रशियन हेवी बॉम्बर खरेदीचा अर्थ काय ?

0

रशियन हेवी बॉम्बर खरेदीचा अर्थ काय ?

 

अमेरिकेच बी २ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर हे जगातील सर्वात शक्तिशाली,अवजड बॉम्बर विमान असून,रशियन टीयू १६० एम हे, दुसऱ्या क्रमांकाच शक्तिशाली बॉम्बर आहे. भारतीय प्रसार माध्यमांनुसार; रशियानी भारताला आण्विक अस्त्र क्षमतेच लांब पल्ल्याच, घातक व अवजड (हेवी) बॉम्बर विमान देऊ केल आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण वर्तुळात देखील,रशिया भारताला प्रगत, टीयू १६० एम बॉम्बर, व्हाइट स्वान (नाटो नामाभिदान ब्लॅक स्वान), देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.ही खरेदी झाल्यास,सूत्रांनुसार,भारतीय वायुसेना यावर विचार करते आहे.या हेवी बॉम्बर विमानामुळे  भारतीय वायुसेनेच्या कार्यपद्धतीत मोठे धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष व्हालिदिमिर पुतीन; २२/२४ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान, कझान, रशियात झालेल्या १७व्या ब्रिक्स समिटच्या वेळी भेटलेत. त्यावेळी रशियानी भारताला; व्हाईट स्वान बॉम्बर विमान देण्याची तयारी दर्शवली.त्याच बरोबर रशिया भारताला, सुकॉय ३० एमकेआय विमानांतील  सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी लागणाऱ्या  महत्त्वपूर्ण धातू व भागांचा पुरवठा करण्याचही मान्य केल. या आधी रशियानी सन २००० मधे भारतीय नौसेनेला, टीयू २३ एम ३ बॉम्बर विमान देण्याचा प्रस्ताव, आर्थिक मुद्यावर फिस्कटला होता.  टीयू १६० एम हे हेवी बॉम्बर विमान, सध्या युक्रेन युद्धात वापरात असलेल्या टीयू १६० स्ट्रॅटेजिक बॉम्बरची सुधारित आवृत्ती (अपग्रेडेड व्हर्शन) आहे.रशियन संरक्षण विश्लेषकांच्या मते, व्हाईट स्वान विमानातील सुधारित   एव्हीऑनिक्स, नेव्हिगेशन सिस्टम आणि शस्त्रास्त्रांमुळे ही विमान, मूळ टीयू १६० मॉडेलपेक्षा ६० % अधिक प्रभावशाली झाली आहेत. १८ नोव्हेंबर,२४ला रशियानी पहिल्यांदा सहा टीयू १६० एम बॉम्बर्सद्वारे ८० केएच ४७ किंझल आणि केएच १०१ क्रुझ क्षेपणास्त्र टाकून युक्रेनच्या पावर ग्रीडच अपरिमित नुकसान केल्याची बातमी समोर आली आहे.

१९७० मधे  सोव्हिएत युनियनच्या तुपोलेव्ह डिझाइन ब्युरोनी डिझाइन केलेली टीयू सिरीजची विमान; सुपरसॉनिक, व्हेरिएबल स्वीप विंग असलेली, हेवी, स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आहेत.या विमानानी १९८१मधे पहिल्यांदा उड्डाण केल होत.कालांतरानंतर २०१६ पर्यंत रशियन हवाई दलाच्या लाँग रेंज एव्हिएशन शाखेत, १६ टीयू १६० एम प्रतीची विमान दाखल झाली.२०३५ पर्यंत. रशियाकडे ६६ टीयू १६० एम बॉम्बर्स असतील. हे एक विमान कार्यरत करण्यासाठी, एक मुख्य वैमानिक, एक सह वैमानिक,एक  बम्बार्डियर आणि एक संरक्षण यंत्रणा अधिकारी असे चार लोक लागतात. हे विमान १७७.६ फूट लांब असून,त्याच्या पंखांचा विस्तार (विंग स्पॅन) १८२.९ फूट व उंची ४३ फूट आहे.विमानाच केवळ वजन (एम्प्टी वेट) ११,००,०० किलोग्रॅम आहे. ४०,२०० फूट उंचीवर या विमानाची  जास्तीत जास्त गती २,२२० किमी/तास असली तरी, सामान्यतः ते, ९६० किमी/तास वेगानी जास्तीत जास्त १२,३०० किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकत. एका विमानात ४५,००० किलो वजनाचे  बॉम्ब नेता येतात. प्रत्येक विमानात दोन प्रक्षेपक (रोटरी लाँचर) असतात आणि प्रत्येक प्रक्षेपकात,सहा क्रूझ क्षेपणास्त्र (एकूण बारा) किंवा १२ किक बॅक, शॉर्ट रेंज आण्विक क्षेपणास्त्र (एकूण चोवीस) नेण्या/ सोडण्याची क्षमता आहे.

ट्यूपोलेव्ह टीयू १६० एम या, रशियन  रणनीतिक क्षेपणास्त्र वाहक सुपरसॉनिक बॉम्बरच्या जलद गतीमुळे ते अत्यंत वेगानी सामरिक हालचाल (फास्ट एयर मॅन्युव्हर्स) करू शकत.त्याच्या व्हेरिएबल स्वीप विंग्स, उड्डाण दरम्यान आपला आकार व कोन बदलू शकत असल्यामुळे, विमानाची गती व हवेतील उंची  मोहिमेनुसार कमी वा जास्त करता येते.विमानाच्या चार ​​एनके ३२०२ आफ्टर बर्नर टर्बोफॅन इंजिनासाठी अल्प देखरेख/देखभाल पुरेशी असते.रशियन संरक्षण विश्लेषकांनुसार, जगातील सर्वात वेगवान उड्डाण करणार हे,सर्वात मोठ/जास्त वजनवाहू  सुपरसॉनिक बॉम्बर, दुर्गम भागातील लक्ष्यांवर देखील मारा करू शकत. नाविन्यपूर्ण नेव्हिगेशन सिस्टीम, अपग्रेडेड रडार आणि मिड फ्लाइट रिफ्युएलिंग प्रोब यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे हे विमान,उच्च श्रेणी/प्रतीत येत.

 आण्विक  क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या टीयू १६० एम विमानामुळे भारताला,​​फार मोठा धोरणात्मक फायदा होईल.भारतीय वायुसेनेत हे बॉम्बर आल्यास तीच्या लांब पल्ल्याच्या मारक  क्षमतेत (लाँग रेंज स्ट्राइक कॅपेबिलिटी) लक्षणीय वाढ होऊन,हिंद महासागर आणि संपूर्ण इंडो पॅसिफिक क्षेत्रात एक मजबूत हवाई प्रतिबंध (स्ट्राँग एयर डेटरन्स) उपलब्ध होईल. या विमानाची,दूरवर आण्विक क्षेपणास्त्र नेण्याची क्षमता, भारताच्या अण्वस्त्र त्रिकूटाला (न्युक्लिअर ट्रायाड) मजबूत तर करेलच पण त्याच्या विद्यमान जमीन आणि समुद्र आधारित आण्विक शक्तींना पूरक ठरेल. संरक्षणसूत्रांनुसार; शनिवार,१६ नोव्हेंबर २४ला भारतानी, १५०० किलोमिटर पल्ल्याच्या,पाच किलोमीटर/सेकंद वेगानी प्रवास करत, विविध वजनाची शस्त्र घेऊन जाणाऱ्या, हायपर सॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. जर ही क्षेपणास्त्र, टी यू १६० एम बॉम्बर्सवर बसवण्यात आलीत तर भारतीय वायुसेनेच्या मारक क्षमतेत किती वाढ/वृध्दी होईल याची केवळ कल्पनाही रोमांचक आहे. डिफेन्स इन या आंतरराष्ट्रीय सूत्रांनुसार, एक टीयू १६० एम विमानाची किंमत १६३० लाख अमेरिकन डॉलर्स आहे. टीयू १६० एम विमान भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सामील करण्यासाठी, पायाभूत सुविधा सुधारणा, वैमानिक आणि चालक दलासाठी विशेष प्रशिक्षण यांच प्रावधान कराव लागेल.डिफेन्स इनच्या सूत्रांनुसार; टीयू १६० एमसारख्या अवजड बॉम्बर्सच्या ताफ्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित विमान कोठार (फोर्टिफाइड हँगर्स) आणि ५५००/६००० मीटर्सची विस्तारित  धावपट्टी, वैमानिक/ चालक दलासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, उच्च संपादन, रोजमर्याचा सामरिक रखरखाव व उड्डाण खर्च,संसाधनीय बदल आणि सामरिक आवश्यकतेसाठी एअरबेस बदल, यासारख्या पायाभूत सुविधा बदलांसाठी प्रचंड भरीव गुंतवणुक करावी लागेल. आजमितीला भारतीय वायुसेनेत पारंपारिक हेवी बॉम्बर्स ऐवजी, मिराज २०००, सुकॉय ३०, रॅफेल, मिग २९, जग्वार सारखी बहुमुखी, लढाऊ, फायटर बॉम्बर विमान कार्यरत आहेत.या पैकी फक्त सुकॉय विमान ब्रह्मोस अण्वस्त्र नेऊ शकतात.पण यांना अचूक क्षेपणास्त्र मारा करण्यासाठी, लक्ष्याच्या किमान तीन किलोमीटर जवळ  याव लागत. उड्डाण भरण्यासाठी यांना २००० ते २५०० मिटर लहान धावपट्टी देखील पुरेशी असते. त्यामुळे, भारतीय वायुसेनेसाठी ही टीयू १६० एम विमान खरेदी; तीच्यापाशी असलेल्या फायटर बॉम्बर्सची संभाव्य श्रेणी आणि आण्विक हल्ल्याची विस्तारित क्षमता  यावर अवलंबून असेल.

   भारताच ब्रह्मोस एरोस्पेस आणि डीआरडीओ, आपल्या ब्रह्मोस ए, एअर लाँच्ड क्रूझ मिसाईलची क्षमता ८०० किलोमीटरपर्यंत वाढवून त्याला, जगातील सर्वात प्रभावशाली, अचूक स्ट्राइक शस्त्र बनवण्याच्या मार्गावर आहे.आजमितीला ४५० किलोमीटर पल्ला असलेल ब्रह्मोस ए,४० सुकॉय ३० एमके वन लढाऊ विमानांवर तैनात आहे. आणखी २० सुकॉय ३० विमान, ब्रह्मोस नेण्यासाठी सुधारित होताहेत. ब्रह्मोस ए, आपली सुपरसॉनिक गती,प्रगत नेव्हिगेशन सिस्टीम आणि अचूकतेमुळे, शत्रूची नौसेना जहाज आणि सामरिक संसाधनांसारख्या उच्च मूल्य लक्ष्य विरोधी एक शक्तिशाली शस्त्र आहे. टीयू १६० एम बॉम्बर्सवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र बसविल्यानंतर,ते क्षेपणास्त्र आणि  वायुसेनेची मारक क्षमता प्रचंड वाढेल. पण त्यासाठी मिसाईल बसविल्यानंतर, विमानाच्या  चाचण्या कराव्या लागतील. त्यात; विविध परिस्थितींमधे  क्षेपणास्त्र चाचणी, प्रणोदन कार्यक्षमता मूल्यांकन आणि विस्तारित अंतरावरील लक्ष्यीकरण प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हतेची पुष्टी सामील असतील. वेग, श्रेणी आणि अचूकता यांच संयोजन असलेल टीयू १६० एम बॉम्बर,एक शक्तिशाली प्रतिबंधक बनून,संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी वायुसेनेला वृद्धिंगत सामरिक लवचिकता प्रदान करेल.भारताचे  धोरणात्मक सिद्धांत आणि दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्तीसाठी  वायुसेनेच्या  विकसित होत असलेल्या गरजा, टीयू १६० एम हेवी बॉम्बर विमान पूर्ण करू शकेल का हे या विश्लेषणानंतरच निश्चित केल्या जाईल.

भारताच्या उत्तर व पश्चिम सीमेला,चीन व पाकिस्तानकडून एकाच वेळी दोन जमीनी आणि सागरी आक्रमणाचा धोका आहे. तिबेटमधे तैनात पीएलए स्थलसेना आणि पीओके, पंजाब व सिंधमधे तैनात पाक स्थलसेना तसच पाकिस्तानच ग्वादार, श्रीलंकेच हंबनटोटा आणि म्यानमारच्या कोको बेटावर तैनात पीएलए नौसेनेशी होणाऱ्या दोन आघाडींवरील युद्धात (टू फ्रंट वॉर) या  विमानाच महत्व खूप मोठ असेल. जमीन व समुद्र अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी चीन व पाकिस्तानशी संघर्ष  झाला तर भारताला आपल्या लष्करी शक्तीच नियोजित विभाजन करावच लागेल. टीयू १६० एम विमान, या परिस्थितीत सामरिक फायद्याच साबित होईल कारण, हे विमान पाकिस्तान आणि चीनचे बिनीचे हवाई तळ,युद्धनौका आणि समुद्रात गस्त घालणाऱ्या विमानवाहू जहाजांवर आपल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करेल.टीयू १६० एम विमानात,हवेतून प्रक्षेपित होणारी १२ ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी योग्य त्या सुधारणा केल्यावर हे विमान,सुरक्षित अंतरावरून, शत्रूच्या सर्फेस टू एयर मिसाईल (सॅम) साइट ध्वस्त करू शकत. शत्रूच्या विस्कळीत व फैललेल्या (टँगल्ड अँड डिस्पर्सड) एयर डिफेन्स सिस्टिममुळे, या बॉम्बर्सना सहज रित्या शत्रू प्रदेशात खूप आत/खोलवर जाता येईल/येत. चीन किंवा पाकिस्तानकडे रशियन एस ४००, इस्रायली आयर्न डोम किंवा अमेरिकन थाड सारखी प्रगत एयर डिफेन्स सिस्टिम नसल्यामुळे टीयू १६० एम, भारतीय शत्रूंच्या हवाई क्षेत्रात जाऊन,सहज रित्या बालाकोटपेक्षा  जास्त खोल जाऊन, दंडात्मक मारा (पनिशिव स्ट्राइक) करू शकत.

चीन व भारताच्या  लडाख आणि तिबेट क्षेत्रात तेथील  पहाड/ डोंगरांमुळे, फायटर विमानांच्या प्रभावी हवाई माऱ्याला,  सरळ दृष्टी समस्येमुळे (प्रॉब्लेम ऑफ डायरेक्ट लाइन ऑफ साइट) मोठ्या मर्यादा पडू शकतात/पडतात. टीयू १६० एम बॉम्बर, त्याची उंच उड्डाण क्षमता आणि दूरवरून बॉम्ब टाकण्याच्या प्रक्रियेमुळे (डिस्टन्स रिलिझ मेकॅनिसम), चीनी/ पाकिस्तानी एयर डिफेन्स सिस्टिमला निष्प्रभ करू शकतात. हिंद महासागर क्षेत्रातदेखील या विमानांची  उपयुक्तता उजागर होते.आशिया पॅसिफिक मधील आधुनिक धोक्याच्या वातावरणात, टीयू १६० एम बॉम्बर, भारतीय नौसेनेच्या युद्धनौकेला होणाऱ्या संभाव्य जोखमीच्या तुलनेत,शत्रू  नौदलावर अचूक मारा करू शकेल/शकत. उलटपक्षी; युद्धात भारतीय युद्ध नौकांचा शस्त्रसंभार संपल्यावर तो पुन्हा भरण्यासाठी त्या युद्धनौकांना शस्त्र आपूर्ती साठी परत किनाऱ्यावर परत याव लागेल. या आपूर्तीसाठी, युद्धनौकेच्या किनाऱ्या पासूनच्या अंतरानुसार, काही दिवस किंवा आठवडे पण  लागू शकतात. उलटपक्षी; सुपरसॉनिक वेगानी उड्डाण करणार टीयू १६० एम बॉम्बर, काही तासांत हिंद महासागर प्रदेशात कोणत्याही ठिकाणी पोचू शकत आणि एकाच उड्डाण वारीमधे (सॉर्टी) १२/२४  विनाशकारी वॉर हेड्स तैनात करू शकत.त्यासाठी हे विमान; शस्त्रास्त्रांचा भार संपल्यावर काही तासांतच ती कमतरता सहजपणे भरून काढून नौसेनेच्या युद्धनौकांपेक्षा कितीतरी अधिक वेगानी दुसरी लढाऊ वारी करू शकत.

   भारताच्या संरक्षणासाठी होणाऱ्या अत्यल्प आर्थिक आवंटणामुळे जिथे भारतीय वायुसेनेच्या अत्यावक्षक लढाऊ विमानांची मूलभूत गरज देखील पूर्ण होऊ शकत नाही तिथे, टीयू १६० एम  स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स सारखी “सो कॉल्ड लक्झरी” पूर्ण होण्याच्या संभावना नगण्य आहेत.काही संरक्षणतज्ञांनुसार, ब्रह्मोस क्षेपणास्त्रधारी  सुकॉय ३० विमान सामरिक बॉम्बरच काम करू शकतात/करताहेत.मग, अडीच तीन सुकॉय विमानांच्या किमतीच एक टीयू १६० एम हेवी बॉम्बर घेण म्हणजे “इकॉनॉमिक हाराकिरी” असेल/ आहे. पण सुकॉय ३० विमान,एका वेळी फक्त एकच ब्रह्मोस क्षेपणास्त्र नेत असल्यामुळे, जर काही कारणास्तव त्यांनी   डागलेल क्षेपणास्त्र, आपल्या लक्ष्यावर मारा करण्यात अयशस्वी झाल/ठरल तर, संपूर्ण मोहीम अयशस्वी होईल/होऊ शकते. शिवाय; ब्रह्मोस सारख्या अवजड शस्त्रामुळे,सुकॉय ३० विमानाच्या सामरिक उड्डाण वैशिष्ट्यांवर (ऑपरेशनल मॅन्युव्हरेबिलिटी) गंभीर परिणाम होतो.शत्रू विमानांनी आक्रमणास प्रत्युत्तर दिल्यास, सामरिक  हालचालींद्वारे, हवेतून हवेत किंवा हवेतून जमीनीवरील लक्ष्यावर क्षेपणास्त्र डागण विमानांसाठी अवघड असत/बनू शकत. जरी, क्षेपणास्त्रानी त्याच इच्छित लक्ष्य गाठल तरी, वायुसेनेतील सुकॉय स्क्वॉड्रनांची संख्या आणि प्रती स्क्वॉड्रन ७० टक्के उपलब्धता लक्षात घेता,त्याची १०/१२ विमान एका वेळी  तेवढीच ब्रह्मोस क्षेपणास्त्र,२००/३०० किलोमिटर दूरवर नेऊ शकतील. पण, एक टीयू १६० एम  बॉम्बर, एका वेळी १२ ब्रह्मोस क्षेपणास्त्र/२४ लहान अण्वस्त्र,१२,००० किलोमीटर नेऊ शकत असल्यामुळे, वायुसेनेच्या अग्निशक्तीत (फायर पॉवर) लक्षणीय, प्रभावी वृद्धी होईल. या स्ट्रॅटेजिक बॉम्बरला आकाशातील विमानवाहू युद्धनौका म्हटल तर ते वावग ठरणार नाही.

१९९२मधे सोव्हिएत युनियन विघटित होण्याच्या काळात तो, जवळपास दिवाळखोर झाला असल्यामुळे त्याला  पैसा हवा होता.युनियनपासून विघटित झालेल्या देशांमधील जवळपास ३४० टीयू २२ एम बॉम्बर्स पैकी काही, भारताला बऱ्याच कमी किमतीत मिळू शकले असते.पण, बोफोर्स घोटाळा प्रकरणाचा धसका घेतलेल्या तत्कालीन सरकारनी ती संधी गमावली. मात्र याच संधीचा फायदा घेऊन चीननी मोठ्या प्रमाणात टीयू २२ ब्लॅकजॅक बॉम्बर्स रशियाकडून खरेदी केलेत आणि रिव्हर्स इंजिनियरिंगच्या माध्यमातून त्याच ब्लूप्रिंट डिझाइन तयार करून देशांतर्गत सुधारित विमान उत्पादन सुरू केल. भारतानी त्यावेळी गमावलेल्या या सामरिक संधीची किंमत त्या वेळी उजागर होईल जेंव्हा, चीन आपल्या विमानवाहू जहाजांच्या माध्यमातून हिंद महासागर क्षेत्रात आपली पोझिशन बळकट करेल. आज चीनकडे तीन विमानवाहू जहाज आहेत व आणखी सात विविध स्तरांवर निर्माणाधीन आहेत. ही सर्व कार्यरत होतील त्यावेळी भारताला अवजड, रणनीतिक बॉम्बर्सची गरज भासेल.टीयू १६० एम स्ट्रॅटेजिक बॉम्बर, लांब पल्ल्याच्या सॅम प्रक्षेपणास्त्र प्रणालीला जॅम करू शकतात. हे विमान, लांब पल्ल्याच्या ब्रह्मोस आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह पश्चिम चीन,पूर्व चीन समुद्र आणि पश्चिम पॅसिफिकमधून पूर्व चीनमधील लक्ष्यांवर हल्ला करू शकत. स्ट्रॅटेजिक बॉम्बर ही भारतासाठी महत्त्वाची गरज आहे. भारतानी; सहा बॉम्बर्स पाकिस्तान  आणि बारा चीन विरुद्ध तैनातीसाठी घेतले पाहिजे.या बॉम्बर्सच्या गतिशीलतेमुळे ते;कच्छ,गुजराथ,पंजाब,राजस्थान व, काश्मिर खोर आणि लखनौ,गोरखपूर, तेजपूर, गौहाटी, हाशिमारासारख्या ठिकाणांपैकी कुठेही  तैनात होऊन, पश्चिम व उत्तर सीमापारची लक्ष्य आणि अंदमान, गोवा,केरळ, तामीळनाडू, ओरिसा व पश्चिम बंगाल पैकी कुठेही तैनात होऊन, मलाक्का सामुद्रधुनीपासून ग्वादारपर्यंत समुद्रातील कुठल्याही लक्ष्याला ध्वस्त करू शकतात.

  आजमितीला;भारताला अभिप्रेत असलेल्या मिशन ओरिएंटेड हवाई हल्ल्यांसाठी टीयू १६० एमसारख्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सची निकड  नसल्यामुळे त्याऐवजी वायुसेनेला अत्यावश्यक असणारे लढाऊ विमान स्क्वाड्रन, टँकर विमान, ॲवॉक्स आणि एमएमआरसीए सारख्या  मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण आवश्यक आहे अस,काही संरक्षण तज्ञांच मत आहे. मात्र या ला भारतीय वायुसेनेत दाखल करायच की नाही हे; वायुसेनेचे सामरिक सिद्धांत (ऑपरेशनल रोल) आणि धोरणात्मक उद्दिष्टांवर अवलंबून आहे.या शिवाय; संसाधनात्मक बदल,विमान आणि विमानतळाचा सामरिक  रखरखाव आणि उड्डाण खर्च, लॉजिस्टिक्स, देखभालीच्या मागण्या आणि विमान खरेदीचा, सध्याच्या फोर्स स्ट्रक्चरवर होणारा परिणाम,याच संपूर्ण  संरेखन आणि काळजीपूर्वक मूल्यांकन केल्या/ झाल्यावरच याच्या खरेदीला मान्यता दिली जाईल. मुख्य म्हणजे हा ताफा वायुसेनेत समाविष्ठ करतांना; टीयू १६० एम विमानाची सामरिक क्षमता, राष्ट्रीय व वायुसेनेच्या संरक्षण धोरणासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण संसाधनांना पूरक आहे की नाही याच मूल्यांकन होण अत्यावश्यक असेल. (Photo – Google)

१९/११/२४:१६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com. 

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Leave A Reply

Your email address will not be published.