अक्साई चीनमधे २०४७ ची पूर्वतयारी ?

अक्साई चीनमधे २०४७ ची पूर्वतयारी ?

  उपग्रहाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले,अक्साई चीनमधल्या एका साईटचे काही फोटो सांप्रत सोशल मीडियावर चांगलेच गाजताहेत.राहुल गांधीं आपल्या चार मित्रांसह ऑगस्ट, २०२३च्या तिसऱ्या आठवड्यात लडाखला मोटर सायकल ट्रिपवर गेले असता त्यांनी याच फोटोंचा संदर्भ देत, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.”चीन आपल्या जमीनीवर पक्क बांधकाम/ पर्मनंट कन्स्ट्रक्शन करतो आहे तरी हे सरकार यावर काहीच कारवाई का करत नाही”असा त्या टीकेचा मतितार्थ होता.विपक्ष आणि सरकार विरोधक टीकाकारांच्या हाती हे आयत कोलीत लागल. उपग्रह फोटोंमधील साईट ही “अक्साई चीन” या,१९५३-५४ पासून चीनच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात आहे. ही साईट;लडाखमधे १९६२ पासून प्रचलित व अमलात असलेल्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या (एलएसी) पूर्वेला स्थित,अक्साई चीनमधून भारतात येणाऱ्या एका नदी/ओढ्या भोवतालच्या पहाडात आहे.”अक्साई चीन हा आमचाच आहे आणि चीननी यावर अवैध कबजा केलेला आहे” हे भारत/आपण जगाला व पर्यायानी चीनला,१९५७ पासून सांगतो आहे.
लडाखमधील देस्पांग क्षेत्राच्या साठ किलोमीटर पूर्वेला असलेल्या या साईटवर, नदीच्या दोन्हीं किनाऱ्यावरील पहाडांना फोडून,प्रचंड मोठया प्रमाणात सिमेंटचे बंकर्स आणि बोगदे (टनेल्स) बांधल्या जाताहेत हे,या उपग्रहीय फोटोंच्या विश्लेषणातून उजागर/स्पष्ट होत. ही करवाई,पीपल्स लिबरेशन आर्मीच वेस्टर्न थिएटर कमांड करत आहे. पहाडांमधे मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्यानी (अर्थ मुव्हर्स/कारव्हर्स/डिगर्स) हे काम केल्या जात आहे. या कन्स्ट्रक्शनमधे; सैनिक आणि त्यांची अवजड/मोठी हत्यार व संसाधनांना लपवण्यासाठी/भारतीय बंबार्डींगपासून वाचवण्यासाठी,अनेक रिएन्फोर्सड स्ट्रक्चर्स/शेल्टर्सच्याआणि बंकर्स बनवलेले दिसून येतात. मागील तीन चार महिन्यांमधील उपग्रहीय फोटोंची तुलना केली असताना, पहाडांमधे खोदलेल्या,अकरा बंकर्स आणि सहा स्ट्रक्चर्स/शेल्टर्सच्या छाया स्पष्ट दिसून येतात/ओळखता येतात.काही फोटो;अर्थ मुव्हर्स/ एक्स्केव्हेर्टर्स/डिगर्स/सिमेंट मिक्सर्ससारख्या अवजड यंत्रांच्या,वेगवेगळ्या ठिकाणच्या छाया/सावल्याही दर्शवतात.अशा प्रकारच बांधकाम/कन्स्ट्रक्शन, भारताचे एयर स्ट्राईक्स/दूर पल्ल्याच्या हेवी आर्टिलरी गन्सच्या माऱ्यापासून चीनी सैनिक आणि अवजड हत्यारांच्या संरक्षणासाठी केल्या गेल आहे यात शंकाच नाही.
अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा (चायनीज ओन टेरीटरी) आहे हे दाखवणारे नवे नकाशे चीननी, २८ऑगस्ट, २०२३ला प्रसिद्ध केले.भारतीय परराष्ट्रखात्यानी ते नकाशे तत्काळ अमान्य केले/फेटाळून लावलेत.”१९५४पासून चीन हेच करत आला आहे.प्रत्येक वेळी भारतात काही महत्वाच घडणार असेल त्यावेळी तो अस करतो.यावेळी,सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स बैठकीच्या अनुषंगानी त्यानी ही कारवाई केली आहे.पण,अस केल्यानी जमीनीवरील प्रत्यक्ष/खरी परिस्थिती बदलत नाही.केवळ असे विचित्र दावे (ॲब्सर्ड क्लेम्स) केल्यामुळे दुसऱ्यांची जमीन आपली होत नाही.आमची जमीन कोणती आहे हे आम्हाला नीट ठाऊक आहे” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनला खडसावल आहे.४ सप्टेंबर, २३ला,रशियन राष्ट्रपतींनी या भारतीय वक्तव्याच समर्थन केल.संरक्षणतज्ञ/ विश्लेषकांनुसार,अक्साई चीनमधल्या कारवायांमधून चीनची सामरिक व डावपेचात्मक विवशता/हतबलता (स्ट्राटेजिक/टॅक्टिकल डेस्परेशन) उजागर होते.चीनच्या तुलनेत भारतीय सेना/वायुसेनेकडे जास्त मारक क्षमता आणि ताकद (स्ट्राईक अँड एंड्यूरंस) आहे त्याच्या परिणामस्वरूप ही हतबलता/ विवशता आली आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. हा सर्व परिसर, भारतीय वायुसेना आणि हेवी आर्टीलरीच्या अचूक माऱ्याच्या टप्प्यात येत असल्यामुळे चीननी;एलएसीच्या इतक्या जवळ,पहाडांच्या आतमधे बांधकाम/कन्स्ट्रक्शन करून त्याद्वारे भारताच्या वरचष्म्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे/असणार.लडाखमधल्या गलवान येथील २०२० मधील चकमकीनंतर भारतानी या क्षेत्रातील एयर/आर्टीलरी/ मिसाईल/ रॉकेटरीच्या आक्रमक फायर पावरमधे मोठया प्रमाणात वृध्दी केली आहे. या आक्रमकतेनी चीनला, बिळात/जमीनीत जायला भाग पाडल आहे. तिबेटवरील संभाव्य भारतीय आक्रमणाला थोपवण्यासाठी चीन ही प्रतिबंधात्मक कारवाई करतो आहे. जर आपल्याला चीनमधे मोठ्या संख्येत जायचे असेल तर अक्साई चीनच्या याच क्षेत्रातून जावे लागेल. आणि या वाटेवर चीन, पहाडांच्या आत दबा धरुन बसला असेल. तिबेटमधील चीनच्या सांप्रत तैनातीतला (डिप्लॉयमेंट डॉक्ट्रीन) हा बदल लक्षणीय असून भारताच्या स्ट्रटेजिक ऍडव्हानटेजला काटशह देण्यासाठी होतो/झाला आहे.
जर चीननी तायवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर क्वाड संघटनेचा सदस्य म्हणून भारताला चीनच्या दक्षिण सीमेच उल्लंघन कराव लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनलाही याची कल्पना असल्यामुळे तो, त्या आक्रमणाच्या संभाव्य मार्गावर भारतीय सेनेला हानी पोचवण्याची तयारी, अक्साई चीनमधे करतो आहे.उलटपक्षी, जर चीनला भारतावर आक्रमण करायच असेल तर ते याच मार्गांनी होण्याची शक्यता असल्यामुळे,भारतीय एयर/आर्टी/मिसाईल/रॉकेट स्ट्राईकपासून आपले आक्रमणकर्ते सैनिक आणि संसाधनांच्या रक्षणासाठी चीन ही तयारी करतो आहे हे देखील स्पष्ट होत आहे.या दोन्ही पर्यायांमधे युद्ध सर्वकषच (फूल स्केल मिलिटरी एक्सलेशन) होईल.असे “रिएन्फोर्सड बंकर्स/शेल्टर्स” तयार केल्यामुळे, फारशी हानी न होता चीनला,अधिक काळ युद्धात टिकून राहण (बॅटल ससटेनन्स) सहज शक्य होईल.१९६२ आणि २०२०मधे चीन/पीएलए याच मार्गांनी पूर्व लडाखमधे आले होते हे लक्षात ठेवण महत्वाच आहे. धिस इज हर की रुट टू इन्कर इन इंडियन टेरीटरी.
चीन या क्षेत्रात झपाट्यानी पक्क बांधकाम/पर्मनंट कन्स्ट्रक्शन करतो आहे. या बंकर्स/शेल्टर्सची रचना (डिझाईन),बॉम्बचा “प्रेशर इम्पॅक्ट” कमी करण्यासाठी केल्या गेली आहे. एका डिफेन्स लोकॅलिटीत,किमान पाच ते आठ बंकर्स/शेल्टर्स असून,प्रत्येक लोकॅलिटी भोवती, बाहेर पडणे/ आत येण्यासाठी,पहाडात दोन ते पाच सुरंग (टनेल्स) खोदलेले/बनवलेले दिसून येतात.प्रत्येक बंकर्स/शेल्टर्सच्या वर व आजूबाजूला, बॉम्ब माऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी,मातीचे ढीग टाकलेले/उभारलेले दिसतात.खोऱ्यात असलेला एकच मार्ग/रस्ता जवळपास बारा ते पंधरा फुट रुंद करण्यात आला असून पक्का झालेला दिसतो.अक्साई चीनमधे झपाट्यानी सुरू असेल बांधकाम/कन्स्ट्रक्शन आणि अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे हे दर्शवणारे, चीननी २८ऑगस्ट, २०२३ला जारी केलेले नकाशे या वरून हे उजागर होत की चीनला, १९५४पासून सुरू असलेल्या सीमावादावर तसच २०१९पासून परत सुरू होऊन २०२०मधे/पासून चिघळलेल्या सैनिकी सीमावादावर (एक्स्टेंडेड मिलिटरी स्टँड ऑफ) तोडगा काढण्याची किंवा तो नजदिकी भविष्यात सोडवण्याची अजिबात इच्छा नाही.त्यामुळे;अक्साई चीनमधे सुरू झालेल बांधकाम/ कन्स्ट्रक्शन ॲक्टीव्हिटी हळूहळू; तिबेट आणि हिमाचल/उत्तराखंड/ सिक्कीम/ अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत तर जाणार/फैलणार नाही, ही भारतीय संरक्षणतज्ञांची आशंका निःसंशयपणे रास्त आहे अस म्हणता येईल.
२०२०-२१मधील उपग्रहीय फोटोंमधे,अक्साई चीनमधल्या वर उल्लेखित नदीखोऱ्यात फारच कमी (मिनीमल) बांधकाम/कन्स्ट्रक्शन दिसत.पण,ऑगस्ट,२०२३च्या फोटोंत तेथील परिस्थिती खूप मोठया प्रमाणावर बदललेली दिसून येते. एकीकडे;”आम्हाला भारत चीन सीमेवरील ताण लवकरात लवकर कमी करायचा आहे” अस, चीनी राष्ट्रपती, शि जिन पिंग म्हणतात.दुसरीकडे,चीनी पंतप्रधान ली क्वांग,भारतात झालेल्या ब्रिक्स कॉन्फरन्सच्या वेळी चीनी राष्ट्रपतींच्या वक्तव्याला दुजोरा देतात.राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर,”या पुढे,ईस्टर्न लडाखमधे ऑफिशियल नो पेट्रोल झोन” स्थापन करण्यात येतील अशी समन्वयी घोषणा, दोन्ही देशांच्या वरीष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांमधे झालेल्या,१९व्या शिखर बैठकीत करण्यात येते. पण, तिसरीकडे; अक्साई चीनमधल्या, भारताकडे येणाऱ्या नदीवरील सामरिक बांधकामाचे उपग्रहीय फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. या मधे,एकाचा संदर्भ दुसऱ्याला लागत नाही.फक्त एकच गोष्ट स्पष्ट होते.एलएसीच्या इतक्या जवळ, भारताकडे येणाऱ्या सामरिक मार्गावर, एवढ प्रचंड, पक्क बांधकाम/ कन्स्ट्रक्शन, हे दर्शवत की, चायना इज डिगिंग फॉर ए लाँग हॉल.या पुढे चीन; भारताच्या कुठल्याही आक्षेपांना न जुमानता किंवा आपसी संवेदना/ संबंधांची पर्वा न करता,आक्रमक सीमावादाची (अग्रेसिव्ह एलएसी पॉलिसी) कास धरेल.त्याची घसरत चाललेली अर्थव्यवस्था, तायवान/दक्षिण चीन समुद्र प्रश्नावरून अमेरिका/नाटो संघटनेशी होऊ घातलेल्या युद्धाची अपरिहार्यता आणि/किंवा वेस्टर्न पॅसिफिकमधील समुद्री मार्गाचा ज्वलंत प्रश्न, यांची तीव्रता त्याला असल भारत विरोधी पाऊल उचलण्यापासून रोखणार नाही.या पुढे पीएलए नेहमीच/सदैव खूप मोठया संख्येत सीमेवर तैनात राहील आणि भारतालाही तेच करण्यास भाग पाडेल.
जून, २०२०ची गलवान चकमक, चीनच्या आगामी सामरिक धोरणाची झलक होती अस “हाइंड साईट” मधे म्हटल्यास ते वावग होणार नाही. त्या चकमकीनंतर भारतानी लडाखमधे, खूप मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड एयर बेसेस, रोड आणि बंकर कन्स्ट्रक्शन सुरू केली आहे.आज भारतीय वायुसेना लडाखमधील फ्रंट लाईन ऑपरेशनल एयर बेसेसवरून उड्डाण भरते.२०२० पर्यंत, श्रीनगर आणि अवंतीपुर याच दोन फायटर बेसेस होत्या. थोड्याच दिवसांपूर्वी आपण, पॅनगोंग सरोवरा जवळच्या न्योमा रनवेचा विस्तार करून तेथून फायटर जेटसची उड्डाण सुरू केली आहेत. यामुळे, एलएसीपासून केवळ ५० किलोमीटर अंतरावरून भारतीय फायटर जेट भरारी घेताना दिसतात.लेहला दौलत बेग ओल्डिशी जोडणारा, ऑल वेदर,दरबुक श्योक डीबीओ रोड ही त्यातली सर्वात मोठी उपलब्धी आहे.आजतायगत, भारतीय वायुसेना; डीबीओमधील इन्फन्ट्री/आर्मर्ड ब्रिगेड, मेकनाइज्ड कॉलम आणि अडव्हांस एयर बेसला हत्यार, गोळाबारुद आणि राशन, हेलिकॉप्टर/विमानांद्वारे पुरवत असे. आता हेच काम वरील रोड द्वारे होईल.
एक मात्र वाचकांनी लक्षात घेण आवश्यक आहे ते म्हणजे, अक्साई चीन हा भूभाग, १९५४पासून चीनी अधिपत्याखाली आहे. तेंव्हापासून चीन,”तिबेटप्रमाणेच ही देखील आमचीच भूमी आहे” हा राग आळवतो आहे. आपल्याला आवडो किंवा नावडो, आजमितीला त्या क्षेत्रावर चीनची हुकूमत चालते. त्यामुळे, चीन अक्साई चीनमधे त्याला वाटेल ते करू शकतो.ज्या प्रमाणे चीन, लडाखमधील भारतीय कारवाया थांबवू शकत नाही त्याच प्रमाणे भारतही, अक्साई चीनमधल्या त्याच्या कारवायांना प्रतिबंध घालू शकत नाही. त्यामुळे, चीनच्या युद्ध सज्जतेला तोंड देण्यासाठी आपल्यालाही सदैव युद्ध सज्ज रहाण अत्यावश्यक आहे. लडाख व अरुणाचल प्रदेशातील डिफेन्सेस सदैव अद्ययावत राखण, त्यात सतत सुधारणा करण आणि लष्कराला अत्याधुनिक हत्यार व संसाधन देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. हे करतांना, चीनच्या प्रत्येक मनोवैज्ञानिक वाराला योग्य तो प्रतिसाद देण, जागतिक पातळीवर त्याचा निषेध करण हे देखील सुरू ठेवल पाहिजे. नाही तर, १९५४मधे झाल तस होईल. त्यावेळी, चीननी अक्साई चीन अवैध रित्या हस्तगत केला हे प्रकरण आपण लगेच संयुक्त राष्ट्र संघात नेल नाही, चूप बसलो आणि अक्साई चीनवरील चीनचा कबजा दृढ होत गेला.त्यामुळे, शेवट पर्यंत मुत्सद्देगिरीचा अवलंब करत आपल्याला चीनी खुरापतीला योग्य भाषेत उत्तर द्यावे लागेल.
चीन; लडाख व अरुणाचल प्रदेशावरील दावा/ सामरिक दबाव कधीही सोडणार नाही किंवा कमी करणार नाही. डिसेंबर, २०२२मधे, चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्लेनरी सेशनमधे,राष्ट्रपती शि जिन पिंगनी आगामी तीस वर्षातील “चाईनीज शेड्युल/स्केड्युल ऑफ वॉर” विषद केल होत.चीन, कुठल्या देशाचा भूभाग केंव्हा पर्यंत काबीज करेल याचा आराखडा त्यांनी सीपीसी समोर मांडला.त्यात,तायवान अग्रस्थानी असून,भारत पाचव्या स्प्रायोरिटीवर आहे.त्या कार्यक्रमानुसार चीन,२०४७ पर्यंत लडाख व अरुणाचल प्रदेश हस्तगत करेल.त्यासाठी चीननी तिबेटच्या अक्साई चीनमधे आता पासूनच तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगानी भारताला देखील योग्य ती पाऊल उचलावी लागतील. भारत चीन युद्धासाठी आपली सेना नेहमीच सज्ज/तयारच असते.१९६२ (लडाख आणि नेफा),१९६७ (नाथु ला, सिक्कीम सेक्टर),१९८७ (सुंद्रांग चू, तवांग सेक्टर) २०१४ (डोकलाम, भूतान सेक्टर) आणि २०२० (गलवान, लडाख) या वेळी आपल्या सेनेच्या तयारीची प्रचिती आली आहे.१९६२ सोडता, बाकी चारही ही वेळा भारतीय सेना पीएलएवर भारी पडली.या वेळीही;ही बातमी मिळाल्यानंतर, भारतीय वायुसेनेनी सप्टेंबर २३च्या पहिल्या आठवड्यात चीन पाकिस्तान सीमेवर केलेला युद्धाभ्यास,हा दिल्लीत होणाऱ्या जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला अस प्रसार माध्यमांमधे आल असल तरी तो केवळ त्याच कारणास्तव केल्या गेला किंवा अक्साई चीनमधील घडामोडींनंतर केवळ योगायोगानी झाला अस म्हणणंही धाडसाच असेल.
वुई कॅन टेक ऑन चायना ऍनी टाईम. पण, हे करायच की नाही आणि केंव्हा करायच हे सरकारला ठरवाव लागेल आणि त्याला अनुसरून सेनेची युद्ध क्षमता वृद्धिंगत करावी लागेल. अक्साई चीनमधे सुरू असलेल्या पीएलए बांधकाम/कन्स्ट्रक्शनमधून हा फोर थॉट, दूरदृष्टीनी आखलेल धोरण आणि त्याचा राबता उजागर होतो. भारतालाही या पुढे हेच कराव लागेल.काळानुसार धोरण आखणी युद्धासाठी अतिशय महत्वाची असते, त्याला पर्याय नसतो हे विसरून चालणार नाही.

१६, भगवाघर कॉलनी, धरमपेठ,नागपूर,१०.

abmup54@ gmail.com

कर्नल अभय पटवर्धन ( निवृत्त )

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Comments (0)
Add Comment