अखेर वधिला शिवरायांनी खासा अफजलखान.

0 866

अखेर वधिला शिवरायांनी खासा अफजलखान.

छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हे हिंदवी स्वराज्य वाढू लागले. पण हा मार्ग सहजसोपा नव्हता. दिल्लीचा मुघल बादशाह,विजापुरची आदीलशाही, समुद्रावर पोर्तुगिज आणि सिद्दी अशा जलचर राजवटी महाराष्ट्रावर जुलूम करत होत्या. त्यांचे बळ अफाट होते, त्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या काय सांगाव्यात? मंदिरे पाडली जात होती,स्त्रीयांची अब्रु सुरक्षित नव्हती,उघडपणे सण- उत्सव साजरे होऊ शकत नव्हते. शेतकरी आणि कष्टकर्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. सारा महाराष्ट्रच सुलतांनानी गिळला होता अशा परिस्थितीत शाहजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला होता. दुष्टांचा नाश करुन सज्जनांचे रक्षण करावे आणि रयतेला सुखी करावे यासाठी शिवरायांनी हे व्रत हाती घेतले होते. या पवित्र कार्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न होणारच होते. असा प्रयत्न अफजलखानाच्या रुपाने विजापुरच्या आदीलशाहीने केला,पण त्या कुटील प्रयत्नावर मात करुन शिवाजीमहाराजांनी अफजलखानाचा वध केला आणि आचंद्रसूर्य आपली कीर्ती स्थापित केली. आपल्या पराक्रमी पूर्वजांचा हा इतिहास आपल्याला निश्चितच प्रेरणादायी आहे.

विजापुरचा दरबार –

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भराभर आदीलशाहीचे किल्ले हस्तगत केले. किल्ला म्हणजे राहते ठाणे! त्याच्या आधारे आसपासच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सोपे जात असे. “ज्याचे किल्ले ,त्याचा प्रदेश” हे मध्ययुगातील समीकरणच होते. स्वराज्य स्थापन करायचे तर किल्ले हवेतच,त्यासाठी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांनी तोरणा,पुरंदर,कोंढाणा, मुरुंबदेव असे किल्ले ताब्यात घेतले. महाराजांच्या तुफानी धुमाकुळाच्या खबरा विजापुरात पोहचत होत्या. त्यामुळे विजापुरचा आदीलशाही दरबार काळजीत पडला होता. बादशाह अली आदीलशाहाची आई बडी साहेबीण उलीया बेगम जास्तच खवळली होती. विजापुरमध्ये आदीलशाहीचा दरबार भरला होता. तख्तापुढे तबकात विडे ठेवले होते. मोठमोठे सरदार उभे होते. बड्या साहेबिणीने दरबाराला खडा सवाल केला ” कौन है वह नारा ए तकदीर बुलंद करनेवाला मुजाहीद? सिवाजी भोसल्याने धामधुम माजवली आहे.आदीलशाही सल्तनत तो तबाह करत आहे,कोण आहे ,असा हिम्मतबहाद्दर ,जो सिवाजीला कैद करेल किंवा त्याची गर्दन मारेल?? सारा दरबार स्तब्ध झाला. भयाण शांतता पसरली. कोणीही तयार होत नव्हते,तेवढ्यात सरदारांतून पोलादी आणि धिप्पाड देहाचा आणि राकट चेहर्याचा अफजलखान पुढे आला आणि मोठ्याने गर्जना करुन म्हणाला “हूजूर , सिवा सिवा तो काय? हा बंदा अफजलशाही मोहम्मदशाही , बगावतखोर सिवाला हूजूरांच्या समोर पेश करेल ,जिवंत या मूर्दा!!”

सारा दरबार आनंदी झाला.अफजलखानाने शिवाजीमहाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला. सारा दरबार खुश झाला. एखाद्या मत्त हत्तीप्रमाणे अफजलखान हिंदवी स्वराज्य गिळायला निघाला.

कोण होता अफजलखान? –

अफजलखान राक्षसी वृत्तीचा होता.पण कर्तबगारही होता.एखादी कामगिरी हाती घेतली तर तो पूर्णच करत असे.त्याचा जन्म एका सामान्य परिवारात झाला ,त्याची आई भटारीण म्हणजे स्वयंपाकीण होती. पण अफजलखान त्याच्या पराक्रमाने मोठा झाला. तो स्वत:ला बुतशिकन आणि कुफ्रशिकन म्हणत असे.याचा अर्थ मुर्त्या तोडणारा आणि काफीरांची कत्तल करणारा !! त्याची दहशत एवढी होती की सिलोनचा सम्राटही त्याला घाबरत असे.एकदा त्याने औरंगजेबाही कैद केलेले होते. अफजलखान प्रचंड कपटी आणि क्रूर होता. कर्नाटकात शिरेपट्टण येथे कस्तुरीरंगन नावाचा राजा होता.त्याची लढाई अफजलखानाशी सुरु होती,तेव्हा अफजलखानाने त्याला विश्वासात घेऊन वाटाघाटीसाठी बोलावले आणि दगाबाजीने त्याचा खून केला. संबंध हिंदुस्थानभर अफजलखानाचा दरारा होता.असा हा अफजलखान स्वराज्य गिळायला निघाला होता. हे फार मोठे संकट होते.

अफजलखान प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला. त्याने पूर्वी मंदिरांनाही उपद्रव केला होता, आणि मंदिरे म्हणजे महाराजांची श्रध्दास्थाने होती. अफजलखानाची फौज अफाट होती. त्याच्याशी प्रत्यक्ष मैदानात लढणे शक्य नव्हते .शक्तीपेक्षा युक्तीच लढवावी असा विचार महाराजांनी केला.

प्रतापगडच्या पायथ्याशी –

निशुंभ राक्षसाप्रमाणे या अफजलखानाने भवानीमातेचा अपमान केला.रयतेला त्रास दिला,या दुष्टाचा नाश करण्याचा निश्चय महाराजांनी केला.महाराज प्रतापगडावर आले.प्रतापगड हा जावळीच्या खोर्यातील बेलाग किल्ला! किल्ल्याभोवती घनदाट अरण्य होते.संबंध मावळात इतका दुर्गम आणि बिकट किल्ला दुसरा नव्हता!!

महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व बोलणीस तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले होते ,पण महाराजांनी त्याला नकार दिला कारण खानाचा कपटी स्वभाव महाराजांना माहित होता. अखेर महाराज आणि अफजलखानाची भेट ठरली.अफजलखानाने आपले सैन्य छावणीत ठेवावे.आपल्याबरोबर दोन-तीन सेवक ठेवावेत. दहा शूर अंगरक्षक आपल्या रक्षणासाठी आणावे त्याचप्रमाणे शिवाजीमहाराजांनीही दहा अंगरक्षक सोबत आणावेत आणि बाणाच्या एका टप्प्यावर मागे ठेवावेत,असे ठरले.

अफजलखानाचा वध –

भेटीचा दिवस ठरला!! दि.10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराज आणि अफजलखानाची भेट ठरली. अफजलखानाची भेट म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण पण महाराज निर्भय होते.सगळी लष्करी योजना तयार होती.सगळेजण आपापले काम चोख पार पाडत होते.

महाराजांनी आपल्यासोबत दहा जणांची निवड केली. संभाजी कावजी कोंढाळकर,जिवाजी महाले,सिद्दी इब्राहीम,काताजी इंगळे,विसाजी मुरुंबक,संभाजी करवर,कोंडाजी कंक,येसाजी कंक,कृष्णाजी गायकवाड,सूरजी काटके हे दहाजण म्हणजे महाराजांच अभेद्य चिलखतच होते.

अफजलखान वेळेआधीच शामियान्यात आला होता.महाराजांनी जाणूनबूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. खानाकडून घातपाताची शक्यता होतीच त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले होते. शिवराय खानासमोर आले.म्हणाला “आओ,सिवाजी आवो,इतना क्यो डरते हो हमसे?

महाराज म्हणाले “खानसाहेब,भ्यावे तो काय तुम्हास भ्यावे? भ्यावे तो रघुनाथास भ्यावे!!खानसाहेब ज्याची करणी त्याला!!

 खानाने महाराजांना अलिंगन दिले.मृत्यूचेच आलिंगन ते! पण मृत्यू कोणाचा? हे काळच ठरवणार होता. अफजलखानाने महाराजांची मान आपल्या काखेत दाबली आणि दात ओठ खाऊन कट्यारीचा वार केला. परंतु चिलखत असल्याने महाराज वाचले. खानाने दगा केलेला पाहून त्यांनी खानाच्या पोटात बिचवा खूपसून त्याची आतडी बाहेर काढली.खानाने “दगा!! दगा!! दगा” म्हणूत आरोळी ठोकली.महाराजांवर चालुन जाणार्या बडा सय्यद याला जिवाजी महाले यांनी ठार केले.तुंबळ युध्द सुरु झाले. देव-धर्मद्वेष्टा अफजलखानाचा महाराजांनी वध केला. अफजलखानाचे दहाही अंगरक्षक ठार झाले. महाराज आणि त्यांचे हशम गडावर निघुन गेले.ग

डावरुन तोफांचे आवाज झाले.खानाची फौज गाफील होती.तोफांची इशारत होताच मराठ्यांचे सैन्य आदीलशाही सैन्यावर तुटून पडले.प्रचंड रणकंदन झाले. अफजलखानाच्या फौजेचा साफ धुव्वा उडाला. महाराज विजयी झाले.

आदिलशाहीसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचे हजारो सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. महाराजांनी शरणागतांवर अत्याचार केले नाहीत.जखमींची योग्य ती शुश्रुषा केली कोणत्याही युध्दबंदी स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत, ही महाराजांची संस्कृती आणि संस्कार होते.

पुढील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी स्वराज्याचा भगवा फडकवला.

महाराज विजयी झाले. बलाढ्य अफजलखानाचा त्यांनी वध केला,या घटनेने त्यांची हिंदुस्थानभर कीर्ती झाली. सह्याद्रीच्या दर्या-खोर्यातून महाराजांचे पवाडे घुमू लागले.

-रवींद्र गणेश सासमकर.

राज्यपालनियुक्त सिनेट सदस्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.

विशेष निमंत्रित सदस्य -छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने आणि प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.

लेखक सामाजिक आणि इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत. संदर्भासाहित लेखाची मांडणी करण्यात लेखकाचा हातखंड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.