अमेरिकन लिबरल्सची गोची आणि भारतीय लिबरल्सची पण.
अमेरिकेतील कॅपिटल बिल्डिंग म्हणजेच त्यांच्या संसदेवर पराजित ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घातला आणि सगळे जग स्तंभित होऊन बघायला लागले. अमेरिकेतील लोकशाहीचा जगभर असलेला दराऱ्याला या मुळे ग्रहण लागले आहे हे नक्की !
खरे तर अमेरिकन माणसाचा आपल्या सिस्टीम वर कमालीचा भरवसा, त्यांच्या लवकर न कळणाऱ्या मतदान पद्धती पासून तर अगदी घरात येणाऱ्या पाईप मधील गॅस पर्यंत संचालित करत असलेली सिस्टीम इतकी पक्की आहे की त्यात अजिबात त्रुटी येत नाही याचा अमेरिकन नागरिकांना भलताच अभिमान. हीच मानसिकता जगप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटात येणारी भयानक वादळे, पूर, हिमवर्षाव, परग्रह वासीयांचे हल्ले या मध्ये जशी अमेरिकन लोकांची लढाऊ वृत्ती दिसते, आम्ही जगाचे रक्षक असल्याचा दंभ दिसतो, तसाच इतक्या संकटात पण त्यांनी तयार केलेल्या सिस्टिम्स आपापली कामे व्यवस्थित देत राहतात हे दिसते. मग वेळेवर येणारी पोलीस मदत असो, लगेच येणाऱ्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल असो, की वादळात, पुरात, बर्फवृष्टीत सतत सुरू राहणारी वीज आणि गॅस लाईन दाखवणे हे या सिस्टीमवर असलेल्या भरवश्यामुळेच !
मात्र ९ नोव्हेंबर २०१६ ला उजव्या विचारसरणीचे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यावर एकाएकी अमेरिकेतील तथाकथित लिबरल्स आणि डाव्या विचारसरणीवाल्यांनी याच सिस्टिम वर अविश्वास दाखवायला सुरवात केली. अमेरिकन शहरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या विरोधात निदर्शने, दंगली, तोडफोड आणि जाळपोळ केल्या जात होती. अमेरिकन निवडणूक सिस्टिम्स वर शंका व्यक्त केली जात होती. आठवत असेल तर ट्रम्प यांच्या विजयासाठी रशियाने मदत केल्याची कॉन्ट्रॅव्हर्सि तयार करण्यात आली होती.
त्या नंतर पुन्हा अमेरिकेत निवडणुका जाहीर होत पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देण्याचे, वेगवेगळे आरोप करत अमेरिकन सिस्टीमला धोक्यात आणायचे प्रयत्न सुरूच ठेवले. याचीच परिणीती “ब्लॅक लाईज मॅटर” प्रकरण पण फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला भोवते आहे बघत त्याला हवा देण्याचा इमानेइतबारे कार्यक्रम तयार करण्यात आला. या अगोदर अगदी बराक ओबामा प्रशासनात पण काळ्या लोकांवर अत्याचार झाल्याचा इतिहास आहे. पण त्या वेळेस असली प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जास्त झाला होता.
या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचे काय झाले असेल तर अमेरिकन जनतेमध्ये आपल्या सिस्टीम विरोधात मत तयार करण्यात लिबारल्स यशस्वी झालेत. त्यातच कोरोनाच्या ना भूतो न भविष्यती अश्या संकटामुळे अमेरिकन जनतेला आपल्या सिस्टीम मध्ये असलेली कमतरता प्रकर्षाने जाणवली, खरे तर संपूर्ण जगातच या चिनी कोरोना संकटामुळे सिस्टीम फेल गेलेल्या पण अमेरिकन लिबारल्सने याचाही फायदा उचलायचा प्रयत्न केला.
आता या सगळ्या उचपतींचा आणि डोनाल्ड ट्रम्प साठी तयार केलेल्या जाळ्यात खुद्द लिबारल्सच फसले आहेत. समजा अमेरिकन निवडणुकांचा निकाल ट्रम्प यांच्या बाजूने लागला असता तर लिबारल्स लोकांनी हेच चाळे कदाचित या पेक्षा जास्त चाळे अमेरिकेत केले असते. मात्र अनपेक्षित पणे निकाल लिबरल्सना हवा तसा लागला आणि जे काम लिबरल्स करणार होते तेच काम आज डोनाल्ड ट्राम समर्थक करत आहे इतकेच ! बाकी या प्रकारानंतर आपल्या समोर आता नक्की काय वाढून ठेवले आहे याची जाणीव जो बिडेन यांना नक्कीच आली असणार. ज्या पद्धतीने अमेरिकन लिबरल्स या प्रकरणा थयथयाट करत आहे त्या वरून लक्षात येत आहे.
आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत झालेल्या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचे आणि संवैधानिक मार्ग सोडून आजारक माजवण्याऱ्यांवर योग्य आणि कडक कारवाई करण्याचे समर्थन केले आहे. मात्र या मुळे आता अमेरिकन रिबरल्सच्या पावलावर पाऊल ठेवण्याऱ्या आणि भारतीय केंद्र सरकार आणि सिस्टिम्सला सतत बदनाम करणाऱ्या लिबरल्स लोकांना पोटात गोळा उठला असणार. आता अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प समर्थकांवर केलेल्या कारवाईचे कौतुक करायचे तर, नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला समर्थन करणे तर होईलच, पुन्हा उद्या पंतप्रधानांनी याच असंवैधानिक प्रदर्शना करता आपल्या पण टिर्या लाल केल्या तर ? हा प्रश्न आहेच.
या सगळ्या प्रकरणात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाचे संविधान गोळीबंद आणि अश्या पद्धतीच्या संविधानिक संकट येणार नाही या दृष्टिकोनातून लिहले आहे या बद्दल आपल्या संविधान सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण ऋणी राहायला हवे. बाकी मतदान पत्रिकेवर मतदान घेऊन पण शंका राहतेच आणि मतदान यंत्राने मतदान घेतले तरी राहते हेच यातून प्रकर्षाने लक्षात येते इतकेच.