धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग ३.
धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज.
भाग ३.
महाराजांच्या आवडीनिवडी खूपच वेगळ्या होत्या. त्यांना नाटक, संगीत,तंत्र-मंत्र,भक्ती,पूजा,ध्यानधारणा,संतर्पण या साऱ्याचीच आवड होती. बालगंधर्वांचे नाटक बघण्यासाठी एकदा महाराज गेले होते.बालगंधर्वांची,म्हणजेच नारायणराव राजहंसांची त्यांच्यावर श्रद्धा होती.त्या दिवशी बालगंधर्वांचा आवाज बसलेला होता.नाट्यगृह पूर्ण भरलेले ,तिकिटे संपूर्ण विकली गेलेली, अशा परिस्थितीत मुख्य कलाकाराचाच आवाज बसलेला! यामुळे संपूर्ण नाटक कंपनी आणि आयोजक अस्वस्थ होते. महाराजांनी बालगंधर्वांच्या मुखामध्ये थोडासा चावलेला विडा घातला आणि सांगितले हा विडा पूर्ण चावून खा. बालगंधर्वानी देखील महाराजांच्या आज्ञेनुसार तो विडा पूर्ण खाल्ला व त्यानंतर त्यांचा आवाज पुन्हा नेहमीसारखा झाला! त्या दिवशीचा प्रयोग हा अतिशय उत्तम रंगला. बालगंधर्वांच्या बाबतीत आणखी एक घटना सांगितले जाते. एकदा गाणगापूरच्या देवदर्शनानंतर स्टेशनवर बालगंधर्व आणि कंपनी पोहोचले, तो रेल्वे निघून गेलेली होती. सोबत खायला प्यायलाही काही नव्हते.स्टेशन मास्तरांना विचारले तर ते म्हणाले आजूबाजूला हॉटेल नाही काही नाही. आता पाणी पिऊनच झोपावे लागणार,म्हणून साऱ्या जणांनी प्लॅटफॉर्मवर सतरंजी अंथरून आडवे होण्याचे ठरवले. तेवढ्यात एक माणूस आला आणि तो म्हणाला प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला माझी पुरी-भाजीची गाडी आहे. चला तुम्हाला पुरी-भाजी खाऊ घालतो.सारेजण आनंदाने तिथे गेले. त्या माणसाने सर्वांना गरम गरम पुरी-भाजी खाऊ घातली. बालगंधर्व त्यांना पैसे देऊ लागले तेव्हा तो म्हणाला असू द्या सकाळी रेल्वे येईल तेव्हा द्या. सकाळी सारे जण गाडी येण्याच्या आत पुरी-भाजीचे पैसे द्यायला जाऊ आणि चहा पण घेऊ म्हणून शेवटच्या टोकापर्यंत गेले तर तेथे गाडाही नव्हता आणि तो माणूसही नव्हता! त्यावेळी बालगंधर्वांच्या लक्षात आले की ही सारी महाराजांची लीला आहे!असेच प्रसंग गायिका यल्लूबाई यांच्याही बाबतीत घडले.कृष्ण भजन गाताना बाळकृष्ण कसा असेल असे त्यांच्या मनात आले,तो महाराजांनी समोरून रांगत जाऊन त्यांना साक्षात श्रीकृष्णाच्या बालरूपाचे दर्शन घडवले.
इंग्रज आमदनीच्या काळामध्ये एक आध्यात्म मार्गी सत्पुरुष उपासनी महाराज यांच्यावर सरकारने खटला भरला.त्यामध्ये उपासनी महाराज हे अध्यात्माच्या नावाने लोकांना लुबाडतात, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. श्रीशंकर महाराजांना हे जेव्हा समजले तेव्हा त्यांनी सर्व माहिती घेतली.त्याबरोबर हे लक्षात आले की उच्चशिक्षित भारतीय वकिलांची फौज इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उभी राहण्यास काही तयार नाही. श्रोत्री नावाचे एक वकील कसेबसे तयार झाले. मात्र ते महाराजांना भेटून म्हणाले,’ की मला शास्त्राचे ज्ञान नाही आणि हा खटला मी कसा चालवेन हे ही मला माहीत नाही.’ तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं,’ तुम्ही फक्त वकीलपत्र घ्यावे.बाकी सारे मी बघतो.’त्याप्रमाणे श्रोत्री वकिलांनी वकीलपत्र घेतले आणि उपासनी महाराजांच्या बाजूने ते कोर्टात उभे राहिले. आश्चर्याची बाब म्हणजे जी शास्त्र वचने ते कधीही शिकले नव्हते,त्यांची सांगोपांग मीमांसा त्यांनी केली आणि उपासनी महाराजांच्या बाजूने खटल्याचा निकाल लागला.
महाराजांच्या अशा सर्व लीला बघितलेले,ऐकलेले शिष्य खूप आनंदित होत.एकमेकांना ते सारे सांगत असत. कर्नाटकातल्या हिप्परगी मध्ये भागवत नावाचे असेच एक शिष्य होते. त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतले. विविध घटना मिळवून,प्रत्यक्ष त्या त्या माणसांना भेटून,नेमकेपणाने काय झाले ते समजून घेत, त्यांनी चरित्र लिहून पूर्ण देखील केले! त्यांनी आदराने महाराजांना बोलावले. मोठ्या पूजेचे आयोजन केले. महाराजांनी ते हस्तलिखित बघायला मागितले आणि त्याचा एक एक कागद फाडुन पूजेचा प्रसाद त्यामध्ये बांधून तो येणाऱ्या सर्व भाविकांना दिला. भागवतांना फार वाईट वाटले .त्यांनी विचारले,’मी एवढे चांगले लिहिले होते. तुम्ही असे विखरून का टाकले?’ तेव्हा महाराज म्हणाले,’ जेव्हा ज्ञानेश्वरी आणि दासबोध पुरेसे पडणार नाहीत,असे तुला वाटेल तेव्हाच माझ्या चरित्राच्या विषयी चिंतन कर. तोवर आधी या सद्ग्रंथांचे वाचन कर.’
रावापासून रंकापर्यंत सर्वत्र महाराजांचा संचार असे. जेवढ्या सहजपणे ते बाबुराव रुद्राच्या घरी किंवा ढेकणे मामा-मामींकडे जमिनीवर बसत, तेवढ्याच सहजपणे रावसाहेबांकडे, प्रधानांकडे उच्चासनावर बसत असत. महाराजांची कीर्ती ऐकून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाड्यामध्ये शंकर महाराजांना मोठ्या आदराने बोलावणे केले गेले .जेव्हा महाराज तेथे पोहोचले तेव्हा महाराजा गायकवाड यांनी त्यांना राजगादीवर बसवले. आजही त्या राजवाड्यामध्ये महाराजांचा पुतळा, त्यांचे फोटो हे उपलब्ध आहेत.
माणसा माणसांमध्ये महाराजांनी कधीही भेद केला नाही. ज्या ठिकाणी एका तथाकथित अस्पृश्याने त्यांना दुरून प्रसाद मागितला. महाराजांनी जवळ जाऊन प्रसाद दिला.काहीही वेगळे न बोलता,थोडया दिवसांनी तो भक्त बसला होता,त्याच ठिकाणाला त्यांनी आपल्या समाधीचे स्थान घोषित केले होते!
महाराज जेवढे प्रेमळ गुरु होते तेवढेच अहंकारी पंडितांना त्यांची जागा दाखवणारे सिद्धही होते! एकदा एका अहंकारी पंडित आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करावे या हेतूने महाराजांकडे आला.त्याला चारवेद, अठरा पुराणे,दहा उपनिषदे, सहा शास्त्रे यांचे तोंडपाठ ज्ञान होते. साळसूदपणे त्याने,’ मला तुमच्याशी चर्चा करायची आहे व माझे ज्ञान वाढवायचे आहे’असे सांगितले. महाराज म्हणाले,’ बस आधी आपण चहा घेऊ.’ महाराजांनी त्याच्या कप बशी मध्ये चहा ओतायला सुरुवात केली. कप भरला त्यानंतर बशी ही भरली तरीही महाराज किटलीतून चहा ओतत राहिले.शेवटी चहा जमिनीवर सांडला. तेव्हा तो माणूस म्हणाला,’ अहो असे काय करता? चहा सांडतो आहे’ महाराज म्हणाले,’ हे जर कळतंय तर मग स्वतःच्या डोक्यामध्ये एवढं ज्ञान भरून आलेला आहे आणि तरीही माझ्याकडून ज्ञान हवे आहे असे म्हणतोस, ते कसे तुला कळत नाही? एवढे गच्च भरलेले डोके असताना मी आणखी वेगळे ज्ञान काय देणार?’ मग मात्र त्या पंडिताने आपली चूक मान्य केली.
महाराजांच्या भ्रमंतीला सीमा नव्हतीच.ते नगर,वाशीम,सोलापूर,गाणगापूर सगळीकडे जात असत.मात्र त्यांनी हळूहळू पुण्यातील आपला मुक्काम अधिक वाढवीत नेला हे खरे.त्यांची प्रिय शिष्य मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी होती.पण भ्रमराला कमळाची ओढ लागावी तसे सगळेजण महाराजांच्या भोवती गोळा होत असत.डॉक्टर नागेश धनेश्वर,आचार्य अत्रे,रावसाहेब मेहेंदळे व ताईसाहेब मेहेंदळे,पंडित,प्रा.देव, ढेकणे मामा व मामी, मिरीकर,न्यायरत्न विनोद,भस्मे,बाबुराव रुद्र,अशर साहेब,नुरी साहेब,जी के प्रधान ही महाराजांची शिष्य मंडळी.
रावसाहेब मेहेंदळे आणि त्यांच्या द्वितीय पत्नी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या संसारात समाधान नव्हते.ताईसाहेब एकदा तर जीव द्यायलाच निघाल्या होत्या.दैवयोगाने मार्गावरील स्वामी समर्थ मठात त्या गेल्या,आणि त्यांच्या कानांना अष्टावक्र गीतेतील श्लोक ऐकू येऊ लागले. कुणीही आसपास नव्हते,पण तरीही आवाज मात्र अगदी स्पष्ट ऐकू येत होता. त्याचवेळी तेथून रावसाहेबांचे मित्र नुरी साहेब तेथून जात होते.ताईसाहेबांना पाहून त्यांनी घरी आणुन सोडले. यादरम्यान श्रीशंकर महाराज जी. के. प्रधान यांच्याकडे आलेले आहेत, असे रावसाहेबांना समजले.ते सपत्नीक दर्शनासाठी गेले.तेव्हा ताईसाहेबांच्या गळ्यास स्पर्श करून महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचने करीत जावे असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून ताईसाहेब कीर्तन करू लागल्या. मेहेंदळे वाडा आता कीर्तनाच्या रंगात रंगून गेला!!
महाराज अस्ताव्यस्त रहायचे.मनाला येईल तो वेश करायचे,दारू प्यायचे, सिगारेट ओढायचे, तारवटलेले डोळे घेऊन शिव्या देखील द्यायचे! असे असतानाही त्यांच्याभोवती अशी हिऱ्यामाणकांसारखी गुणी माणसे कशी जमा झाली असावीत हे कोडेच आहे. महाराज असे का वागतात हे त्यांनीच एकदा सांगितले होते. ते म्हणाले माझ्या बाह्य रूपावरून मला जे ओळखतील ते आपोआप दूर जातील आणि माझे अंतरंग जे ओळखतील ते आपोआप माझ्याजवळ येतील.मला तोच ओळखू शकतो जो स्वतःला जाणतो!
(क्रमशः)
रमा दत्तात्रय गर्गे