वाचकाच्या चष्म्यातून
पुस्तक: “अदलीभर दाने “
असच यकडाव रिकामपणाचं मोबाईल चीवड चावड करत असतानी; “वऱ्हाडी कट्टा” ह्या फेसबुक पानावर वऱ्हाडी बोली भाषेतलं लिखान वाचण्यात आलं. आपलं वऱ्हाडी व्हय म्हणून मोठ्या आवडीनं वाचाले लागलो त आखिर पावतर वाचतच रायलो.
आखरी लेखकाचं नाव वाचलं तव्हा काही ईशेष नाही वाटलं ;पण जव्हा गावाचं नाव वाचलं आन यकदम माहया लाईटच पेटला; का बॉ….हे त आपल्या गावा पासचं पेठ मांगरुई व्हय! मग हे लेखक बी आपल्या गावा शेजचेच! तथी साऱ्यात खाल्त मोबाईल नंबर लिवला व्हता. मंग म्या आव इचार न करता तसाच फोन लावला. तिकडून आबासाहेब बोलले मंग आम्ही दोघ बी बोलतच रायलो, लय वाडखूय पावतर…..
बोलता-बोलता आबा साहेबान सांगतलं का माह्या “अदलीभर दाने” नावाचा यक कथा संग्रह प्रकाशित झाला हाये. ईशेष म्हनजे, सारे पुस्तकं आता पावतर खपून बी गेलेत.म्या म्हणलं आबासाहेब येवढ्या बातच हे पुस्तकं खपलं , त मंग मलेबि थे वाचाच लागन बा ! तिथून चार दिवसातच आबासाहेबाचे “अदलीभर दाने “माह्या घरी पोहोचले .
मंधातच दिवाई ची सफाई आल्यानं पुस्तक वाचाले टाईमच भेटत न्होता. मंग यकडाव जेवण खावन आटपल्यावर बसलो असतानी; माह्य लक्ष समोर टेबलावर पडेल “अदलीभर दाने”वर गेलं. थे पुस्तक हाती घेऊन न्याहाळत बसलो. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं चित्र पाहून म्या अंदाज बांधला का; म्हतारी बुढी, बिल्लोर ईकणारा अन् यक लहान लेकराची माय यायच्या जीवनात या अदलिभर दाण्याचं काही तरी जुगाड नक्कीच असलं पायजे.
कारण का, शेतकरी-शेतमजूर अन खेड्यातले कारागीर लोकाचं पोट हे मजुरीवरच असते.दिवसभर काबाडकष्ट करणं अन् मजुरीच्या पैशात दाय दाना ईकत घेऊन आपलं पोट भरनं ;असं कस्टीक ग्रामीण भागातलं जीवन ह्या पुस्तकात चितारलं असन ,असा माह्या अंदाज बांधून पुस्तक वाचाले घेतलं.अन् येका बैठकीतच पुस्तक वाचून कडावर केलं.
या पुस्तकातल्या पयल्याच कथेचं नाव हाये “अदलीभर दाने”. थे म्हनतेत ना इंग्रजी मंदी “फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन ” तसंच इम्प्रेशन ह्या कथेचं माह्यावर पडलं. ह्या पयल्याच कथेमंदि काय घडलं ?हे सांगून मी तुमची कथा वाचाची हवा काढून घेणार नाही. पण मी तुम्हाले गॅरंटीनं सांगतो का, हे कथा वाचल्यावर ह्या कथासंग्रहाचा गाभा काय? हे वाचकाले नक्की समजन. अन् लेखकानं ह्या कथेतून मानवतावादी विचार कसा पेरला; हे बी समजदार वाचकाच्या लक्षात येईन.
यखाद्याच्या नशीबात कितीक दुःख असावं? याचा काही नेम नाही! अशीच यक कथा “एक होती मैना ” हे कथा वाचल्यावर वाचनाऱ्याच्या कायजाले पाझर फुटल्या शिवाय राहत नाही. यव्हढं हृदय पियवटून टाकणारं कथानक ह्या कथेमंधी लेखकानं रंगवलं हाये.
“अदलीवर दाने “या वऱ्हाडी बोली भाषेतल्या लघु कथासंग्रहात लेखकानं त्याच्या जीवनात पायलेल्या अन् प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी, प्रसंग, घटना साध्या-सोप्या वऱ्हाडी बोलीत चितारल्या आहेत.
दररोजच्या जीवनात लोकापाशी गरजेपेक्षा जास्त पैसा आल्यान, लोकं मंग मानसाले जनावरासारखे अन जनावराले माणसा सारखी वागणूक द्याले लागते. असच चित्रन “आपल्याले काय करा लागते” ह्या कथेमंदी लेखकानं इनोदी ढंगानं मांडलं हाये.
इकडे गरिबाचे खावाचे वांदे आहेत अन तिकडे लखपत्याच्या घरच्या कुत्र्याची मिजास किती अन् कशी असते? हे चीड आणणारं वास्तव लेखकानं मोठया खुबिनं ह्या ईनोदी कथेतून रेखाटलं हाये.
आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, समाजातल्या काही प्रथा ,परंपरा ह्यावर टीका करण्यासाठी रूपकाचा वापर करून उपरोधिक लिखान लेखकानं “मैत्र जिवाचे” ह्या कथेमंदी केलं हाये; थे कथा प्रत्यक्ष वाचल्याशिवाय त्याच्यातली नजाकत वाचकाले कयनार नाही.
“अदलीभर दाने” ह्या कथासंग्रहात लेखकांनं काही व्यक्तिचित्रनं बी आपल्या लेखन शैलिनं जिवंत केले हायेत. लेखकाचं जीवन वरुड तालुक्यातल्या “पेठ मांगरुई” ह्या आडवयनाच्या खेड्यात गेलं. तिथं लायनाचे मोठे व्हतांनी जे अनुभव आले,जीवाले जीव देणारे माणसं भेटले, थ्या सार्या आठोनी लेखकानं आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या. त्यातलीच यक आठोन म्हनजे “पांढरा कासार आणि जंगलू”.
ह्या कथेतला दर हप्त्याले गावात बांगड्या ईकाले येणारा कासारा. लोकं त्याले “पांढरा कासार” ह्या टोपन नावान हाका मारत. ह्या परधर्माचा, परगावचा माणूस असूनबी त्याच्या गोड स्वभावानं अन् निर्मय यवहारानं थ्या गावात लोकांमंदी यव्हढा मिसयला का, लेखकाले इतक्या वर्षांनं आजही त्याची आठोन यकदम ताजीच वाटते. “पांढरा कासार” ह्या कथेमंदी व्यक्ती चित्रनाच्या निमित्त्यान लेखकानं जुन्या कायातलं, गाव खेड्यातलं सर्व धर्म समभावाचं हुबेहूब चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत केलं.
ग्रामीण भागात यकमेकाले सुख दुःखात साथ देणारे लोकं असले, तरी यकमेकाचे पाय ओढणारे खेकड्या सारखे लोकंबी पाहाले मियते. कोणाले चांगलं पीक झालं असन, गावात कोनं चार मजली घर बांधलं , कोनं चार चाकी गाडी घेतली ,नायतर मंग यखाद्याले मोठं पद भेटलं का ,गावातले काही जयतुकडे त्याचा हिरस कराले लागते.
थो पुढं जाणारा डूबला पाह्यजे, आपल्या परिस जरासा मांगच रायला पाह्यजे; म्हणून खेड्यातले लोकं खेकडया सारखे यकमेकाचे पाय ओढत राह्यते. अन् थो बरबाद झाला पायजे;म्हणून त्याले पानी देत राह्यते अन् उच्ची पट्टी देत रायते.
ह्या पानी देण्याचा दुष्परिणाम काय व्हते,याचं जितं जागतं उदाहरन म्हणजे “बाज्या पाटील” अन् ” हिस्से वाटनी” ह्या दोन कथेतून लेखकानं अशा पद्धतीनं कथानक गुंफलं हाये, का वाचकाले शेवट पावतर थे कथानक अन् त्याच्यातले पात्र गुंतवून ठेवते.
ग्रामीण भागातले कुंभार, लोहार ,सुतार यासारखे बलुतेदार म्हनजे; लोक शिक्षणाचं,आव इचाराची देवान घेवान करण्याचं यक साधनच व्हतं. ग्रामीण कारागिरांच्या कामातून लोकायची करमणूक आपोआपच व्हाची.अशीच लेखकाच्या मनात लहानपणीच कोरलेली गावातली जुनी आठोन “वाढ्याचा कामठा” या कथेतून जशीच्या तशीच ताजी झालेली दिसते. हे कथा वाचताना वाचकाले लेखकाच्या गावात घेऊन जाते; हेच लेखकाचं यश म्हना लागन.
“अदलीभर दाने” ह्या कथासंग्रहात लेखकानं गत तीस-चाळीस वर्षातल्या आठोनी, भेटलेले मानसं,आलेले चांगले-वाईट अनुभव, आपल्या वऱ्हाडी बोली भाषेत अशा पद्धतीने मांडले ;का वाचकाले थे सोताचीच कहानी वाटते.
नोकरी पान्याच्या निमित्तानं लेखक आबासाहेब कडू हे काही वर्षे गावाबाहेर फिरतीवर असले; तरी आपल्या गावासंग अन् गावातल्या आपुलकीच्या माणसासंग तैची अजूनही नाय जुयुन हाये.
लेखकाच्या घरी पिढीजात समाजसेवेचा वारसा, सूक्ष्म निरीक्षण क्षमता ,अन् वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचे संस्कार लेखकाच्या मनावर खोल पावतर रुजलेले हायेत. पेठ मांगरुयी सारख्या खेड्यातल्या लोकायचं लेखकानं जवयुन पाह्यलेलं जीवनमान आपल्या वऱ्हाडी बोली भाषेत जसंच्या तसं मांडल्यानं, थे वाचकाले आपलंच वाटते.
शेतकरी,शेतमजूर,कारागिराचं जीवन किती कष्टीक अन् हलाखीचं असून बेभरवशाच्या निसर्गावर विसंबून असते ; याचा अनुभव नव्या पिढीले व्हावा म्हणून प्रत्येक घरात “अदलीभर दाने” असालेच पाह्यजे. जेणेकरून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लेकरायले ह्या ग्रामीण कथा वाचले भेटन.
आबासाहेब कडू याइंन “अदलीभर दाने ” कथासंग्रह वऱ्हाडी बोली भाषेत लिहून वऱ्हाडी साहित्यात भरच टाकली.अशीच भर वऱ्हाडातल्या लेखकायंन आपल्या परीनं टाकली ; त वऱ्हाडी बोली भाषेची कनगी शिगोर भरल्याशिवाय राह्यनार नायी,अशी आशा करतो अन् थांबतो.
जय वर्हाडी!वाचू वर्हाडी!! लिहू वर्हाडी!!बोलू वर्हाडी !!
*************************
पुस्तकाचे नाव: “अदलीभर दाने”
लेखक: आबासाहेब कडू
प्रकाशक: मुक्ता पब्लिकेशन,अकोला.
पृष्ठ:७०
किंमत:१००₹
प्रकार: वर्हाडी कथा संग्रह.
************************