डॉ.अनिल काकोडकर.
अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर, १९४३ रोजी मध्यप्रदेशातील बडवाणी येथे जन्म झाला. त्यासुमारास गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतल्याने त्यांचे वडील श्री.पुरुषोत्तम काकोडकर हे पोर्तुगालमधील लिस्बनच्या तुरुंगात दहा वर्षे असल्याने काकोडकरांच्या आईने त्यांचे सर्व पालन-पोषण केले. ते काकोडकरांच्या आईने चालवलेल्या बालवाडीत आणि नंतर बडवाणीच्या शाळेत हिंदी माध्यमातून शिकले आणि अकरावी उत्तीर्ण झाल्यावर ते मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात दोन वर्षे शिकले. त्यानंतर ते व्हि.जे.टी.आय.मध्ये शिकून बी.ई.(मेकॅनिकल) झाले. त्यानंतर ते भाभा अणुशक्ती केंद्रात नोकरीला लागले. तिथे सुरुवातीला एक वर्षाचे ट्रेनिंग असते. त्या ट्रेनिंग स्कूलच्या परीक्षेत त्यांनी मिळवलेले गुण एवढे जास्त होते की पुढे अनेक वर्षे इतर कोणाला तेवढे गुण मिळवता आले नव्हते. काकोडकरांना १९६८ साली एक वर्षासाठी बीएआरसीने नॉटिंगहॅम विद्यापीठात पाठवले होते व तेथे त्यांनी एक्सपेरिमेंटल स्ट्रेस अॅनॅलिसिस या विषयात एमएस्सी केले. जी कामे इतरांना सहजी जमत नसत अशी कामे बीएआरसीत त्यांना करायला मिळाली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. यात राजस्तानातील कोटा येथील आणि तामिळनाडूतील कल्पकम येथील बिघडलेले २०० मेगॅवॉट क्षमतेच्या दोन अणु भट्ट्या त्यांनी मोठी जोखीम घेऊन दुरुस्त केल्या आणि देशाचे कोट्यावधी रुपये वाचवले. संशोधनाला वाहिलेल्या धृव अणुभट्टीचे डिझाईन आणि त्याची उभारणी त्यांनी पुरी केली. ५०० मेगॅवॉट हेवी वॉटर रिअॅक्टरच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. व्यापारी तत्त्वावरच्या पहिल्या ब्रीडर रिअॅक्टरच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, रिअॅक्टिव्ह मटेरीअल
फॅब्रिकेशन, वेगवेगळ्या धातूंची वेल्डिंगने सांधे जुळणी करता येईल अशा नव्या तंत्रज्ञानाचा विकास त्यांनी केला. शेतीत अधिक उत्पादन देणारी भुईमूग, उडीद अशी नवी बियाणे त्यांच्या प्रोत्साहनाने विकसित झाली. अन्न टिकवण्याच्या प्रक्रियेचा विकास झाला. नाशिकजवळील लासलगावला कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, पण कांदा लवकर खराब होतो. तो अधिक काळ टिकावा यासाठी गॅमा रे रेडिएशनची प्रक्रिया केली जाते. याच पद्धतीनी डाळ-तांदूळाला पोरकिडे लागतात त्यासाठीही ही प्रक्रिया केली जाते. कल्पकमला खा-या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याचा प्रकल्प त्यांनी सुरु करून दिला. बीएआरसीत काम करणा-या हजारो लोकांचे जेवण दुपारी तेथे होते तर होस्टेलमध्ये राहाणा-या मुलांचे रात्रीचेही जेवण तेथे होते. या सर्वांमधून वाया जाणारे अन्न कच-यात फेकून दिले जात असे. त्यामुळे मुंग्या, किडे यांचा प्रादुर्भाव, घाण वास आणि कुत्र्यांचा सुळसुळाट झाला होता. मग त्यावर उपाय म्हणून त्या अन्नाचा उपयोग करून त्यावर मिथेन गॅस बनवून त्याचा उपयोग इंधन म्हणून करणे सुरु झाले. माथेरानसारख्या ठिकाणी झाडांच्या पानांचा खच पडतो. त्याचा उपयोग करूनही मिथेन गॅसचे निर्मिती व पुढे त्यावर विजेचे उत्पादन सुरु झाले. ही वीज माथेरानमधील रस्त्यांवरच्या सर्व दिव्यांना वीज पुरते. या संपूर्ण प्रकल्पाला, ‘निसर्गऋण’ असे नाव दिले, कारण निसर्गाकडून मिळालेल्या संपत्तीची परतफेड निसर्गाला केली. या निसर्गऋण प्रकल्पाचा उपयोग भारतात अनेक ठिकाणी केला जात आहे. अशा अनेक यशस्वी कामांमुळे बीएआरसीत काकोडकर हळूहळू वर वर चढत गेले आणि १९९६ साली बीएआरसीचे संचालक झाले. चार वर्षानंतर इ.स.२००० साली ते अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या अणुशक्ती खात्याचे सचिव झाले. या दोन्ही पदांवर ते २००९ सालापर्यंत होते. १९७४ आणि १९९८ या दोन वर्षी भारताने राजस्तानातील पोखरण येथे अणूचाचण्या घेतल्या. त्या दोन्हीत काकोडकरांचा मोठा वाटा होता. त्यामुळे अमेरिकेने भारतावर बरेच निर्बंध घातले होते, पण त्यातून त्यांनी बीएआरसीला तर तारलेच, पण भारत अमेरिका यांच्यात झालेल्या १-२-३ करारात त्यांनी पंतप्रधानांबरोबर अमेरिकेस जाऊन अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर बोलणी करून त्यात यश मिळवले. एक वेळेस भारताच्या अणू ऊर्जेच्या सर्व केंद्रांची तपासणी अमेरिका करेल अशी जाचक अट अमेरिका घालत असताना तिथल्या तिथे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत ही अट भारतास जाचक आहे असे उत्तर त्यांनी पंतप्रधान मन मोहन सिंग यांना सुचवले आणि पंतप्रधानांनी ती सूचना फेटाळली. निवृत्तीनंतर काकोडकरांच्या उद्योगप्रवणतेचा आणि तज्ज्ञतेचा उपयोग आपापल्या संस्थांना व्हावा या अपेक्षांनी त्यांना अनेक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांची आमंत्रणे आली आणि आज निवृत्तीनंतर १५ वर्षे उलटली तरी त्याचा ओघ कमी झाला नाही. निवृत्तीनंतर काकोडकरांना महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष बनवले. या आयोगान्वये अनेक ठिकाणी संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्रे उघडली जातात. ती सोलापूर, पंढरपूर, वारणानगर, लातूर, गोंदिया येथे सुरु झाली. नॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने असे प्रकल्प हाती घेतले जातात. भारत सरकारने नेमलेल्या टेक्निकल इन्फर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट (टायफॅक) या ग्रुपचे २०१४ ते २०३४ या काळासाठी काकोडकर अध्यक्ष आहेत. पुढील २० वर्षात भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्या समस्या भेडसावणार आहेत आणि त्या कशा सोडवता येतील या संबंधी काम करणारा हा गट आहे. या गटात भारतातील अनेक विषयातील तज्ञांनी भाग घेऊन अहवाल बनवला आहे. त्या अहवालाचे मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. काकोडकर मुंबई आयआयटीचे काही वर्षे अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषदेचे बरीच वर्षे विश्वस्त होते. कोकणातील जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुवीज प्रकल्पाला गावक-यांनी केलेला विरोध कसा योग्य नाही हे समजावून सांगण्यासाठी कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात काकोडकरांनी दिलेल्या भाषणांची संख्या कमीतकमी शंभर तरी असणार. बीएआरसी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च उर्फ टीआयएफआरमधून निवृत्त झालेल्या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून मुंबई विद्यापीठात ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन सायन्स’ सुरु करण्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवला. तसेच भुवनेश्वरला नायसर नावाची संस्था याच कारणासाठी सुरु करवून घेतली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथेही बीएआरसीला उपयोगी पडेल असे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी संदर्भातील अभ्यासक्रम सुरु करवून घेतला. या पद्धतीने उच्च शिक्षणाकडे त्यांनी पुरेपूर लक्ष पुरवले. निवृत्तीनंतर काकोडकरांनी ‘सिलेज’ या नावाची एक नवीन कल्पना काढली. याचे उद्देश दोन – १) शहरात होणारी गर्दी टाळणे. २) खेड्यात नोकरीच्याआणि व्यवसायाच्या नसलेल्या संधी व शहरासारख्या अन्य सुखसोयी पुरवणे. या संदर्भातील ही कल्पना असून जर आपण खेडी या दृष्टीने समृद्ध केली तर लोक खेडी सोडून शहराकडे धावणार नाहीत व शहरातील झोपडपट्टीत राहून दुय्यम जिणे जगणार नाहीत. या कल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी असंख्य भाषणे दिली. गडचिरोलीच्या गोंडवन विद्यापीठात यासंबंधी रचनाबद्ध काम चालू आहे. काकोडकरांना आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना १९९८ साली पद्मश्री, १९९९ साली पद्मभूषण आणि २००९ साली पद्मविभूषण हे सन्मान लाभले. त्याशिवाय गोवाभूषण आणि महाराष्ट्रभूषण हे सन्मान लाभले. शिवाय विक्रम साराभाई पुरस्कार, मटेरीअल सायन्सचा पुरस्कार, एच.के.फिरोदिया पुरस्कार, नाफेनचा जीवनगौरव पुरस्कार, इंडियन सायन्स कॉंग्रेसचा होमी भाभा स्मृती पुरस्कार, श्रीराम सायंटिफिक अँड रिसर्चचा सुवर्ण महोत्सव पुरस्कार, भारत सरकारच्या विग्यान प्रसार संस्थेचे अध्यक्ष, पुण्याच्या आयुका संस्थेचे व आघारकर संशोधन संस्थेचे अध्यक्ष, नायसरचे अध्यक्ष, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंदरचे अध्यक्ष, भारत सरकारच्या ‘सजेस्टिंग रोड मॅप फॉर द अॅटॉनॉमी अँड द फ्यूचर ऑफ आयआयटीज अॅज वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट फॉर द रिसर्च इन हायर लर्निंग’ या समितीचे अध्यक्ष, रेल्वेतील सुरक्षितता समितीचे अध्यक्ष असे अनेक सन्मान त्यांना लाभले आहेत.आज वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांची उपस्थिती अनेकांना हवीहवीशी वाटते आणि वयाची तमा न बाळगता त्यांची धावपळ चालू असते.
- अ.पां.देशपांडे
९९६७८४१२९६