मतदारांचे काय चुकले ?

लेख

हाराष्ट्र विधानसभेच्या लागलेल्या निकालाने जनतेने भाजप, सेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट कौल दिला तर  कॉंग्रेस-रा.कॉ. आघाडीला विरोधात बसून शासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील जनतेनी दिली. परंतु वेळेवर भाजप-सेनेत अनपेक्षित  दुरावा  निर्माण होऊन झालेल्या पेच प्रसंगाने ते सरकार स्थापन करू शकले नाहीत तर दिलेल्या कालावधीत इतर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्याने महाराष्ट्रात महामाहीम राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली हे सर्वांनी पहिले.

निवडणुकीत आपापला विचार आणि वचननामा पुढे करत सर्वच राजकीय  पक्षांनी मतदार राजाला स्वतःकडे आकर्षित करून आमचाच पक्ष कशा प्रकारे योग्य आहे व महाराष्ट्राला प्रगती पथावर आम्हीच कसे नेऊ शकतो हे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला.

लोकसभा निवडणुकी नंतर लागलेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला बहुमत देत पुन्हा एकदा सत्तेची संधी मतदार राजाने भाजप प्रणीत एन.डी.ए. ला दिली. महाराष्ट्रात त्यावेळी भाजप – सेना महायुती म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात जनतेनी त्यांना निवडून दिले. लोकसभा हि महाराष्ट्रात विधानसभेची ट्रायल म्याच आहे अशा पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पातळी ते राज्य पातळीवरील  नेते कामाला लागले व त्यांनी या रणांगणात उडी घेतली.

महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी कॉंग्रेस – रा.कॉ आघाडी, भाजपा-सेना महायुती, वंचित बहुजन, इतर राजकीय पक्ष,  अपक्ष, अशा विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आपापल्या अधिकृत वचन नाम्यात म्हणा किंवा पक्षाच्या जाहीर नाम्यात म्हणा अनेक आश्वासन जनतेला दिली.

प्रामुख्याने या निवडणुकीत महायुती, आघाडी व इतर पक्ष निवडणुकीत जनतेला सामोरे गेली व मतदारांनी आपल्या पवित्र मताचा वापर करत आपापल्या मतदार संघातून मतदारांच्या दृष्टीने योग्य उमेदवाराला मत देऊन निवडून आणले. झालेल्या मतदानाचा अभ्यास जर केला तर अनेक ठिकाणी मतदारांनी अनपेक्षित निकाल दिलेत. याचा अर्थ असा कि या वेळी मतदारांनी आपल्या विवेक बुद्धीचा वापर करत कोण्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले.

 विधानसभेच्या  २८८ जागांसाठी लागलेल्या निकाला मध्ये भाजप – सेना महायुतीला १६२ सीट, कॉंग्रेस – रा.कॉ. आघाडीला १०४ सीट, वंचित बहुजन आघाडीला १ सीट आणि इतर २१ सीट जनतेनी जीवाडून दिल्यात. त्यानुसार महायुतीने जनतेने दिलेल्या निर्णया नुसार सरकार स्थापन करून काम करणे अपेक्षित आहे. परंतु अनपेक्षित पणे घडामोडी घडत गेल्या व महायुतीमध्ये दुरावा निर्माण होऊन त्यांनी सरकार स्थापन केले नाही.

निवडणुकीच्या आधी आम्ही निकाला नंतर  शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असे विधान शिवसेनेने केले नाही व निकाला नंतर मात्र अचानक सेनेला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले. तुमच्यात आपापसात सत्तेतील वाटा घाटीवरून काय ठरले असेल ते असेल पण मतदारांच्या निर्णयाचा अनादर हा होता कामा नये. मतदारांनी मतदान केले यात मतदारांचे काय चुकले ?   

आता भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असून शिवसेना मात्र आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी जा कॉंग्रेस – रा.कॉ. आघाडीच्या  विरोधात निवडणूक लढली त्यांच्याच सोबत जाण्यासाठी आतुर आहे. काहीही करू पण शिवसेनेचा मुख्यमंत्री करू, यासाठी आतुर असलेली शिवसेना जनतेनी सत्ता स्थापनेसाठी नाकारलेल्या राजकीय पक्षाकडे जाऊन सत्तेची गणित मांडताना दिसत आहे. हे जनतेच्या भावनेच्या आणि निर्णयाच्या विरुद्ध आहे असे म्हटले तरी गैर होणार नाही.

निवडणुकीआधि जनतेला  दिलेल्या शब्दाला जागात महायुतीने सरकार स्थापन करून कामाला लागणे हिताचे आहे. अन्यथा  येणाऱ्या काळात जनता याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

 

  • नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment