?”नांदा सौंख्य भरे….!!”?
- “तुझ्या कुंकूवाशी माझं नातं
जन्मोजन्मी असावं,
मंगळ सुत्र गळ्यात घालतांना
तु डोळ्यात पाहून हसावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात
माझ्या हाती असावा,आणि
मृत्यूलाही जवळ करताना देह
तुझ्या मिठीत असावा…..!”
अश्या भरभक्कम शब्द सुमनांच्या गजऱ्यासह सुरू झालेला संसार काही दिवसातच….त्या माळलेल्या गजऱ्यातील प्रेम,जिव्हाळा, आत्मीयता आणि ओढरूपी सुमने कधी गळून पडतात हे आजच्या नवदापत्यास कळतच नाही. आजकालच्या नवविवाहित्यांच्या आशेच्या नवकिरणांनी,स्वप्नांच्या झोपाळ्यावर, दोघांनी गिरक्या घेत सुरू केलेला संसाररूपी प्रवास एखाद्या चित्रपटाच्या सुंदर आणि देखण्या “ट्रेलर” सारखाच असतो.प्रथमदर्शनी तो फार हवाहवासा मनाला भुरळ घालणारा व अनामिक ओढ लावणारा असतो मात्र प्रत्यक्षात कदाचित तुमचा अपेक्षाभंगही होऊ शकतो.मग तुमचं आपलं नेहमीचं ठरलेलं उत्तर “अरे…,यार..थोडं थांबलो असतो तर..बरं झालं असतं..!!”
माझ्या मते आजच्या शिक्षित नव जोडप्यांना सद्यस्थितीतील धकाधकीच्या व स्पर्धेच्या काळात एकमेकांना समजून घेणे आणि समजून सांगणे यातील योग्य सांगडच घालता येत नाही.व त्या मध्ये भर पडलेली असते ती घरामधील वरिष्ठांची. ही मंडळी जर जुन्या विचार सरणीची असेल तर मग विचारूच नका…!! तेव्हा या दोघामधील प्रेम-बीम राहतं बाजूला, अन नवरा ऑफिस मधून घरी आला की रोज नवा अध्याय सुरू झालाच म्हणून समजा..!
काही जोडपी याला अपवाद असू शकतात. मात्र तरीही,
“तू मला पूर्वी सारखा वेळच देत नाही..!”
“तुझं माझ्यावर प्रेमचं राहिलेलं नाही..!”
“किती दिवस झालेत आपण कुठे फिरायला पण गेलो नाहीत..!”
“मला फक्त का घरी मोलकरीण म्हणून आनलस..!”
“तुम्ही दिवसभर घरा बाहेर असता,आणि मला इथे काय-काय म्यानेज करावं लागतं..!!” वगैरे- वगैरे अश्या कितीतरी प्रश्नांची यादीचं बहुदा घरांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात तयार असते.
“नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.”
म्हणून एकमेकांना समजून घेणे फार महत्त्वाचे आहे,आणि समजून घेण्याची जवाबदारी ही केवळ एकाची नाही तर दोघांचीही आहे.
पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे लग्नानंतर भविष्यातील सुखी आयुष्याची तरतूद करत असताना कदाचित संसाराकडे दुर्लक्ष होतं आणि नको-नको त्या तक्रारी तोंड वर काढायला लागतात. म्हणूनच तर कामा व्यतीरिक्तही नातं जपणं आपण शिकलो पाहिजे. यामध्ये पुरुषाचा रोल हा फार महत्वाचा असतो,कारण आपल्या आई- बाबांना त्यांच्या इच्छा -आकांक्षाना सांभाळत तितक्याच अलगदपणे आपल्याला अर्धांगिनीचे हृदय सांभाळता आले पाहिजे. असंख्य स्वप्न उराशी बाळगून तीही आपलं घर सोडून तुमच्या आयुष्यात आलेली असते व वेळोवेळी अगदी ठामपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची हिम्मत ती ठेवते.
असं म्हणतात….
“नातं कप-बशी सारखं असावं
एकातून सांडलं तर
दुसऱ्यानं सांभाळाव.”
सरते शेवटी एवढंच सांगेल तुमच्या दोघातील गोडवा कमी होऊ देऊ नका.एकमेकांना सांभाळून घ्या, लहान-मोठ्या तक्रारीचे निरसन दोघांनी मिळून करा.
कधी अचानकपणे घरी पोहचा ,दारावरची बेल वाजवा..!दार उघडताच क्षणीं आपल्या आयुष्यभऱ्याच्या प्रियसीच्या चेहऱ्यावरील आनंद बघा..!,कधी अचानक मन सुवासीत करणारा “गजरा” तिच्या जुळ्यात माळा. कधी चार चौघात तिच्या अंगावर स्तुती-सुमने स्वच्छदपणे उधळून टाका..!आणि बघा ती कशी लाजरी-बुजरी होऊन स्वतःला जगातील सुखी,आनंदी व समाधानी स्त्री समजेल. हेच महत्वाचं…!!आयुष्य तर सगळेच जगतात हो..!पण त्यामध्ये सुख,समाधान,आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम,आर्तता नसेल तर काय.?
सर्व निरर्थक.!!!
आपल्या सुखी संसारात तक्रारींना थारा देऊ नका,सुख- दुःखाशी दोन हात करत पुढे चला.
“झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच, तो पुढे देखील येतो,
सुख आणि दुःख दोन्ही जीवनात बरोबर येतात.
जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका,
तो पुढेही तितकाच येईल.” आणि…
म्हणूनच तर….”नांदा सौंख्य भरे…!!!”??
- श्री.मनोज वाडेकर(कलाशिक्षक)