बाबा मला काठी चालवायला शिकायचं आहे. ..!
अकरा वर्षाची असलेली परी अचानक आपल्या बाबाला म्हणाली बाबा. .बाबा मला काठी चालवायला शिकायचं आहे हो,मला काठी चालवायला शिकवा नं तिच्या मुखातून असे शब्द बाहेर पडताच तिच्या बाबाला आश्चर्य वाटले. आणि ते,विचारु लागले बेटा अचानक तुला काय झालं. .? काठी चालवणे या विषयावर का बरं बोलून राहिली. तुला तर “गरबा, दांडिया” खेळायला, शिकायला आणि बघायला खूप आवडते मग आज अचानक काठी चालविण्याच्या विषयावर का बरं बोलून राहीलीस मला कळले नाही जरा स्पष्टपणे सांगशील का…? तेवढ्यात परी म्हणाली अहो, बाबा अनेक वर्षापासून आमच्या देशात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ती जगावेगळी आहे. याचा मला फार अभिमान आहे. उरला प्रश्न दांडिया आणि गरबा खेळण्याचा तसेच शिकण्याचा ते, मला या दोन, तीन वर्षापर्यंत खूप आवडत होतं पण,आता मात्र ते, मला अजिबात आवडत नाही. हे, ऐकून तिच्या बाबांनी पुन्हा प्रश्न केला बेटा तो, तर तुझा आवडता खेळ होता आणि ती तुझ्यात कला होती आज अचानक का बरं नको वाटायला लागलं..? परी तेवढ्यात बोलली बाबा ती, कला आहे त्या कलेचा मी सन्मान करते पण,मला त्या कले पेक्षा स्वतः चे रक्षण कशाप्रकारे करता येईल हे, जास्त महत्वाचे वाटते. कारण आजकाल बघितले तर दिवसेंदिवस दोन वर्षाच्या मुलींवर तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत. एवढेच नाही तर मुलगी गर्भात सुद्धा सुरक्षित नाही. मला असं वाटतं की, माझे संरक्षण मी स्वतः करण्यासाठी संक्षम बनली पाहिजे. त्यासाठी मला गरबा खेळायचं नाही तर इतर खेळ शिकायला आवडेल जेणेकरून ते, माझ्या भविष्यात कामी येतील.
कारण गरबा हे, भलेही कला असेल आणि आहे पण,त्यातून फक्त मनोरंजन होत असते, आनंद घेतला जातो, सजणे, सवरणे होते आणि बसं तेवढ्यातच समाधान मानल्या जाते. मला वाटते की, या मनोरंजनाच्या साधनात वेळ घालविण्यापेक्षा स्वतः चे संरक्षण कशाप्रकारे करता येईल ,हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे वाटते यासाठी मला गरबा शिकायचं नाही तर काठी चालवायला शिकायचं आहे. परीचे हे, महान शब्द ऐकून तिचे बाबा गहिवरून गेले. त्यांना परीचा अभिमान वाटू लागला. त्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आणि म्हणाले बेटा, मला काठी चालवता येत नाही. त्यावर परी म्हणाली बाबा आपल्या पेक्षा मला दुसरे गुरू शोधूनही सापडणार नाही. आपणच माझे गुरू आहात आणि कायम रहाल उद्यापासून मला काठी चालवायला शिकवा.
बेटा ठीक आहे म्हणून तिच्या बाबांनी होकार दिला आणि दोघेही बापलेक पहाटेला पाच वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात केली. तिचे बाबा तिला काठी कशाप्रकारे चालवली जाते ते, पूर्ण लक्ष देऊन शिकवू लागले. आणि परी सुद्धा मोठ्या आवडीने काठी चालवणे शिकू लागली. हळूहळू काठी चालविणे शिकण्याबरोबरच तिच्यात हिंमत येऊ लागली, तिच्यात परिवर्तन होऊ लागले. कुठेतरी तिचे बाबा मनाच्या एका कोपऱ्यात आनंदीत होऊन बघत होते कारण, एवढ्या लहान वयात मुलीला आजचे जग कळले हे, त्या बापासाठी सर्व काही होते म्हणून दररोज पहाटे पाच वाजता उठून आपल्या मुलीला काठी चालवणे शिकवू लागले. वास्तविक बघता ह्या, बापलेका कडून आजच्या समाजाला खूप मोठा संदेश मिळतो.
कारण, आजच्या प्रत्येक बापाला आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची काळजी लागलेली दिसत आहे. मुलगी एकदा घरातून बाहेर पडली की, ती घरी येईपर्यंत मायबाप चिंतीत असतात ही, आजची भयानक वास्तव परिस्थिती आहे. आणि याच वास्तव परिस्थितीला ओळखून अकरा वर्ष वय असणारी परी जेव्हा, स्वतः च्या संरक्षणासाठी काठी चालविण्याचा हट्ट बापासमोर करत आहे म्हणजेच ती मुलगी जगाला ओळखत आहे. या धरतीवर देवीला पूजतात मात्र तिच्याच लेकीवर अत्याचार केला जातो,तिची अब्रू लुटली जाते,तिचा बळी घेतला जातो,तिची नग्न धिंड काढली जाते, तिचा अमानुषपणे छळ केला जातो, तिचा हुंड्याच्या लालसेपोटी जीव घेतला जातो, एवढेच नाही तर तिला आत्महत्या करण्यापर्यत तिचे हाल केले जातात.हे, आजच्या महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत दररोज घडत असणाऱ्या घटना बघून कदाचित छोटीशी ती परी जागी झाली असावी. तिच्या डोक्यात प्रकाश पडला असावा म्हणून आज तिने नुसते मनोरंजनाच्या साधनाकडे न वळता स्वतःचे रक्षण कशाप्रकारे करता येईल याकडे तिने आपली वाटचाल सुरू केली आहे खरोखरच त्या मुलीचे महान विचार हे, अनेक मुलींसाठी एकदिवस प्रेरणादायी ठरतील आणि उशीरा का होईना मुली, महिला जागतील आज जर प्रत्येक मुलींनी या परीसारखे विचार अंगिकारले तर झाशीची राणी लक्ष्मीबाई बनायला जास्त वेळ लागणार नाही. पण,शोकांतिका म्हणावे लागेल की, महिलांच्या व मुलींच्या बाबतीत एवढे काही घडताना सुद्धा त्या मुली, महिला पूर्णपणे जाग्या होत नाही उलट दुसऱ्याला नाव ठेवण्यात दंग असतात. आणि मग काही घडले की, मेणबत्ती पेटवून निषेध करतात . त्या आधी आजच्या महिलेला किंवा मुलीला आजची परिस्थिती बघून नेमकं काय शिकायचं आहे किंवा काय करायचं आहे त्यावर विचार करणे काळाची गरज आहे. कारण, दुसऱ्याच्या भरोशावर राहून सर्वच काम होत नाही तर स्वतः सुद्धा त्यासाठी काहीतरी घडवून आणावं लागतं जशी त्या छोट्याशा परीने काठी शिकण्याचा संकल्प करून आज प्रयत्न करत आहे ही, खूप मोठी अभिमानाची बाब आहे.
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५