१६ ऑगस्ट १९४२ चा ऐतिहासिक दिवस..
दररोज सूर्य उगवतो आणि मावळतो परंतु जगाच्या इतिहासात असे काही दिवस उगवले आहेत की ज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे दिवस वजा केले तर इतिहास निष्प्राण होईल. असाच १६ ऑगस्ट १९४२ हा एक अलौकिक दिवस. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा या गावाचे स्वतंत्र समर म्हणजे बेनोडा परिसरातील वीरांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक सोनेरी पानच होय.
१६ ऑगस्ट नागपंचमीचा दिवस, पण परंपरागत नागदेवतेची पूजा बाजूला सारली गेली. प्रथम भारत मातेला विळखा घालून बसलेला गोऱ्या अजगरांना ठेचून काढण्यासाठी स्वातंत्र्य देवीची पूजा बांधली. ८ ऑगस्ट चा मुंबई चा चलेजाव चा ठराव, राष्ट्रीय नेत्यांची धरपकड यामुळे संपूर्ण हिंदुस्थानभर ही चळवळ विद्युत वेगाने संचारली. खेड्यातील तरुण कार्यकर्ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले. अनेक गावांमध्ये ते सभेला जाऊ लागले. लोणी, करजगाव,उत्तमगाव, या गावांनी आपली कार्याची दिशा ठरवीत सरकारी रेकॉर्ड जाळले ,पटवारी,पाटील यांचे कार्यालयावर तिरंगा फडकवला. इत्यादी उपक्रमाद्वारे एक- एक खेडे ब्रिटिश अंमलातून मुक्त झाल्याचे घोषित केले. लोक स्वयंस्फूर्त गावात मिरवणूक, प्रभात फेरी काढू लागले.बेनोडा परिसरातील १९४२ चा स्वातंत्र्यलढा ही परिसरातील जनतेने राष्ट्रीय नेतृत्वाच्या आदेशावर उभारलेली स्वयंस्फूर्त व सर्वस्पर्शी चळवळ होती .याशिवाय महत्त्वाचे म्हणजे ही चळवळ देशव्यापी स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग अविभाज्य अध्याय असणारी अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना होय.
१५ ऑगस्ट १९४२ ला लोणी येथे सभा झाली .या सभेत बेणोडा पोलिस स्टेशन मधील दप्तर जाळणे व पोलिस स्टेशनवर तिरंगा लावण्याचे ठरले .ही सभा आटोपून बेनोडा येथील मंडळी रात्री उशिरा घरी पोहोचली. सकाळी महत्त्वाच्या व्यक्ती श्री श्रावणजी फरकाडे ,नथुजी भुतडा, रामभाऊजी फरकाडे,बळीराम जी फरकाडे ,रामभाऊजी गोहाड विनायकराव बंड यांना अटक झाली. बेनोडा पोलीस स्टेशनवर झेंडा लावायचा असल्याने तेव्हा उत्तमगाव, लोणी, करजगाव, परसोडा येथील सर्व स्वयंसेवक बेनोडाच्या क्रांतिकारकांमध्ये सामील झाले. २००० हून अधिक सत्याग्रहींचा स्वयंस्फूर्त मोर्चा होता.एक सरकारी व्यक्ती पुढे आली.मोर्चा पुढे न नेण्याविषयी बोलली,गोळीबाराची शक्यता बोलून दाखवली .पण ध्येय वेड्या सत्याग्रहींना त्याचे काहीही वाटले नाही .वामनराव पाटील पुढे आले. आपल्या पहाडी आवाजात सर्वांना उद्देशून ते म्हणाले,” गोळीबाराच्या भीतीने विचलित होऊ नका बलिदाना शिवाय स्वातंत्र्यप्राप्ती असंभव आहे. बलिदानाची हिंमत असणाऱ्यांनीच समोरचा रस्ता चालावा. मरणाला भिणाऱ्यानी परत फिरावे.पण परतायला कोणीच तयार नव्हते. दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा बेनोडा स्टॅण्डवरील चावडीवर आला. भारत माता आणि राष्ट्रीय नेत्यांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमला.स्टॅंडवर जलालुद्दीन नावाचा पोलीस ड्युटीवर होता.प्रचंड जमाव पाहून तो घाबरला. तेथून पळायला लागला.
काही तरूण सत्याग्रही त्याच्या मागे धावले. त्याला पकडले .त्याचा सरकारी पोशाख उतरवून त्याची होळी केली आणि शिपायाला खादीचा पंचा असावयास दिला.,” तू आता सरकारी कर्मचारी नसून काँग्रेसचा स्वयंसेवक आहे” असे बजावले त्याचेकडून भारत मातेचा जय जय कार वदविला. राष्ट्रीय गीतांचे स्वर, भारत माता की जय, नेत्यांचा जयघोष ,ब्रिटिश राजवटीचा धिक्कार इत्यादींनी घोषणांनी आसमंत दुमदुमला. गावात नवचैतन्य संचारले होते .हा आवाज पोलीस स्टेशनमध्ये सहज पोहोचला. स्टेशन ऑफिसर निंबाळकर,हेडकॉन्स्टेबल रामदुलारे, मोहम्मद युनूस, अब्दुल जब्बार, रामसुमेर सर्व सज्ज झाले. ठाणेदार निंबाळकर, राम पदारत व रामसुमेर ह्या दोघांना बंदुका घेऊन तसेच मोहम्मद युनुस याला लाठी घेऊन मोर्चा अडवायला समोर पाठविले. पाच हजारांहून अधिक क्रांतिकारकांचा हा मोर्चा पोलीस स्टेशन हस्तगत करून स्टेशनवर तिरंगा ध्वज लावायचा या उद्देशाने प्रेरित होऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला होता.
बंदूकधारी शिपायांनी हा मोर्चा धवलगिरी नदीचे पुलावर अडवला. अरुंद लांब पूल, २५ फुटाहून अधिक खोल नदी, सडकेच्या बाजूला खूप घसरण, पुलाच्या अलीकडे स्टेशन कडील दोन्ही बाजूच्या शेतांना तारेचे कुंपण, आणि समोर पंचवीस-तीस फुटावर बंदूकधारी पोलीस. गोळीबार सुरू झाला तर सत्याग्रहींना आल्यापावली परतल्या शिवाय दुसरा मार्ग मिळणार नाही, अशा अचूक ठिकाणी मोर्चा अडवला. १६ ऑगस्ट चा लढा सत्याग्रहींच्या दृष्टिकोनातून शक्तिप्रदर्शन किंवा गनिमी युद्ध नव्हते, तर साध्याभोळ्या खेडूत शेतकरी, शेतमजुरांच्या स्वातंत्र प्रेमाचे चे वास्तव दर्शन होते. आणि म्हणूनच सैन्य खिंडीत सापडावे तसा हा मोर्चा धवलगिरी नदीच्या पुलावर कोंडीत अडवून धरण्यात पोलिसांना यश मिळाले.
इंस्पेक्टर निंबाळकर हातात पिस्तुल व कमरेला तलवार घेऊन अब्दुल जब्बार या शिपायासह आला. निंबाळकरने मोर्च्यात सर्वासमोर असणाऱ्या उत्तम मानकर व साथीदारांना परत जाण्यास सांगितले. कुणीही ऐकायला तयार नव्हते .”आम्हाला गोळीबाराचे सक्त आदेश आहेत तुम्ही परत जा” निंबाळकर पुन्हा पुन्हा सांगत होता. तेव्हा उत्तमराव मानकरने छाती पुढे करून गोळी चालवण्यास सांगितले. जमाव काहीही ऐकायला तयार नव्हता पुढे पुढे सरकत होता. पोलीस एकेक पाऊल मागे घेत होते. कमिशनर च्या गोळीबाराच्या आदेशास काहीही कसूर ठेवायला निंबाळकर तयार नव्हता. कारण सत्याग्रही समोर त्याला वेळोवेळी स्वीकारावा लागणारा पराभव,आणि बेनोड्याच्या लोकांनी सोडवून घेतलेल्या पाच सत्याग्रहींना अटक करताना अगोदरची दिवशी कमिशनर ने केलेली कान उघाडणी. त्याच्या जिव्हारी झोंबली होती. जमाव ऐकत नाही हे पाहून त्याने गोळीबाराचा आदेश दिला. स्वतः स्टेशन कडे निघून गेला. लोक आणखी पुढे सरकले.तेव्हा पोलिसांनी बंदुका तानल्या. पोलिसांच्या बंदुकीची संगीन आणि सत्याग्रही यांच्यात केवळ आठ फुटांचे अंतर होते. पोलीस आंदोलकांना,” वापस चले जाव”. तर आंदोलन पोलिसांना ,”वापस हम नही, अंग्रेज जायेंगे, अंग्रेजो भारत छोडो, अंग्रेजो के गुलाम भाग जावो”… असे बजावत होते. आंदोलक आणखी पुढे तर पोलिस मागे सरकत होते. सत्याग्रही पोलिसांना बरेच मागे रेटत आले होते. साठ-सत्तर फूट अंतर सत्याग्रही कापले होते. आता सत्याग्रहींचा स्वर बदलला. ते शिव्या द्यायला लागले. ह्या शिव्या इतम गावच्या महादेव जागोजी वाघमारे यांना सहन झाल्या नाही. तो पुढे सरसावला.रामपदारत पोलिसांने त्याच्यावर बंदूक रोखली, तोच वाघमारे यांनी आपल्या हातातील काठीचा एक वार पोलिसाच्या डोक्यावर केला. त्याच्या डोक्यातून रक्त बाहेर आले. हातातील बंदुक गळुन पडली. राम पदारत खाली कोसळला. इतक्यात जमावातून कुणीतरी लावलेल्या दगडाने त्याच्या डोळ्याचा वेध घेतला. डोळा कायमचा निकामी झाला.राम पदारत कोसळ ताच अब्दुल जब्बार ने मोर्चा सांभाळला. राम पदारत ची खाली पडलेली बंदूक उचलून पहिली गोळी हवेत उडवली. आणि मग गोळीबाराचे सर्व नियम धाब्यावर बसवून जनतेच्या दिशेने रामसुमेर आणि अब्दुल जब्बार यांच्या कडील दोन्ही बंदूका सुरू झाल्या. अब्दुल जब्बार राम पदारत वरील हल्ल्याचा बदला म्हणून सरळ वाघमारे च्या डोक्याचा नेम धरून गोळी झाडली. तर रामसुमेर च्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने इत्तमगावच्या महादेव आत्मारामजी फांदाडे च्या छातीचा वेध घेतला. गोळी मस्तकात शिरली. वाघमारे धारा शाही कोसळला. फादादे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पहिल्याच दोन गोळ्यांनी उत्तम गावचे आघाडीवरील दोन वीर पुत्र दोघेही मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तिच्यात कुशीत विसावले.
आपल्या साथीदारांच्या बलिदानाने उत्तमराव मानकर यांना भयंकर त्वेष चढला. ते सरळ शिपायावर चालून गेलेत. बंदुका पुन्हा गरजल्यात एक उत्तमराव मानकर च्या हाताला तर दुसरीने पुंडलिकराव वानखेडेच्या पायाच्या मांडीला छेदले.मोहम्मद युनुस ने अनेकांना काठीने झोडपून काढले. गोळी लागून जखमी झालेल्या पुंडलिकराव वानखडे यांना लाठीचा मार सहन करावा लागला. उत्तम वानखडे बेशुद्ध पडले. पुंडलीकराव वानखडे असह्य वेदनांनी विव्हळत होते.एकापाठोपाठ एक शहीद होतांना पाहून लोकांचा धीर खचला. मोर्चा काही क्षण थांबला.गोळीबारही थांबला. पहिल्या दोन स्वतंत्र प्रेमी वीरांना विस्मरण झाले. आणि अनेक लोक जखमी झालेत. या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी सत्याग्रह हात कामी लागलेत.परंतु आपल्या सहकार्या वर झालेल्या गोळीबारामुळे व लाठी हल्ल्यामुळे तितक्याच अधिक प्रमाणात ब्रिटिश विरोधी भावना ही उफाळून आली.आणि लगेच “आगे बढो”चा आवाज गुंजला. सत्याग्रही पुन्हा कोतवाली च्या दिशेने निघाले. पोलिसांनी बंदुका ताणल्या. जमाव अधिकच संतप्त व निग्रही बनला होता. पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला जात होता. पुन्हा गोळीबार चालू केला.सत्याग्रहींच्या मनोनिग्रह समोर पोलिसांचे शस्त्र बळ फिके पडत होते. पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. एकामागून एक असे अनेक स्वातंत्र्यवीर टिपल्या गेलेत. या दुसऱ्या चढाईच्या प्रसंगी महादेवराव बारमासै, विनायक यावले,लोणी चे पांडुरंग मालपे, यांना घटनास्थळीच वीर मरण आले. याशिवाय इत्तमगावचे संतोष बोरकर, गोविंदा तुमराम ,माणिक बोरकर, श्रीराम वानखडे, बाबुराव माणिकपुरे, मारुती लिखितकर, उदयभान अंबाळकर, माणिकराव आगरकर, नत्थु मालपे, बिसन नेरकर, बाजीराव बर्डे, गोपाळराव देवघरे, गंगाराम जोशी हे तेरा व्यक्ती गोळीबारात गंभीर जखमी झालेत.काय करावे कोणालाच सुचत नव्हते. सडकेवर काही प्रेते पडलेली, काही बेशुद्ध तर काही वेदनांनी विव्हळत होते. सर्व भयानक दृश्य होते. जखमींना पाणी पाजणे, पट्ट्या बांधणे इत्यादी कामे स्वयंस्फूर्तीने होऊ लागलीत. पोलिसांच्या बंदुका आंदोलकांच्या दिशेने पुन्हा सरसावल्या. सत्याग्रही पुन्हा हल्ला चढविण्याच्या विचारात उभे होते. जखमी असंख्य वेदनांनी विव्हळताना देखील ,”आम्हाला इथेच राहू द्या …तुम्ही पुढे चला… ठाण्यावर झेंडा फडकावला पाहिजे”…. असा संदेश देत होते. इत्तमगाव ,परसोडा, लोणी इत्यादी गावाचे नेतृत्व ईत्तम गावचे उत्तमराव वानखडे पाटील यांच्याकडे होते.त्यांनी आपसात विचार विमर्श केला. आता माघार घेण्यात काहीच अर्थ नाही. ५ वीर शहीद १५ जखमी झालेले पाहून वामनरावांना आवेश चढला. महादेवराव पावडे यांना सोबत घेऊन सहकाऱ्यांना “आगे बढो” चा आदेश दिला. सारा आसमंत भारत माता की जय जयकाराने दुमदुमला. सर्व सत्याग्रही पुन्हा नव्या उत्साहाने स्टेशन कडे कूच करू लागले. मरणाचे भय कुणालाही नव्हते .जमादारानी वामनरावांना समजाविले व परत जाण्यास सांगितले. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचे पाऊल थांबत नव्हते . बंदूकीचे चाप ओढल्या जाताच गोळ्या सुटल्या. एक गोळी वामनरावांच्या हातात घुसली रक्तस्त्राव होऊ लागला. तरीही ते निर्धाराने व द्वेषाने महादेवराव पावडे सोबत स्टेशनची वाट चालत होते. क्षणभर पोलिसही स्तंभित झाले. त्यांनी अचूक नेम धरून गोळ्या झाडल्या. एक गोळी पावडे यांना तर दुसरी वामनरावांच्या कमरेखाली घुसली. दोन्ही वीर जमिनीवर कोसळले. लोकांनी वामनराव भोवती गर्दी केली. जनतेचा लाडका नेता आपल्या गोळ्यांनी टिपला. आता लोक आपल्याला माफ करणार नाही. पोलीस पळायला लागले. अडीचशे ते तीनशे लोकांनी धावत जाऊन त्यांचा पाठलाग केला. समोर पळपुटे पोलीस तर मागे सत्याग्रही असे दृश्य होते. पोलीस स्टेशन आता शंभर फुटावर होते. आपण सत्याग्रहाच्या हातात पडणार म्हणून त्यांनी पुन्हा गोळीबार केला. शंकरराव पापळकर यांच्या पायातून एक गोळी आरपार गेली. पोलिसांनी पळतच पोलीस स्टेशन गाठले.पोलिसही जखमी झालेत. १६ ऑगस्ट च्या गोळीबारात चार फेरीत एकूण चाळीस गोळ्या झाडल्या गेल्या. पाच स्वातंत्र्यवीर घटनास्थळी शहीद झालेत ,१८ वीर जखमी झाले, अनेकांनी रुग्णालयात आपली जीवनयात्रा संपविली. क्रांतिवीरांना अभिष्ट साध्य झाले नसले तरी त्यांचे शौर्य व मनोधैर्य पाहून पोलिसांचे अवसान गळाले होते.
१६ ऑगस्ट च्या घटनेमुळे बेनोड्याचे नाव सर्वत्र गाजले. स्वातंत्र्य प्रेम अमर ठरले. मरणाची भीती कुणाला नाही? जगण्याची लालसा, सुखलोलुपता, संपत्तीचा मोह, स्वकीयांबदल ओढ याबाबी मानवाची प्रमुख स्वभाववैशिष्ट्य आहेत. तरीही या सर्वांचा त्याग करून यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या होमकुंडात झोकून दिले. यथाशक्ती व यथापरिस्थिती स्वातंत्र्याचा सूर्योदय अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न केला. अशा वीरांची उणीव भारत वर्षात कधीच भासली नाही. बेनोडा परिसराने हे आदर्श, प्रेरणादायी उदाहरण इतिहासाला बहाल केले. १९४२ ची चळवळ दडपण्यात ब्रिटिशांना यश मिळाले .पण स्वतंत्र प्रेम कमी झाले नाही. हा या परिसराचा इतिहास गौरवास्पद आहे.
– अमर शहीदो की जय – भारत माता की जय –