आचार्य विनोबा भावे – एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व
“गीताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता| पडता रडता घेई उचलूनी कडेवरी||”
“गीताई”| आचार्य विनोबा भावे यांची एक अजरामर रचना. आपल्या आईच्या आग्रहाखातर महर्षी व्यासांच्या श्रीमदभग्वतगीतेचे समश्लोकी काव्यमय मराठी भाषांतर म्हणजे “गीताई”.
मला आठवते, बालपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून, “स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे।
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा॥ ५४ ॥ या “गीताई”च्या दुसऱ्या अध्यायातील ५४ ते ७२ अशा १९ ओव्या मुखोद्गत होत्या. जीवनाच्या जडणघडणीत निश्चितच याचा मोलाचा वाटा आहे.
११ सप्टेंबर २०२० तारीख म्हणजे आचार्य विनोबा भावे यांची १२५ वी जयंती.
विनोबाजींचे पूर्ण नाव, विनायक नरहरी भावे. ११ सप्टेंबर १८९५ ला, कोकणातील, कुलाबा जिल्ह्यातील “गागोदे” या गावी विनोबांचा जन्म झाला. त्यांची “आई” हे त्याचं प्रेरणास्थान. त्यांची आई त्यांना “विन्या” म्हणायची.
विनोबाजी, म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती भूदान चळवळ. भूदान चळवळीचे प्रणेते म्हणजेच विनोबा भावे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे,गीता यांतील तत्वज्ञान समजून घेवून, ते ज्ञान सामान्य जणांपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहचाविणारे आचार्य विनोबा भावे. बालपणापासूनच अगदी विरक्त, संन्यासी मनोवृत्ती असणारे, विनोबाजी. थोर गांधीवादी, आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक म्हणजे आचार्य विनोबा भावे. त्यांचं माध्यमिक आणि उच्च शिक्षण गुजरातेत बडोदा येथे झाले.
विनोबाजींचे चिंतन हे प्रायोगिक होते. वात्सल्य, सख्य व प्रेम हे तीन क्षमा मंदिरे आहेत. वात्सल्य दोष पोटात घालते, सत्य दोष सहन करते, तर प्रेमाला दोष दिसतच नाहीत. त्या तीनही प्रकारांनी दोष दूर होऊ शकतो, स्थितप्रज्ञ हा समतेचा साक्षात्कार घडविणारा असतो. समानतेचे सूत्र अवलंबिणारा असतो आणि समरसतेच्या सन्मार्गानेच जाणार असतो, असा विनोबांचा दृढभाव. विनोबाजी पूर्ण जाणून होते की परमार्थ ही वाचायची-सांगायची गोष्ट नसून केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे – जी अतिशय कठीण- सगळ्यात कठीण गोष्ट होय.
भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीवर त्यांचा विशेष अभ्यास होता. “हिंदी” राष्ट्रभाषा असावी आणि लिपी “देवनागरी” असावी, असा त्यांचा आग्रह असायचा. विनोबाजींना १४ भाषा येत होत्या. त्यांचा दृष्टिकोन वैश्विक होता.
वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच ७ जून १९१६ ला त्यांची महात्मा गांधीं सोबत भेट झाली आणि त्यांच्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले. विनोबांचे महात्मा गांधींच्या संपर्कात येणे हा एक विलक्षण योगायोग होता.एक अध्यात्मिक विचारधारेचा खोल डोह, तर दुसरा कर्मयोगाचा हिमालय.
स्वत: गांधीजी, विनोबांना शिष्य न मानता “अध्यात्मिक गुरु” म्हणून संबोधित असत. एका पत्रात गांधीजी विनोबाजीना म्हणतात, “ए गोरख, तुने मच्छिंदरको भी जीत लिया”. ते महात्मा गांधींचे एकनिष्ठ अनुयायी होते
८ एप्रिल १९२१ ला विनोबाजी पहिल्यांदा वर्धेला पोहोचून, आश्रमवासी झाले. विनोबांनी नेहमीच निष्काम कर्मयोग मान्य केला. ते अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते होते. भूदान चळवळीचे वेळी साडेतेरा वर्ष यांनी “पदयात्रा” केली. वयाच्या ५५ ते ६८ वर्षा दरम्यान संपूर्ण भारत पालथा घातला. “सब भूमी गोपाल की”| हा “शांतीमय क्रांती”चा नारा त्या काळी प्रचंड गाजला. “जय जगत” चा घोष देणारे ते एक अध्यात्मिक नेते म्हणून ओळखले जायचे.
त्यांचे अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा या वरील लेखन, भारतीय मनाला प्रभावित करून गेले. “योगः कर्मेषु कौशलं”, प्रमाणे सुंदरतेला विनोबाजी कामाचा गाभा म्हणतात. सफाई आणि नीटनेटकेपणा याबाबतीत विनोबाजी नेहमी लष्कराचा दाखला देत. कोणतेही काम हे “जाणून” केले पाहिजे. “नेटके” केले पाहिजे. “वेगाने” केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. “सुंदरता, ही कामाची शोभा नसून, कामाचा गाभा आहे” असं विनोबाजी म्हणायचे. या सगळ्यातून माननीय स्वभावाचं उत्कृष्ट होतं.
विनोबाजींची महत्त्वाची कामगिरी म्हणजे “भूदान चळवळ”| केवळ १७ दिवसात, समाज प्रबोधनातून त्यांनी सुमारे बारा हजार एकर जमीन मिळविली होती.
विनोबाजींनी विपुल लेखन केले आहे. विनोबा पूर्ण जाणून होते. त्यांच्या विविध ग्रंथ संपदे मधून जी गोष्ट आपल्या अगदी सहज लक्षात येते ती हीच की यात सांगितलेल्या गोष्टी या महापुरुषाच्या अनुभवाच्या आहेत. ज्या विश्वात्मक भावात जाऊन माऊलींनी पसायदान मागितले तीच गोष्ट विनोबांच्या बाबतीतही आढळते. त्यांनी ज्या पारमार्थिक गोष्टी यात विशद केल्यात त्या आपल्याही ह्रदयात ठसूनच रहातात याचे कारणही हेच. “गीताई” ची रचना १९३२ मधली. आजवर गिताई च्या २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.
शब्दांचा मोजून मापून पण नेमका वापर, विचार मांडणीतील सखोलता पण सुगमता, प्रकांड पंडित असताना बुद्धिच्या मर्यादा लक्षात घेऊन सहज निर्माण झालेली ईश्वर -शरणता असे अनेक पैलू त्यांच्या या चिंतनातून प्रकट होताना दिसतात. “समतेच्या मंदिराकडे ममतेच्या मार्गानेच जाता येते”, असे विनोबाजी सांगतात.
सगळ्यात महत्वाची गोष्ट – गीतेतील तत्वज्ञान हे केवळ त्या विचारात, त्याच्या शाब्दिक अभ्यासात नसून आचरण्यासाठीच आहे या करता विनोबांनी केलेला आटापिटा. अतिशय विद्वान असे विनोबा किती रसिक असावेत याचाही प्रत्यय आपल्याला या पुस्तकातून येत रहातो.
विनोबाजी फार मार्मिक लिहायचे. खूप सोपं लिहायचे. भगवत्गीतेवर त्याचं अगाध प्रेम होत. ते म्हणत, “मी एकांतात असतांना गीतारूपी मातेच्या अंगावर पहुडलेला असतो”. “मधुकर” हा त्यांच्या “महाराष्ट्र धर्म” या साप्ताहिकात सन १९२४ ते १९२७ या दरम्यान प्रकाशित झालेल्या स्फुट लेखांचा संग्रह. काही काळ तो विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट होता. या लेखांमधून विनोबाजींनी भगवद्गीतेचा सार, छोट्या-छोट्या घटना, विषय घेऊन सोप्या पद्धतीने सांगितला आहे. “मधुकर” ची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली, ती १३ जुलै १९३६ला. विनोबांचे विचार मान्य झालेच पाहिजेत असे नाही. परंतु उत्पादन प्रक्रियेत कुटुंबाला महत्वाचे स्थान असले पाहिजे, आणि कुटुंबातील व्यक्तींनी शक्यतोवर स्वावलंबी बनायला शिकले पाहिजे असा कालोचित अर्थ काढता येतो.
“म्हातारा तर्क” या लेखात “नवीन गोष्टी शिकण्याची उमेद हरवून बसलेला तो म्हातारा” असे का म्हटले आहे. “नवीन शिकणे नको” हा मानवी स्वभावधर्म विनोबांनी खुमासदारपणे आपल्या लेखात मांडून मर्मावर बोट ठेवले आहे. आजही आपण ही मानसिकता बघतो, अनुभवतो. काळ बदलला मात्र मानसिकता कायम आहे.
विनोबाजी एका लेखात म्हणतात, “दान करायचे म्हणजे पात्र पहावे लागते”. “त्याग” हा अगदी मुळावर घाव घालणारा आहे, “दान” वरून पालवी खुडण्यापैकी आहे. त्याग पोटात घेण्याची दवा आहे, दान कपाळावर फसण्याची सुंठ आहे. त्यागात अन्यायाची चीड आहे, दानात लौकिकाची भीड आहे.
त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते. त्यागाचा स्वभाव दयाळू आहे, दानाचा स्वभाव मायाळू आहे. दोन्ही धर्मच आहेत. त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे तर दानाची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे. विनोबाजींना सेवाभाव अतिशय प्रिय होता.
“सोडूनी कामना सर्व फिरे होवुनी नी:स्पृह| अहंता ममता गेली, झाला तो शांती रुपची||अ.२रा. ओवी क्र. ७१.
प्रायोपवेशनाचा संकल्प करून आचार्यांनी “आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक!” असे मनाशी ठरवून, १५ नोव्हेंबर १९८२ ला, पवनार (वर्धा) येथील परंधाम आश्रमात आपली देह्यात्रा संपविली.
तत्वज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर होऊ शकत नसेल तर ते तत्वज्ञान संपूर्णतः काय कामाचे अशी विनोबाजींची रोखठोक धारणा. गूढवाद, चमत्कार व अंधश्रद्धा यांचा पुरस्कार ते कुठेही करत नाहीत. दररोजचे जीवन किती उंच पातळीवर नेता येते हे प्रत्यक्ष आचरण करून त्यांनी दाखवून दिले आहे. शारीरिक श्रमांची त्यांची निष्ठा पाहिली की आपल्या लक्षात येते की हा केवळ आश्रमवासी प्रवचने देणारा संत नसून कृतिशील प्रयोगशाळाच आहे. जुन्या विचारांना सरसकट टाकाऊ म्हणून ते फेकून न देता त्यातील आजही उपयुक्त ठरतील असे जे विचारधन आहेत, त्याला आधुनिक दृष्टीने तपासून, आत्मसात करण्याचा प्रयत्न म्हणजेच, आजच्या १२५ व्या जयंती निमित्त, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना केलेले अभिवादन ठरावे. या ऋषितुल्य महामानवास कोटी कोटी प्रणाम.