आठवणीतील वारी.

0 382

आठवणीतील वारी.

वारी ज्यावेळी फलटण मुक्कामी येते त्या निमित्ताने अनुभवलेला अनुपम्य पालखी सोहळा..

दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात आळंदीहून पंढरपुरास जाण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबद्दल कुतूहल व प्रेम मराठी माणसाच्या मनात जणू उपजत निर्माण झाले आहे. पिढ्यान् पिढ्या वारकरी व सर्वसामान्यांच्या मनावर या पालखीचे संस्कार झालेले आहेत. लोकांच्या प्रेमाचे प्रत्यंतर पालखीच्या वाटेने ठायी ठायी दिसून येते. पालखीने मराठी माणसाला अगदी भारून टाकले आहे. आयुष्यात सर्व गोष्टी श्रीभगवंत ठरवत असतात, आपण त्या मार्गावरून वाटचाल करायची असते. याचा प्रत्यय बरेचदा येतो. वारीचा हा अनुभव फक्त टीव्ही च्या माध्यमातून घेणारा मी कधी माउलींच्या पालखीला खांदा देण्यापर्यंत गेलो हे समजलेच नाही. वाटले की स्वप्नवतच आहे की काय?

पण मी स्वतःला भाग्यवान समजतो याचे मुख्य कारण म्हणजे फलटणला वारीत जाण्याची संधी पांडुरंगाने दिली. तो माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस मी समजतो. प्रत्यक्ष आळंदी ते पंढरपूर वारीत जायला मिळाले नाही; पण फलटण ला जो अनुभव मिळाला तो अवर्णनीय आहे.

सर्व संतांच्या पालख्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रमुख समजली जाते. पंढरपुरास येताना निरनिराळ्या गावी या पालखीची मोठ्या आदराने आणि उत्कंठाने लोक वाट बघत असतात. असाच काहीसा अनुभव मला फलटण मुक्कामी आला. तत्पूर्वी माउली किती काळजी घेतात याचा अनुभव सातारा येथे आला. फलटणला जाण्यासाठी सातारा हून जायचे होते. सातारा येथे भेटण्याचे ठरले. पालखी गावी येणार म्हणून बसेस बंद होत्या. मग श्री.रोहन दादा उपळेकरचे परिचित श्री.गुमास्ते काका अचानकपणे बस स्टैंड वर भेटले. मग टैक्सी करून आम्ही सर्वजण फलटण ला पोहोचलो.

माउली म्हणजे साक्षात् चैतन्यच! त्यामुळे सर्वच वातावरणात चैतन्याने भरले होते. साधारणपणे दुपारी ४ वाजता गावाच्या वेशीवर पालखी आली. बरेचजण गावाच्या वेशीवरच पालखीला सामोरे जातात.तेथून मग पालखी गावात रात्रीच्या मुक्कामी आली. संध्याकाळी ६.३० – ७.०० च्या सुमारास पालखी तळ्यावर आली. एका विशिष्ठ ठिकाणी रथ थांबवून त्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन तळाच्या मध्यभागी आणली जाते. पालखी खांद्यावर घेण्याचे भाग्य मला लाभले.आणि तेथून मग “माउली माउली” चा जयजयकार करत तंबूपुढे तळाच्या मध्यभागी पालखी आली. तंबूपुढे सर्व दिंड्या वर्तुळाकार थांबतात, मध्ये लोक बसलेले असतात. मध्यभागी गालिचावर पालखी आणून ठेवतात. “ज्ञानोबा माउली तुकाराम” म्हणत सर्व वारकरी गजर करत टाळ वाजवत असतात. पुढे माउलीच्या पालखीजवळ पंच उभे राहून तेथे जाऊन चोपदार उभे राहतात. त्यांनी चांदीची मूठ असलेली काठी वर केली व हैबतराव बाबांचे प्रतिनिधी यांनी “हो” म्हटले की एक चमत्कार दिसून येतो, सर्वजण एकदम टाळ वाजवण्याचे थांबवतात. सर्वत्र एकदम शांतता पसरते.चोपदार काय सांगतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागते. सावकाशपणे चोपदार हरविलेल्या व सापडलेल्या वस्तूंची यादी वाचतात, कोणाचे काही हरविले व कोणाला काही सापडले असेल तर ते त्यांनी माउलींच्या तंबूजवळ कळवायचे. नंतर दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाची व प्रस्थानाची वेळ सांगितली जाते. यानंतर ” आरती ज्ञानराजा ” या आरतीस सुरवात होते. ही आरती वारकऱ्यांना अत्यंत प्रिय आहे. खरं सांगायचं तर शिस्तीने, प्रेमाने आणि आदराने आरती म्हणावी ती वारकऱ्यांनीच !आरती झाली की पालखी तंबूत जाते व वारकरी आपल्या दिंडीच्या उतरण्याच्या ठिकाणी जातात.

माऊलींच्या पादुकांवर डोकं टेकवल्यावर सर्व शीण एका क्षणात विरघळून जातो व मग नवे चैतन्य आणि आनंद घेऊन बाहेर पडतो.
’समाधान’ या शब्दात किती गोष्टी भरून आहेत याचा प्रत्यय प्रत्यक्ष पादुकांचे दर्शन घेतल्यावर येतो. ज्या गावात पालखी येते तेथील लोकांच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. याचा अनुभव मी घेतला. सर्वजण वारीत समाविष्ट होतात. गावात अनेक साधू संत आलेले असतात तोच त्यांचा दसरा व तीच त्यांची दिवाळी. या माध्यमातून मैत्री झालेला Rohan Vijay Upalekar यांच्या घरी मी हा सोहळा​ अनुभवू शकलो. याच्या घरी अनेक वारक-यांना जेवायला बोलावले जाते. अगदी सणावाराप्रसंगी जे गोडधोड पदार्थ करून खातो, तसे पदार्थ केले होते हे पाहून आश्चर्य वाटले. हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. पण रोहन दादाची आई सौ.चारुकाकू म्हणाल्या की, यांना जेवू घातले म्हणजे आपण व आपले कुळ कृतार्थ झाले असे समजले जाते. त्यानंतर वारकरी संप्रदायातील संततुल्य श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या दर्शनासाठी जाण्याचा योग आला. स्वतः ते वारीत अनेक वर्षांपासून चालत आहेत. त्या नंतर तळावर रात्री परत दर्शनाला गेलो. तोच उत्साह सर्वदूर होता.रथाला फुलांनी सजवण्याचे काम चालू होते. दर्शनार्थी दर्शन घेत होते.

सकाळी ६ वाजता माउली पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. सर्व वारकरी माउलींबरोबर त्या अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या भेटी साठी निघाले. हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत व मनात साठवून आम्ही पण परतीच्या प्रवासाला निघालो. तेथून परतीच्या प्रवासाला ‘श्रीक्षेत्र दत्तधाम’ येथे दर्शन घेऊन परत सातारा येथे येऊन श्री गुमास्ते काकांकडे आलो. त्यांनी पण खुप अगत्यानी सर्व केले. एक नवं नातं साताऱ्यात निर्माण झालं. खरं सांगायचं तर हे सगळं खूप विलक्षण आहे. यथाशक्य सगळ्यांनी एकदा तरी वारी अनुभवावी. हा आनंद सदैव सोबत असतो. अजून बऱ्याच गोष्टी आठवत आहेत, पण त्या शब्दात सांगता येणार नाहीत. त्यासाठी एकदा तरी वारीच अनुभवायला हवी !

– सर्वेश फडणवीस.

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक व धार्मिक विषयाचे अभ्यासक आहेत. sarveshfadnavis.blogspot.com

Leave A Reply

Your email address will not be published.