच्या स्वराज्याच्या कामात स्वतःला झोकून देऊन पराक्रम करू लागला.मूठभर मावळ्यांनिशी मांडलेला हा डाव अखेर शिवबानं सह्याद्रीच्या मदतीने जिंकला .शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले.
महाराजांची युद्धनीती, युद्धरीती आणि त्यांचे युद्धाचे प्रमुख अस्त्र म्हणजे गनिमी कावा. महाराजांचे आरमार ,महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ,महाराजांचे स्थापत्य, पर्यावरण प्रेम, राज्यव्यवहार कोश या व अशा अनेक बाबींवर चर्चा करता येईल पण विस्तारभयास्तव फक्त उल्लेख करून जातो.
महाराजांच्या स्वराज्य लढ्याला खरे बळ आणि ताकद मिळाली ती अफजल खानाच्या वधानंतर. अफझलखान प्रकरण शिवचरित्रातील एक महत्त्वाचे व शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतील प्रयत्नाला कलाटणी देणारे प्रकरण आहे .शाहिस्तेखानाला केलेली शास्त ,सुरतेची लूट ही व अशी अनेक प्रकरणं शिवचरित्राच्या अभ्यासकांनी तपासून पाहिली पाहिजेत.
महाराजांचे पुत्र म्हणून त्यांनी निभावलेले कर्तव्य , भाऊ म्हणून व्यंकोजीराजांना केलेली विनवणी,पिता म्हणून शंभुराजांना दिलेली शिकवण आणि राजा म्हणून प्रजेची घेतलेली काळजी व प्रजेचा केलेला सांभाळ या बाबीही अभ्यासपूर्ण आहेत.
या जगात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याचे जीवन सुखी ,समाधानी, ऐश्वर्यसंपन्न ,वैभवशाली असावे. तशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही .प्रत्येकाच्या वाट्याला वैभवशाली जीवन येत नाही .प्रत्येक जण ऐश्वर्यात लोळत नाही ,प्रत्येकाला जीवनात यशस्वी होता येतच असं नाही. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्यक्ती म्हटलं जात नाही.तर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्ती त्या मोजक्याच असतात.आपल्या गुणांचा विकास करून सामान्य व्यक्तीही येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून यशाचे शिखर गाठू शकते .ते शिवचरित्र आम्हाला शिकवते
नियोजन ,आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर ती व्यक्ती यशस्वी होत असते .ते सर्व काही बाजारात विकत मिळत नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये सद्गुणांचा खजिना असतो .सुप्तावस्थेत जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि उच्च ध्येय असतात मात्र त्यांचा शोध घेऊन त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातील कल्पना, स्वप्ने साकार करण्यासाठी कष्ट घेण्याची मानसिक तयारी लागते ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ कृतीविना सर्व कल्पनांच्या विचार व्यर्थ आहे.
शिवचरित्र आपणास आपल्या मधील बलस्थाने शोधण्याचा ध्येयाप्रती वाटचाल करण्यास प्रेरीत करते प्रोत्साहित करते. शिवचरित्र आपल्यामध्ये उतरविणे गरजेचे आहे आत्मविश्वास, उच्च विचार, सद्विचार ,सद्वर्तन, सद्गुण, उत्साह, निर्णयक्षमता, वेडेपणा धाडस, नेतृत्व या सर्व गुणांचा विकास करण्यासाठी झपाटल्यासारखे शिवचरित्र वाचा . यश नक्की मिळेल यात किंतु नाही या शिवसागरातील एक जलबिंदू प्राशन करा. नक्कीच कमीत कमी एक जलबिंदू प्राशन करा आपले आयुष्य शिवमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही .यात तिळमात्र शंका नाही. अशा या ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अखंड स्फूर्तीचा झरा असणारे शिवचरित्र तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे.
त्याचे चिंतन मनन केले पाहिजे. आणि आपण शिवचरित्र काही अंशी का होईना आपण ते आत्मसात केले पाहिजे.असे जगल़ो तर आपण आपल्या आयुष्याची लढाई नक्कीच जिंकू.
कशासाठी आणि जगावे कसे मी।
विचारु स्वतःला असा प्रश्न नेहमी ।।
जगूं पांग फेडावया मायभूचे ।
आम्ही मार्ग चालू जिजाऊसूतांचे ।।

आपल्याला या यशासाठी शुभेच्छा.

फोटो गुगल साभार

 

© हिंदुराव गोळे
सातारा जिल्हा बजरंग दल संयोजक
संपर्क:- ७७७४९२१२७३

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. तसेच बजरंग दल सातारा जिल्ह्याचे संयोजक आहेत. संपर्क:- ७७७४९२१२७३

Leave A Reply

Your email address will not be published.