शिवराय केवढे ? आभाळा एवढे.
एक पुतळा बनवायला जेवढा पैसा लागतो, तेवढ्या पैस्यात घरो घरी सरकारने शिवचरित्र भेट दिले पाहिजे. आज महाराजांना वाचायची जास्त गरज आहे महाराष्ट्राला.
महाराष्ट्राला कधीचं महाराजांचे उंच उंच पुतळे नको आहेत, महाराष्ट्राला महाराजांचे गडकिल्ले दुरुस्त झालेले हवे आहेत. महाराजांना पुतळ्या मध्ये बघून हा महाराष्ट्र सुधरेल असं वाटतं तुम्हाला? अहो आज याचं छत्रपतींच्या महाराष्ट्रात जो तो आप आपल्या जातीचा पुतळा आणि झेंडे घेऊन उभा आहे.महाराज हिंदूंचे रक्षक होते हो.. स्वराज्य निर्माते होते, युगपुरुष होते हे सांगण्याची गरज आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला.
अवघ्या भुमंडळाचे ठायी धर्म रक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे.
ज्या युगपुरुषाने महाराष्ट्र धर्म जपला, वाढवला आणि राखला त्यांचा हा महाराष्ट्र आज धर्म तर सोडाचं पण नुसता राजकारणी झालेला बघून महाराजांना अत्यंत वेदना होत असतील.कशासाठी मी इतके कष्ट घेतले आणि का इतकी आव्हाने आयुष्यात पेल्ली ती या नालायकांसाठी छे…. असे महाराज म्हणत असतील जिथे असतील तिथे.
महाराजांचा पुतळा पडणे म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर पडलेला घाव आहे, कारण महाराजांकडे बघत महाराष्ट्र जगतो आणि लढतो. पण पुतळा उभा असतांना किंवा आज जे काही महाराजांचे अनेक पुतळे उभे आहेत ते जर जातीपातीत विभागलेला महाराष्ट्र आज बघत असतील तर त्या पुतळ्यांची काय अवस्था होत असेल? या साठी केले होते हिंदवी स्वराज्य? महाराजांचे पुतळे जेव्हा प्रत्येक जातीचा वेगळा झेंडा बघत असतील तेव्हा त्या पुतळ्यांना काय वाटत असेल? महाराष्ट्रात जेव्हा सर्रास पणे महाराजांच्या नावावर राजकारण चालू असतं, तेव्हा त्या पुतळ्यांना किती वेदना होत असतील.
महाराज पुतळ्या कडे बघून नव्हे तर गडकिल्ले बघून आणि वाचून कळतात. आणि महाराज समजण्यासाठी पहिले माणूस जातीयवादी नसावा लागतो. माणूस हा महाराष्ट्र धर्माला जागणारा असावा लागतो.
आज एकाही महाराष्ट्रातील नेत्याची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव घेऊन राजकारण करायची. साले सबके सब झूट है. महाराजांना मराठी माणसाच्या देव्हाऱ्यात स्थान आहे,पण या राजकारणी लोकांनी महाराज पार रस्त्यावर आणून उभे केले आहेत ही या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी व्यक्तीची चूक आहे. आजचे सत्ताधारी असो अथवा विरोधक महाराजांसारखे राज्य कोणीही चालवू शकत नाही.
महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापिले होते. त्यात तू माळी, तू तेली, तू धनगर, तू मराठा, तू ब्राम्हण असा भेद नव्हता. तर स्वप्न होते सर्व जाती एक करून महाराष्ट्राला आदर्श आणि सुजलाम सुफलाम बनवायचे. पण आज ना अठरा पगड जाती एकत्र आहेत, ना कोणाला महाराष्ट्राचं काही घेणं देणं आहे.
म्हणून आज महाराष्ट्राला शिवरायांच्या पुतळ्यांची नाही तर शिवचरित्र वाचण्याची जास्त गरज आहे…….
आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे पुन्हा प्रबोधन करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र शांत आहे म्हणजे सहण करतोय असं नाही. इतकं फक्त राजकारणी मंडळींनी लक्षात ठेवावं.
शिवराय केवढे आभाळा एवढे.
अभिषेक पत्की.
पुतळे असावे मात्र त्या पुतळ्यांच व्यवस्थापन व्यवस्थित होयला पाहिजे ,महाराजांचा पुतळा पाहला की ऊर्जा मिळतो
बरोबर