पुस्तक परिचय – बेल भंडारा.

लेखक - डॉ. सागर देशपांडे.

पुस्तक परिचय – बेल भंडारा.

लेखक – डॉ. सागर देशपांडे.

लेखक, डॉ.सागर देशपांडे यांनी अवघ्या ३६६ पानांत हा अनोखा बेल-भंडारा अतिशय मनोभावे आणि अद्भुत रित्या उधळला आहे. हा बेल-भंडारा आहे…राजमाता सुमित्रा राजे भोसले यांनी गौरविलेल्या ‘शिवशाहिरा’च्या आठवणींचा ! हा बेल-भंडारा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ब्रह्मांडा पल्याड पोहोचविण्याचा ध्यास घेणाऱ्या ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ या ऋषितुल्य इतिहास संशोधकाच्या आठवणींचा !!! या बेल-भंडाऱ्याचं मळवट प्रत्येक भारतीयानं आपल्या कपाळी मोठ्या अभिमानाने मिरवावं असंच आहे.

‘बाबासाहेब पुरंदरे’ हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याची पावती म्हणून त्यांना सरकारने तसेच अनेक खाजगी संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. तर असं हे व्यक्तिमत्त्व ‘घडतं’ कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं. त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल.ही आहेत. परंतु बाबासाहेबांनी फारसं कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिलेत. पण या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ. सागर यांनी एक खूप मोठी उपलब्धी आपल्या सर्वांच्या पदरात टाकली आहे. या पुस्तकांतून बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं असं काही दर्शन वाचकाला घडतं की वाचताना अनेक ठिकाणी आपण आपल्याही नकळत विचारांतमध्ये गुरफटतो. असा विचार नक्की मनात येतो की एका व्यक्तीत एवढे गुण कसे काय असू शकतात? एवढी मोठमोठ्ठाली अशक्यप्राय वाटणारी कामं बाबासाहेब कसे काय यशस्वी करून दाखवतात ? बाबासाहेब सर्वोत्तम वक्ता आहेत, लेखक आहेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे निर्माते आहेत व सर्वात मुख्य म्हणजे कुशल संघटक आहेत…जे करतात ते सर्वोत्तम दर्जाचे असते. हे सगळं एका व्यक्तीला एकाच जन्मात कसं काय शक्य आहे या विचारांनी वाचक ठायीठायी हरवतो..मग वाटतं ‘बाबासाहेब म्हणजे एक अद्भुत चमत्कारच असावेत’! अशा या आपल्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा जीवनप्रवास मर्यादित पानांत आपल्यासमोर मांडणं म्हणजे एकप्रकारे लेखकासमोर ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखंच होतं‌. ते त्यांनी आई भवानीच्याच आशिर्वादाने उत्तमरित्या पेललं आहे.

बाबासाहेबांच्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते आणि समजतं की किती मोठ्या घराण्याची पुण्याई बाबासाहेबांच्या शिवकार्याच्या पाठिशी प्रथमपासूनच उभी आहे. या पुस्तकात बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात (पान क्र.३३७) “पुरस्कार पूर्वीच्या काळीही दिले जात असत. पहिला पुरस्कार शहाजीराजांनी दिल्याचा उल्लेख आहे आणि तो देण्यात आला होता, महादेवराव दिनकरराव पुरंदरे यांना. माझे ते पूर्वजच. पुण्यातला साडेतेरा एकराचा भूखंड त्यांना इनाम देण्यात आला होता.” आपल्या पूर्वजांची परंपरा बाबासाहेबांनी किती समर्थपणे पुढे चालू ठेवली आहे हे आपण पहातोच आहोत.

बाबासाहेबांच्या घरातील खानदानी वातावरण, वागण्याबोलण्यातील अदबशीरता, विनम्रता, थोरामोठ्यांची ऊठबस व त्यातून घडत गेलेलं बाबासाहेबांचं संस्कारशील व्यक्तिमत्त्व लेखक अलवारपणे टप्प्याटप्प्याने उलगडत जातो. बाबासाहेबांच्या लहानपणच्या आठवणींत, त्यांच्या जडणघडणीत भावे हायस्कूलचा व तेथील शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे हे ते आवर्जून सांगतात. त्या सगळ्या गमतीशीर आठवणी मुळांतून वाचण्यासारख्या आहेत.

बाबासाहेबांचं तरूणपणीच भारत इतिहास संशोधन मंडळातील रमणं, तासनतास जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांचा धांडोळा घेणं, त्यावरील विक्षिप्त पण दिग्गज इतिहास संशोधकांबरोबरील चर्चा, त्यांची मेहनत, झपाटलेपण खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. हे सर्व इतिहास संशोधक एका ध्येयाने पछाडलेले आहेत. बाबासाहेबांची मेहनत तर विचारूच नका‌‌. कुठे कुठला एखादा जुना कागद उपलब्ध आहे हे कळताच हे धावत सुटायचे. अंतर, काळवेळाचा विचार न करता, वेळप्रसंगी पावसापाण्यातही कित्येक मैल सायकल रपेट करायचे. समाधान फक्त एकच असायचं महत्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज गवसल्याचं !

प्रस्तुत पुस्तकाचा आकार ऐसपैस असून फॉन्ट साईज अगदी रिडेबल आहे. आवश्यकतेनुसार कृष्णधवल व रंगीत पानांच्या वापराने हे पुस्तक सुरेख नटलेलं आहे. त्यामुळे वाचताना नेत्रसुखद वाटते. शिवाय मला या पुस्तकांतील सगळ्यात जास्त जर काही आवडलं असेल तर ते म्हणजे अत्यंत दुर्मिळ फोटोंनी हे पुस्तक सजलेलं आहे. बाबासाहेबांच्या जन्मकथेपासूनचे फोटो यांत असल्याने बाबासाहेबांची विविध टप्प्यांवरील छबी, त्यातील बदल आपल्याला पहायला मिळतात. बाबासाहेबांचा जन्म जिथे झाला त्या शिर्के वाड्याचा परिसरही फोटोत पहायला मिळतो. अनेक दिग्गजांबरोबर चे फोटो यांत आहेत. लता मंगेशकर, संपूर्ण मंगेशकर कुटुंब, इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, शंकरराव जोशी, डॉ.जस्टिन ॲबट, तात्यासाहेब खरे, बाबूजी, गदिमा, द.मा.मिरासदारांसारख्या साहित्यिकांसोबतचे फोटो, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांसारख्या राजकीय नेत्यांसोबत चे फोटो, त्याचबरोबर दादरा नगर हवेली च्या विजयाच्या वेळचे फोटो, डॉ.भटकर, डॉ रघुनाथ माशेलकर यांसारख्या ख्यातनाम शास्त्रज्ञांसोबतचे फोटो, भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांसह रायगडावरील फोटो अशा अनेक उत्कृष्ट फोटोंमुळे हे पुस्तक अधिक मौल्यवान झालेलं आहे.

बाबासाहेबांनी शिवचरित्र मांडण्यासाठी ज्या ज्या वाटा धुंडाळल्या त्या सर्वच क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीचा आढावा यात घेतला आहे. बाबासाहेबांची शिवभक्ती, त्यांचे इतिहासप्रेम अगदी लहानसहान गोष्टींतूनही जाणवत रहाते. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले. आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहारलेले राष्ट्रप्रेमाचे मळे उभे राहिले.

‘सामांपातु सरस्वती…अशी प्रार्थना करून, आई तुळजाभवानीचं स्मरण करून आणि शिवछत्रपतींचा जयजयकार करून एकदा का बाबासाहेबांच्या मुखातून शिवगाथा सुरू झाली की आमचं देहभान हरपून जातं’, असं सांगणाऱ्या चार पिढ्या तरी महाराष्ट्रात सापडतील.

‘राजा शिवछत्रपती’ हा महाग्रंथ, ‘जाणता राजा’ हे महानाट्य, ‘शेलार खिंड’ सारखी अप्रतिम शब्दकळा असलेली कादंबरी आणि अन्य ग्रंथसंपदा, तमाम शिवभक्तांना राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारी त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं…या सगळ्या खटाटोपांतून बाबासाहेबांनी एक इतिहासच घडवला‌. आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत हा इतिहास तर पोहोचला पण या इतिहासामागचा इतिहास? तो कसा घडला ? तो या पुस्तकातून उमगतो !

बाबासाहेबांनी अनेक मानापमान सहन केले आहेत. बाबासाहेबांचा अपमान करायचा कोणीही प्रयत्न केला तरी त्यांनी स्वतःच्या चित्ताची शांतता कधीही ढळू दिली नाही परंतु कुणी शिवप्रतिष्ठेला एवढा जरी धक्का लावला तर कधी खपवून घेतले नाही. बाबासाहेब म्हणतात, ‘इतिहासात चंदनही खूप आहे आणि कोळसाही खूप आहे. आपण चंदन उगाळू या. कोळसा नको. चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको.’

बाबासाहेबांनी आयुष्यभर एकच ध्यास घेतलाय… शिवचरित्र ब्रह्मांडा पल्याड पोहोचविण्याचा ! ते म्हणतात, ” शिवचरित्र घराघरांत गेलं पाहिजे, मनामनात गेलं पाहिजे, इतकंच नव्हे तर ज्या आमच्या मायभगिनी गर्भवती असतील, त्यांच्या गर्भापर्यंत गेलं पाहिजे…जन्माला येतील ते अभिमन्यूच!”

ज्यावेळी महाभारतात रणांगणावर दोन्ही सेना उभ्या राहिल्या त्यावेळी गलितगात्र झालेल्या अर्जुनाची विजिगिषूवृत्ती जागृत होण्यासाठी भगवंताने गीता सांगितली. जेव्हा शब्दांनी अर्जुनाचा भ्रम दूर झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्यास विश्वरूप दर्शन दिले. मात्र ते रूप इतके विराट होते की ते पहाण्याचे सामर्थ्य अर्जुनाच्या डोळ्यांमध्ये नव्हते. मग त्यासाठी भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि त्यामुळे अर्जुनाला ईश्वराच्या भव्य विश्वरूपाची अनुभूती घेता आली. अगदी याचप्रमाणे, आपल्या अफाट सामर्थ्याने ‘स्वराज्य’ निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगतामध्ये मोठे आहेतच. परंतु ते किती मोठे आहेत हे समजण्याची ताकद या मराठी माणसांतच नव्हती. ते त्यांचं मोठेपण समजण्यासाठी महाराष्ट्राला मिळालेली दिव्य दृष्टी म्हणजे ‘बाबासाहेब पुरंदरे’ !!!

आपल्या सुदैवानं बाबासाहेब यंदाच्या म्हणजे २०२१ च्या नागपंचमीला १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. अशा वेळी, या पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. चला तर हे पुस्तक वाचून आपण समृद्ध होऊ या आणि बाबसाहेबांना द्विशताब्दी आयुष्य लाभो अशी आई भवानीला प्रार्थना करू या.

गौरी शेटे

लेखिका ह्या समीक्षक म्हणून सुपरिचित असून १९९९ पासून इतिहास प्रेमी मंडळाच्या संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था आपला दैदिप्यमान इतिहास विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. कॉलेजच्या दिवसांत Earn and Learn करत शिक्षण पूर्ण करून गेली १५ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी (HR, ISO-MR) केली आहे. सध्या उद्योजिका आहेत. २०१६ पासून स्वत:चे पूर्ण वेळ 'रुचिरांगण' हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालवतात. ईमेल - sairama.shete@gmail.com

Comments (3)
Add Comment
  • Aruna Sandesh Ubhe

    अतिशय सुरेख शब्दात गौरी शेटे यांनी बेल भंडारा या पुस्तकाचा परिचय केला आहे. गौरी शेटे यांना अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • CHAITANYA SHREEKANT BHALERAO

    अतिशय मांडणीपूर्वक परिचय घडवला आहे. आता पुस्तक वाचायची ओढ लागलीये.

  • Asha

    गौरीने अतिशय समर्पकपणे पुस्तक परिचय करून दिला आहे. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण केली तिच्या शब्दमांडणी मुळे!