तिसऱ्या महायुद्धाची नांदी ?  “ ऑपरेशन ट्रू प्रॉमिस २ ”

2 1,175

तिसऱ्या महायुद्धाची नांदी ?  “ ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ” 

 मध्यपूर्वेमधे इस्रायल हमास युद्धाचा तणाव वाढत असताना इस्रायलनी;गाझामधे हमासला संपवल तसच दक्षिण लेबनानमधील हिजबुल्लाहची ठिकाण आणि पायाभूत सुविधा नष्ट करून तीला मूळापासून संपवण्यासाठी मर्यादित जमीनी/हवाई हल्ले सुरू केल्यामुळे इराणनी इस्त्रायलवर हल्ला केला.सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत इराणनी इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला होता/ आहे.३० सप्टेंबर/०१ ऑक्टोबर, २४च्या रात्री, इराणनी इस्त्रायलवर २१० वर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि इस्रायल इराण संघर्षानी गंभीर वळण घेतल.इस्रायलच्या प्रगत क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणेनी अनेक क्षेपणास्त्र रोखली असली तरी त्यांच्या हानीची खरी व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही.इस्रायलची लेबनानमधील लष्करी मोहीम, इराणचा इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला आणि इस्रायल या हल्ल्याला कसा प्रतिसाद देईल  यावरून,जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर उभ आहे का/मध्यपूर्वेतील युद्ध ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का हे स्पष्ट होईल.त्यामुळे; इराणचा इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला,इस्रायलचा संभाव्य प्रतिसाद,या हल्ल्यामागील इराणचे  हेतू आणि इस्रायलनी इराणवर प्रति हल्ला केला तर त्याची प्रतिक्रिया काय असेल याच विश्लेषण होण आवश्यक आहे.

युद्ध हानी 

   सोमवार,०७ ऑक्टोबर, २४ला इस्रायल व हमास/हिजबुल्ला/इराण युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल.इस्रायल किंवा त्याचे शत्रू हा दिवस कसा साजरा करतील या बद्दल सर्वांच्याच मनात भीती होती.पण; नेतन्याहू, खोमेनी किंवा हमास/हिजबुलच्या सुप्रीमोंनी थोड्या डरकाळ्या फोडल्या, हिजबुलनी ११० आणि हमासनी नऊ क्षेपणास्त्र/रॉकेट इस्रायलवर डागलेत आणि इस्रायलनी त्यांच्यावर १७० तीव्र हवाई हल्ले आणि तोफांचे असंख्य हल्ले केलेत.मागील एक वर्षात इस्त्रायलवर; गाझातून १३,२००, लेबनानमधून १२,४००, येमेनमधून १८० आणि इराणमधून ४०० असे २६,००० वर क्षेपणास्त्रांचा मारा झाला असून त्याचे ७२८ सैनिक मृत्युमुखी पडलेत आणि ४५७६ जखमी झाले आहेत.आर्थिक व संसाधन नुकसानीचे आकडे उपलब्ध नाहीत.इस्रायली हल्ल्यांमधे; गाझापट्टीत आठ ब्रिगेड/३०बटालियन/१८५ कंपनी कमांडर्ससमेत १७,००० हमास सैनिक, आणि ४२,००० पॅलेस्टिनी अल्ला प्यारे झाले,४०,३०० ठिकाणांवर हल्ले झालेत त्यात ४,७०० भूमिगत बोगदे नष्ट करण्यात आले आणि वीस लाख लोक विस्थापित झाले; लेबनानमधे; ५१,०० हिजबुल ठीकाणांवरील हल्ल्यात,९० कमांडर्ससमेत ८०० हिजबुल सैनिक अल्ला प्यारे झाले असून,वेस्ट बँकमधील २०,००० इस्रायली आणि लेबनानमधील दोन लाख लोक विस्थापित झाले आहेत.

इराणचा क्षेपणास्त्र हल्ला .

२८ सप्टेंबर,२४ला;दक्षिण लेबनानची इराण समर्थित शिया दहशतवादी संघटना हिजबुल्लावर इस्रायलनी तोफा व हवाई हल्ले केल्यानंतर इराणनी ३० सप्टेंबरच्या रात्री इस्रायलवर जॉर्डनवरील आकाशमार्गे (थ्रू एयर स्पेस), इराणनुसार २१० तर इस्रायलनुसार १८०, क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा  हल्ला केला. १३ एप्रिल आणि ३० सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यात; इस्त्रायलवर ५००वर इराणी ड्रोन्स/ क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत असताना, इस्रायलची आयर्न डोम आणि ॲरो एयर डिफेन्स सिस्टीम, त्या हत्यारांना टार्गेटपर्यंत न जाऊ देण्यासाठी कार्यरत होती.या ड्रोन्स/क्षेपणास्त्रांना, इस्रायल व अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीनी आळा घातला.जी क्षेपणास्त्र  रोखल्या गेली नाहीत ती; दक्षिण इस्रायलमधील हवाई दलाच्या तळांजवळ, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच मुख्यालय आणि तेल अवीवच्या उत्तरेकडील लष्करी गुप्तचर तळाच्या रिकाम्या जागेत पडलीत.इराणी दाव्यांनुसार; “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस २” अंतर्गत करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्र फायरिंगमुळे, नेवाटीम हवाई दल तळ, नेत्झारिम लष्करी सुविधा आणि टेल नोफ इंटेलिजेंस युनिट यांच मोठ नुकसान झाल आहे. इस्रायलनी या इराणी दाव्याच खंडन केलेल नाही..

इराणी एरोस्पेस फोर्सनी या तीन लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हायपरसॉनिक फताह क्षेपणास्त्र वापरली होती. इराणनी कुठल्याही नागरी लक्ष्य आणि पायाभूत सुविधांवर हल्ला केला नाही. इराणनुसार,”इस्रायलविरुद्ध केलेली लष्करी कारवाई,कायदेशीर अधिकारांतर्गत, इराण आणि मध्यपूर्व क्षेत्रासाठी शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानी केली असून ती,इराणचे हितसंबंध आणि नागरिकांच्या रक्षणासाठी होती. ०१ ऑक्टोबर,२४ला दुपारी, इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला थांबवण्यात आला कारण त्यांना व्यापक प्रादेशिक संघर्ष सुरू किंवा वृद्धिंगत करायचा नाही”. इराणच्या आधुनिक क्षेपणास्र/शस्रास्रात;अबू महदी मिसाईल, फतह हायपरसॉनिक बॅलिस्टीक मिसाईल, मुहाजिर १० ड्रोन आणि खोर्रमशहर/खुर्ज क्षेपणास्त्र असून, यांना निरस्त्र करण (न्युट्रलाइझ) ही इस्त्रायलची प्राथमिकता असेल.मात्र;या वेळी इराणनी  केवळ फतेह क्षेपणास्त्र वापरल असल्यामुळे, भविष्यात इराणशी दोन हात करताना इस्रायलला विचारपूर्वक पाऊल उचलावी लागतील.

इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली.

(एक) आयर्न डोम नावाची सुप्रसिद्ध,हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, या समन्वय प्रणालीचा सर्वात खालचा स्तर आहे. ही  मोबाईल संरक्षण प्रणाली,७० किमी दूर आणि पाच किमी उंच असलेल्या क्षेपणास्त्र/ रॉकेटला ध्वस्त करते. ही प्रणाली; रॉकेट, क्षेपणास्त्र, मोर्टार आणि ड्रोन्सना ओळखून शोधून नष्ट करण्यासाठी (आयडेंटिफिकेशन,सर्च अँड डिस्ट्रक्शन) रडार आणि तिमिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्र वापरते.ही प्रणाली  इस्रायलमधे २०११ साली कार्यान्वयीत झाली असून तीनी,हमास आणि हिजबुल्लाच्या हजारो प्रक्षेपणास्त्रांना नष्ट केल आहे.दोन) डेव्हिड स्लिंग ही; मध्यम ते लांब पल्ल्यांच्या  इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची संरक्षण प्रणाली,आयर्न डोमनंतर कार्यरत असलेली, दुसऱ्या स्तराची हवाई संरक्षण प्रणाली आहे.ही इस्रायलमधे २०१७ साली कार्यांन्वयीत झाली. ही प्रणाली, गाझा किंवा दक्षिण लेबनानमधून डागण्यात आलेली,२०० किमी पर्यंत दूर आणि दहा किमी उंच असलेली बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्र, तसच ड्रोन्स नष्ट करते.तीन) ॲरो २ व ॲरो ३ या दोन्ही हवाई संरक्षण प्रणाल्या; २४०० किमी दूर आणि १५ किमी उंच, पृथ्वी वातावरणाच्या बाहेरून डागलेल्या क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात.ॲरो २ व ३च रडार, आपल्याकडे येणारे धोके शोधत,लक्ष्य शोधल्यानंतर त्याचा  मार्ग,वेग आणि  संभाव्य लक्ष्य कोणत असू शकत या संबंधीची वास्तविक वेळेनुसार माहिती (रियल टाईम इंटलिजंस) नियंत्रण केंद्राला देत.ॲरो ३ एअर डिफेन्स सिस्टम;शत्रू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पुन्हा पृथ्वी प्रवेशात (अर्थ स्फियर) प्रवेश करण्यापूर्वी, वातावरणातील आपल्या संभाव्य लक्ष्यांना माहिती देऊन शत्रू क्षेपणास्त्रांना पृथ्वी प्रवेशात येण्या आधीच ध्वस्त करत.सप्टेंबर २४च्या सुरवातीला येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना या दोन हवाई संरक्षण प्रणाल्यांद्वारे  नष्ट करण्यात आल होत. ॲरो २ व. ३  ही, क्षेपणास्त्र संरक्षण इंटरसेप्टर प्रणाली, इस्रायल क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा तीसरा स्तर आहे. ॲरो ३ ही,सर्वात लांब पल्ल्याची इंटरसेप्टर प्रणाली ॲरो २ हवाई संरक्षण प्रणालीची पूरक आहे.चार) आयर्न बीम ही इस्त्रायलची; सैनिकांवर १०००-१५०० मीटर दुरीहून फायर केलेल्या प्रोजेक्टाइलला नष्ट करू शकणारी, हॅण्ड हेल्ड लेझर वेपनरी आहे. सूत्रांनुसार,ही २०२५मधे इस्रायली स्थलसेनेला दिल्या जाईल;आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग आणि ॲरो २ व ३ इंटरसेप्टर्सनी एप्रीलआणि सप्टेंबर २४मधे करण्यात आलेल्या इराणच्या; ४०० वर ड्रोन,क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी ९८ टक्के  हत्यार नष्ट केली. 

इस्रायलचा प्रतिसाद.

इराणी क्षेपणास्त्रांचा सामना करतांना इस्रायलनी; जीपीएस जॅमिंग/ जीपीएस प्रणालीत  व्यत्यय आणून क्षेपणास्त्रांची दिशाभूल करण किंवा नॉनकायनेटिक माध्यमांद्वारे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची क्षमता कमी करण;या इलेक्ट्रॉनिक युद्ध पद्धतीचा वापर केला असणार. प्रत्युत्तरात इस्रायल, इराणच्या तेल उद्योगावर आणि कदाचित त्याच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित लष्करी लक्ष्यावर प्रतिकात्मक हवाई हल्ला हल्ला करेल. संरक्षणतज्ञांनुसार; इस्रायलचा इराणवरील प्रतीहल्ला,येमेनी बंदरातील हौथी नियंत्रित तेल सुविधा, पॉवर प्लांट्स आणि गोदी यांच्यावर २९ सप्टेंबर,२४ला केलेल्या  हवाई हल्ल्यांसारखा इराणच्या लष्करी किंवा आर्थिक लक्ष्यांवर झालेला प्रातिनिधिक हल्ला असेल.इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांचे  क्लस्टर्स,भूगर्भात/ पर्वतांखाली खोल असून आहेत. बॉम्बफेकीद्वारे त्याची प्रवेशद्वार सील करणे शक्य आहे.इस्रायल इराणच्या  तेहरान, इस्फाहान आणि पर्शियन खाडीवरील बंदरांवर देखील हल्ले करू शकतो.जर मोठ टार्गेट हव असेल तर, जानेवारी,२३प्रमाणे, इस्फहानच्या लष्करी-औद्योगिक उत्पादन केंद्राला लक्ष्य करू शकतो.पण, संरक्षणतज्ञांनुसार,बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्यांचा  संभाव्य प्रतिसाद  देतांना, हे युद्ध हाताबाहेर जाऊ नये यासाठी इस्रायल इराणच्या;९० टक्के  कच्या तेलाची निर्यात हाताळणार,खार्ग ऑइल टर्मिनल आणि देशांतर्गत तेलाच्या गरजा पूर्ण करणारी,अबदान रिफायनरी सारख्या  तेल पायाभूत सुविधांवर हल्ला करेल.३० सप्टेंबर/०१ ऑक्टोबर,२४च्या रात्री इराणची १८०/२१० क्षेपणास्त्र पाडण्यासाठी इस्रायलला, ४५० वर इंटरसेप्टर्स फायर करावी लागलीत. हे अतिशय खर्चिक आहे.एक तीमिर आयर्न डोम क्षेपणास्त्र,एक लाख पन्नास हजार डॉलर्स, डेव्हिड स्लिंग क्षेपणास्त्र आठ लाख डॉलर्स आणि ॲरो क्षेपणास्त्र पस्तीस लाख डॉलर्सच असत.०७ ऑक्टोबर,२३पासून इस्रायलनी स्वरक्षणासाठी ५६ अब्ज डॉलर्सची क्षेपणास्त्र वापरली आहेत.तुलनात्मक दृष्ट्या, २०२४-२५साठी भारताच संरक्षण आवंटन ७६ अब्ज डॉलर्सच आहे.खोमेनीनी म्हटल्याप्रमाणे,इराणनी इस्रायलवर, वारंवार, मोठ्या संख्येनी, बॅलिस्टिक मिसाइल डागलीत तर इस्रायल कितीदा ही हवाई संरक्षण यंत्रणा वापरू शकेल आणि तो/अमेरिका हा खर्च कुठ पर्यंत झेलू शकतील हा लाख मोलाचा प्रश्न आहे.

अमेरिकन पाठींबा .

मध्यपूर्वेतील संघर्षात अमेरिकेनी इस्रायलला सर्वकष पाठिंबा दिला आहे. त्या क्षेत्रात आधीपासून तैनात असलेल्या, आण्विक शक्तीवर चालणारी विमानवाहू जहाज, क्षेपणास्त्रवाहू युद्ध नौका व आण्विक पणबुड्याच्या मदतीला अमेरिकेच; आण्विक शक्तीवर चालणार दुसर विमानवाहू जहाज,त्याच्या बरोबरच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका आणि आण्विक पाणबुड्यासमेत तीन मरीन बटालियन्सना या प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत.अमेरिकेनी, एफ १५ई आणि एफ १६ लढाऊ विमानांचे तीन अतिरिक्त स्क्वॉड्रन आणि ए १० विमान स्क्वॉड्रन मध्यपूर्वेत आणले आहे.अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी, “आक्रमकतेच अपमानास्पद कृत्य” करणाऱ्या इराणविरूध्द इस्रायलच्या संरक्षणात मदत करण्याचे आणि इस्रायलला लक्ष्य करणारी क्षेपणास्त्र पाडण्याचे निर्देश अमेरिकन लष्कराला दिले आहेत.इराणनी, इस्रायलवर परत हल्ला केल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पेंटागॉन प्रमुखांनी दिला आहे. ३० सप्टेंबर २४ला इस्रायलवर झालेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्या गेला.यूएसएस अब्राहम लिंकन आणि मदतगार युद्ध नौका/पाणबुड्या, आधीपासूनच मध्य पूर्वेत होत्या आणि यूएसएस हॅरी एस. ट्रुमन आणि यूएसएस अब्राहम लिंकन आणि मदतगार युद्ध नौका/पाणबुड्या आता तेथे पोचल्या आहेत. 

अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑस्टिननुसार, यूएसएस लिंकन आणि त्या बेड्यातील इतर युद्ध नौका,दुहेरी सागरी वाहक सुरळीत व्हावी या दृष्टीनी, उभयचर आक्रमक जहाज,यूएसएस वास्प बरोबर, मध्य पूर्व आणि पूर्व भूमध्य सागरीय भागात तैनात होत्या. यूएसएस लिंकन,एफ ३५ लढाऊ विमान असणार,जगातल सर्वात मोठ विमानवाहू जहाज आहे.युएसएस थिओडोर रुझवेल्ट सध्या अरबी समुद्रात,एडनच्या आखाताजवळ,इराण समर्थित हुथी बंडखोरांविरोधात तैनात आहे. यूएसएस न्यूयॉर्क आणि यूएसएस ओक हिल, लेबनॉनमधे फसलेल्या अमेरिकन व पाश्चिमात्य नागरिकांना,संभाव्य धोक्यातून बाहेर काढण्यासाठी (इव्हॅक्यूएशन) तैनात करण्यात आल आहे.इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धाची शक्यता अटळ बनल्यामुळे अमेरिकेनी हे पाऊल उचलल आहे या खेरीज,या क्षेत्रात अमेरिकेकडे; यूएसएस इंडियाना पोलिस,यूएसएस स्प्रुअन्स, यूएसएस कोल आणि यूएसएस बुल्केले आणि यूएसएस स्टॉकडेल या,मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक युद्ध नौका आहेत.ही जहाज/युद्ध नौकांनी इस्रायलवरील इराणी हल्ल्यांना रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सप्टेंबर २४च्या अखेरीस, क्रुझ मार्गदर्शित क्षेपणास्त्र असलेली आण्विक पाणबुडी, यूएसएस जॉर्जिया इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी मध्य पूर्वमध्ये आली.पेंटॅगॉन प्रवकत्यानुसार त्यांनी इस्रायलला इराणचे, ड्रोन, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बॅरेज नष्ट करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अमेरिकन नौसेनेच्या दोन विनाशकांनी इराणच्या २०वर इंटरसेप्टर्स क्षेपणास्त्रांना नष्ट केल आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यांच पृथ:करण .

इस्रायलची बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली; आयर्नडोम, डेव्हिड स्लिंग आणि ॲरो डिफेन्स सिस्टीम या तीन स्तरांवर कार्यरत आहे.२०२१पासून कार्यरत असलेला आणि ९० टक्के यशस्वी गमक असलेला आयर्न डोम, इस्त्राईलचा “गेम चेंजर” आहे. हा;लहान धोक्यांचा सामना करण्यासाठी तैनात असून त्यानी, अगणित रॉकेट आणि मोर्टर हल्ल्यांपासून इस्रायलच,रक्षण केल आहे.नवीनतम क्षेपणास्त्र हल्ल्यातही आयर्न डोमनी अनेक क्षेपणास्त्रांना रोखून/ध्वस्त करून आपली त्योग्यता  सिद्ध केली आहे.इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता जात्या दिवसागणिक वृद्धिंगत होत असताना, अत्याधुनिक धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपली तीन स्तरीय हवाई संरक्षण प्रणाली पुरेशी आहे की नाही या गंभीर प्रश्नाला इस्रायलला सामोर जाव लागेल. नेवाटीम हवाई तळ ते तेल अवीव क्षेत्रातील इस्रायलच्या प्रमुख स्थानांना लक्ष्य करणाऱ्या इराणी क्षेपणास्त्रांमुळे, इस्रायल क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची लवचिकता आणि प्रभवाबद्दल (फ्लेक्सीबिलिटी अँड इफेक्ट) शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. ही लोखंडा सारखी मजबूत त्रिस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीच (आयर्न क्लॅड सिस्टीम) गंभीर पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ/ परिस्थिती इस्तायलवर आली आहे. इराणनी केलेले नवीनतम  क्षेपणास्त्र हल्ले,त्याच्या लष्करी पवित्र्यातील  लक्षणीय बदल/वाढ उजागर करतात. १३ एप्रिल,२४ मधिक ड्रोन/क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षा ३० सप्टेंबर/ ०१ ऑक्टोबर,२४च्या रात्री झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा आयाम (स्केल)  आणि तीव्रता (थ्रस्ट) दोन्ही खूपच जास्त होते.सूत्रांनुसार; ताशी १२,००० किमी वेगाच्या,प्रगत फत्तेह २ हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह, हाय-स्पीड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्यामागील इराणचा हेतू, इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींना वेसण घालून थकवण हाच आहे हे स्पष्ट होत.बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वेग, प्रक्षेपण आणि सामग्री वाहक क्षमतेमुळे (पे लोड कपॅसिटी) त्याला रोखण/आळा घाला कठीण असत. ..

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोक्यांचा सामना करण्यासाठी अधिक प्रगत इंटरसेप्टर्स आवश्यक असतात जे,ॲरो २ आणि ॲरो ३  प्रणालींमधे उपलब्ध आहे.ही प्रणाली, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी निर्माण झाली असून ती, इस्रायल संरक्षणाचा कणा आहे. पण नवीनतम इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांनी या प्रगत प्रणालींच्या मर्यादा उजागर केल्या आहेत. एकाच वेळी,असंख्य शत्रू क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्यास,उपलब्ध इंटरसेप्टर्सची संख्या, त्यांच्या किंमतीमुळे महत्त्वाची बनते. इराणनी केला तसा,प्रचंड क्षेपणास्त्र हल्ला वेळोवेळी/वारंवार झाल्यास ही प्रणाली, कितपत योग्य असेल हे येणारा काळच ठरवेल.अशा, दीर्घकाळ चाललेल्या हल्ल्या दरम्यान या संरक्षणाची परिणामकारकता कमी करून साठा कमी करण्याची शक्यता (परम्युटेशन्स काँबिनेशन्स) पडताळून पाहावी लागेल.एकाच वेळी अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना यशस्वीपणे रोखण्यासाठी स्प्लिट-सेकंड निर्णय आणि निर्दोष समन्वय आवश्यक आहे, तरीही या प्रणाली मोठ्या प्रमाणातील समन्वित हल्ल्यां पुढे अक्षम ठरू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.इराणच्या फत्तेह-२ सारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, क्षेपणास्त्र युद्धात धोकादायक बदल घडवून आणू शकतात/आणतील. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, आवाजी वेगापेक्षा (मॅक स्पीड) पाच पट वेगानी जात असल्यामुळे,संरक्षण प्रतिक्रिया वेळ कमी होऊन,प्रभावी प्रतिसाद देण अधिक कठीण होत.

   या मुळे,इस्रायलनी आपली क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनी,नवीन धोरण आणि तंत्रज्ञानाचा विचार केला पाहिजे. आयर्न डोम, ॲरो २ आणि ॲरो ३ हे इस्त्रायली सुरक्षा प्रणालीचे आधारस्तंभ असले तरी,क्षेपणास्त्र धोका त्याच्या दुप्पट वेगानी  विकसित होतो आहे.इस्रायलची, लेसर आधारित आयर्न बीम हवाई संरक्षण प्रणाली,विद्यमान क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्कला पूरक ठरू शकते. अमेरिकन/आंतरराष्ट्रीय युती, इस्रायलची भविष्यातील संरक्षण गुरुकिल्ली असेल.कुठल्याही परिस्थितीतील सतत अमेरिकन पाठिंबा इस्रायलसाठी आवश्यक आहे. इस्रायलवर, विशेषत: नेवाटीम हवाई तळ आणि तेल अवीवमधील नागरी ठिकाणांवर झालेल्या बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे, इस्रायलचली क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची ताकद आणि मर्यादा दोन्ही उघड झाले आहेत. नवीन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय युती आणि नाविन्यपूर्ण संरक्षण उपायांसह, इस्रायलने आपल भविष्य सुरक्षित करण्यासाठी सज्ज असण ही काळाची गरज आहे.

इस्रायलच संभाव्य उत्तर. 

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल इराणवर केंव्हा,कुठे व कसा प्रहार करेल याच्या संभवनांच विश्लेषण करण आवश्यक आहे. इराणनी ३० सप्टेंबर/०१ ऑक्टोबरला डागलेल्या, २००वर क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरात,जर इस्रायलनी इराणच्या भूमीवर हल्ला केल्यास, इराण भयंकर मोठी कारवाई करेल अशी धमकी इराणनी दिली आहे. शुक्रवार,०४ ऑक्टोबर,२४ला  तेहरानच्या मशिदीतील नमाजच्या नंतर एक लाख नमाजींच उद्बोधन करतांना,इराणी सुप्रीमो आयातुल्ला खोमेनींनी,”आम्ही इस्रायलवर परत हल्ला करू.त्याचे तुकडे होईस्तोवर शांत बसणार नाही.हिजबुल हमास आतंकी नाहीत” अशी गर्जना केली.  इस्रायल,नवीनतम इराणी हल्ल्याला “महत्त्वपूर्ण प्रत्युत्तर” देण्याची योजना आखतो आहे अस इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केल आहे. तज्ञांनुसार यात;इराणमधील तेल उत्पादन सुविधा, लष्करी स्थळ आणि इतर मोक्याच्या ठिकाणांना ध्वस्त/लक्ष्य केल्या जाईल. याला जर इराणनी काही प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास ईस्रायल,इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ले करेल.पण माझ्या अंदाजानुसार; इस्रायल इराणवर, विचारांत, साधकबाधक सामरिक हल्ला (कॅलिब्रेटेड अटॅक) करेल.इस्रायली हल्ला,अण्वस्त्र किंवा तेल उत्पादन/निर्यात केंद्रांवर न होता, लष्करी ठिकाणांवर होईल.इराणनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांच मोजमाप (इव्हॅल्युएशन) करून,त्याची जेवढी हानी झाली तेवढीच करण्यासाठी हल्ला करण्यात येईल.इस्रायल, इजिप्त व सीरिया युद्धात उतरतील अस कुठलही कृत्य करणार नाही.इस्रायली पंतप्रधान, बेंजामिन नेतन्याहूनुसार “इराणनी इस्रायलवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला ही, धोरणात्मक सामरिक घोडचूक आहे आणि त्यासाठी त्याला शिक्षा होईलच. इराण राजवटीला,शत्रूंचा बदला घेण्याचा आमचा निर्धार समजत नाही”.

युद्धाचे भारतावरील परिणाम.

मध्य पूर्वेतील संकट आणि इराणनी इस्रायलवर केलेल्या नवीनतम बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरची परिस्थिती भारतासाठी; व्यापार विशेषत: तेल, पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवरील  संभाव्य  परिणामांमुळे चिंताजनक आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तीव्र संघर्ष सर्वकष युद्धात बदलला तर,रेड सी आणि एडनच्या आखाताच्या मार्गांवर व्यापक व्यापार व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.यामुळे मालवाहतुकीचे दर लक्षणीय प्रमाणात वाढू शकतात कारण लेबनानमधील इराण-समर्थित हिजबुल्लाह आणि येमेनमधील हुथी चांचे/बंडखोर यांच साटलोट आहे. हुथी चांच्यांनी; रेड सी आणि एडनच्या आखातातून मालवाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करून, जागतिक व्यापार विस्कळीत केला. भारताची पेट्रोलियम आयात,४५ मिलियन डॉलरनी महागेल.भारत रेड सीमार्गे, १८ लाख कोटी रुपयांची निर्यात आणि १७ लाख रुपयांची आयात करतो.२३-२४ मधे, भारताचा एकूण व्यापार (निर्यात/आयात) ९४ लाख कोटी रुपये होता.त्यात;६८ टक्के (मूल्याच्या दृष्टीने) आणि ९५ टक्के (व्हॉल्यूमच्या दृष्टीने) समुद्रमार्गे झाला. आखाती राष्ट्रांमधे भारत; ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा आणि आरोग्य या क्षेत्रांत निवेश करतो.२०२३-२४मधे,गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांमधील द्विपक्षीय व्यवहारातून भारताला १६२ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. सर्वकष युद्ध सुरू झाल्यास या सर्वांवर गंभीर परिणाम होईल.तसच भारतात; मुस्लिम असंतोष (अनरेस्ट)निर्माण होईल.सप्टेंबर,२४ला बैरूट मधे हिजबुल चीफ हसन नसरल्लाह मारला गेल्यावर भारतात काश्मिर,दिल्ली,महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यात झालेल्या शोक निदर्शनांवरून,भविष्यात,मध्यपूर्वेत सर्वकष युद्ध झाल तर,भारतात निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कल्पना करता येते.या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानी प्रवास सल्ला जारी करून,भारतीयांनी इराण किंवा  मध्यपूर्वेत अनावश्यक प्रवास टाळण्याच आणि या प्रदेशात असलेल्या भारतीयांना, सतर्क राहून  तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला, सांप्रत गोंधळा दरम्यान सरकारच्या भारतीय नागरिक सुरक्षेबाबत चिंता दर्शवतो.त्या लाेकांच्या परतीसाठी,इस्रायल आणि इराणला भारतीय विमान उड्डाण सुरू आहेत.

इराणची भावी रणनीती .

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी,पाच वर्षांमधील वर्षांतील त्यांच पहिल नमाजी भाषण, शुक्रवार,०४ ऑक्टोबर, २४ला, ऐतिहासिक “इमाम खोमेनी मशिदीत” केल.नमाज अदा केल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी; “इस्त्रायल दीर्घकाळ टिकणार नाही”, “हा क्षेपणास्त्र हल्ला, आंतर राष्ट्रीय,इराणी आणि इस्लामिक विचारसरणीच्या अनुरुपच आहे”, “आमच्या बांधवांच्या मदतीस जात,आम्ही वारंवार असे हल्ले करू”,“इस्रायलला संपविण गरजेचे;अरब देशांनी एकत्र यावे”,”हमास व हिजबुल या आतंकी संघटना नसून धार्मिक आहेत”; या वर भर दिला. या वेळी खोमेनीनी,एके ४७ रायफल डाव्या हाती धरली होती हे लक्षणीय असून इराणच्या आक्रमक दृढतेच (रिझॉलव्ह टू अग्रेसिव्ह फाईट) प्रतीक मानल्या जात आहे.नमाजासाठी अयातुल्ला खोमेनीनी १९७९ च्या इस्लामिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल ठिकाण निवडल कारण त्यांना;इस्रायल इराण संघर्षात इराणच्या भूमिकेच समर्थन करून,इस्लामी जगतात त्याची नवीनतम भूमिका त्या इस्लामिक क्रांती इतकीच महत्वाची आहे हे अधोरेखित करण,हे होत अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.या पुढे होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराण, आक्रमक क्षेपणास्त्र ओव्हर सॅच्युरेशनची नवीन रणनीती अमलात आणून,भविष्यात इराणवर होऊ शकणाऱ्या  हल्ल्याचा पाया असणाऱ्या,इस्रायलमधील नेवाटिम एअर बेससारख्या  दुर्गम ठिकाणी असणाऱ्या लष्करी लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करेल.

इराणने हे दाखवून दिल की त्याच्याकडे  भरमसाठ मोठा क्षेपणास्त्र साठा असून तो इस्रायलवर कितीदाही,कितीही  बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी मारा करू शकतो. या वेळी इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या नागरी क्षेत्रांना लक्ष्य केल नव्हत.जर केल असत तर इस्त्रायलची प्रचंड जीवहानी झाली असती. आगामी इराणी क्षेपणास्त्र हल्ला,,विस्तृत क्षेत्राच्या पायाभूत सुविधांवर झाला तर,आर्थिक/संसाधन नुकसान खूप मोठ होईल. इराण त्याच्या भूभागावर हल्ला करू शकतो ही आता, इस्रायलसाठी चिंतेची बाब आहे. इराण; त्याच्या क्षेपणास्त्रांची संख्या, अचूकता, प्रतिकार शक्ती वाढवत असल्यामुळे इस्रायलला, आगामी काळात मोठया धोक्याला तोंड द्याव लागेल.नवीनतम हल्ल्याचा व्याप्तीमुळे इराणला त्याच्या, वेगानी विकसित होत असलेल्या, लांब पल्ल्याच्या स्ट्राइक सिस्टममध्ये सुधारणा करण्यासाठी, विस्तृत डेटा मिळाला असणार ही पण इस्रयलसाठी चिंतेची बाब आहे. एकी कडे इराण म्हणतो युद्ध नको,दुसरीकडे म्हणतो इस्रायलवर हल्ले करणारच. लेबनानमधील इस्रायली कारवायांपासून ते इस्रायलवरील इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांपर्यंत घटनेचा केंद्र बिंदू असलेल हे क्षेत्र,थेट संघर्षाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. याचे संभाव्य,दूरगामी परिणाम मध्य पूर्व आणि त्यापलीकडे होतील. आजमितीला, मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत अस्थिर व गंभीर आहे. त्याच्या उत्तर पूर्वेला, रशिया युक्रेन संघर्ष सुरू असून निर्णायक वळणावर पोचला आहे.शुक्रवार,०४ ऑक्टोबरच्या नमाजा नंतरच खोमेनीच उद्बोधन आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू याच्या वक्तव्यांनंतर जग, तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर आलेल दिसून पडत. 

हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार; इराणच्या सेमनान प्रांतातील अरादान आणि ११० किमी दूर तेहरानमधे,०५ ऑक्टोबर, २४ रात्री १०:४५ला, ४ दशांश ५ रिश्टर स्केल भूकंपाचे झटके बसले. त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त १० किमी खोल  होता. त्याच रात्री बाराच्या सुमारास, इस्रायलमधे कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूगर्भ/संरक्षण तज्ञांनुसार,हा भूकंप नसून इराणनी भूगर्भातील अणुचाचण्या केल्या असाव्यात.इराणचा अणु ऊर्जा प्रकल्प, आण्विक अस्त्र बनवण्याच्या अगदी नजदीक असल्यामुळे आणि इस्रायलच्या प्रती हल्ल्याच्या धमकीमुळे,हा खरा भूकंपीय धक्का होता की इराणच्या अणुचाचणीमुळे झाला यावर संशोधनात्मक मतभेद आहेत. साधारणत:,भूकंप केंद्र जमीनीच्या ३०-४० किमी आत/खोल असत.त्यामुळे, इराणच्या अणुचाचणीची अटकळ अधिक बळावली आहे.इराण जर खरच अण्वस्त्रधारी देश झाला असेल तर; सर्व संरक्षणतज्ञ व प्रसार माध्यमांमधे होत असलेल्या,संभाव्य तिसऱ्या महायुद्धा बद्दलच्या चर्चेला दुजोरा नक्कीच  मिळतो.

photo – google.

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

2 Comments
  1. Vijay Manohar Gore says

    लेखकाने इस्रायल युद्धावर संपूर्ण विश्लेषण करून सर्व बाजू मांडल्या आहेत उत्तम लेख आहे. सर्वांनी हा लेख जरूर वाचावा

  2. Gauri Shete says

    हे युद्ध किती भयानक होऊ शकतं याची कल्पना आपल्या लेखावरून येत आहे. खास करून भारतावर होणारा परिणाम फारच सावधानतेचा इशारा आहे.
    लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.