महात्मा गांधींच्या विचारांवर पाणी कोणी सोडले ?

२ ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने.

0 981

नुकताच पितृपक्ष पांढरावाडा संपला. पितृपक्षात आपल्या पितरांसाठी श्राद्ध आणि त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण आणि त्यांच्या प्रती आदर भाव व्यक्त करण्याची आपली परंपरा आहे. भाताचा पिंड करून त्यात आपल्या पूर्वजांचे आवाहन करून त्यावर अंगठ्याने पाणी सोडण्याचा विधी असतो. आपल्या जाती बांधवाला भोजन वैगेरे विधीभाग आहेच. परंतु आपल्या राजकीय पूर्वजांच्या विचारावर पाणी सोडण्याचे काम कॉँग्रेस एवढे कुणी केले नसेल. विचारांचे श्राद्ध घालणे आणि विचारांवर पाणी सोडणे ह्या कॉँग्रेसी परंपरेत उद्धव ठाकरे आता सहभागी झाले असले तरी नेहरू-गांधी घराण्याचा हा जुना मक्ता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वावलंबी मूल्याधारित ग्रामीण जीवनाची प्रारूपे उभी केली आणि त्याची प्रेरणा घेऊन अनेक गावांमध्ये ग्रामविकासाचे काम व्हायला लागले. संघाचे प्रचारक नानाजी देशमुख हे याचे मोठे उदाहरण आहे. गोंडा व चित्रकूट परिसरात आपल्या असामान्य कामाने त्या भागाचे रूप त्यांनी पालटले व त्यांच्या प्रेरणेने देशभरात हजारो कामे उभी राहिली. संघाच्या ग्रामविकास गतिविधीच्या पुढाकाराने हजारो गावांच्या लोकसहभागातून विकासाला चालना मिळाली आहे.

महात्मा गांधींचे विचार व त्यावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिका अनेकांना पटत नसल्या तरी त्यांनी केलेले देशकार्य आणि भारतीय मूल्यांचा केलेला प्रचार याबाबत कोणीही आक्षेप घेणार नाही. त्यांचा ‘खेड्यांकडे चला’ हा मूलमंत्र शाश्वत विकासाचा पाया आहे. परंतु ग्रामविकासातून राष्ट्रविकासाकडे जाण्याच्या गांधींच्या दृष्टीला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर नजरेआड केले ते नेहरू आणि त्यांच्या नेतृत्वातील कॉँग्रेसने. नेहरूंच्या सोशालिस्ट फॅन्टसीने भारत सरकारच्या मूलभूत रचनात्मक कामाच्या स्वरूपाला विकृत बनवले. गांधी विचाराला त्यांच्या निधनानंतर पायदळी तुडवून कॉँग्रेसजनांच्या रोजगाराच्या सोयीसाठी संस्था उभ्या करण्यापलीकडे कॉँग्रेसने काही केले नाही.

आज नरेंद्र मोदींचे सरकार आणि त्यांच्या मार्गदर्शनात चाललेले महाराष्ट्राचे सरकार ग्रामविकासासाठी लक्ष पुरवून आणि योजना आखून निधीची तरतूद करत आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून निधीचा आधिक वाटा ग्रामपंचायतींना देऊन ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण तसेच गावातील विकास चक्राला गती देण्याचे काम होत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटत आहे. जलसंधारण व मृदासंधारणातील विविध योजनांच्या माध्यमातून वाहणारे पाणी थांबवून, थांबलेले पाणी मुरवून भूजल पातळी वाढल्याची हजारो गावातील उदाहरणे आहेत. महाराष्ट्र राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील जलयुक्त महाराष्ट्र अभियान हे उल्लेखनीय मानायला हवे. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली पंतप्रधान ग्रामसडक योजना ही ग्रामीण रस्ते बांधणीमधील अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या निकषात नाहीत. त्या रस्त्यांच्या बांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. राष्ट्रीय रुर्बन अभियानाच्या माध्यमातून शहरातील सुविधा ग्रामीण भागात पुरवणे तसेच PMEGP, CMEGP, PMFME अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, कौशल्य विकासाच्या विविध योजना आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कौशल्यविकास घडवून पारंपरिक कारागिरांना सन्मान, प्रशिक्षण व कर्ज मिळवण्यात सहाय्य यामुळे ग्रामीण भागातील समृद्धीला चालना मिळणार आहे.

केंद्र व राज्यसरकारची ही विकासाभिमुख दृष्टी ग्रामीण भागात परिवर्तनाची पहाट घेऊन आली आहे. त्यामुळे विकासाचा हा सूर्य आणि हा कॉँग्रेसरूपी जयद्रथ आपल्यासमोर आहे. बाण कुणावर मारायचा याबाबत कुठलीच शंका आपणा सर्वांच्या मनात असण्याचे काहीच कारण नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.