गेल्या वीस – बावीस दिवसांपासून राज्यातील सगळ्या राजकीय घडामोडी अगदी स्क्रीप्टनुसार घडताहेत. ठरवून शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत लोटलं गेलंय, की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना आपल्याकडे ओढलंय? राष्ट्रपती राजवट लागेल, असा इशारा मुनगंटीवारांनी पंधरा दिवसांपूर्वीच दिला होता, तसंच झालंय. मग विरोधात बसण्याचा जनादेश असल्याचे सांगणारे सत्ता स्थापनेच्या हालचाली खरोखरच कराताहेत की तसा भास निर्माण केला जातोय? आत्ताच अचानक एमआयएमे आवेसी आणि नारायण राणेंना कंठ कसा फुटला? या प्रश्नांचा पाठपुरावा केल्यास गुंता अधिकाधिक वाढत जातो… कधी – कधी सुटताना दिसतो, पण दुसरे टोक पुन्हा गुुंतलेले असते. हा गुंता मुद्दाम तयार झाला आहे, करण्यात आला आहे. या राजकीय महानाट्याची स्क्रीप्ट तयर आहे हे निश्चित, पण ती लिहिली कोणी? हा प्रश्न शेवटपर्यंत कायम राहणार आहे.
(photo – google )
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार राज्य सरकारची मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुती सरकार स्थापन करेल. सरकारची मुदत संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत तसा दावा केला, पण शिवसेनेच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीही ठरलेलं नाही, हे ठासून सांगीतलं. कितीवेळी आणि कधी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला हे फडणवीसांनी सविस्तर सांगीतले. शिवसेनेमुळेच सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगीतले. तरीही युती कायम आहे, असे सांगतानाच शिवसेनेला या सगळ्या विलंबाचा आणि जनादेशाचा अपमान करण्याचा दोष जावा, ही काळजी फडणवीसांनी घेतली. दुसर्याच दिवशी सत्ता स्थापन करण्यास आपण शिवसेनेशिवाय असमर्थ आहोत, हे मुदत संपण्याच्या बारा तास अगोदरच सुधीर मुनगंटीवारांनी जाहीर केलं. यावेळी राजभवनात उपस्थित असतानाही फडणवीस पत्रकारांना सामोरे न जाता निघून गेले.
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. जे ठरलंय ते द्या, हा त्यांचा होरा कायम होता. खरे – खोटेपणा सिद्ध करण्यासाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचा परिवार हा निकष त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्यांनी त्यांच्या आमदारांना अज्ञातस्थळी (?) हलविले. इतर पर्याय खुले आहेत, हे सांगतानाच त्यांनी नवे समिकरण उदयास येईल, असे सांगीतले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थता दर्शविताच शिवसेनेला निमंत्रण दिले. त्यांची मुदत 11 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसातला संपणार होती.
शरद पवार यांच्याशी शिवसेनेची पंधरा दिवसांपासून संजय राऊतांच्या माध्यमातून चर्चा सुरु होती, निदान तसे भासविले जात होते. फडणवीसांची पत्रकार परिषद राऊतांनी पवारांच्या घरी पाहिली. पण सत्ता स्थापनेसाठी केवळ काही तास राहिले असताना पवारांनी काँग्रेसच्या सहमतीशिवाय निर्णय घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यापूर्वीही भाजप – शिवसेनेने सत्ता स्थापन करावी, असा सल्ला पवारांनी तीनवेळा दिला होता. अर्थात तो भाजपपेक्षा शिवसेनेसाठीच अधिक होता.
सोनिया गांधी यांच्या दरबारात राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत पोहचले. दिवसभरात दोन बैठकी घेतल्यानंतर पुन्हा पवारांशी याविषयी चर्चा करण्याच्या निर्णयापलिकडे काहीही त्यातून निघाले नाही.
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे साडेसातपर्यंत शिवसेनेचे नेते जाऊन बसले होते. पाऊण तासानंतरही या नेत्यांनी दोन्ही काँग्रेसचा तत्वतः पाठिंबा असल्याचे सांगीतले, आणि मुदत वाढविण्याची मागणी केली. पण राज्यपालांनी ती फेटाळली. हात हलवित राजभवनाच्या बाहेर शिवसेनेचे नेते निघत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिले. पण राष्ट्रवादीने पुन्हा मुदत मागितली, आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारला केली.
केंद्र सरकारकडे राज्यपालांची शिफारस पोहचताच त्याला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदी परदेश दौर्यावर निघून गेले आणि अमित शहांचे गेल्या तीन आठवड्यांचे मौन अधिक घट्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या बैठकी सुरुच आहेत, पुढील काही दिवसांत त्या सुरुच राहतील. संजय राऊतांशी वेळोवेळी चर्चा करणार्या पवारांनी एकट्याने निर्णय घेण्यास नकार दिला, त्यावेळी शिवसेनेचे अवसान गळाले. मुळात रितसर प्रस्तावच शिवसेनेने दिलेला नाही, हे सांगून त्यांनी आपण अद्यप अलिप्त असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम या पक्षावर भाजपची बी टीम म्हणून आरोप होतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता होत असल्याचे चित्र माध्यमातून रंगविण्यात येत होते. त्यामुळे काँग्रेस कदाचित या नव्या आघाडीत सहभागी होईल का, असा अंदाज घेणे सुरु असतानाच ओवेसींनी लगेच मुस्लिम राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला. गत वीस दिवसात ओवेसींचे एकही वक्तव्य नव्हते. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आणि बैठक – बैठक खेळण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्या घडामोडी अशा क्रमाने मांडल्यास सत्ता स्थापनेच्या या संपूर्ण नाट्याची स्क्रीप्ट तयार आहे, हे स्पष्ट होते. कोणी केव्हा रंगमंचावर प्रवेश करायचा हे ठरलंय. या स्क्रीप्टमध्ये उत्स्फूर्ततेवर, भावनिक आधारावर राजकारण करणार्या शिवसेनेची गोची होणार हेसुद्धा ठरलंय.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीत कलगीतुरा रंगला होता. समोर कोणी पेहलवानच नाही, असं फडणवीस म्हणाले होते. सातार्यात उदयनराजेंसाठी मोदींनी सभा घेऊनही ते पराभूत झाले. राष्ट्रवादी राज्यात गेल्यावेळेच्या तुलनेत वाढली. तरीही सध्या सुरु असलेल्या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपकडून एका वाक्यानेही पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका झालेली नाही. तेच पथ्य राष्ट्रवादीकडूनही पाळले जात आहे. भाजपला पवारांनी एका शब्दानेही दुखावलेले नाही. उलट आता नवी आघाडी तयार करायची तर राष्ट्रवादीला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद हवे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून पुढे येत आहे. हा मोठा खोडा नव्या आघाडीत निर्माण होणार आहे.
महाराष्ट्रातील स्थीर सरकारसाठी आणि राष्ट्रपती राजवटीचा पेच सोडविण्यासाठी आणि अखेर काय तर जनतेच्या हितासाठी, शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काय होईल, हा सस्पेंस उघड होईल… आणि बाहुबलीला कटाप्पाने का मारलं? असा प्रश्न शिवसेनेला पडेल (?)
- विशाल राजे, पत्रकार, स्तंभ लेखक,
- रायगड.
- www.vishalraje.com