आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांचे समाधान

नवरात्री विशेष

0

आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांचे समाधान

आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी प्राचीन काळापासून प्रयत्न सुरू आहे पण स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा तर झाली नाहीच उलट आधुनिक काळातील भारतीय स्त्रियांची परिस्थिती फारच दैनिय होत चाललेली आहे. आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी अनेक कायदे केले गेले पण त्यांच्यामुळे स्त्रियांच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्या पण त्या सोबतच अनेक सामाजिक समस्या उदभ्वल्या. आज आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी त्या समस्यांचे सार्वांगिण, समग्रतेने आणि सर्व दृष्टिकोनातून संशोधन करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांचे समाधान या विषयातील घटक आधुनिक, भारतीय, स्त्रियांच्या, समस्यांचे आणि समाधान या सर्वांचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर विषयाचे चित्र जास्त स्पष्ट होईल. जसे आधुनिक काळातील स्त्रियांच्या समस्या जून्या काळातील स्त्रियांच्या समस्यांपेक्षा वेगळया आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य स्त्रियांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. भारतीय स्त्रियांमधील श्रीमंत गरीब, सुशिक्षित अशिक्षित, शहरी ग्रामीण आणि प्रगत मागासवर्गीय या सर्व स्तरावरील स्त्रीयांच्या समस्या परस्पर भिन्न आहेत. आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्या इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्यांचा संबंधात वेगवेगळा स्तरावर विचार करायला हवा. आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांचे जितके प्रकार असतील तितकेच त्याचे समाधान राहतील. जर निदान बरोबर झाले तर योग्य उपचार होईल. जोपर्यंत आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांवर योग्य पद्धतीने संशोधन होत नाही तोपर्यंत त्यांचे समाधान होणार नाही. पाश्चात्य देशातील स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात स्त्रीमुक्ती आंदोलने उभारून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण त्यामुळे पाश्चात्य देशातील कुटुंब व्यवस्था, लग्न संस्था आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त झाले. जर पाश्चिमात्य देशाप्रमाणे भारतातील कुटुंब व्यवस्था, लग्न संस्था आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त झाले तर भारतीय संस्कृती संपुष्टात येईल. आणि म्हणून आज आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी सखोल संशोधन करणे ही काळाची गरज आहे.

आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी त्या समस्यांचे स्वरूप, व्याप्ती आणि गांभीर्य जाणून घेणे आवश्यक आहे. आधुनिक काळात ज्ञान, विज्ञान आणि पुर्नजागरणामुळे संपूर्ण जगाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीत अनेक बदल झाल्याने स्त्रीयांच्या समस्यांचे स्वरूप देखील काही प्रमाणात कमी झाले पण त्यांची व्याप्ती आणि गांभीर्य काही कमी झाले नाही. भारतात आजही स्त्रीयांवर अनेक सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक बधने आहेत. भारताच्या पुरुषप्रधान  संस्कृतीमुळे स्त्रियांना नेहमीच अन्याय, अत्याचार आणि आतंक सहन करावा लागतो. धार्मिक प्रथा, परंपरा आणि रूढींमुळे स्त्रीयांना भंयकर त्रास सोसावा लागतो. लैंगिक विषमतेमुळे स्त्रीयांना छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारा सारख्या अनेक अपमानास्पद समस्यांचा सामना करावा लागतो. आज भारतातील वाढत असलेले बलात्काराचे प्रमाण एक भीषण समस्या झाली आहे. पुरूष सत्ताक पद्धतींमळे स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अश्या मानसिकतेमुळे स्त्रियांचा शारीरिक, वैचारिक आणि मानसिक छळ केला जातो. स्त्रिया आर्थिक बाबतीत पुरूषांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित राहावे लागते. पाश्चात्य देशातील स्त्रियांनी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीयांच्या सन्मानासाठी स्त्रीमुक्ती आंदोलने उभारून आपल्या मागण्या मान्य करवून घेतल्या. भारतातत पण अनेक समाज सुधारकांनी स्त्रीयांच्या समस्यांच्या समाधानासाठी ब्रिटिश सरकार कडून अनेक कायदे लागू करून घेतले. जगभरातील स्त्रीमुक्ती आंदोलनाचा परिणाम असा झाला की संयुक्त राष्ट्र संघानी 1975 ला महिला वर्ष आणि दरवर्षी 8 मार्चला महिला दिन घोषित केले. स्वातंत्र्यानंतर भारतातील सरकारांनी स्त्रीयांच्या समस्यांच्या समाधानासाठी अनेक कायदे अमलात आणले. पण इतके सर्व प्रयत्नानंतरही स्त्रीयांच्या समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यासाठी आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या दशे आणि दिशेमध्ये अमूलाग्र बदल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी सांस्कृतिक मूल्य शिक्षणात काळानुरूप बदल करून त्यात स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीयांचा सन्मान या विषयांचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. मूल्य शिक्षणाचा उद्देश सर्व स्तरावरील पुरूषांच्या दृष्टिकोनात, प्रवृत्तीत आणि मानसिकतेत बदल करणे आहे. जगातील सर्वच स्त्री संघटना, समाजसुधारक आणि राज्यकर्तांनी फक्त सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक सुधारणांवर भर दिला पण सांस्कृतिक सुधारणांकडे नेहमी दुर्लक्ष केले. आज भारतीय संस्कृतीच्या अधोगतीमुळेच स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानाचे लक्ष्य गाठणे अशक्य झाले आहे. पाश्चिमात्य देशात स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अतिरेकामुळे आज स्त्री स्वातंत्र्याचे स्वैराचारात, स्त्री पुरुष समानतेचे व्यक्ती स्वातंत्रात आणि स्त्रीयांच्या सन्मानाचे उपभोगवादात रूपांतर झाले आहे. त्यामुळे समाज जीवनात अस्थिरता, स्त्री पुरुषात स्पर्धा आणि व्यक्तीतील सदगुणांचा ऱ्हास झाला आहे. परिणामस्वरूप कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात आणि मुले पाळणाघरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याने आणि  लिव्ह इन रिलेशनशिपनी विवाह संस्थेचे महत्व कमी झाले आहे. आज भारतीय संस्कृतीत फार मोठ्या प्रमाणात बदल होत आहे पण दुर्दैवाने पाश्चात्य देशात जे बदल होतात ते भारतात जसेच्या तसे टप्प्याटप्प्याने स्विकारले जात आहेत. भारतीय संस्कृती जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृती मानली जाते पण दहा हजार वर्षांचा एतिहासिक कालखंडात त्यात अनेक दोष निर्माण झाले आहेत. भारतीय संस्कृतीत मूल्य शिक्षण, संस्कार आणि चारित्र्याला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. ऋषीमुनींनी असंख्य आश्रम स्थापित करून विविध पद्धतीने अनेक वर्षांपासून मुल्य शिक्षण देण्याचे कार्य केले. ब्रिटिशांनी भारताच्या गुरूकुल पद्धतीच्या आधारावरच शाळा काढल्या. आजच्या शालेय शिक्षणात फक्त पुस्तकी शिक्षणावर भर दिला जातो पण मूल्य शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. तसेच कुटुंब व्यवस्थाचे विघटन झाल्यामुळे कुटुंबातून दिले जाणारे मूल्य शिक्षण बंद पडले आहे. त्याच प्रमाणे संस्कृतीच्या अधोगतीमुळे संस्कृतीतून मिळणारे मूल्य शिक्षण संपुष्टात आले आहे. आधुनिक भारतीय स्त्रियांच्या समस्यांच्या समाधानासाठी शासनावर अवलंबून न राहता, स्वतःहून, आणि आप आपल्या परिने शिक्षण व्यवस्थेतून, कुटुंब व्यवस्थेतून आणि संस्कृतीतून मूल्य शिक्षण मिळेल यासाठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करावे. 

फोटो – freepik.com साभार 

लेखक हे धर्म, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. मो.- ९९२३२९२०५१.

Leave A Reply

Your email address will not be published.